विस्थपित होऊन मुंबईत आलेला मास्टर अली बक्ष मूळ पंजाब मधील बेहरा गावचा.. मुंबईतल्या एका पारशी नाटक संस्थेत कधी पेटी वादकाचे तर कधी संगीत शिक्षकाचे तर कधी अभिनयाचे काम करायचा.
उर्दू शायरीचाही त्याला शौक होता. “ईद का चाँद” नावाच्या एका चित्रपटात त्याने छोटी भूमिकाही केलेली तर “शाही लुटेरे” नावाच्या चित्रपटाला संगीतही दिलेले.
कलाकाराला पोटही असतं हे त्या काळातील समाजमनाला फारशी मान्य नसणारी गोष्ट होती. अलीबक्षच्या पत्नीचे मूळ नाव प्रभावती देवी,लग्ना नंतर त्यांनी इस्लाम धर्म स्विकारला व त्या इक्बाल बेगम झाल्या.
प्रभावती देवीची आई म्हणजे बंगालच्या प्रसिद्ध टागोर घराण्यातील हेम सुंदरी टागोर. पती निधना नंतर हेम सुंदरी टागोर लखनौला येऊन् नर्सचे काम करू लागल्या.
येथे त्यांची ओळख प्यारेलाल शंकर मिरूती या खिश्चन उर्दू पत्रकारांशी झाली व नंतर त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुली झाल्या पैकी प्रभावती या एक होत.
प्रभावती देवी नृत्य आणि नाट्य कलेशी पूर्वी पासूनच जोडलेल्या होत्या. रंग भूमीवर त्या कामिनी या नावाने प्रसिद्ध होत्या. अली बक्ष आणि प्रभावती देवी यांची भेट रंगभूमीवर झाली आणि दोघे प्रेमात पडले व त्यांनी लग्न केले.
अली बक्ष यांचे आगोदर एक लग्न झालेले होते व त्यांना एक मुलगीही होती. आज ज्या नायिके बद्दल मला सांगायचे तिची ही अशी पार्श्वभूमी बरीच मागे नेणारी आहे. पण ती गरजेची आहे.
अली बक्ष आणि इक्बाल बेगम यांना मुंबईतील डॉ. गद्रे यांच्या प्रसुतीगृहात मुलगी झाली.
डॉक्टर ची फिस पण न देता येणारे अली बक्ष गरीबीमुळे आगोदरच कायम तंगीत.
त्यानां वाटले होते मुलगा होईल पण झाली मुलगी. त्यानां समजेना काय करावे. एक दिवस त्यांनी या नवजात बाळाला उचलले आणि एका मुस्लिम अनाथालयाच्या पायरीवर ठेवून माघारी वळले.
पण थोड्याच वेळात त्यांच्यातील पित्याने त्यांच्यावर मात केली आणि ते परत अनाथालयाकडे वळले. मुलगी तिथेच होती…. रडत होती. जवळ जाऊन् बघितले तर तिच्या शरीरावर मुंग्याच मुंग्या.
त्यांनी मुंग्या बाजूला सारल्या आणि तिला परत घरी आणले. मुंग्यानी अनेक ठिकाणी चावा घेतला होता. काही दिवसांनी त्या जखमा भरून निघाल्या खऱ्या पण पूढच्या संपूर्ण आयुष्यभर ही मुलगी भळभळत्या जखमा घेऊनच जगली. तिच्या प्राक्त्तनाची सुरूवातच अशी वेदनामय झाली.
पूढील आयुष्यात नाव, प्रसिद्धी, पैसा, पुरस्कार, मान सन्मान सर्वांनी तिच्या पायाशी लोळण घेतली पण इतक्या सर्व गर्दीतही ती मात्र कायम एकाकीच राहिली.
सातव्या वर्षां पर्यंत ती महजबीन बानो या नावानेच ओळखली गेली. विजयभट्ट या प्रसिद्ध निर्मात-दिग्दर्शकाच्या चित्रपटात महजबीनने बाल कलावंत म्हणून काम केले.
