डॉ. अब्दुल कलाम यांचा रोमहर्षक आणि रोमांचित करणारा जीवनप्रवास, ‘विंग्ज ऑफ फायर’ म्हणजे ‘अग्निपंख’ हे पुस्तक जगातल्या सर्वात चांगल्या मोटीव्हेशनल पुस्तकांपैकी एक आहे.
हे पुस्तक मी लहानपणीच झपाटल्यासारखे कित्येकदा वाचुन काढले होते, परवा दिवशी पुन्हा एकदा लायब्ररीमध्ये हाती लागले आणि आता पुन्हा नव्याने वाचल्यावर, मी भारावुन गेलो आहे.
इतका वेडा झालो आहे की, मागच्या दोन दिवसांपासुन मी अब्दुल कलांमांचा साथीदार, साक्षीदार, प्रशंसक आणि मदतनीस बनुन एका काल्पनिक जगात जगतो आहे,
इतकी ह्या पुस्तकात जादु आहे, कारण ह्या पुस्तकातला शब्द न शब्द जिवंत आहे.
कारण प्रत्येक शब्द प्रामाणिक आणि सच्च्या, निर्मळ हृदयातून निघालेला आहे.
ह्या पुस्तकाची जन्मकथाही विलक्षण आहे. ह्या पुस्तकाचं शब्दांकन करणारे अरुण तिवारी हे अब्दुल कलामांचे एक सहकारी, त्यांच्या पदाचा स्पष्ट उल्लेख नाहीये, पण दिलेल्या वर्णनावरुन ते खुप कनिष्ठ किंवा ज्युनिअर लेव्हलचे अधिकारी असावेत असे वाटते.
काम करताना त्यांचा कलामांशी प्रत्यक्ष संबंध खुप कमीच यायचा, पण ह्या महान व्यक्त्तिमत्वाची त्यांना भुरळ पडली.
त्यांनी धाडस करुन कलामसाहेबांना विचारले, की काय तुम्ही मला तुमचे चरित्र शब्दबद्ध करण्याची संधी द्याल?
कलाम फक्त स्वच्छ हसले, त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.
नंतर वयाच्या तिशीतच अरुण तिवारी गंभीर आजारी पडले, इतके की ते फारफार तर फक्त एक महिना जगतील अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली.
तेव्हा अब्दुल कलाम त्यांना भेटायला जातात, अरुण तिवारींचा हात हातात घेऊन, अत्यंत प्रेमाने, “तुला माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहायचे आहे ना?, लवकर बरा हो, अशा शुभेच्छा देतात”
रात्री अरुण साठी मनातुन प्रार्थना करतात, आणि आश्चर्यकारक पद्धतीने गंभीर व्याधींवर मात करुन अरूण बरा होतो.
हे पुस्तक सहा भागांमध्ये आहे.
१) परिचय – ह्यात रामेश्वरमधल्या धनुषकौडी ह्या कलामांच्या जन्मगावाच्या मोहक आठवणी आहेत.
त्यांच्या बालपणात डोकावलं की, पैशाने गरीब असलेली पण मनाने प्रचंड श्रीमंत असलेली अनेक माणसे आपल्याला पानोपानी भेटतात.
वडील जैनुलाबदीन हे वृत्तीने प्रामाणिक, आणि श्रद्धाळु आहेत. ते रामेश्वरम पासुन धनुष्कौडी पर्यंत येणाऱ्या तीर्थयांत्रीसाठी लाकडी नौका बनवत असत. आई आशिअम्मा जगातल्या सर्वच आयांसारखी प्रेमळ आणि कष्टाळु आहे.
जलालुद्दीन नावाचा त्यांचा जिवलग मित्र जो त्यांच्यापेक्षा पंधरा वर्ष मोठा होता, जो पुढे त्यांचा भावोजी झाला, तो ही अत्यंत सह्र्द, व्यवहारीज्ञानी आणि उत्साही मित्र होता.
तो कमी शिकलेला असला तरी, आयुष्याचे कोडे त्याला उपजतच उलगडले होते, सतत आनंदी आणि कृतज्ञ होता. जलालुद्दीन वर्तमानपत्रे विकायचा, त्याला ह्या कामात मदत करुन कलामांनी आपल्या आयुष्याची पहिली कमाई मिळवली होती, तेव्हा त्यांना झालेला अदभुत आनंद त्यांनी ह्र्दयस्पर्शी शब्दात सांगितला आहे.
शमसुद्दीन हा त्यांचा चुलत भाऊ, प्रत्येक बऱ्यावाईट प्रसंगी त्यांच्या मागे खंबीरपणे ठाम उभा ठाकलेला असायचा.
