अजून मी भिंतीकडे तोंड करूनच झोपलोय, म्हणजे धीर होत नाहीये कुशीवर वळण्याचा, खूपच शांत एरियात आमचं घर आहे अगदी कोणी कुजबुजलं तरी ऐकू येईल सहज अश्या ठिकाणी……
हल्ली मी घरीच असतो म्हणजे काहीच काम धंदा नाही…. सकाळी उठून मस्त फिरून यायचं गावाबाहेर नदीकाठी शांत वाटतं एकदम…. घरी आल्यावर न्याहरी चहा…..
आम्ही दोघेच घरात, घर मोठं, म्हणजे चार खोल्यांचं, गावाकडच्या खोल्या, मस्त बंगल्या टाईपचं अगदी, ओळखीत मिळालं…… रिटायर झाल्यावर मला मनोजोगती मिळाली ही जागा. मुंबईहून इकडे शिफ्ट झालो दोघेच जण, सगळ्यांनाच आवडलं होत हे घर म्हणजे पहिल्यांदा खूप कौतुक केलं सर्वांनी….. येऊन राहिले पंधरा पंधरा दिवस, आम्हालाही बरं वाटायचं, हळू हळू लोकांचं येणं बंद झालं, एकदा शास्त्री आले होते, म्हणाले काहीतरी वेगळंच वाटतंय इकडे, हळू हळू आम्हाला सवय झाली, अधून मधून ही जायची मुंबईला नातेवाईकांकडे, मला इकडेच बरं वाटायचं, दिवस छान शांतपणे जात होते आणि मागच्या सहा महिन्यात हे घडत होतं.
मुंबईहून हिच्या भावाचं बोलावणं आलं, जाऊ का मी पंधरा दिवस…… मी म्हंटल, जाऊन ये…… मी व्यवस्था करून जाते तुमची, गावात ओळखीचे झाले होते…. तुरळक येणं जाणं होतं घरी आमच्या, डबा सांगून ही जाते नेहमी, गावात सोय होती माझी…..
त्यादिवशी प्रसन्न सकाळ, मी मस्त फिरून आलो, सकाळीच न्याहारीच डबा आला होता, मस्त ताव मारला, जरा बागेत टाईमपास केला, पेपर वाचला, जरा टीव्ही बघितला, दुपारी डबा आला, जेवलो थोडाफार, गुंगी यायला लागली होती डोळ्यावर, दुपारी वामकुक्षी घ्यायची सवय लागली होती, आमची बेडरूम खूपच शांत आणि मागच्या साईडला होती, मागे घनदाट झाडी होती, खूपच घनदाट वाटायचं, म्हणजे फक्त पक्षांची किलबिल बस बाकी काही नाही, दुपारी तर ह्या विश्वात आवाज नावाची चीज आहे की नाही याची शंका यायची,
मी सहज लवंडलो बेड वर, एकाबाजूला खिडकी आणि दुसऱ्या बाजूला भिंत, मला कुशीवर झोपायला आवडतं मी भिंतीकडे तोंड करून निवांत ताणून दिली, मस्त छान थंड वातावरण होतं. लगेच घोरायला लागलो बहुतेक, दुपारचे दीड दोन झाले असतील, आमच्या घराजवळ रस्ता नव्हता आतल्या साईडला असल्यानं येणं जाणं वर्दळ नव्हती त्यामुळे शांत झोप लागायची….
पडल्यापडल्या मला झोप लागली बहुतेक, कसल्यातरी आवाजांनी जागा झालो, डोळे उघडले तर समोर भिंत पण आवाज माझ्या बाजूलाच म्हणजे माझ्या बेडवर येत होता अगदी कानात गुणगुणल्यासारखा, मागे कोणीतरी माझ्या शेजारी झोपल्याचा भास होत होता आणि काहीतरी कुजबुज / पुट्पुट, माझं तोंड भिंतीकडे, माझं धैर्यच होईना, बाप रे कोण असावं? मला वळायचं होतं वळून बघायचं होतं पण तसं घडतंच नव्हतं, शरीर बांधल्यासारखं झालं होत आणि कानाशी गुणगुण, मी किती वेळ भिंतीकडे तसेच डोळे उघडे ठेऊन झोपलो होतो पण मागे वळून बघायची डेअरिंग झाली नाही माझी….. काय करावं समजतच नव्हतं.
