कोंड- वऱ्हाडी भाषेतला शब्द. कोंड म्हणजे पावसाळ्याच्या सुरवातीला, आषाढात आभाळ गच्चं भरलेलं असतं, पावसाची प्रतिक्षा टोकाला पोहचली असते पण पाऊस पडतच नाही, असे वातावरण.
वरच्या माडीवर आभाळ न्याहाळत रुख्माक्का ऊभ्या होत्या. आषाढ सरला तरी पावसाचे नामोनिशाण कुठे नव्हते. आभाळ तर काठोकाठ भरून होतं.
रोजचा दिवस पावसाची वाट बघत उगवायचा आणि आभाळाचा डोंब बघत मावळायचा. सारी सृष्टी स्तब्ध होती, झाडं, पानफुलं, माती आणि मातीत रूजलेल्या माणसांना आता एकच ओढ होती कोंड फुटण्याची.
“कई फुटल ही कोंड तं? रोजचा दिस निरा. तसाच येते नं जाते. आखाडी झाली पर कामाले तं काई वाटच नाई गवसून राह्यली.” गुरांना वैरण घालत घरगडी करवादला.
“न्हाई तं का, या साली तं सारं कसं अल्लगच दिसुन ऱ्हायलं बाप्पा. काईच्या काई कोंड दाटुन आलं… महीनाभरापासुन ना सुर्याचं तोंड दिसलं ना पाऊस आला. कधी फुटन हे कोंड आता? म्या तं असं पाह्यलंच नाही” घरकाम आवरणाऱ्या शांताबाईनी त्याला दुजोरा दिला.
“नाही कसं? ६०-६२ वर्ष झाली असतीन आपलं लगीन झालं तंवा अशीच कोंड दाटुन आल्ती” रूख्माक्का मनाशीच पुटपुटल्या.
“तो सारा पावसाळा पावसाची वाट पाहू पाहू पार पडला. मंग कधी फुटली का ते कोंड?” आठवणींचे ढग गर्दी करत होते.
कोंड कधी फुटली हे बघायला रुख्मी माहेरी राहीलीच कुठे? नवरात्र येता येता समाधान पाटलांचं स्थळ सांगुन आलं. साऱ्या वऱ्हाडात नावाजलेलं, पिढ्यांपिढयाची मालगुजारी असलेलं, घरात भरपूर सोनं-नाणं, माणसं, वैभव कशालाच काही कमी नव्हतं आणि मुख्य म्हणजे स्वत: समाधान पाटील कर्तबगार, चारित्र्यसंपन्न होते. आणखी काय हवं होतं?
दाखवण्याच्या कार्यक्रमात पाहुण्यांच्या गर्दीत डोळयांच्या कोपऱ्यातुन न्याहाळतांना नवऱ्या मुलाचा थोराडपणा जरा खटकलाच. पण मनातलं सांगणार कोणाला? आणि मुलीचं ऐकुन सोयरिक जुळवायचा रिवाज थोडीच होता?
पेढयाचा पुडा घेऊन सासरचे आले. साखरपुडयाच्या कार्यक्रमात समाधान पाटलांचा अलिप्तपणा काहीसा अनपेक्षितच होता रुख्मीसाठी. भावांची, मेव्हण्यांची त्यांच्या त्यांच्या लग्नांत आपल्या नवरी भोवती भिरभिरणारी नजर रूख्मीला आठवत होती पण इथे तर पाटलांनी डोळा वर करून क्षणभर सुद्धा नजरभेट घेतली नव्हती.
मनातलं मनातच दडपत रुख्मी सोहळ्यात रमली.
पापणीआडच्या स्वप्नांना रंग चढू लागलेत, मनातलं हसू गालावर उमटलं. अधिऱ्या जीवाला थोपवतांना श्वास फुलू लागले. नव्या कोऱ्या खणा पातळांची सळसळ, दागिन्यांची रुणझुण, असोशीनं सुरू असलेली खरेदी, आवडीने जमवलेलं रुखवंत, पाहुण्यांची गजबज, केळवणं, थट्टा -मस्करी यात रूख्मी हरवली, हरखली, स्वप्नांचे पंख ल्यायली.
“निदान मंगळसुत्र तरी नवं घडवाव त्याइनं. बाकी चालुन जाईल पहिलीचं” आक्का बोलुन गेली.
“पहिलीचं? म्हंजे?” न समजुन रुख्मीनं विचारलं.
“म्हणजे पहिल्या बायकोचं. कसं समजत नाई वं तुले. सारं बैजवार सांगा लागते तं….” जवळ बसलेल्या मालीने पुस्ती जोडली.