ते तिचे खरे पालक होते. त्यानींच मग “एक एक ही भूल” (१९४०) या चित्रपटाच्या सेटवर तिला बेबी मीना असे नवे नाव दिले. याच बेबी मीनाने मग चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला. ती ट्रॅजडी क्वीन मीना कूमारी बनली.
मीना कुमारीचे कुटूंब दादरच्या रूपतारा स्टुडिओ समोरच रहात असे. लहान असताना तिला चित्रपटात काम मिळावे म्हणून आई रोज तिला तिच्या समोरच्या स्टुडिओत घेऊन् जात असे.
मीना कुमारीने बाल कलाकार म्हणून नई रोशनी, कसोटी, बहन, विजय, गरीब, प्रतिज्ञा, लाल हवेली अशा चित्रपटातुन कामे केली. तिला बाल कलाकार म्हणून जी पहिली रक्कम मिळाली ती होती फक्त २५ रूपये.
१९४६ मध्ये “बच्चों का खेल” या चित्रपटात ती सर्व प्रथम नायिका म्हणून चमकली त्यावेळी ती फक्त १४ वर्षांची होती. ती टॅलेंटेड असल्याचे त्यावेळच्या सिने पत्रीकेत छापूनही आले होते.
१९४७ मध्ये मीना कुमारची आई खूप आजारी पडली आणि वर्षभरात तिचा मृत्यू झाला. जाणत्या मीना कुमारीने अनुभवलेली ही पहिली जखम. खरं इतर मुली सारखं शाळेत जावे धमाल करावी असे तिला नेहमी वाटायचे.
चित्रपटातील कामे करणे ही तिच्या आवडीची बाब नव्हती. पण आता रोजी रोटीचा हाच एक मार्ग होता. सुरूवातीला तिने हनुमान, पाताल विजय, वीर घटोत्कच, श्री गणेश महिमा अशा पौराणिक चित्रपटात भूमिका केल्या.
१९५२ हे वर्ष मीना कुमारीसाठी एकदम टर्नींग पाँईट ठरले. विजय भटट् यांचा “बैजू बावरा” हा संगीतमय चित्रपट प्रदर्शीत झाला आणि चित्रपटसृष्टीला एक सशक्त अभिनेत्री मिळाली.
यातील तिने साकारलेली गौरी घराघरात पोहचली. १०० आठवडे चाललेल्या या चित्रपटाने १९५४ मध्ये सुरू झालेला फिल्म फेअरचा पहिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मीना कुमारला मिळाला.
१९५३ पर्यंत दो बिघा जमिन, दायरा आणि परिणीता हे तिचे तीन चित्रपट आले. परिणीता मध्ये तिने साकार केलेली भूमिका ही भारतीय स्त्रीचे प्रतिक म्हणून गौरवीली गेली.
कठीण परिस्थितीशी लढणाऱ्या भारतीय स्त्री मनाची सर्व अंगे तिने आपल्या या भूमिकेतून अभिनीत केली. या चित्रपटाने तिने स्त्री प्रेक्षक वर्गाच्या मनावर मोहिनी घातली.
मीना कुमारीच्या आवाजात एक वेगळीच जादू होती. हा आवाज अगदी थेटपणे मनाला भिडत असे. शिवाय तिच्या अभिनयाची एक स्वतंत्र शैली होती त्यामुळे चित्रपटातल्या कथेत ती संपूर्ण विरघळून गेल्या सारखी वाटे.
बिमल रॉयच्या “परिणीता” ने तिला दुसरा फिल्म फेअर पुरस्कार मिळवून दिला. या चित्रपटात अशोक कुमार हे तचे नायक होते.
१९५१ मध्ये “तमाशा” या चित्रपटाच्या सेटवर अशोक कुमार यांनी मीना कुमारीची ओळख कमाल अमरोहीशी करून दिली. त्यानां त्यांच्या अनारकली या चित्रपटासाठी नवी नायिका हवी होती.
ते मीना कुमारीच्या अभिनयाने प्रभावित होतेच. त्यांनी मीना कुमारीला साईन केले. पण दूर्देवाने २१ मे १९५१ रोजी महाबळेश्वर जवळ मीना कुमारीच्या गाडीला अपघात झाला आणि यात तिची करंगळी कायमची वाकडी झाली….
