बऱ्याच वेळा आपण इतरांना सोईस्कर ठरेल अशाच बेतानं वागत असतो. आपले योग्य-अयोग्य बद्दल असलेले मत, समज, आपल्या धारणा, विश्वास आणि कल्पना ओलांडून आपण ‘लोकांना काय वाटेल’ म्हणून सामाजिक समारंभात सहभागी होत असतो.
असं वागण्याची खरंच गरज असते का? की आपण केवळ वेळ साजरी करतो?
बरं, या ‘इतर’ लोकांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी, आपल्या भावविश्वाशी संबंध असतोच, असं नाही. आपल्याला त्यांच्याबद्दल खूप काही प्रेम वाटत असतं, त्यांच्या कार्यक्रमांविषयी आस्था असते, किंवा त्या समारंभात आपण खूप काही आनंदात असतो, असेही नाही. मग त्यांच्याशी जुळवून घेण्याचा इतका अट्टाहास आपण कशासाठी करतो? आणि वर पुन्हा स्वतःच स्वतःला स्पष्टीकरण देत बसतो? का?
आपल्या आनंदाशी जोडलेले सण, समारंभ, उत्सव साजरे करतांना त्यातले आपल्याला पटेल, रुचेल, पेलवेल आणि परवडेल ते ठामपणे स्वीकारण्यास आणि त्याप्रमाणे वागण्यास काय हरकत आहे? हास्यास्पद, कालबाह्य सण-समारंभ केवळ दुसऱ्यांसाठी म्हणून साजरे करणे आता सोडून द्यायला हवे.
आनंद असो वा दु:ख, आपल्याला वेळ ‘साजरी’ करण्याची सवय लागलीये. उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला केवळ एक निमित्त हवे!
आपण उत्सवप्रिय आहोत, मान्य. सगळ्यांनी मिळून एकत्र येणे. मजा, गंमत करणे, एकत्र खाणे-पिणे हे ही समजण्यासारखे. पण त्या पलिकडे जाऊन उत्सव म्हणजे आता केवळ एक ‘फॅड’ झाले आहे, असे नाही वाटत?
आपला आनंद, दु:ख ‘प्रदर्शनीयच’ असावे का? आणि अशा प्रदर्शनात आपणही केवळ जनरित म्हणून सहभागी व्हावं? साजरं करण्यात वाईट काही नाहीये, पण ते ज्या पद्धतीने केलं जातंय ते मात्र वाईट आहे.
त्यापेक्षा स्वत:च्या मनाला आवडेल ते करणं.. आणि वेळेत ‘नाही’ म्हणायला शिकणं.. हे देखील जमायला हवं, नाही का?
एका लग्नाला गेले होते, वातावरणातला उत्साह, ’उन्माद’ वाटेल या पातळीवर होता. प्रत्येक गोष्टीत वेड्यासारखा खर्च केलेला दिसत होता. लग्नाचा हेतू काय आणि त्यासाठी आपण करतो काय, याचे यजमानांचे आणि पाहुण्यांचे भान सुटलेले दिसत होते. लग्न लागले, डोळे दिपवून टाकणारी आतषबाजी झाली. वातावरणात खमंग अन्नाचा आणि फटाक्यांचा संमिश्र वास भरून राहिला. आजूबाजूला खाण्याचे विविध स्टॉल्स आणि त्यात डोळ्यांना खुणावणारे अगणित पदार्थ दिसत होते.
अशा गर्दीत आपल्याला माणसांच्या विविध तऱ्हा, मनोवृत्ती दिसतात. काही लोकं लग्नाला म्हणून येतात की केवळ चवीने खाण्यासाठी, असा प्रश्न पडतो. तिथेही अनेक लोक असे होते की ज्यांना प्रत्येक पदार्थ चाखायचाच होता. रांगा लावून लोकांनी आवर्जून सूप प्यायले. आपापली डिश घेतली आणि जागा मिळेल तसे बसायला सुरवात केली. आता आजूबाजूला अस्ताव्यस्त खाणाऱ्या लोकांची नुसती धांदल.
काही वेळापूर्वी स्वच्छ, सुबक, सुंदर वाटणारी सजावट, व्यवस्था अगदी काही वेळातच अस्ताव्यस्त झाली. लोकांनी खाणे कमी आणि टाकणे, भिरकावणे जास्त अशी परिस्थिती होती. आपल्या पोटाला किती लागते आणि किती ताटात वाढून घ्यावे याचे तारतम्य सुटलेली लोके बघून जेवण्याची इच्छाच गेली.
इतक्यात रांगेत उभ्या असलेल्या एका बारा-तेरा वर्षाच्या मुलाला एका माणसाने खसकन ओढून बाजूला केले.. इतक्या जोरात की तो मुलगा खाली पडला. त्याच्या हातातली डिश खाली पडली.. अन्न विखुरले. इतका त्या माणसाला कशाचा राग आला? तर झालं होतं असं की, एकदा पळवून लावूनही तो अनाहूत पाहुणा, चांगल्या जेवणाच्या आशेने दुसऱ्या बाजूच्या रांगेत घुसलेला होता.. तो काही आमंत्रित लोकांच्या मुलांसारखा दिसत नव्हता म्हणून त्याला बरोबर वेचून बाजूला काढता आला.