”हौ नं !आमच्या रूख्मीबाई ले तं सारं नवं नवं लागते. कोण्णाले काई आधी घेऊच देत नाई. आता कसं करन तं”
कुरडया शेवयाची पाटी उचलुन आत नेतांना काकू बोलली.
दरीत कोसळली रुख्मी. नवऱ्या मुलाचा थोराडपणा, मांडीवरचा मुलगा, बाजुला बसलेल्या लहानग्या मुली, साखरपुडयातली उदासिनता.
“कसं लक्षात आलं नाही त्या वेळेस आपल्याला?” अख्खं घर भौवती गरागरा फिरल्यागत झालं.
पाहुण्यांच्या उस्तवारीत गढलेल्या आईला ओढतच रूख्मी न्हाणीकडे एकांतात घेऊन गेली.
“बाप्पा ! तुले तंवा समजलंच नाई का दुसरपन्या हाये म्हनुन?”
“नाई तं पोरगी बघण्या-दाखोण्यात कोणी पोरं मांडीवर घेऊन बसते?” मायच विचारत होती.
“आता माहया ध्यानात नाई आलं, पर तू काऊन नाई बोलली वं मले? आता कसं कराचं वं माय?” स्वप्नांच्या उडालेल्या ठिकऱ्यांनी घायाळ रुख्मी आक्रंदत होती.
“आत्ता! पोरीबाळीले इच्यारून सोयरिक करतेत कां? आन कसं करू म्हंजे? शांतच ऱ्हा जराशीक. हळदीले वऱ्हाडी जमतीन आता. दुसरे पणाचा हाय पर सारं चांगलं हाये. मोठ्ठ धराणं मिळालं तुले” पोरीचे हुंदके थांबता थांबत नव्हते. समजुतीच्या सुरात माय बोलत होती. कोसळणाऱ्या लेकीला सावरू बघत होती.
“माह्याच्यानं नाई जमणार” रुख्मी निर्वाणीचं बोलली.
“आता वेळ गेली पोरी. पावण्याईसमोर ताल नको करू. बापाची लाज राख. नशीबाचं दान मान अन् चाल सामोरं” समज देऊन माय पाव्हण्यांच्या गर्दीत मिसळली आणि…
आणि दुसऱ्याच कुणाच्या तरी लग्नाला जावं तशी रुख्मी स्वतःच्या लग्नाच्या बोहल्यावर चढली.
पाटलांचा भला थोरला वाडा, नोकर चाकर, अंगावरचं शेरभर सोनं, चार पिढ्यांनी भरलेलं घर रुख्मी सगळं सुन्न नजरेनं न्याहाळत होती, मेल्या मनाने वावरत होती. कुणीतरी ढकलावं तशी ती माप ओलांडुन या घरात आली.
‘नवी आई’ म्हणुन कुतुहलाने न्याहाळणाऱ्या निरागस नजरा देखिल तिला पाझर फोडत नव्हत्या. जणू सगळं प्रेम, लाघव माहेर सोडतांना ओरपुन गेलं होतं..
“माझ्या आधी माझ्या मुलांना आपलं माना, त्यांची आई व्हा.” पहिल्यावहिल्या एकांतात पाटलांनी तिला विनवलं.
“त्यासाठी तशीच पाहयची व्हती, पोराईच्या मायच्या वयाची. माहया सारख्या कोवळया पोरीले काऊन दावणीले बांधलं?” रुख्मीने मनात उसळलेला लाव्हा महत्प्रयासाने बंद ओठांआड रोखुन धरला होता तो डोळ्यातुन बाहेर पडत होता. त्यात नव्या नात्याचे अंकुर दग्ध होत होते.
ना अंगावरच्या दागिन्यांचं अप्रुप, ना नव्या कपडयांचं कौतुक. अंगावरची हळद उतरायच्या आतच विरक्त झाली रुख्मी.
“मोठया बाई, लोकं पाह्यतेत नवं नवं तरी चांगले कपडे घाला जी! पाटलीणीसारखे चार सोन्याचे डाग चढवा अंगावर.” मानाने लहान पण वयाने मोठी जाऊ न रहावुन म्हणाली.
एव्हाना रुख्मीच्या वागण्यातला कोरडेपणा, औदासिन्य माजघरात चर्चेचा विषय झालेला होता.
“काऊन वैनी नवं पातळ नाही नेसत? नव्या नवरीवानी” तिची कळी खुलवायला नणंदेने थट्टा केली.
