योगशास्त्र हा आपला अमूल्य ठेवा आहे. हजारो वर्षांपासून आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती सुदृढ ठेवण्यासाठी याचा अभ्यास केला जातो.
काही लोकांना मात्र योगा म्हणजे वजन कमी करण्याचा उपाय वाटतो. खरंतर नियमितपणे केलेली योगसाधना एखाद्या मनुष्याला अंतर्बाह्य बदलून टाकू शकते.
योग या शब्दाचा अर्थ आहे संयोग किंवा जोडणे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य यांची सांगड घालणे म्हणजे योग.
यामुळे साधक नेहमीच एका संतुलित अवस्थेत रहातो आणि जीवनातील चढ उतारांमुळे खचून जात नाही.
आधुनिक जीवनशैलीमुळे डिप्रेशन, निराशा, चिंता, भीती अशा अनेक मानसिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.
हे न दिसणारे रोग आहेत जे हळूहळू आयुष्य पोखरून टाकतात. पण सुदैवाने यावरचा साधा आणि प्रभावी उपाय देखील आपल्या हातात आहे आणि तो म्हणजे नियमितपणे केलेली योगसाधना.
दररोज साधारण अर्धा तास मेडीटेशन आणि काही ठराविक आसने केली तर या मानसिक समस्या दूर करता येतात.
या लेखातून अशीच काही वैशिष्ट्यपूर्ण आसने आणि त्यांचे उपयोग याबाबत आम्ही संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
जाणून घेऊया कोणती आहेत ही आसने.
१. बालासन
नावाप्रमाणेच यात लहान मुलाप्रमाणे शारीरिक स्थिती धारण केली जाते.
या आसनामुळे ताणतणाव, चिंता कमी होतात. पाठ व कंबरेचे स्नायू रिलॅक्स होतात त्यामुळे दिवसभर थकून आल्यावर हे आसन केले तर फ्रेश वाटते.
कृती
योगा मॅटवर पाठीवर झोपावे. दीर्घ श्वास घेऊन दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटाजवळ आणावेत.
पाय जास्तीत जास्त पोटाजवळ घेऊन श्वास शक्य तेवढा बाहेर सोडावा.
यानंतर खोल श्वास भरून घ्या. त्याचवेळी दोन्ही हातांनी पोटावर घेतलेल्या पायांना घट्ट पकडून ठेवावे.
पाय गुडघ्यातून थोडे रुंद करावे म्हणजे दोन्ही गुडघे वरच्या बाजूला येतील. गुडघे काखांपर्यंत येऊ द्यावेत.
जर सहजपणे पाय पकडणे जमत नसेल तर स्कार्फ किंवा नॅपकीन वापरावा.
या अवस्थेत घोट्याचे सांधे गुडघ्यापेक्षा उंचावर असले पाहिजेत. आणि पाय जमिनीला समांतर ठेवावे.
हनुवटी गळ्याजवळ टेकवून कपाळाचा स्पर्श जमिनीला होईल यासाठी प्रयत्न करावा.
दोन्ही टाचांनी माकडहाड व मणक्याचा खालचा भाग याठिकाणी दाब द्यावा.
मानेचा मागचा भाग व खांदे जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने झुकवावे. पाठ जमिनीला समांतर ठेवावी.
या अवस्थेत नैसर्गिक श्वासोच्छ्वास सुरु ठेवावा.
आसन सोडताना प्रथम दोन्ही हातांची पायावरील पकड सैल करावी व नंतर हळूहळू दुमडलेले गुडघे सोडवून घ्यावेत.
शवासनात पाठीवर झोपावे व नंतर पुढील आसनाकडे वाटचाल करावी.
२. भुजंगासन
फणा काढलेला साप जसा दिसतो त्याप्रमाणे शरीराची स्थिती या आसनात दिसते.