इतक्यात दाराची काडी वाजली आणि मला हायस वाटलं, चहा घेऊन त्या बाई आल्या होत्या थर्मास मध्ये, मी सुटलो मी मागे न बघत उठलो काडी काढली आणि चहा घेतला, या ना आत, थर्मास घेऊनच जा परत, मी घाबरलो होतो, साहेब काय झालंय? काही नाही, ती बाई गेली, मी बेडरूप मध्ये हळूच तिरक्या नजरेनी बघितलं, टीव्ही लावला मोठ्यांनी, संध्याकाळ मस्त गेली नदीकाठी, घरी आलो, रात्रीचा मी जेवत नाही फक्त दूध घेतो, गरम करून घेतलं, पुस्तक घेऊन बेडरुम मध्ये शिरलो, आणि अंगावर काटा आला दुपारचा प्रसंग आठवून, बाहेर झोपूया का असा विचार आला मनात, भासच तो, स्वतःशीच हसलो माझ्या मूर्खपणाला, पुस्तक वाचता वाचता कधी झोप लागली समजलंच नाही दिवा तसाच उघडा राहिला बहुतेक, सकाळी झोप चाळवली म्हणजे तीन साडेतीनला, आणि मी थरारलोच, चक्क कोणीतरी कुजबुजत होत माझ्या पाठीमागे…..
माझं तोंड भिंतीकडे, दुपारी एकटीचीच गुणगुण होती पण आता दोघांचे आवाज, बाई आणि बुवा, बाप रे देवा सोडव रे, माझी काही छाती झाली नाही बेडवर ह्याकुशीवर वळण्याची, बेडवरुन बहुतेक कोणीतरी उतरलं असावं, मी घाबरलो, घाम सुटला मला, माझ्या चेहऱ्यासमोर येतंय की कोण ते कुजबुज करणारे, मी घट्ट डोळे मिटून घेतले आणि पांघरून घेतलं तोंडावरून कधी झोप लागली समजलंच नाही…..
चांगलं ऊन पडलं होतं….. मी उठलो मागे बघितलंच नाही, बाहेर आलो, मला समजत नव्हतं हे काय चाललंय ते? दुपारी अर्धातास आणि पहाटे अर्धा तास ती कुजबुज मला ऐकावी लागायची, पाठ वाळवून बघण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं, मला बैचैन वाटायला लागलं होत, शास्त्री काहीतरी म्हणाले होते ना? माझा विश्वास नाही……
आज ती संध्याकाळी येणार म्हणून खुशीत होतो, एकटेपणाचा कंटाळा आला होता, सकाळ छान गेली, दुपारी मस्त ताणून दिली…. मी वाट बघत राहिलो त्या गुणगुण्याची, मला गुंगी आली डोळ्यावर आणि मला धक्काच बसला…. कोणीतरी माझ्या मागे बसलं होत अशी जाणीव झाली माझा चेहरा बघायचा प्रयत्न करत होत बहुतेक….. दोघेही होते बहुतेक…. माझ्या पाठीवरून ओणव होऊन बघत होतं, मी कुशीवर वळण्याची वाट बघत…..
मला सावली दिसली मी ओरडलो जिवाच्या आकांताने, अहो अहो काय झालं…… मी आलीये, दार उघडं टाकून झोपलात ना नेहमीसारखे? आणि हे काय डोक्यावरून पांघरून घेऊन कधी पासून झोपायला लागलात? अहो उठा, इकडे बघा…… मी तयार नाही बघायला….. शेवटी हीच भिंतीच्या बाजूला आली आणि मुख्य डोळ्यातली भयानक भीती तिला दिसली…..
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.