आई गेल्या नंतरची ही दुसरी जखम तिला खूप वेदना देवून गेली..दोन महिने तीला पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधील बेडवर पडून रहावे लागले.
तिचे हालहवाल विचारण्यासाठी कमाल अमरोही दुसऱ्या दिवशी मीना कुमारीला जाऊन् भेटले. या भेटीगाठी मग वाढत गेल्या आणि दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले.
जेव्हा भेट होत नसे तेव्हा पत्राने देवाण घेवाण होई. एकदा तिने कमाल अमरोही यांना विचारले- “अनारकली या चित्रपटातील माझी भूमिका पूढेही मलाच मिळेल ना?” यावर कमाल अमरोही म्हणाले- “का नाही?” व त्यांनी तिच्या तळ हातावर “अनारकली” हा शब्द लिहला या शब्दामागे “मेरी” हा शब्द जोडला.
१४ फेब्रुवारी १९५२ रोजी नेहमी प्रमाणे मीना कुमारी व तिची लहान बहीण मधू रात्री ८ वाजता फिजीयोथेरीपिस्ट कडे गेल्या.
वडील त्यानां रात्री १० वाजता घ्याला परत येणार होते. वडीलांची पाठ वहताच कमाल अमरोही पूर्व नियोजित ठरल्या प्रमाणे आपल्या दोन मित्रांना घेऊन आले.
सोबत काजीला पण आणले होते. अवघ्या १९ वर्षांच्या मीना कुमारने मग आगोदर दोन लग्न झालेल्या ३४ वर्षीय कमाल अमरोहीशी आपली बहीण मधू, बाकर अली आणि काजीच्या दोन मुलानां साक्षी ठेवून निकाह केला.
वडील अली बक्ष यानां थांगपत्ताच नव्हता की मुलीने लग्न केले आहे. मग एक दिवस घरातल्या नोकराला मीना आणि कमाल यांच्या नियमित होणाऱ्या फोन संभाषणा मधून हे समजले.
त्याने अली बक्षला सांगितले मग ते तलाक घ्यावा म्हणून मीना कुमारी वर दबाव आणू लागले. वडीलांनी मेहबूब खानच्या “अमर” चित्रपटासाठी मीनाच्या डेटस् आणि दोन लाख रूपये अनामत घेतले होते.
त्यामुळे मीनाने निश्चय केला की जो पर्यंत वडीलांची रक्कम परत करणार नाही तो पर्यंत ती अमरोही सोबत रहाणार नाही. तिला कमाल अमरोहीच्या “दायरा” मध्ये काम करायचे होते ना की अमर चित्रपटात.
वडीलांनी मग तिला सरळ सांगितले की नवऱ्याच्या चित्रपटात काम करायचे असेल तर तुला हे घर सोडावे लागेल. दोघांत खूप वाद झाले आणि शेवटी मीनाचे प्रेम जिंकले.
तिने अमर चित्रपट सोडला आणि ती कमालच्या घरी राहू लागले. जवळपास दीड वर्षां नंतर हे संबंध उघड झाले आणि वर्तमन पत्रानां अनेक दिवस बातम्यांसाठी विषय मिळाला.
मीना कुमारीची अभिनय कारकिर्द बहरत होती. १९५३ ते १९६३ या काळात परिणीती, बादबाँ, बंदीश, आझाद, एक ही रास्ता, मिस मेरी, यहुदी, शारदा, चार दिल चार राहे, दिल अपना प्रित पराई, कोहीनूर, भाभी की चुडियाँ, आरती, मै चूप रहूँगी,साहिब बिबी और गुलाम, किनारे किनारे, दिल एक मंदीर वगैरे एका पेक्षा एक सरस चित्रपट येत राहिले आणि ती सर्वगूण संपन्न अभिनेत्री म्हणून रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करू लागली.
एका ठिकाणी मीना कुमारी म्हणते- “ एकदा सेटवर मला एक प्रसंग साकार करायचा होता ज्यात मला गोळी लागते आणि मी पडते. पण मला असे पडणे अजिबातच मान्य नव्हते अगदी चित्रपटात देखिल.” मीना कुमारी उत्तम गायिका पण होती पण स्वत:साठी तिला गायचे मान्य नव्हते.