या आसनात शरीराचा वरचा भाग उचलला जातो त्यामुळे एनर्जी वाढते. मूड सुधारतो, आत्मविश्वास वाढतो.
कृती
योगा मॅटवर पोटावर झोपावे. पायाची बोटे व हनुवटी जमिनीला टेकलेली असावी.
दोन्ही पाय, टाचा व पावलांचा भाग एकमेकांना जोडून घ्यावा.
दोन्ही हात कोपरात दुमडून खांद्याच्या रेषेत ठेवावेत.
तळहात व बोटे जमिनीवर टेकलेले असावेत.
कोपरे जमिनीला समांतर व कोपराचा सांधा मॅटवर टेकलेला असावा.
दीर्घ श्वास घेत डोके, छाती व नाभीपर्यंत पोटाचा भाग हळूहळू वर उचलावा.
खांदे मागे ओढून डोके मागच्या बाजूला झुकवावे.
छातीचा भाग पुढे ताणलेला असावा.
नजर समोर किंवा वरच्या बाजूला स्थिर ठेवावी.
शरीराचा वरचा भाग हातांवर तोलून धरावा. मात्र शरीराचा भार हातांवर न टाकता कंबर आणि पाठ या भागात बॅलन्सिंग करावे.
साधारणपणे वीस ते तीस श्वास या अवस्थेत रहाण्याचा प्रयत्न करावा.
शरीरावर जास्त ताण घेऊ नये. हलकेच श्वास सोडत शरीर पूर्वस्थितीत आणावे.
दोन्ही हात शरीराच्या बाजूला व हनुवटी जमिनीवर टेकवून विश्रांती घ्यावी.
३. अधोमुख श्वानासन
या आसनामुळे शरीरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर टाकली जाते त्यामुळे चिंता, भीती यापासून सुटका होते. तसेच मेंदूची शक्ती वाढते, थकवा दूर होतो.
नावाप्रमाणेच यात जमिनीच्या दिशेने तोंड केलेला कुत्रा जसा दिसतो तशीच शरीराची स्थिती दिसते.
कृती
हे आसन करताना जमिनीवर उभे रहावे.
कंबरेतून पुढे झुकत दोन्ही हातांनी जमिनीचा आधार घ्यावा.
गुडघे व कंबर सरळ रेषेत ठेवावेत. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर व्यवस्थित टेकवून आधार घ्यावा.
श्वास बाहेर सोडावा व गुडघे आणि मांड्या सरळ रेषेत ठेवाव्यात.
सुरुवातीला जर आसन जमत नसेल तर गुडघे थोडेसे वाकवून टाचा वर उचलाव्यात.
सरावाने हळूहळू टाचा जमिनीला टेकवणे जमते.
या आसनात वक्षभाग ताणला जातो.
डोके दोन्ही हातांच्या मधे व खालच्या दिशेने वळवावे.
अधोमुख श्वानासन हे सूर्य नमस्कारातील एक आसन असून यात हात, पाय व पोट यावर ताण येतो.
या अवस्थेत काही सेकंद राहून पुन्हा गुडघ्यात पाय दुमडून पूर्वस्थितीत यावे.
आसन सोडताना मान हळूहळू वरच्या बाजूला आणावी.
यानंतर बालासनामध्ये काही वेळ थांबून नंतर पुढील आसन करावे.
४. वीरभद्रासन
यात शरीराचा मध्य भाग ताणला जातो व त्यामुळे रिलॅक्स वाटते. या आसनामुळे आत्मविश्वास वाढतो, तणाव कमी होतो. एखाद्या योद्ध्यासारखी मानसिक अवस्था होते. म्हणजे चिंता, भीती या भावना कमी होऊन अवघड प्रसंगाचा सामना करण्यासाठी धैर्य लाभते.
कृती
प्रथम ताडासनात उभे रहावे. दोन्ही पायांमध्ये साधारण तीन ते चार फूट अंतर ठेवावे.