कलामांचे बालपण वाचताना एक गोष्ट सहज जाणवते, की त्यांच्यावर लहानपणीच उच्च संस्कार झाले, वडीलांची अल्लाहवर प्रगाढ श्रद्धा, त्यांचे सकाळ संध्याकाळ अंतःकरणपुर्वक नमाज पढणे, लोकांशी मिळुन मिसळुन वागणे, त्यांना मदत करणे, हे कलामांच्या संवेदनशील मनाने टिपुन घेतले व वडीलांच्या संस्कारांचा, विचारांचा ठेवा, त्यांनी आयुष्यभर जपला.
लहानपणी कलामांना त्यांच्या वडीलांचे घनिष्ठ मित्र, बारा ज्योतिर्लिंगामध्ये एक असे प्रसिद्ध असलेल्या रामेश्वर मंदीराचे मुख्य पुजारी पक्षी लक्ष्मणशास्त्री यांचा सुद्धा सहवास मिळाला, दरवर्षी होणाऱ्या रामजन्माच्या वार्षिकोत्सवात कलामांच्या परिवाराने बनवलेली लाकडी नाव वापरली जायची, याचा कलाम ह्यांना अभिमान होता.
अब्दुल कलाम ह्यांनी भारतीय अंतराळ क्षेत्रात जी झेप घेतली त्याचं रहस्यही त्यांच्या बालपणात दडलेलं आहे, समुद्र किनाऱ्यावर जाऊन, लाटांचा आनंद घेणं, निसर्गाशी एकरुप होणं, हा त्यांचा आवडता छंद होता.
समुद्रकिनाऱ्यावर बसलेले असताना तासन्तास ते आकाशाकडे एकटक बघत असत.
आकाशात झेप घेणाऱ्या पक्ष्यांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते, हे पक्षी कसे उडतात, ह्याचे त्यांना कुतुहुल आणि आकर्षण होते.
सारस आणि इतर पक्ष्यांना ते आकाशात उड्डाणे करताना उत्कंठतेने पहायचे, त्यांचं निरीक्षण करायचे.
एके दिवशी मी ही ह्या पक्ष्यांसारखाच आकाशात झेप घेईन, अशा तीव्र इच्छेने बालपणीच त्यांच्या मनात जन्म घेतला.
आणि पुढच्या पन्नास वर्षात ह्या जगासाठी ते स्वतःच आकाशाएवढे अनंत, विश्वव्यापी असे प्रचंड मोठे व्यक्तीमत्व झाले.
त्यांचा हा प्रवास खडतर होता, पावलोपावली आव्हाने होती, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी स्वतःला घडवले.
अखंड श्रद्धा, नम्र स्वभाव, जिद्द, चिकाटी ह्यांच्या बळावर प्रत्येक कठिण परिस्थितीत ते तरुन गेले.
त्यांनी एक मोठे उड्डाण केले, कारण त्याचे बीज लहानपणीच त्यांच्या मनात रोवले गेले होते. वेगळ्या शब्दात हा लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही काय?
अब्दुल कलामांनी अंतराळ क्षेत्रात खुप मोठी कामगिरी केली, स्वतःच्या आणि देशाच्या सर्व काल्पनिक मर्यादा तोडुन, एकामागे एक आलेली अपयशं पचवुन, त्यांनी एकाहुन एक सरस आणि उत्कृष्ट असे सॅटेलाईट, रॉकेट आणि क्षेपणास्त्रे बनवले, आज भारताने ह्या क्षेत्रात जी नेत्रदिपक कामगिरी केली आहे, त्याचे बरेचशे श्रेय कलामांना जाते.
प्राथमिक शिक्षणानंतर ते आपले प्रिय जन्मगाव धनुष्कौडी सोडुन, पुढच्या शिक्षणासाठी, रामनाथपुरम् ह्या ठिकाणी जातात. तिथल्या श्वार्टझ् हायस्कुल आणि सेंट जोसेफ कॉलेजच्या अनेक आठवणी रम्य आणि आवर्जुन वाचाव्या अशा आहेत.
ह्या पुस्तकातले वर्णन इतके रसभरित आहे की ते आपल्याला त्यांच्या प्रत्यक्ष कॉलेज जीवनाचा अनुभव देतात.
कृतज्ञ राहणे हे आनंदी जीवनाचं रहस्य आहे, हे कलाम ह्यांना माहित होते, ते त्यांच्या प्रत्येक मित्राविषयी, आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांविषयी शब्दाशब्दातुन, पानापानातुन प्रचंड कृतज्ञता व्यक्त करतात.
सेंट जोसेफ कॉलेजमधुन भौतीकशास्त्रात बी. एस्सी. केले खरे, पण त्या शिक्षणाने ते समाधानी नव्हते, विमानात बसण्याचे आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांनी मद्रास इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या कॉलेजमध्ये इंजिनीअरींगला प्रवेश घेतला.