ती मुलांसाठी मात्र गात असे. लहानपणी शुटींग करताना मधली सुट्टी होई तेव्हा तिच्या सोबतची मुले कम्पाऊंड मध्ये खेळत तर लहान मीना कोपऱ्यात बसून लहान मुलांच्या पुस्तकात हरवून जात असे.
प्रसिद्ध अभिनेत्री नादिरा यानी एका मुलाखतीत म्हटले होते की- “मीनाचे तिच्या नवऱ्यावर अफाट प्रेम होते. ती कमाल अमरोहीच्या बाबती खूप पजेसिव्ह होती.
ती त्यांचा खूप आदर करी आणि घाबरतही असे. ती त्यानां चंदन किंवा कमाल साहब म्हणायची तर कमाल अमरोही तिला मंजू असे म्हणत.” मात्र तिच्या या संबंधाला पुन्हा वेदनेने ग्रासले.
१९६४ मध्ये ती कमाल अमरोही पासून विभक्त झाली. चित्रपटातली ही ट्रॅजडी क्वीन प्रत्यक्ष आयुष्यातही वेदनेने तळमळत राहिली.
चित्रलेखा, गजल, भिगी रात,फूल और पत्थर, काजल, बहू बेगम, चंदन का पलना या चिपटातील तिचा अभिनय अधिक गहीरा होत गेला.
आवाज अधिकाअधिक काळीज कापत जाई या काळात तिच्या आणि धर्मेद्र बद्ल बरेच काही बोलले व लिहले गेले.. हृदयात ज्यावर खूप प्रेम केले त्याच्या वियोगाच्या जखमा अभिनयातही मग भळभळून वाहू लागत.
१९७१ मधील राजेश खन्नाच्या “दुष्मन” मध्ये मीना फक्त डोळे आणि चेहऱ्यानेच बोलली. यातील ३८ वर्षांची मीना कुमारी चक्क ५० ची जाणवते.
१३ जून १९६३ ला मीना कुमारीने फिल्म फेअर पुरस्काराच्या सोहळ्यात एक अनोखा विक्रम केला. हा फिल्म फेअरचा १० वा पुरस्कार वितरण सोहळा सूरू होता.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नॉमिनेशन जाहीर झाले त्या यादीत साहिब बीबी और गुलाम,आरती, मै चूप रहँगी असे तीन चित्रपटांची नावे जाहीर झाली आणि तिनही चित्रपट तिचेच होते.
साहिब बीबी और गुलाम साठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरसकार जाहीर झाला. बिमल मित्रा याच्यां बंगाली कादंबरीवर हा चित्रपट आधारीत होता.
यातील व्यसनाच्या आधीन झालेली छोटी बहू मीनाने अप्रतिम साकारली आहे. मला वाटते तिच्या आणि चित्रपटाच्या इतिहासातील ही एक अजरामर व्यक्तीरेखा आहे जी मीना कुमारीने अगदी हृदया पासून साकारली आहे.
तिच्या प्रत्यक्ष आयुष्यातील सर्व जखमा या छोटी बहू द्वारे भळाभळा वाहिल्या.. १९६७ मध्ये विविध भारतीच्या एका मुलाखतीत मीना कुमारी म्हटलीच होती की साहीब बीबी और गुला मधली छोटी बहू म्हणजे माझा सुक्ष्म देहच आहे.
या व्यक्तीरेखेत तिची Reel Life आणि Real Life एकमेकात मिसळून गेली होती. या भूमिकेला “डेंजरस” रोल असेही म्हटले गेले. कारण प्रत्यक्ष आयुष्यात मीना कुमारी खरोखरच दारूच्या खूप आहारी गेली.
१३ व्या बलिर्न महोत्सवात तिच्या याच भूमिकेने गोल्डन बेअर मिळवून दिले. ऑस्करसाठी हा चित्रपट भारतातर्फे पाठविण्यात आला होता.