उजवा पाय ९० अंशात उजवीकडे वळवावा. डाव्या पायाचे पाऊल आत वळवावे.
दोन्ही हात उचलून डोक्यावर न्यावेत.
हात वरच्या बाजूला जमिनीला समांतर ठेवावे.
या अवस्थेत शरीराचा मध्य भाग जास्तीत जास्त उजव्या बाजूला वळवावा.
चेहरा सुद्धा उजव्या बाजूला वळवावा.
यावेळी पाय मात्र स्थिर ठेवावेत.
यानंतर उजवा पाय गुडघ्यात वाकवून पुढे घ्यावा.
या अवस्थेत शक्य तितका वेळ स्थिर रहावे.
पुन्हा डाव्या पायाने अशीच कृती करावी. यावेळी डाव्या पायाचा गुडघा वाकलेला असून शरीर व चेहरा डाव्या बाजूला वळवावा.
जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी पाच ते सहा वेळा हे आसन करावे.
५. सेतुबंधासन
डिप्रेशन दूर करण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. यात पाठीचा कणा ताणला जातो त्यामुळे शरीराला एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. सेतु म्हणजे पूल.
शरीराचा मध्यभाग उंचावला जातो व पूल बांधल्याप्रमाणे शरीराची स्थिती दिसते.
कृती
जमिनीवर झोपावे व पाठ मॅटला टेकवावी.
दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून शरीराजवळ आणावे.
दोन्ही पावले जमिनीवर घट्ट टेकवून आधार घ्यावा.
दोन्ही पावले व गुडघे यांत सहा इंच अंतर ठेवावे.
दोन्ही हात शरीराच्या बाजूला जमिनीला समांतर ठेवावे. तळहात जमिनीवर टेकलेले असावेत.
सेतुबंधासन करत असताना पाठीवर दाब देऊन ती जमिनीला लावून ठेवावी.
श्वास घेत घेत प्रथम पाठीचा खालचा भाग, मग मधला भाग व शेवटी पाठीचा वरचा भाग हळूहळू वर उचलावा.
शरीराचा तोल सांभाळला जाण्यासाठी दोन्ही टाचा जमिनीवर घट्ट रोवून ठेवाव्यात.
हनुवटी छातीजवळ आणावी. छातीचा भाग अशाप्रकारे वर उचलावा की सहजपणे तो हनुवटीला स्पर्श करेल.
संपूर्ण शरीराचे वजन खांदे, हात, व पायांवर समप्रमाणात तोलून धरावे.
कोणत्याही एका भागावर ताण येऊ देऊ नये.
अशाप्रकारे हळूहळू शरीर जमिनीपासून जास्तीत जास्त वर उचलावे.
या अवस्थेत नैसर्गिक श्वासोच्छ्वास सुरु ठेवावा.
साधारणपणे वीस ते तीस श्वास या अवस्थेत रहावे.
श्वास सोडत हळूहळू प्रथम खांदे खाली आणावेत व त्यानंतर पाठ हळूहळू जमिनीवर टेकवावी.
एक दीर्घ श्वास घेऊन दोन्ही पाय सरळ स्थितीत ठेवावेत.
हात व पाय सैल करुन शवासनात विश्रांती घ्यावी.
वरील सर्व आसने मनाची सकारात्मकता वाढविण्यासाठी उपयोगी आहेत.
नियमितपणे या आसनांचा अभ्यास केला तर प्रसन्न, आनंदी मन:स्थितीचा अनुभव घेता येतो.
पण आसने म्हणजे कोणत्याही औषधोपचारांसाठी पर्याय होऊ शकत नाहीत. योगाभ्यास ही पूरक साधना आहे.
यापैकी कोणतीही आसने करण्यापूर्वी योगतज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. औषधे घेत असाल तर आपल्या डॉक्टरांशी चर्चा करुनच योगसाधना सुरू करावी.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा.
लेख आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.