‘वंध्यत्व’ म्हणजे काही कारणाने गर्भधारणा न होऊ शकणे.
वंध्यत्व हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असू शकते, किंवा दोघांपैकी एकाला असू शकते.
पुरुष वंध्यत्त्व नक्की कशामुळे होतं? आणि त्यावर करायचे घरगुती उपाय काय आहेत हे आपण या लेखात बघणार आहोत.
पुरुषांमध्ये वंध्यत्व अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकते.
त्यातील काही कारणे खालील प्रमाणे आहेत. यामुळे पुरुषांच्या विर्य उत्पादनावर परिणाम होतो.
१) जन्मजात जनन अवयवात दोष किंवा इरेक्टाइल डिसफ़ंक्शन
२) मधुमेह
३) अतिरिक्त वाढलेले वजन
४) टेन्शन/स्ट्रेस
५) प्रोस्टेट ग्लॅन्डला सूज येणे
६) हॉर्मोनल इम्बॅलन्स
७) व्यायामाचा अतिरेक
८) फॉलीक ऍसिडच्या कमतरतेमुळे
९) शारीरिक संबंध ठेवण्याच्या अनिच्छेमुळे
विर्यात शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल, त्यांची गती हे गर्भधारणेसाठी महत्वाचे मुद्दे आहेत.
वरील दिलेल्या कारणांचा परिणाम विर्य उत्पादनावर होतो.
आणि म्हणून गर्भधारणा होऊ शकत नाही.
मॉडर्न मेडिसिनमध्ये वंध्यत्वावर अनेक उपचार आहेत पण त्यासाठी हे स्वीकारण्यासाठी मनाची तयारी लागते.
त्याचप्रमाणे हे उपचार खूप खर्चिक होऊ शकतात.
पुरुषांना वंध्यत्व समस्या असेल, ज्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नसेल तर त्यासाठी या वैद्यकीय उपचारांबरोबर आपण घरच्याघरी कोणते उपाय करू शकतो, आहारात आणि जीवनशैलीत कोणते बदल करू शकतो हे आज या लेखातून आम्ही सांगणार आहोत.
साधारणतः वंध्यत्वाचा त्रास होऊ नये म्हणून आहार संतुलित असावा.
मधुमेह असल्यास तो नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
टेंशन किंवा स्ट्रेस कमी करायचा प्रयत्न करावा.
याव्यतिरिक्त वंध्यत्वाच्या समस्येवर घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
1. नियमितपणे व्यायाम करा
व्यायामामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन तयार होते.
हे हॉर्मोन पुरुषांमध्ये अतिशय महत्वाचे असते आणि त्याचा परिणाम विर्य उत्पादनावर होतो.
त्यामुळे पुरुषांच्या शरीरात टेस्टेस्टेरॉनच उत्पादन व्हावे यासाठी त्यांनी आठवड्यातून पाच दिवस तरी व्यायाम करणे गरजेचे आहे.
पण याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की अति व्यायाम टाळला पाहिजे कारण व्यायामाचा अतिरेक केला तर त्यामुळे टेस्टेटरॉन वाढण्या ऐवजी कमी होते.
2. आहारात व्हिटॅमिन सी भरपूर घ्या
व्हिटॅमिन ‘सी’ चा उपयोग आपली प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी होतोच पण त्याचबरोबर व्हिटॅमिन ‘सी’ हे गर्भधारणेसाठी अतिशय उपयुक्त व्हिटॅमिन आहे.
व्हिटॅमिन ‘सी’ मध्ये अँटिऑक्सिडंट्स खूप जास्त प्रमाणात असतात जे की आपल्या शरीरातल्या पेशींसाठी चांगले असते.
व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण आहारात वाढवल्याने स्पर्म काऊंट, म्हणजेच विर्यातली शुक्राणूंची संख्या वाढायला मदत होते.
लिंबू, संत्र, आवळा यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ जास्त प्रमाणात असते.
3. स्ट्रेस कमी करा
सतत चिंता, काळजी करणे हे आरोग्यासाठी तसेही चांगले नसतेच.
याच स्ट्रेसचा परिणाम लैंगिक आयुष्यावर होतो.
बऱ्याच जोडप्यांना गर्भधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करण्यासाठी सुद्धा घरच्यांकडून प्रेशर असते.
हे सुद्धा स्ट्रेसचे एक महत्वाचे कारण आहे.
स्ट्रेस कमी केला तर त्याचा परिणाम म्हणजे मूड चांगला होणे, ज्यामुळे जोडप्यांमधल्या लैंगिक समस्या दूर होतात.
यासाठी एकमेकांबरोबर वेळ घालवणे, बाहेर फिरायला जाणे, गाणी ऐकणे, मेडिटेशन करणे यासारखे उपाय आहेत.