“कां करते नवं पातळ नेसुन? माणुस तर जुनंच मिळालं नं मले” शब्दांचा आसुड कडाडला. काय बोलुन गेलो हे उमगेपर्यंत बोल घरात कानोकान पसरले होते…..
मन वास्तव स्विकारायला तयार नव्हतं आणि परिस्थिती जगणं नाकारू देत नव्हती.. दुसरेपणाचा संसार मिळाला म्हणुन नवरा, सासर आपलं वाटत नव्हतं, माहेरची माया आटली होती.
“काय केलं माय-बापुनं ? निरा पैसा पाहुन लोटुन देल्लं. अरे गरिबी चालती मले अशा उष्टावलेल्या संसारा परिस.” मन आक्रोशतच राहीलं….
आपल्याच कोषात मग्न असलेल्या रूख्मीचं उफराटं वागणं घरातल्यांच्या, भावकीतल्यांच्या नजरेत खटकलं. वार्ता वेस ओलांडुन माहेरी पोहचली.
केवळ रिवाज पाळायचा म्हणुन कधीतरी माहेरी आलेल्या रुख्मीने बापुंच्या, भावांच्या नजरेतली नाराजी टिपली. त्या दोन-चार दिवसांच्या मुक्कामात वहिन्यांनी सुध्दा ‘नणंद परत सासरी जाते की नाही?’ याचा कानोसा घेतला. रुख्मीला मग आणखीनच परकं परकं वाटलं.
“काऊन वं बापाचं नाक कापाले निंगाली? ऱ्हाय नं साजरी देल्ल्या घरी. तुही किर्ती तं लईच आईकू येऊन ऱ्हाह्यली. नांद तथीच आता सुद्या मतीनं.” कुशीत विसावायला आसुसल्या रूख्मीला मायनं एकांतात जरब दिली.
“चांगली वाग न वं, एवढं मालदार सासर पाहुन देल्लं नं बापुनं तुले. न्हाई तं आमचा सारा संसार जुगाड जमवूजमवू जुन्या हंडया-भांडयातच चालते.” आक्का समजावत होती.
“हंडया भांडयाचं जुने पण चालुन जाते वं, आपलं माणुस नवं कोरं ऱ्हाह्यलं कां” पोटातली व्यथा ओठावर आलीच.
“अंss ! माणुस का कधी जुनं व्हते? जवळ तर येऊ दे त्याइले. पलंगावर सारेच नवे व्हतेत” माली खिदळली.
बहिणींनी आपल्या परीनं समजावलं.
“चांगली वागजो बापा सासरी. शेवटी पैसाच मोठा ठरते. अन् बाईच्या जातीले कोठं बी मन मारूनच जगाव लागते. म्हातारपणी आम्हाले बेइज्जत नको करू माय” माय नं निरोप देतांना, हात जोडले… बापुनं पाठ फिरवली.
मग रूख्मीनं मनाशीच ठरवलं, कुण्णा कुण्णाला आपली व्यथा सांगायची नाही. आपण अगदी एकट्या आहोत. आपलं दुःख आपल्यापाशीच ठेवायचं.
सैरभैर झालेलं मन सावरत, घट्ट करत ती सासरी परतली. नाही तरी दुसरी वाट होतीच कुठे? आणि गलितगात्र मनात आयुष्य संपवायची हिंमत नव्हती.
मनातली जखम लपवायला, मन गुंतवायला घरकाम हाच एक इलाज होता. तसही इतका मोठा बारदाना कर्तेपणानं हात फिरवणाऱ्या लक्ष्मीची वाट बघतच होता. पण साऱ्या व्यवहारात विलक्षण कोरडेपणा आलेला होता आणि त्याचं वैषम्य कोणालाच नव्हतं.
लेक सासरी नांदतेय ह्यातच तिचे मायबाप खुष होते. ‘घराण्याची रितभात निट निभावली जातेय नां?’ ह्याकडे सासरच्यांचा कटाक्ष होता. बायकोच्या मनातली अढी ओळखुन नवरा ही दुरच रहात होता. राहता राहिली सवतीची मुलं.
अश्राप, आईच्या प्रेमाला आचवलेली, भरल्या घरातल्या गोतावळ्यात बांधावरच्या बाभळींसारखी आपसुक वाढणारी. रूख्मीच्या असहकार पुकारलेल्या मनाला त्यांची मुकयाचना जाणवलीच नाही की तिने जाणुनबुजुन दुर्लक्ष केलं? कुठला आसूरी आनंद त्यातुन मिळत होता?
