आपण वीज वापरतो, मात्र कधी कधी झटका बसतो….
आपण वाहन वापरतो, कधीतरी अपघात होतो….
आपण स्वयंपाकासाठी गॅस वापरतो, कधीतरी गळती होऊन आग लागू शकते….
म्हणून आपण वीज, वाहन, गॅस वापरणे सोडून देत नाही, तर या गोष्टी वापरण्याचे नियम शिकून घेतो आणि काळजी घेतो.
अगदी तितकाच उपयुक्त आणि त्यापेक्षाही घातक आहे स्मार्टफोन आणि सोशल मीडिया.
पण त्याचे नियम शिकण्यात फारसा कुणाला रस नसतो. माकडाच्या हाती जळते लाकूड मिळावे तसे स्मार्टफोन आणि फेसबूक, व्हाट्सप इत्यादी वापरले जाते.
स्मार्टफोन वापरण्याचे मॅनर्स आणि एटीकेट्स
१. मिस्टेकचा झटका
आपल्याला अनुभव असेलच की एखाद्याच्या फोनवरून दुसर्याला चुकून नंबर डायल होतो किंवा नाव सारखे असेल तर व्हाट्सपवरून भलत्याच व्यक्तीला संदेश पाठवला जातो.
त्यावरून गैरसमज होतात, भांडणे आणि हाणामारीही होते. हा तंत्रज्ञानाचा झटका आहे. म्हणून त्यावर दोन्ही बाजूंनी शांतपणे विचार केला तर ही केवळ एक मिस्टेक आहे असे लक्षात येते.
संशय घेतल्याने संशय वाढतो, तर विश्वास ठेवल्याने विश्वास वाढतो.
२. दुसर्याचा फोन घेऊ नका
कितीही जवळची व्यक्ती, मित्र असेल तरी इतरांच्या फोनला हात लावू नका.
त्यांचे आलेले काॅल घेऊ नका, त्यांच्या फोनवरून काॅल करू नका.
अगदीच आणीबाणीची परिस्थिती असेल तर आधी स्वतःचे नाव सांगा. समोरून कोण बोलत आहे त्याची खात्री करून मगच पुढे बोला. यातून अनेक गैरसमज टळतील.
३. प्रत्येक काॅल रेकाॅर्ड होत आहे असे समजून वागा
आपला प्रत्येक काॅल रेकाॅर्ड होत आहे, असे समजूनच बोला. समोरच्या व्यक्तीने कुणाची बदनामी होईल असे बोलणे सुरू केले तर त्यात सहभागी होऊ नका.
त्या व्यक्तीचे बोलणे थांबवा. विषय बदला किंवा फोन कट करा. हे सर्व बोलणे आपल्याला महागात पडणारे असते. कुणाची स्तुती करणार असाल तर बिनधास्त करा. त्याचा तुम्हाला फायदाच होईल.
४. ब्राॅडकास्ट ग्रुपची सवय
व्हाट्सपवर ओळखीच्या लोकांचा ब्राॅडकास्ट ग्रुप बनवून त्यांना सकाळ, संध्याकाळ गुड माॅर्निंग वगैरे फोटो टाकण्याची ड्युटी अनेक लोक करतात.
तुमची काय सरकारने नेमणूक केली आहे का? दररोज विनाकारण तुमच्या नंबरवरून मेसेज येत असतील तर लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात.
मग एखाद्या दिवशी तुम्ही असा मेसेज टाका की, आमच्या घरात बिबट्या शिरला. तरी लोक तुमचा हा मेसेज वाचणार नाहीत. कदाचित त्यांनी तुम्हाला ब्लाॅकसुद्धा केलेले असेल.
५. फेसबूकवरचे वाढदिवस
आपल्या पुतण्यांचे, भाच्यांचे वाढदिवस साजरे करताना मोठ्या हौसेने लहान मुलांचे फोटो फेसबूकवर टाकले जातात.