मीना कुमारी रोज डायरी लिहीत असे. त्यात ती एके ठिकाणी लिहते- “मला दिवसभर एक स्त्री सतत छळत असते विशेषत: रात्रीला तर ती माझ्या बरोबर डिल करत असते.
ती स्त्री छोटी बहू आहे…..छोटी बहू……छोटी बहू……मला आजारी केलंय या बयेनं” विनोद मेहता नावाच्या लेखकाने मीनाचे चरीत्र लिहले आहे. त्यात कमाल अमरोही आणि मीना कुमारीच्या शारीरीक हिंसेचाही भाग आला आहे.
मीना कुमारीला जेव्हा बर्लिनला जायचे होते तेव्हा, तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्री सत्य नारायण सिन्हा यांनी दोन विमानाची तिकीटे बुक केली होती.
पण कमाल अमरोही यांनी मीना कुमारी सोबत तिचा “नवरा” म्हणून जाण्यात इंटरेस्ट नाही असे म्हणून नकार दिला. मला वाटतं मीना कुमारी पुरूषी अहंकारची बळी ठरली असावी.
एकाच व्यवसायातील दोन प्रतिभावान पार्टनरसाठी व्यक्तीगत आयुष्य म्हणजे एक शापच ठरावा.
मुबंईत साहिब बीबी और गुलामचा प्रिमियर शो एरॉस चित्रपटगृहात ठेवला होता. सोहराब मोदी मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांची ओळख करून देताना महाराष्ट्राच्या राज्यपालानां म्हणाले- “या सुप्रिसद्ध अभिनेत्री मीना कुमारी आणि हे यांचे पती कमाल अमरोही” यावर लगेच कमाल अमरोही म्हणाले- “ नाही…..मी कमाल अमरोही आणि ही माझी पत्नी मीना कुमारी”…..इतके बोलून ते हॉलच्या बाहेर निघून गेले.
मीना कुमारीनी एकट्यानेच प्रिमिअर बघितला. ५ मार्च १९६४ मध्ये कमाल अमरोही यांनी आपल्या पिंजरे के पंछी या आगामी चित्रपटाचा मुहूर्त ठेवला होता.
या सेटवर अमरोही यांचे सहाय्यक बकार अली यांनी मीना कुमारी यांच्योबाडात लगावली होती आणि ती यासाठी की मीना कुमारीला भेटायला गुलजार आले होते आणि मीना कुमारी त्यांना मेकअप रूममध्ये बोलवा म्हणून सहाय्यकाला सांगत होत्या.
मीना कुमारी रडतच बाहेर येतानां त्याला म्हणाल्या- “कमाल साहेबानां सांगा की मी आज घरी येणार नाही.” आणि त्या नंतर मीना कुमारी परत कधीच अमरोहीच्या घरी गेल्या नाही.
त्या मेहमूदच्या घरी जाऊन राहिल्या. नंतर कमाल अमरोहीने परत येण्यासाठी बरीच गळ घातली पण मीनाने नकार दिला. मग अमरोही पण तिच्या बहिणीला मधूला (मेहमूद तिचा नवरा) म्हणाले की-“मंजूला सांग मी ही तिला नेण्यासाठी कधीच येणार नाही.” आणि तेही कधी परत आले नाही.
अति दारूच्या सेवनाने मीना कुमारीचे यकृत निकामी झाले. १९६८ मध्ये मग त्यांना उपचारासाठी लंडन आणि स्वित्झरलॅँडला नेण्यात आले.
तिथे डॉ. शेहीला शेरलॉक यांनी तयांची उत्तम देखभाल केली. परत आल्यावर मात्र त्यांनी दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. त्यांनी प्रथमच मग स्वत:साठी बांद्रे येथे एक घर खरेदी केले.
२४ ऑगष्ट १९६८ ला कमाल अमरोही यांनी मीना कुमारीला एक पत्र लिहले- “माझा पाकिजा चित्रपट अपूर्ण आहे. तुझ्या म्हणण्यानुसार मी तूला तलाक दिला तरच तू हा चित्रपट करणार आहेस. मी तुला या बंधनातुन मुक्त करेन, जर तू हा चित्रपट पूर्ण केला तर मला खूप आनंद होईल.