त्या सर्वांची आयुष्य एकमेकांशी समांतर वहात होती.
एका रात्री पाटील घरी नव्हते आणि मुलगा तापाने तळमळत होता. भांबावलेल्या बहिणी वडीलांची आतुरतेने वाट बघत होत्या. स्वतःचा प्रपंच सांभाळत घरातल्या माऊल्या लक्ष देत होत्या जमेल तसं.
सारं निर्विकार नजरेनं न्याहाळणाऱ्या रूख्मीला अवचित एका क्षणी जाणवलं”…. आपल्यासारखीच नियतीच्या डावाला बळी पडलीत ही मुलं… तितकीच अगतिक, असहाय्य.
आणि त्याच क्षणी ते समदुःखी जीव वात्सल्याच्या आवेगात बांधले गेले, आजन्म !
मनातला राग, संताप जमेल तसा दडपत रुख्मी कणाकणानं घरात सामावत होती आणि तिच्यावर घराचा भार सोपवुन पाटील बाहेर मोठे होत होते. किंबहुना, नवरा बायकोच्या ताणलेल्या संबंधांवर पांघरूण घालायला तोच ऊपाय होता.
कधीतरी देहधर्म निभावल्या गेला आणि दिलीप कुशीत रूजला. दिलीपच्या जन्माने सुखावलेल्या रूख्मीने घराला घरपण दिलं, सख्खा-सावत्र भेद तर कधीच केला नाही. पण तिचे आणि पाटलांचे भावबंध कधीच जुळले नाहीत.
फसवणुक झाल्याचा सल तिच्या मनातुन गेलाच नाही. फक्त दोघांच्याच असलेल्या क्षणांमधला विषाद कधी सरलाच नाही. भरल्या घरचं वैभव, थाट कधी उपभोगावसं वाटलंच नाही, अकाली आलेलं वैराग्य श्वासा श्वासात सामावलं होतं.
वाढत्या वयाबरोबर आलेल्या परिपक्वतेने भावनांना आवर घालायला शिकवले. पण कधीतरी खिपली निघायची, वैफल्याचा उद्रेक व्हायचा आणि मग दिलीप वर राग निघायचा. असहाय्य दिलीपच्या मनात तेच कटू क्षण पक्के झाले आणि तिच्यापासुन दिलीपला, पाटलांना दुर करत गेले.
काळाचे चक्र अव्याहत फिरत होते. नात्यांच्या जुन्या दशा गळल्या, नवे धागे जुळले. मनातले पिळ मात्र तसेच राहीले. पाटलांचा लौकीक पंचक्रोशी ओलांडुन वाढत होता. तर घरात रुख्मीची ‘रूख्माक्का’ झाली होती.
मुलं मुली आईच्या वळणात वाढले, शिकले, मार्गाला लागले. लेकी तालेवारांच्या घरी पडल्या आनंदाने तिथेच रुजल्या. त्या परंपरावादी घरात रुख्माक्कानं मुलींना स्वतःची मतं जाहीर मांडायला शिकवले आणि अख्ख्या घरादाराला त्या मतांचा आदर करायला लावला.
त्यांचं माहेरपण प्रेमानं निभावलं, सुनांना मोकळीक दिली. त्यांचं प्रेम मिळवलं, व्याह्या सोयऱ्यांमधे मानाचं स्थान मिळालं. सगळयांचा आधारवड झाली.
थोरला शिकला गावातच कारखानदार झाला. तर दिलीप लागुनच्या शहरात प्राध्यापक झाला, प्राचार्य होऊन निवृत्त झाला, तिथेच राहीला.
अदब राखणाऱ्या सुना, नातवंडानी घर अंगण फुलले होते. म्हातारे जीव त्यात रमुन गेले होते.
ऐंशीच्या घरात पोहचलेल्या पाटलांची रुख्माक्कांनीं. मनोभावे सेवा केली. संध्याछाया गडद होत होत्या मनाचे पिळ थोडे सैल झाले होते. नावाप्रमाणेच पाटील समाधानी होते. कृतार्थतेने त्यांनी डोळे मिटले.
आयुष्यभरातले दोघांमधल्या नात्यांचे अनेक चढउतार आठवत रुख्माक्काने त्यांना मनोमन निरोप दिला “धनी, पुढच्या जल्मी माहया एकलीचेच होऊन या जो. म्या या जल्मी न्याय नाई केला तुमच्या सोबत. पुढच्या जल्मी साऱ्याची भरपाई करतो”
आयुष्याचं एक पर्व संपलं होतं. उन्हाळे पावसाळे येत होते, जात होते. अजुनही घराचं सुकाणू रुख्माक्कांच्याच हातात होतं.