4. व्हिटॅमिन ‘डी’
व्हिटॅमिन ‘डी’ हे स्त्री आणि पुरुष, दोंघांच्या वंध्यत्वावर फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन ‘डी’ मुळे शुक्राणूंची हालचाल आणि वेग वाढतो ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते.
सकाळच्या कोवळ्या उन्हात व्हिटॅमिन ‘डी’ मिळते. व्हिटॅमिन ‘डी’ च्या गोळ्या सुद्धा मिळतात ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जाऊ शकतात.
5. मेथी
मेथीमुळे पुरुषांच्या शरीरातले टेस्टेस्टेरॉन हे हॉर्मोन वाढते.
पुरुषांमध्ये हे एक महत्वाचे हॉर्मोन असून त्याचा परिणाम विर्य उत्पादनावर होतो.
हे आपण वर बघितलेच आहे. मेथीचे दाणे भाजून, त्याची पूड करून ती पाण्यात घालून घेतली तर बराच फायदा होतो.
या मुळे शरीरातील फॅट सुद्धा कमी होतात ज्यामुळे लैगिक आयुष्य सुधारते.
6. अश्वगंधा
अश्वगंधा हे आपल्याकडे पूर्वापार वापरात असलेली औषधी आहे.
अश्वगंधाच्या नियमित सेवनाने टेस्टेस्टेरॉनचं उत्पादन अधिक प्रमाणात होते आणि त्याचबरोबर विर्यातील शुक्राणूंची संख्या आणि त्यांच्या हालचालींचा वेग वाढवायला सुद्धा मदत होते.
7. वजन कमी करा
अतिरिक्त वजन हे वंध्यत्वाचे मुख्य कारण आहे.
नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेऊन वजन कमी करणे हा गर्भधारणा करण्याची इच्छा असल्यास करायचा पहिला प्रयत्न आहे.
8. दारू पिणे टाळावे
दारूच्या अतिरेकाचा परिणाम पुरुषांच्या शरीरातील महत्वाच्या अशा टेस्टेस्टेरॉन हॉर्मोनवर होतो.
दारूमुळे टेस्टेस्टेरॉन कमी होते त्यामुळे वंध्यत्व येते. दारूमुळे विर्यातील शुक्राणूंची संख्या सुद्धा कमी होते.
9. पुरेशी झोप घ्या
पुरेशी झोप होत नसेल किंवा शांत झोप लागत नसेल तर त्याचा परिमाण विर्य उत्पादनावर होतो.
म्हणून रोज किमान सात ते आठ तास झोप ही आवश्यक असते.
10. मधुमेह नियंत्रणात ठेवा
ज्या पुरुषांना मधुमेह आहे त्यांना वंध्यत्वाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
म्हणूनच डॉक्टरांच्या औषधाबरोबरच नियमित व्यायामाने, आहारात साखरेचे आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करून मधुमेह नियंत्रणात ठेवला तर त्याचा गर्भधारणेसाठी निश्चित फायदा होतो.
मित्रांनो, गर्भधारणा करण्याची इच्छा असेल तर सगळ्यात आधी आपली जीवनशैली सुधारली पाहिजे हे आपल्या लक्षात आलेच असेल.
नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप तसेच कोणत्याही, अगदी गर्भधारणेबद्दल सुद्धा स्ट्रेस न घेणे हे करणे सगळ्यात महत्वाचे आहे.
वंध्यत्वावर वैद्यकीय उपचार घेत असताना देखील या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.
आपण म्हणतोच की मन फ्रेश असेल, तर शरीर सुद्धा फ्रेश होते.
म्हणूनच मन ताजेतवाने ठेवण्यासाठी योगासने, प्राणायाम हे व्यायाम केले पाहिजेत.
याचबरोबर आपल्या डॉक्टरांचा सल्ला सुद्धा मोकळेपणाने घेणे गरजेचे आहे.
समस्येचा स्वीकार ही त्याला दूर करण्यासाठी चढलेली पहिली पायरी असते, हो ना?
मित्रांनो, अजून एक गोष्ट- वंध्यत्वावर उपचार घेत असताना किंवा हे घरगुती उपाय अजमावून बघताना सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले आपल्या जोडीदाराशी संबंध आहेत.
जोडीदाराशी चांगले संबंध ठेऊन, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
एकमेकांना दोष न देता, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून एकमेकांना मदत केली तर त्याचा नात्यावर तर सकारात्मक परिणाम होतोच आणि लैगिक जीवन सुद्धा सुधारते.
म्हणूनच एकमेकांबरोबर वेळ घालवणे, बाहेर फिरायला जाणे, मोकळेपणाने बोलणे हे सुद्धा या उपायांइतकेच महत्वाचे आहे.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.