ज्यांच्या मनात काळे आहे ते या फोटोत काय पाहतात. तुमची श्रीमंती किती आहे? घरात काय काय वस्तू आहेत? या पोराचे अपहरण केले तर साधारण किती पैसे मागता येतील?
यातला दुसरा धोका म्हणजे स्वतःला सिद्ध न करताही प्रसिद्ध होण्याची सवय मुलांना लागते.
६.काॅमेंटमध्ये अपशब्द
अनेकांना फेसबूकवर काॅमेंट करताना शिव्या देणे गरजेचे वाटते. पण यावरून गुन्हा दाखल होऊ शकतो. तुम्ही काॅमेंट डिलिट केली तरी त्याचे स्क्रीनशाॅट आधीच कुणीतरी काढून घेतलेले असतात.
७. काॅपी पेस्टची समस्या
आजकाल अनेक चांगल्या पोस्ट जशाच्या तशा उचलून काॅपी पेस्ट केल्या जातात. लेखकाचे नाव काढून टाकले जाते. पोस्टमध्ये वाटेल तसे बदल केले जातात.
काॅपीराइट कायद्यानुसार हा गुन्हा आहे. तुम्हाला जर वाटते की एखादी माहिती सर्वांच्या भल्याची आहे म्हणून पुढे पाठवत आहात.
अशा वेळी पूर्ण लेख जसाच्या तसा न उचलता त्यातील सुरुवातीचा थोडा भाग घेऊन पुढे मूळ लिंक द्या. ज्याला पूर्ण लेख वाचायची इच्छा आहे तो लिंकवर जाऊन वाचेल. लेखक लोक मेहनतीने लिहितात. त्यांचे श्रेय त्यांना द्या. ते आणखी उत्साहाने लिहीतील.
८. शासकीय आदेशांचे फाॅरवर्ड
राजमुद्रा असलेले शासकीय परिपत्रक पीडीएफ जोडल्याशिवाय कोणताही शासकीय आदेश फाॅरवर्ड करणे ही अफवाच आहे.
फाॅरवर्ड करण्याची भलतीच घाई आपल्याला झालेली असते. नंतर कळते की ती माहिती खोटी आहे. यात तुम्ही आपल्या शब्दाचे वजन गमावून बसता.
ऐसी जगह बैठो,
कोई न बोले ऊठ।
ऐसी बात करो,
कोई न बोले झूठ।।
असे खोटे आदेश ज्यांनी तुम्हाला पाठवले त्यांना सरकारचा जीआर मागा आणि कडक शब्दात समज द्या.
दुसरी बाजू
याची दुसरी चांगली बाजू म्हणजे आज अनेक ग्रुप व्हाट्सप आणि फेसबूकवर शिस्तीत काम करत आहेत. तेथे ऍडमिन खंबीर आहेत. निव्वळ गप्पा नाही तर अनेक कामे या ग्रुपद्वारे होत आहेत.
लेखमाला चालवल्या जात आहेत. ज्ञानगंगा घरोघरी वाहत आहे. अशा जबाबदार नेटिझन्सची संख्या वाढो आणि हा देश सोशल मीडियाच्या दुष्परिणामातून मुक्त होवो, हीच सदिच्छा.
मित्रांनो, जग बदललं तसं सोशल मीडियावरचे मॅनर्स आणि एटीकेट्स पाळणं गरजेचं झालं. कारण हल्ली तुमच्या स्मार्टफोन, सोशल मीडिया वापरण्याच्या सवयीवरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावला जातो.
आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही, तसंच व्हर्च्युअल जगाच्या चारचौघांत आपलं ‘हसं’ होणार नाही याची काळजी पण आपणच घेतली पाहिजे…. बरोबर ना!!
लेखन: विनोद जैतमहाल
(संस्कृत शिक्षक आणि भाषणकला प्रशिक्षक, जालना)
Image Credit: shutterstock
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very good Article Sir & Thanks
Very good article Sir & Thank You very much
Very good advice given about smartphone. Thank you Sir.