साऱ्या स्थिरस्थावर आयुष्यात दिलीपचा दुरावा हाच एक सल होता. नोकरीच्या निमित्ताने तो शहरात गेला आणि तिथेच स्थिरावला. नोकरी हे एक निमित्त होते, मुळात त्यालाच दुर रहायचे होते.
आणि नात्याने सावत्र असलेला थोरला मात्र आईला धरून होता. सगळयाच नातवंडांची आजीवर भारी माया होती. म्हणुन तर सगळं मनाआड करून रुख्माक्का दिलीपकडे अथुन मधुन जायच्या, नातवंडांना भेटायच्या. दिलीपची लेक तर अख्ख्या घरादारात एकुलती एक अगदी काळजाचा तुकडाच. नातवंड आजीचा पदर सोडत नसत पण पोटचा मुलगा मात्र मनात अढी धरून बसलेला.
लहानपणी आई बापुंमधला ताणतणाव, आईचं बापुंशी कोरडं वागणं दिलीपच्या मनात पक्कं ठसलं आणि वाढत्या वयात मनातल्या अढीचं कारण ठरलं. आईशी रोजचा संबंध नको म्हणुन तो मग शहराच राहिला.
सर्वांशी हसुन -खेळुन वागणारा दिलीप मग आईशी बोलेनासाच झाला.. पोटच्या पोराकडुन मिळणारी परकेपणाच्या वागणुकीनं रुख्माक्कांच्या काळजाला खोल जखम केली तिचा नासूर बनला.
“अजी आक्का, तथी गच्चावरच काऊन थांबल्या जी सांजच्याला? खाली या नं” शांताच्या आवाजाने त्या भानावर आल्या. केवढा लांबचा प्रवास करून आलं होतं त्यांचं मन!
“श्रीराम जयराम जय जय राम ” रूख्माक्कांनी तुळशीजवळच्या दिव्याला हात जोडले
दिलीपचा आदित्य आजीला न्यायला आला होता. दोन वर्ष अमेरिकेत शिकत होता. आता गावात दवाखाना थाटणार होता. तसंही त्याला गावात रहाणं आवडायचं. आजीच्या अवतीभोवती रेंगाळत तिच्या गोष्टी ऐकत सुट्टी घालवणं हा त्याचा छंद होता.
“काऊन आता मले कशापाई बलावते तुही माय? अथीच ठिक हाव नं मी” रूख्माक्काने आढेवेढे घेतले.
“ते आई सांगेल तुला” आदित्य आजीच्या गळयात पडला.
समजायचं ते समजुन रुख्माक्का निघायची तयारी केली. खरं तर त्यांना आता घर सोडुन जावसंच वाटत नव्हतं. आता थकलेलं शरीर ‘प्रवास नको’ म्हणत होतं आणि दिलीपच्या वागण्यातला कोरडेपणा असहय होत होता.
तशा त्या दोन वर्षांपुर्वी नातीच्या लग्नात गेल्या त्या लेकाचा ‘आदर्श प्राध्यापक’ म्हणुन झालेला सत्कार बघुनच परतल्या होत्या. पण इतक्या दिवसांत दिलीप काही क्षणभर सुध्दा आईजवळ बसला नाही. पोटच्या पोराने केलेली उपेक्षा मनात दडवत दुखावुनच त्या परतल्या. तेव्हापासुन मन दिलीपकडे जायला तयार नव्हते.
आताही त्या अनिच्छेने केवळ आदित्यच्या प्रेमापोटीच जात होत्या.
“तथी आता कश्यात न्हाई गुंतायचं. नजरेले दिसल ते मुक्यानं पाह्यचं. पोटच्या पोरालेच आपण डोळयातल्या कुसळावानी सलतो हे ध्यानात ठेवुन वागायचं” रूख्माक्कiनी मनाशीच खूणगाठ बांधली.
मागच्या खेपेला दिलीपचं तुटक वागणं बघुन त्याची समजुत घालायला त्यांनी स्वतःहुन पुढाकार घेतला होता. “काऊन रे बापू साऱ्या जगाशी हसुन खेळून राह्यतं नं माह्या संग बोलाले कन्नी काटतं? माहया मनाले तं इंगळ्या डसतेत तुह्या वागण्यानं”
“तुझाच कित्ता गिरवतोय” दिलीपच्या मनातलं विष बाहेर पडलं.