मुलगा अर्थातच शरमला होता. तिथेच काम करणाऱ्या कोणा कर्मचाऱ्याचा तो मुलगा होता. त्यादिवशी वडिलांबरोबर आलेल्या त्याला भूक लागली होती आणि पदार्थांच्या वासाने अस्वस्थ होऊन तो जेवण्याच्या रांगेत गेला होता कोणीतरी त्याला ओळखले आणि त्याला पुन्हा जेवण्याच्या रांगेत उभे केले गेले.. पण त्याचे इवलेसे मन आता नाराज झाले असावे. त्याने हळूच रांगेतून काढता पाय घेतला, न जेवताच.. आणि थोड्याच वेळात दिसेनासा झाला.
जेवण झाल्यावर खरकट्या डिश गोळा करण्यासाठी ठेवलेले मोठे मोठे टब वाया गेलेल्या अन्नाने थोड्याच वेळात ओसंडून गेले.. लोकांनी कितीतरी अन्न ताटात वाढून घेऊन टाकून दिलेले होते.
किती विरोधाभास आहे, ना आयुष्य? माणसं सुसंस्कृत आहेत असे का म्हणयचे?
याच कार्यक्रमात आनंद साजरे करणारे अनेक चेहरे होते आणि त्यांना आनंद साजरा करता यावा, त्यामागची मेहनत करणारे देखील अनेक चेहरे होते.. दोन्ही चेहऱ्यांच्या मागच्या भावनांमध्ये किती जमीन अस्मानाचे अंतर होते, खरंच!
हे आपण प्रत्येक साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात बघतो. ‘आनंद’ जरूर साजरा करावा पण तो करतांना त्यासाठी कष्ट घेणाऱ्या लोकांकडे आपण किमान “माणूस’ म्हणून तरी बघतो का याचा विचार देखील जरूर करावा.
जग बदलले, पिढ्या बदलल्या पण अजूनही श्रम आणि पैसा आणि सत्ता यांचे गणित व्यस्तच आहे की… आणि गरीब हा केवळ आर्थिक परिस्थितीने गरीब असतो.. त्याला जात-पात, धर्म आणि इतर रंग आपण केवळ आपल्या सोयीसाठी देतो. कारण आपल्याला त्याची गरिबी काहीतरी हेतूने वापरायची असते. कारण आपल्याला मोल आहे ते फक्त पैशाचे!
‘शारीरिक श्रम’ आपल्यासाठी कायम दुय्यम, दुर्लक्षित.
आपला आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडतांना प्रत्येकाने हा विचार जरूर करावा की आपला तो आनंद, आपण ‘माणूसपणाच्या पातळीवर’ तरी घेतोय का?
हॉटेलमधले वेटर्स, वॉचमन, ड्रायव्हर, रस्त्यावरचे फेरीवाले, भाजीवाले, छोटे दुकानदार, लहान विक्रेते, रिक्षा आणि इतर वाहनचालक, घरकाम, बागकाम करणारी माणसे.. अनेक छोटी मोठी श्रमाची कामे अगदी थोड्या मोबदल्यात करणारी माणसे.. आपल्या क्षणभराच्या आनंदासाठी, आपल्याला सुख मिळावे म्हणून दिवसभर राबत असतात.
आपण थोड्या पैशांच्या मोबदल्यात तो आनंद, सुख, आराम, सेवा विकत घेत असतो, इथपर्यंत ठीक आहे.. पण मग त्या लोकांशी वागण्याच्या पातळीवर तरी आपण ‘माणूस’ म्हणून वागतो का?
त्यांची जाणीव ठेवतो का? त्यांच्या शारीरिक श्रमाबद्दल आपल्याला आदर वाटतो का?
साजरे करणे म्हणजे आपल्याजवळचे दुसऱ्याला देणे.. हे देतांना, आणि ‘आपले-परके’.. अशा चौकटी आखतांना आपण सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत वागतो आहोत का?
‘आमंत्रित’ लहान मूल तेवढे प्रतिष्ठित आणि बिनाआमंत्रण आलेले तेवढेच मूल मात्र अप्रतिष्ठित?
परवा एका भाजीवालीने घासाघीस करणाऱ्या एका सद्गृहस्थांना माझ्यासमोर अगदी चपखल उत्तर दिलं..
“भाऊ, तुम्हाला सातवा वेतन आयोग पाहिजे आणि तरीही भाजीचा भाव मात्र जुनाच पाहिजे, नाही का? आम्ही कुठं जायचं मग संप करायला?”
हा प्रश्न व्यवस्थेने ‘माणसातल्या माणुसकीला’ विचारलेला प्रश्न आहे.. आपल्याकडे खरंच आहे का याचे उत्तर?
मनाचेTalks च्या वाचकांचे अभिप्राय:
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.