नवीन लग्न झालेली एखादी मुलगी काही दिवसांनी भेटली की सगळे सहजपणे तिला “लग्न छान मानवलंय हं” असे म्हणतात. खरोखरच लग्न झाल्यावर महिलांचे वजन वाढते असे दिसून येते. परंतु त्यामागे अनेक कारणे असतात. ती कारणे आज आपण जाणून घेऊया.
एका सर्वेनुसार असे आढळून आले आहे की लग्नानंतरच्या पहिल्या पाच वर्षात महिलांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. त्यामुळे सुमारे ८२ टक्के महिलांचे वजन ५ ते १० किलोंनी वाढते.
कोणत्याही व्यक्तीचे वजन अचानक वाढण्यामागे मानसिक आणि शारीरिक अशी दोन्ही कारणे असतात. लग्नानंतर महिलांचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. त्यामुळे त्यांच्यामध्ये होणाऱ्या इतर बदलांबरोबरच त्यांचे वजन देखील वाढते.
१. अपुरी झोप
प्रत्येक निरोगी व्यक्तीला रात्री किमान सात ते आठ तास झोप मिळणे शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक असते. अशी झोप न मिळणे हे वजन वाढीचे प्रमुख कारण असते. लग्न झाल्यानंतर घरातील परिस्थिती बदलल्यामुळे उशिरापर्यंत घरातील कामे करणे, झोपण्याची जागा नवी असणे, सकाळी लवकर उठावे लागणे ह्या कारणांमुळे महिलांची झोप अपूर्ण राहते. अशा अपूर्ण राहणाऱ्या झोपेमुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढू लागते. ते टाळण्यासाठी महिलांनी कामाचे नियोजन नीट करून झोप पूर्ण करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
२. हॉर्मोन्सचे असंतुलन
वजनवाढीसाठी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन हे देखील एक प्रमुख कारण आहे. लग्नानंतर तर आधीची जीवनशैली अचानक बदलल्यामुळे महिलांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक बदल होतात. अशा बदलांमुळे देखील त्यांचे वजन वाढू शकते.
३. वाढते वय
वाढत्या वयाबरोबर शरीराचा चयापचय म्हणजेच मेटाबोलिजमचा रेट कमी होतो. त्यामुळे शरीरातील चरबी वितळण्याची प्रोसेस हळू होते. त्यामुळे अर्थातच वजन वाढू लागते. वय वाढले की होणाऱ्या या समस्येची सांगड लग्नाशी घातली जाते. खरे तर वाढत्या वयाबरोबर वजन वाढत असते परंतु सहजपणे लग्न झाले की स्त्रियांचे वजन वाढते असे समजले जाते.
४. सामाजिक दबाव कमी होतो
लग्न होईपर्यंत मुलींच्या मनावर बारिक आणि सुडौल दिसण्याचा एक प्रकारचा दबाव असतो. घरचे लोक, नातेवाईक, मैत्रिणी अशा सर्वांच्याच अपेक्षा त्या मुलीने वजन आटोक्यात ठेवून सुंदर दिसावे अशा असतात. परंतु एकदा लग्न झाले की या अपेक्षा उरत नाहीत. त्यामुळे नकळतपणे स्त्रियांच्या मनावरील ताण कमी होऊन त्या रिलॅक्स होतात आणि त्यांचे वजन वाढू लागते. वजन आटोक्यात ठेवण्याची गरज वाटेनाशी झाल्यामुळे तसे प्रयत्नही केले जात नाहीत. त्याचा परिणाम अतिरिक्त वजनवाढीत होतो.
५. व्यायामाचा अभाव
लग्न झाल्यावर नवीन कुटुंबाशी जुळवून घेताना स्त्रियांना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ उरत नाही. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता त्या स्वतःसाठी थोडासुद्धा वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे आवर्जून व्यायाम करण्याकडे लक्ष दिले जात नाही. मोकळा असलेला वेळ बैठ्या कामांमध्ये किंवा मनोरंजनासाठी टीव्ही पाहण्यामध्ये जातो. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे वजन वाढू लागते.
६. स्ट्रेस किंवा ताण-तणाव वाढणे
लग्न झाल्यानंतर जीवनात होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना काही स्त्रियांना स्ट्रेस किंवा ताणतणावाचा सामना करावा लागतो. लग्नानंतर आयुष्यात होणाऱ्या बदलांची की त्यांना सवय नसते. त्यामुळे झालेल्या स्ट्रेसचे रूपांतर वजन वाढण्यात होते. चिंता किंवा ताणतणाव हे तसेही वजन वाढण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या काही स्त्रियांमध्ये वजन वाढीची समस्या आढळून येते.
७. गरोदरपणा
लग्न झालेल्या बहुतेक सर्व जोडप्यांकडून कुटुंबातील सर्वांची बाळाबद्दल अपेक्षा असते. सहाजिकच गरोदर महिलेच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात त्यामुळे तिचे वजन वाढते आणि बरेच वेळा प्रसूती नंतरही तिचे वजन कमी होत नाही.
८. स्वतःकडे दुर्लक्ष
लग्नापूर्वी स्वतःच्या तब्येतीकडे संपूर्ण लक्ष पुरवणारी मुलगी लग्न झाल्यानंतर मात्र वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे स्वतःकडे दुर्लक्ष करू लागते. घरच्या लोकांच्या, लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळताना स्त्रियांचे स्वत:च्या खाण्याच्या वेळा पाळणे, नियमित व्यायाम करणे, आनंदी राहणे याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे हळूहळू स्त्रियांचे वजन वाढू लागते. हळूहळू वजन वाढण्यास सुरुवात झाली तरी स्त्रियांकडून बरेचदा त्याकडे दुर्लक्ष होते आणि लक्षात येईपर्यंत वजन बरेच वाढलेले असते. मग वजन वाढण्याचा गिल्टी घेऊन स्त्रिया निरनिराळ्या प्रकारची डायट करू लागतात. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही आणि वजन वाढण्याच्या दुष्टचक्रात स्त्रिया अडकतात.
यावरून असे दिसून येते की स्त्रियांचे वजन वाढण्यामागे अनेक शारीरिक आणि मानसिक कारणे असतात. परंतु त्यातील प्रमुख कारण म्हणजे व्यायामाचा अभाव आणि योग्य संतुलित आहार न घेणे. स्त्रियांनी जर दिवसातील थोडासा वेळ काढून स्वतःकडे लक्ष दिले तर त्या ह्या वजनवाढीच्या समस्येवर सहजपणे मात करू शकतात. त्यासाठी त्यांना कुटुंबाच्या सहकार्याची थोडीशी गरज असते.
तर मित्र मैत्रिणींनो, आजपासून आपण पण आपले वजन आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या कुटुंबियांना त्यासाठी उद्युक्त करूया तसेच संपूर्ण सहकार्य करूया.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.