“म्हंजे?” रूख्माक्का अवाक् झाल्या.
“तू तरी काय केलंस? साऱ्या जगाकडुन कौतुक करून घेतलं आणि…” बोलता बोलता दिलीप थबकला.
“बोल पुरं आता. थांबू नगंस” अवाक झालेल्या रुख्माक्का बोलत राहिल्या. “काय चुकलं रं माहं? कदी सख्ख्या -सावत्राचा भेद न्हाई केला. मोठे म्हणु नको लहान म्हणू नको साऱ्याइले मानानं वागवलं, साऱ्याइची उस्तवार केली अन् आता तू मलेच बोल लावतं”
“बाहेरच्यांना दाखवले चांगुलपण घरात मी आणि बापू मात्र तुझ्या प्रेमाला पारखेच होतो. कधी तरी वागली तू बापुंशी प्रेमानी?” कित्येक वर्ष दिलीपच्या मनात साठलेलं हलाहल आज बाहेर पडत होतं आणि रुख्माक्का हतबल होऊन बघत होत्या.
“अरे न्हाई रे लेकरा, माहं ऐक रं जरा….” जवळ येऊ बघणाऱ्या आईला दुर सारत दिलीप ताडताड् निघुन गेला.
दुरावलेल्या लेकाला जवळ आणण्यासाठी कुठलं साकव घालावं हे त्यांना कळलंच नाही.
दिलीपच्या बंगल्यापाशी गाडी पोहचली आणि रुख्माक्का सावरल्या. सुनबाईनं हात धरून घरात नेलं. मागुन आदित्य सोबत आणलेला गावचा मेवा घेऊन आला.
मुलाच्या दुराव्याचं सुनेसमोर प्रदर्शन नको म्हणुन आधीच त्यांनी आतली खोली गाठली. सुनबाईनं सारा वृत्तांत सांगितला. आदित्यसाठी चांगल्या घरची मुलगी सांगुन आली होती.
“सगळया गोष्टी जुळतायत, बघणं दाखवणं करून होकार द्यावा म्हणतोय आम्ही. तुम्हीसुध्दा मुलगी बघुन घ्या”
बघता बघता लग्न ठरलं आणि थाटात साखरपुडा झाला. आदित्य तर होताच हुशार, कर्तबगार पण रूपानं जरा डावाच होता. नवरी मुलगी मात्र नक्षत्रासारखी देखणी होती. मुलीकडचे लोकंही चांगले होते.
पण कां कुणास ठाऊक रुख्माक्कांना काही तरी खटकत होतं. मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू खरं वाटतच नव्हतं. कदाचित आपल्याच मनाचे खेळ समजुन त्या गप्पच बसल्या. तसंही त्यांनी स्वतःला अलिप्तच ठेवलं होतं.
साखरपुडा पार पडला आणि गणपतीचा सण येऊ घातलेला. कधी नव्हे तो दिलीप स्वतःहुन “थांब” म्हणाला आणि तसंही गावाकडे पावसाची वाट बघत दिवस ढकलणंच सुरू होतं.
मग रूख्माक्कांचा पाय काही निघाला नाही तिथुन.
या खेपेला दिलीप जरासा निवळल्यागत झाला होता. पोटच्या मुलीच्या आणि जावयाच्या आयुष्यातले नव्हाळीचे, आनंदाचे, कौतुकाचे क्षण बघतांना त्याला’ आईच्या आयुष्यातली उणिव जाणवली. तिच्या मनातलं शल्य उमगत होतं पण अजुनही उघडपणे मनातल्या बदलेल्या भावनांचा स्विकार करणं कठीण जात होतं.
आता नवऱ्या मुलीची होऊ घातलेली आजे सासू गावातच आहे म्हंटल्यावर आदित्यच्या सासरहुन निमंत्रण आले, येणं जाणं, बोलणं वाढलं.
आणि एका भेटीत ऊत्साहाच्या भरात मध्यस्थ बोलुन गेले, “पाहा बरं, मुलगी काळा नवरा नको म्हणत होती पण समजावलं तर समजली नं? अमेरिका रिटर्न नवरा सोडायचा थोडाच हातचा. आता थोडी नाराज आहे पण संसाराला लागली की खुलते कळी आपच”
“संसाराला लागली की खुलते कळी आपच…….. संसाराला लागली खुलते कळी आपच……….. संसाराला….. खुलते….आपच…..” रूख्माक्कांच्या कानात शब्द घणासारखे आदळत होते.