एच. ए. एल. मध्ये आपली इंटर्नशिप पुर्ण केल्यावर, एरॉनॉटीकल इंजिनीअर बनल्यावर, त्यांच्यासमोर नोकरीच्या दोन संधी असतात, पहिली भारतीय वायुसेनेमध्ये वैमानिकाची, आणि दुसरी रक्षामंत्रालयामध्ये अभियंत्याची. त्यांची वैमानिक होण्याची संधी थोडक्यात हुकते आणि त्यांचं स्वप्न भंगतं, तीव्र नैराश्याने ग्रासलेले असताना, ह्रषिकेषला आल्यावर स्वामी शिवानंदाकडुन जीवनाचा खरा हेतु आणि जगण्याची अदभुत अशी उर्जा गवसते,
कलामांच्या मनातले संशयाचे दाट धुके ज्ञानाच्या प्रकाशात हळुहळु विरुन जाते, आता त्यांना सारंकाही स्वच्छ, नितळ दिसु लागतं.
दिल्लीमध्ये येऊन रक्षा मंत्रालयाच्या वरिष्ठ वैज्ञानिक पदावर ते आनंदाने रुजु होतात, हाती सोपवलेले पराध्वनिक लक्ष्यभेदी विमानाचे काम असो किंवा डार्ट विमानाचे इंजिन, त्यांनी प्रत्येक काम आनंदाने, पुर्ण निष्ठेने, मन लावुन आणि सर्वस्व ओतुन केले. त्यासाठी कधी त्यांना कानपुरमध्ये जावे लागले, कधी बेंगलोरमध्ये पाठवले गेले.
बघता बघता तीन वर्ष निघुन जातात.
त्यांची हुशारी, कामातली तडफ आणि असामान्य उत्साह पाहुन स्वदेशी हॉवरक्रॉफ्ट बनवण्याच्या योजनेचा प्रमुख म्हणुन त्यांची निवड केली जाते.
त्यांना मिळालेली ही संधी त्यांच्या काही वरिष्ठ लोकांना सहन होत नाही, त्यांचा जळफळाट होतो.
कलाम म्हणतात, हे माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक काम होते.
फक्त चार लोकांची टीम होती, हातात तुटपुंजी साधने होती, आणि आजुबाजुला होते मानसिक खच्चीकरण आणि उपहास करणारे आणि अपयश आल्यावर, मस्करी करणारे, टाळ्या पिटणारे क्षुद्र मनोवृत्तीचे खुजे लोक!
वेड्या लोकांची टोळी असे त्यांना उघडपणे बोललं जायचं, टोमणे मारुन हिणवलं जायचे. पण असंख्य अडचणींवर मात करुन कलामांनी पहिले स्वदेशी हॉवरक्रॉफ्ट बनवलेच, त्याच नाव ‘नंदी’.
संरक्षणमंत्री कृष्णा मेनन स्वतः त्या हॉवरक्रॉफ्टची सफर करतात आणि कलामांना शाबासकीची थाप देतात, लवकरच पुन्हा एकदा भेटण्याचे आश्वासन देतात, लवकरच मोठ्या प्रमाणावर देशी हॉवरक्रॉफ्टचे उत्पादन सुरु करायचे वचन देतात, पण…
पण दैव आडवे येते.
कॄष्णा मेनन यांचे संरक्षणमंत्री हे पदच जाते.
देशी हॉवरक्रॉफ्ट बनवले, तर विदेशी व्यवहारांमध्ये मिळणारी दलाली बंद होईल ना…
कलाम खुप खटपट करतात, पण त्यांची मेहनत आणि काही वर्षांचे श्रम वाया जातात.
त्यांच्या परिश्रमांवर लालफितीचा कारभार पहिल्यांदाच वरचढ ठरतो. ‘नंदी’ हॉवरक्राफ्ट धुळ खात एका कोपऱ्यात पडुन राहतो. जे प्रचंड वेदनादायी असते.
कलामांचा पुन्हा एकदा दारूण असा मनोभंग होतो. सगळं गुपचुप सहन करुन ते कसेबसे दिवस ढकलत असतात.
हे दुःखही फार काळ टिकत नाही, कारण आयूष्याच्या उनपावसाचा खेळ फार मजेशीर असतो.
लवकरच एक सुवर्णसंधी त्यांचे दार ठोठावत येते.
मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अग्निपंख पुस्तक वाचल आहे तरी परत परत वाचण्यासाठी संग्रही ठेवण्यासारखं असं म्हणता येईल. पुस्तकाचा सारांश खुप सुरेख रितीने मांडला आहे त्याबद्दल मनाचे Talks team चे व लेखकाचे मनापासून आभार, धन्यवाद व खुप साऱ्या शुभेच्छा.