आता असतात काहीजणांच्या सवयी विचित्र त्याला आपण काय करणार. परीक्षेच्या पेपरला जाण्याआधी काहीजण देवाचे आशीर्वाद घेतात तर काहीजण आईवडिलांचे. पण आमच्यातले काहीजण शिव्या खाऊन जायचे. त्यासाठी काही ठराविक व्यक्ती हेरूनच ठेवल्या होत्या त्यांनी. गार्डन बाहेरील टेलिफोन बूथ चालविणारा आंधळा अण्णा किंवा बाहेर भीक मागणारी ती वेडसर भिकारी. पेपरला जायच्या आधी सकाळी गार्डनमध्ये एक फेरी मारणार आणि त्यांना चिडवणार. त्यांच्याकडून आपल्या कमीतकमी दोन तीन पिढ्यांचा उद्धार करून घेणार मग शांतपणे आता कुठे पेपर लिहायचा मूड आलाय असे म्हणत निघून जाणार.
असतात काहीजण अचानक लहान होणारे. चालत बोलता लहान मुलांसारखे वागणारे. आमच्यातील एक कलाकार कुठलाही लहान मुलगा काहीही खाताना दिसला तर त्यातील थोडे स्वतःच्या तोंडात टाकणार. एकदा याने एका लहान मुलाच्या हातून आईस्क्रीम घेतले आणि खाऊन टाकले तो मुलगा रडत रडत घरी गेला थोड्यावेळाने त्याची आई बाहेर आली तोपर्यंत ह्याने नवीन आईस्क्रीम त्या मुलाच्या हातात ठेवले.
असतात मोठी माणसे ही खोड्या काढणारी. नेहमीच गंभीरपणाचा मुखवटा घेऊन कोण वावरेल. पहिल्या कंपनीतील आमचा जनरल मॅनेजर अतिशय गंभीर माणूस. डिपार्टमेंटमध्ये आला की सगळ्यांची पळापळ व्हायची. बोलताना चेहऱ्यावरची एकही रेष हलली नाही त्याच्या. एक दिवस अचानक सुपरवायझरच्या केबिनमध्ये शिरला. सगळ्यांशी बोलत असताना टेबलावरचा फोन वाजला. ह्याने फोन उचलला आणि विचारले कोण पाहिजे ?? मग काही ऐकून हे मेंटेनन्स डिपार्टमेंट नाही. कोठेही फोन करत जाऊ नका ?? काल रात्रीची उतरली नाही वाटते अजून ?? की बायकोने सकाळी सकाळी शिव्या दिल्या तुम्हाला ?? असे म्हणून फोन ठेवला. इतक्यात परत फोन आला. सुपरवायझर फोन घेणार तर त्याला थांबवून परत याने फोन घेतला. मी म्हटले ना हे मेंटेनन्स डिपार्टमेंट नाही. जरा डोळे आणि डोके दोन्हीही चेक करून घ्या ?? शिव्या देऊ नका. हिम्मत असेल तर समोर येऊन बोला. असे म्हणून फोन ठेवला. मग आमच्याकडे बघून हसत म्हणाले. मीच का नेहमी दुसर्यांना शिव्या देऊ कधीतरी मला ही शिव्या खाव्याश्या वाटतात. आज बऱ्याच वर्षांनी कोणाची तरी कळ काढून शिव्या खाल्ल्या जरा बरे वाटले. पळतो आता. असे म्हणून निघून गेले.
असतात काही असे ज्यांना फक्त मन गुंतवायचे असते. आमचा एक मित्र कंटाळा आला की एकटाच चित्रपट पाहायला जातो. चित्रपट कोणताही असुदे त्याला फरक पडत नाही. चित्रपट पाहता पाहता हा झोपी जातो, चित्रपट संपल्यावर शेजारचा किंवा डोअरकिपर उठवतो तेव्हा हा डोळे चोळत बाहेर पडतो. त्या दिवशी संध्याकाळी अचानक विठ्ठलाच्या देवळात दिसला. चक्क डोक्यावर पांढरी टोपी घालून हातात टाळ घेऊन भजन गात होता. अगदी छान तल्लीन झाला होता. भजन संपल्यावर त्याला विचारले” हे काय …’?? तर म्हणतो “कंटाळा आला होता. पिच्चर पाहायला जात होतो पण देवळात हे भजन चालू होते म्हणून थांबलो. त्यांनी विचारले बसतो का.. ?? म्हटले हो ….घातली टोपी, घेतले टाळ आणि बसलो त्यांच्यात. दोन तास कसे निघून गेले कळलेच नाही. नेहमी नेहमी पिच्चर काय बघायचा ?? कधीतरी भजन ही मस्तच वाटतं………असतात काही माणसे अशी!!
वाचण्यासारखे आणखी काही…..
आमचा हरी
Low Cost Housing – बांधकामाची किंमत कमी कशी कराल?
वांग्याचं भरीत……… सांगा हं कसं झालं???
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खरच.. असतात