“तरीच मुलगी काही मांडवात आनंदी वाटली नाही” रुख्माक्कांचं विचारचक्र सुरू झालं.
“पुन्हा तेच! या ही पोरीच्या माथी तसाच नाराजीचा संसार, थ्येच तडजोड. तंवा गावच्या पाटीलकीची भुलन पडली व्हती माह्या माय-बापुले आता पोराचं अमेरिकेले जाणं मोहवते या पोरीच्या आई बापाले.
नाई आता असं पुना न्हाई होऊ द्याचं. कोण्या अश्राप पोरीले पुन्ना न्हाई मनाविरूद्ध जगण्याची शिक्षा होऊ द्याची”
“पण कसं?” या एकाच विचाराने त्या पछाडल्या. जे काय करायचं ते लवकरच करायला हवं होतं. दोनच दिवसांनी आदित्यला विश्वासात घेऊन त्या व्याह्यांकडे पोहोचल्या.
व्याहयांकडे जाण्याचा निर्णयइतका सहज सोपा नव्हता. दोन दिवस मनात वादळ घोंघावत होतं. मन अलिप्त रहायला सांगत होतं तर सद्सद्विवेक बुद्धी परिस्थितीतुन योग्य मार्ग काढायला सांगत होती. आदित्यच्या लग्नाच्या निर्णयात ढवळाढवळ करणं म्हणजे दिलीपला आणखी दुर करणं ठरणार होतं.
“पर मंग निस्तं पाहात बसू?” रुख्माक्कांची तगमग होत होती.
“आपल्या वक्ती साऱ्याइनं तसंच तं केलं कोनी न्हाई आलं मायबापूले समजावयले. एक गोष्ट तं खरीच ऱ्हायते का मायबाप पाठीशी असले तं जग पाठीशी उभं असते. माय बापूले कोणीतरी समजवा लागत व्हतं”
“झालं गेलं गंगेला मिळालं. आता कितीकई आग पाखडली तरी काय? पुरी जिंदगी बितली आपली हाच ईचार करू करू. पर हातीतं काईच न्हाई लागलं. आता तं सख्खा पोरगाच बोल लावते.
त्याच्या मनातलं कदी जाइन अन् कदी त्याले माहयासाठी पाझर फुटन तं? आपला जीव मात्र मिरगातल्या कोरड्या जमिनीवाणी आसावुन हाय. शेवटच्या वक्ताले तोंडात गंगाजळ टाकाले आला तरी बस झालं.”
“उंss ! कोळसा किती बी उगाळला तरी काळाच ऱ्हाइल. माय बापू गेले त्याले कैक साल झाले, धनी बी देवाघरी गेले त्याले ही तपापेक्षा जास्त काळ लोटला. आता कोणाची तक्रार करायची आन कोणापाशी?” मध्यरात्र उलटली तरी डोळयाला डोळा लागत नव्हता.
“आपण मन मारून नांदलो, नेला संसार या थडीचा त्या थडीपातूर पर आता नवा जमाना हाय. थ्ये पोरगी न्हाई नांदली तं? न्हाई नांदली तं पेक्षा अशीच रडत कुढत जगली तं?” नुसत्या विचाराने सुध्दा रुख्माक्का शहारल्या.
“नको!!! नको!!! परक्याची झाली म्हुन काय झालं? कोनाले न्हाई पर आपल्याले तं समजतेनं तिची नाराजी. आता थ्ये नाई मायबापा पुढं बोलणार पण आपलं तं आइकतिन तिचे मायबाप.
लोकं कां दोन दिस बोलतीन आन् तिसऱ्या दिवशी आपल्या कामाले लागतीन. त्याईची कायले फिकीर कराची? थ्ये काई न्हाई ऊद्याच्या ऊद्या आधी नवऱ्या पोरीले भेटुन तिच्या मनाचा कौल घेऊ. आन पोरीच्या मायबापालेबी समजावू” रूख्माक्कांचा निर्णय झाला तेव्हा तांबडं फुटत होतं.
“ये पोरी बस अथी माहयापाशी” सरळ विषयाला हात घालत रुख्माक्का म्हणाल्या, “खरं सांग, तुले खरंच माहा नातू पसंत हाय कां त्याचं अमेरिकेले जाणं जास्त मानाचं वाटुन राह्यलं?” त्या भांबावलेल्या मुलीला समजेच ना आई वडीलांचं स्वप्न, प्रतिष्ठा जपायची की स्वतःचं मन मोकळं करायचं?
