जर तुम्ही लघवीला येणाऱ्या दुर्गंधीने त्रासले असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे.
लघवीला वास येण्याची निरनिराळी कारणे जाणून घेण्यासाठी तसेच त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
लघवी किंवा युरीन हा शरीरातील टाकाऊ पदार्थ आहे. शरीरातील अशुद्धी, टॉक्सीन्स युरीनवाटे बाहेर टाकले जातात. त्यामुळे युरीनला हलका दुर्गंध येणे ही कॉमन गोष्ट आहे. विशेषत: सकाळच्या पहिल्या युरीनला हलका अमोनिया सारखा वास येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे.
परंतु लघवीला त्याहीपेक्षा जास्त वास येणे, असह्य दुर्गंधी येणे हे मात्र आरोग्याच्या तक्रारीचे लक्षण असू शकते. एखाद्या प्रकारचे युरीन इन्फेक्शन किंवा डीहायड्रेशन झाले की लघवीला वास येऊ शकतो.
त्यामुळे जर सतत लघवीला दुर्गंधी येत असेल आणि आरोग्यविषयक इतरही काही तक्रारी वाढताना दिसत असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आज आपण लघवीला दुर्गंधी येण्याची काही कारणे पाहुयात
लघवीला दुर्गंधी येण्यामागे आरोग्यविषयक तक्रारी तर असतातच परंतु काही वेळा इतरही कारणे असू शकतात जसे की डीहायड्रेशन, काही औषधांचे साइड इफेक्ट किंवा युरीन मध्ये असणारे काही विटामिन्स.
१. कॉन्सन्ट्रेटेड यूरीन
जेव्हा शरीरातून बाहेर टाकली जाणारी लघवी खूप जास्त प्रमाणात संपृक्त (कॉन्सन्ट्रेटेड) झालेली असते तेव्हा अशा लघवीला एक प्रकारचा तीव्र वास येतो. या लघवी मध्ये खूप जास्त प्रमाणात अमोनिया आणि अतिशय कमी प्रमाणात पाणी असते.
कॉन्सन्ट्रेटेड युरीन होण्याचे प्रमुख कारण डीहायड्रेशन हेच असते. जेव्हा एखादी व्यक्ती पुरेशा प्रमाणात पाणी पीत नाही तेव्हा त्या व्यक्तीला ही समस्या उद्भवते. सकाळची पहिली लघवी अशा प्रकारची कॉन्सन्ट्रेटेड असू शकते.
एखादी व्यक्ती डीहायड्रेशनने ग्रस्त असते तेव्हा खालील लक्षणे दिसतात
- तोंड कोरडे पडणे
- थकवा, अशक्तपणा
- स्नायू कमकुवत आणि शिथिल होणे
- डोकेदुखी
- चक्कर येणे
डीहायड्रेशन असलेल्या व्यक्तीने पुरेशा प्रमाणात पाणी पिऊन देखील वरील लक्षणे कमी होत नसतील तर किडनी इन्फेक्शन झालेले असू शकते. त्यावर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२. खाण्याचे पदार्थ
अन्नपदार्थांमुळे आपल्या शरीराचे पोषण होते. शरीरात अन्नाचे पचन झाल्यानंतर त्यातील टाकाऊ भाग लघवीद्वारे आणि मलाद्वारे शरीराबाहेर टाकला जातो. अन्नाचे पचन जर योग्य प्रकारे झाले नाही तर त्यापासून निर्माण झालेल्या युरीनला दुर्गंधी येऊ शकते.
काही विविक्षित पदार्थ खाल्ल्यामुळे लघवीला दुर्गंधी येऊ शकते. या पदार्थांमध्ये कांदा, लसुण, तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ यांचा समावेश होतो.
३. काही औषधे आणि सप्लीमेंट्स
विशिष्ट प्रकारच्या औषधे आणि सप्लीमेंट्सच्या सेवनाने देखील लघवीला दुर्गंधी येऊ शकते. ती औषधे आणि सप्लीमेंट्स खालील प्रमाणे
- विटामिन बी, थायमिन आणि क्लोरिन यांचा हाय डोस
- विशिष्ट प्रकारचे अँटिबायोटिक्स
- मधुमेहावरील औषधे
- कॅन्सर वरील ट्रीटमेंट साठी केली जाणारी केमोथेरपी
या सर्वांमुळे लघवीला दुर्गंधी येऊ शकते.
४. काही विशिष्ट आजार किंवा वैद्यकीय लक्षणे
आरोग्यविषयक काही तक्रारी किंवा आजारांमुळे युरीनला दुर्गंधी येऊ शकते. अशा आजारांवर औषधोपचारांची गरज पडते.
१. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन
मूत्राशय किंवा मूत्र मार्गामध्ये बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाले की हा त्रास होऊ शकतो. लघवीला दुर्गंध येण्याव्यतिरिक्त युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची लक्षणे खालील प्रमाणे
- लघवी करताना वेदना होणे
- वारंवार लघवी करावी लागणे तसेच लघवी करताना घाई होणे
- लघवी करून झाल्यानंतर शरीरावाटे संपूर्ण लघवी बाहेर टाकली गेली आहे असे न वाटणे
- गडद रंगाची लघवी
- लघवी वाटे रक्त पडणे
- ताप येणे
- पाठ दुखी
अशी लक्षणे आढळल्यास त्यावर औषधोपचार घेणे आवश्यक आहे. लवकर उपचार घेतले नाहीत तर इन्फेक्शन वाढण्याचा धोका असतो.
२. स्त्रियांना होणारे योनीमार्गातील इन्फेक्शन
जर स्त्रियांना योनीमार्गात बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाले असेल तर त्यांच्या लघवीला दुर्गंधी येऊ शकते. त्याच प्रमाणे खालील आणखी काही लक्षणे दिसून येतात….
• योनीमार्गात वेदना
• खाज
• लघवी करताना जळजळ होणे
• अंगावरून पांढरे जाणे
अशी लक्षणे आढळल्यास स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
३. मधुमेह
मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या लघवीला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. रक्तातील साखर नियंत्रणात नसण्याचे ते लक्षण असते.
काही लोकांच्या लघवीला गोडसर वास येतो. त्याच प्रमाणे वारंवार लघवीला जावे लागणे, खूप तहान लागणे अशी लक्षणे देखील दिसतात.
मधुमेह झालेल्या व्यक्तींना रात्रीच्यावेळी जास्त प्रमाणात लघवीसाठी उठावे लागते.
४. शरीरातील विशिष्ट अवयवांचे काम बंद पडणे
शरीरातील मलमूत्र विसर्जनाचे काम करणारे अवयव जर काही आजाराने योग्य प्रकारे काम करू शकत नसतील तर लघवीला दुर्गंधी येण्याचा त्रास होऊ शकतो. किडनी इन्फेक्शन किंवा किडनी फेल्युअर झाले असल्यास अशी लक्षणे दिसतात.
५. गरोदरपणा
गरोदर असणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे लघवीला दुर्गंधी येण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
अशा परिस्थितीत स्त्रियांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचा धोका देखील जास्त असतो.
त्यावर वेळीच औषधोपचार करून घेणे आवश्यक असते अन्यथा होणाऱ्या बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो.
तर ही आहेत युरीनला दुर्गंधी येण्याची निरनिराळी कारणे.
युरीनला दुर्गंधी येऊ नये काय करता येईल ते आपण आता पाहूया…
१. भरपूर प्रमाणात पाणी पिणे. दिवसभरात कमीत कमी १० ते १२ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. त्यामुळे शरीरातील अशुद्धी तर बाहेर टाकली जातेच शिवाय किडनी आणि मूत्रमार्गाचे आरोग्यही चांगले राहते
२. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. आहारात कांदे, लसूण यांचा समावेश कमी प्रमाणात असावा.
३. जर कोणती औषधे किंवा सप्लीमेंट्स घेत असाल तर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यात योग्य तो बदल करून घ्यावा.
४. मद्यपान करू नये.
५. लघवीला जाण्याची भावना निर्माण होताच ताबडतोब बाथरूममध्ये जावे. लघवी फार वेळ रोखून धरणे आरोग्याला घातक असते.
६. मधुमेह असणाऱ्या लोकांनी रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवावी..
७. संतुलित आहार घेणे तसेच नियमित व्यायाम करणे या गोष्टी करून एक चांगली जीवनशैली स्वीकारावी.
तर मित्र मैत्रिणींनो, या साध्या साध्या उपायांनी आपण युरीनला दुर्गंधी येणे रोखू शकतो.
तसे तर नियमित पाणी पिण्यामुळे आणि वेळोवेळी युरीन शरीरातून बाहेर टाकली गेल्यास हा त्रास निघून जाऊ शकतो.
परंतु दीर्घकाळ किंवा वारंवार असा त्रास होत असेल तर टाळाटाळ न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करून घेणे आवश्यक असते. अन्यथा सुरुवातीला छोट्या प्रमाणात असणारे हे दुखणे गंभीर स्वरूप धारण करू शकते.
म्हणूनच लेखात दिलेल्या माहितीचा वापर करून आपले आरोग्य सांभाळा. स्वस्थ राहा आनंदी राहा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.