ही माझी विनंती आहे. या चित्रपटावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. अनेकांची इच्छा आहे की हा चित्रपट अपूर्ण राहयला नको.पाकिजाला तुझ्या व्यक्तीत्वाची खूप गरज आहे.
सध्या पाकिजा एक बुडणारे जहाज आहे आणि तूच ते किनाऱ्याला लावू शकतेस.” यावर बऱ्याच कालावधी नंतर १९६९ च्या पूर्वार्धात मीना कुमारीने उत्तर दिले – “पाकिजा हे माझे स्वप्न आहे. यातील भूमिका करायला मला मनापासून आनंदच होईल. पाकिजाचे स्वप्न साकार करण्यात मला आनंदच होईल. आणि माझे हे स्वप्न पूर्ण करण्याची तुम्ही मला संधी देत आहात. तुमच्या बद्दल आदर व्यक्त करण्याची हीच वेळ आहे. पाकिजातील माझ्या भूमिकेसाठी मला फक्त एक गिनी मेहनताना द्यावा.”
१९६९ मधील हिंदूस्तान टाईम्स च्या बातमी नुसार सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांच्या मध्यस्तीने व उपस्थितीत दोघांची भेट घडविण्यात आली. दोघांनी अश्रूद्वारे ऐकमेकांशी संवाद साधला.
कमाल अमरोही यांनी सोन्याची एक गिनी मीना कुमारीला दिली अणि वचन दिले की पाकिजाच्या सुरूवातीच्या शुटींगमध्ये तू जशी दिसत होतीस तितकीच सुंदर मी तुला करेन.
मग दोघांनी एकत्र डिनर केले. जातानां मीना कुमारीने आपली डायरी त्यानां वाचण्यासाठी दिली. जवळपास पाच वर्षांच्या खंडा नंतर पाकिजाचे पुन्हा चित्रीकरण सुरू झाले.
३ फेबुवारी १९७२ ला मुंबईच्या मराठा मंदिर या चित्रपटगृहात पाकिजा प्रदर्शीत झाला. मीना कुमारी तिच्या आयुष्यातला शेवटच्या प्रमिअरला अवर्जुन आली.
संपूर्ण चित्रपट तिने कमाल अमरोहीच्या शेजारी बसून बघितला. चित्रपट संपल्यावर ती आपल्या एका मित्राला म्हणाली- “माझे पती कमाल अमरोही हे नि:संशय भारतातले सर्वोत्तम चित्रपट दिग्दर्शक आहेत.”
पाकिजाने सिल्व्हर ज्युबली साजरी केली. पाकिजासाठी मीना कुमारीला फिल्म फेअरचा १२ वा आणि शेवटचा पुरस्कार मिळाला.
पाकिजा प्रदर्शीत झाल्या नंतर तिसऱ्याच आठवड्यात मीना कुमारी गंभीर आजारी झाली. २८ मार्च १९७२ रोजी तिला सेंट एलिझाबेथ नर्सींग होम मध्ये अडमिट करण्यात आले.
३० मार्च ला कोमात जाण्यापूर्वी ती कमाल अमरोहीला शेवटचे बोलली- “चंदन, मी आता अधिक काळ जगेल असे वाटत नाही माझी एकच इच्छा आहे की माझा शेवटचा श्वास मी तुझ्या बाहूपाशात घ्यावा.” ३१ मार्च १९७२ रोजी गुड फ्रायडेच्या दिवशी तीने अखेरचा श्वास घेतला.
वयाच्या फक्त ३८ व्या वर्षी माझगाव मुंबईच्या नारळवाडीतल्या कब्ररीस्तानमध्ये तिचा देह कायमचा विसावला. शायरीची उत्तम जाण असणाऱ्या या महान अभिनेत्रीच्या कबरी वरील पत्थरात खालील ओळी कोरल्या आहेत—
She ended life with
a broken fiddle,
With a broken song,
With a broken heart,
But not a single regret.”
वाचण्यासारखे आणखी काही…..
शोले….शोकांतिकेची गाथा..(भाग २)
पायाने आकाशाला गवसणी घालणारी जेसिका
दूहेरी हेरगिरीचा बळी : माता हरी
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.