सण आणि उत्सवांची नाळ भारतीय समाजमानाशी अत्यंत घट्ट जोडलेली आहे. भारतीय संस्कृतीची उज्ज्वल परंपरा टिकवून ठेवणे हा सण साजरे करण्यामागील उद्देश असला तरी, या प्रत्येक सणामागे काहीतरी अर्थ दडलेला आहे. प्रत्येक सणाचं आयोजन मोठ्या उदात्त हेतूने करण्यात आलं आहे. केवळ वेळ मजेत जावा, चार घटका मनोरंजन व्हावं हा यामागचा उद्देश नाही तर या उत्सवांतुन एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे.
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. बहीण भावाच्या हातावर ‘राखी’ बांधून त्याच्या उज्वल भवितव्याची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. ‘राखी’ या शब्दाचा अर्थच ‘रक्षण कर्ता’ असा आहे. परंतु, या शब्दाची फोड केली तर ‘राख’ म्हणजेच सांभाळ करणे असाही त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. शूरवीरांनी दुर्बलांचा, श्रीमंतांनी गरिबांचा, कर्तबगारांनी असाह्य असणाऱ्यांचा, धडधाकटानी अपंगांचा, अबलांचा सांभाळ करावा, त्यांचे रक्षण करावे असे तात्पर्य यामागचे असावे.
रक्ताची नाती जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असतेच पण त्यापुढे जाऊन मानवतेचे बंध जपण्याचा संदेश हा सण आपल्याला देतो. आज बदलत्या काळात नात्यांचे बंध कमकुवत होऊ लागले आहेत.. रस्त्यावर फिरणाऱ्या बहिणी सुरक्षित राहिल्या नाहीत. भोग आणि वासनेनें बरबटलेल्या नजरा त्यांचा निरंतर पाठलाग करत असतात. अशात रक्षणकर्ता भाऊ प्रत्येकवेळी ढाल बनून पाठीशी उभा राहू शकेलचं असे नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील चांगुलपणाला जागे करून संकाटाच्या वेळी धावून जाण्याची वृत्ती ठेवून मानवतेचे नाते मजबूत करण्याची गरज आहे. रक्षाबंधनाचा सण हा केवळ ‘सण’ म्हणून साजरा न करता एक ‘वचन’ म्हणून साजरा केला तर या त्यामागचा उद्देश सफल होऊ शकेल.
रक्षाबंधनाची सुरवात कधीपासून झाली याबद्दल निश्चित असे सांगता येत नाही. परंतु भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून हा सण देशभरात साजरा केला जातो. पौराणिक कथा व इतिहासामधेही या सणाचे माहात्म्य आणि उद्देश दिसून येतो. एका पौराणिक कथेनुसार इंद्र दानवांकडून पराजीत झाला असताना त्याच्या उजव्या हातावर इंद्राणीने रक्षासूत्र बांधले. यामुळे इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला व त्यांनी दानवावर विजय मिळवला. अशी कथा आहे. तर महाभारतात श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला होता व द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीचे रक्षण करून भावाचे कर्तव्य पार पाडले. चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती. रविंद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदु व मुस्लिम यांच्यात सलोखा निर्माण करण्यासाठी दोन्ही समुदायांना एकमेकांच्या हातावर रक्षासूत्र बांधण्याची विनंती केली होती. काळानुरूप रक्षाबंधनाच्या सणाचे स्वरूप बदलेले असले तरी आजही भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाच्या, स्नेहाच्या या ‘बंधना’ चे महत्त्व कायम आहे.
आज बदलत्या काळात रक्षाबंधनाचा अर्थ नव्याने समजून घेऊन त्याला व्यापक करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजचा समाज कालपेक्षा अनेक अर्थांनी समृध्द असला तरीही यात खऱ्या नीतिमत्ता असलेल्या माणसांची उणीव आहे. आजही स्त्रियांना केवळ उपभोगाची वस्तू समजणारयांची संख्या कमी नाही. रस्त्यावर, कार्यालयात, शाळेत इतकेच नाही तर अगदी घरातही आपल्या आया-बहिणी सुरक्षित राहिलेल्या नाहीत. प्रत्येक ठिकाणी गिधाडांच्या नजरा त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवत असतात. स्त्री जातीवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्यांनी भरलेली वर्तमानपत्रांची रकाने हि विदारक परिस्थिती अधोरेखित करतात. स्त्री समानतेच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरी समाजची मानसिकता अजून बदलेली नाही हे कटू सत्य आहे. या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाचा सण ‘दृष्टी परिवर्तनाचा सण’ बनला पाहिजे. बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. हाच दृष्टीकोन व्यापक करून समाजात वावरणाऱ्या प्रत्येक स्त्रीला बहीणाचा दर्जा देऊन तिच्या संरक्षणाची नैतिक जबाबदारी समाजाने आपल्याकडे घेतली पाहिजे. रक्ताच्या नात्याचे ‘बंध’ जपण्यासाठी जसे आपण संवेदनशील असतो. तसेच, किंबहुना त्यापेक्षा अधिक संवेदनशील मानवतेचे नाते जपण्यासाठी राहावे लागणार आहे. नीतिवान समाज ही उद्याची प्राधान्याची गरज असणार आहे. त्यामुळे कर्तृत्वाची शिखरे गाठताना सामाजिक जबाबदारीचे भानही गांभीर्याने जपण्याचे भान सर्वाना ठेवावे लागणार आहे.
‘स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा” असा महान संदेश देणार्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. शाळेत प्रतिज्ञा म्हणत असताना हात पुढे करून ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ हि शपथ आपण सर्वानी घेतलेली आहे. या शपथेला साक्षी मानून समाजातील प्रत्येक स्त्रीप्रती पवित्र दृष्टिकोन ठेवून तिच्या रक्षणाची जबाबदारी घेऊया. समाजबांधणीसाठी मानवतेचे ‘बंध’ जपण्याचा निर्धार करून रक्षाबंधन साजरे करूया..!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.