“बोल पोरी बोल! वेळ हाय तंवरच बोलून घे मंग हाती काई गवसत नाई, आन् माह्यासारखं कोनी तुह्या मनाले समजुन घेणारं भेटतई नाई साऱ्याइले. तंवा आताच बोल पोरी मनात कां हाये ते.
नसन् माहा नातू पसंत तं नाही म्हण जो, पण तडजोडीचा संसार करून दोन जिवाले घोर नको लावू. कोणीच सुखी नाई राहात त्यात.” रूख्माक्का काकुळतीला आल्या आणि नवऱ्या मुलीचा बांध फुटला.
“मला मनासारखा जोडीदार हवा हो. नसे ना का तो अमेरिकेहुन आलेला.” मुलीच्या आई वडिलांना रुख्माक्कांचा सल्ला मानावाच लागला. आणि लग्नं मोडल्याचं सारं खापर स्वतःवर फोडुन घेत त्या घरी परतल्या.
आजीवर विश्वास ठेवत आदित्य शांत होता पण घरातलं वातावरण मात्र तापलं होतं. सुनबाई संतापाने फुलल्या होत्या. रुख्माक्का सरळ वर गच्चीत जाऊन बसल्या. दिलीप बाहेरून आला आणि धुसफुसीला सुरवात झाली.
“आता झाल्या प्रकाराचा आईला जाब कसा विचारावा?” दिलीपच्या अंगाचा तिळपापड झाला.
”कुठुन आईला ‘थांब’ म्हंटलं आणि तिने दुधात मिठाचा खडा टाकला?” घडल्या गोष्टीचे कारण विचारायला जातांना त्याचा संताप पायरीगणिक वाढत होता.
“आई काय केलंस हे ? कसला सुड घेतलास गं?….” दिलीपचं वाक् ताडन रूख्माक्का शांतपणे ऐकत होत्या.
आईच्या चुकांचा पाढा वाचुन, बोलुन बोलुन तो थकला, श्रमला, गप् बसला आणि रूख्माक्का जवळ आल्या. खुप आतुन काळजाच्या गाभ्यातुन शब्द फुटले, “खरं हाय बाबा! तुहं म्हणणं खरं हाय.
तुहया बापुशी माहं मनाइरूध लगीन झालं नं माहं आयुष्यच नासलं. चुक कोणाची होती अन् कोणाची न्हवती? मोप पाणी वाह्यलं आता काय मांडू जिवनाचा लेखाजोखा? मी तं माहया दुःखातच व्हती पण त्याइले बी खुप सोसाव लागलं.
तुह्या बापुची मोठी अपराधी हाओ रे मी. जलमभर एकाच घरात राहुन ते बी एकलेच आन् मी बी एकलीच राहिलो. मनाची गाठ कदी उकललीच नाई.
माह्या जागेवर दुसरी कोणी पैश्याले भुलणारी आली असती तं नक्कीच तिनं त्याइले सुखात ठेवलं असतं. पर याइच्या पदरी म्या पडली मन जुळाची वाट बघणारी.
आता तंवाचं जाऊ दे पर आता न्हाई मी माह्या नातवाचा बळी देणार फुकाच्या इज्जती पायी. थ्ये पोरगी मन मारून ऊभी झालती लग्नाले माय बापासाठी.
म्हंजी पुन्ना त्येच राग लोभाचं अन नाराजीचं चक्र फिरवाचं होतं कां? पुन्ना एका संसारात आग थुमसू द्याची?”
बोलता बोलता गळा भरून आला आणि रूख्माक्का थांबल्या. ऊभं अंग गदगदत होतं आणि डोळ्याला पदर लागला होता.
भारावलेला दिलीप आईला आधार देत तिच्या सोबत खाली बसला अगदी जवळ. रूख्माक्कांना अजुनही खुप बोलायचे होतं पण शब्दच फुटत नव्हते.
आता शब्दांची गरज उरलीच कुठे होती? न बोलताच आईची व्यथा, तगमग दिलीपला समजत होती. आता धुसर डोळयांमधे आई मावतच नव्हती.
वर आकाशात विजेची लांब सळई चमकली आणि गडगडाट झाला. आता कोंड फुटली होती. श्रावण मुसळधार बरसत होता आणि आसावलेली जमीन सुखावत होती.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
काय बोलावे…. कथा वाचताना अवस्था तशीच झालीय जशी रुक्माख्खाच्या मुलाची झाली होती…. अप्रतिम 👌👌👌👌
Khupch Sundar 👍
Kharach apratim
excellent very nice.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
Nice
Very nice