घर बांधायचे नसेल तर फक्त प्लॉट घेण्याकरता लोन मिळू शकते का? वाचा, काय आहेत नियम?
प्लॉट घेऊन त्यावर टुमदार घर बांधावं ही प्रत्येकाची इच्छा असते. शिवाय जमिनीत केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आणि फायदा देणारीच मानली गेली आहे.
त्यामुळे आपला स्वतःचा प्लॉट असावा आणि आपण त्यावर छानसे घर बांधावे असे वाटणे अगदी साहजिक आहे.
परंतु त्याकरता करावी लागणारी पैश्यांची सोय फार महत्वाची ठरते.
मध्यमवर्गीय लोकांचा प्लॉट वगैरे घेण्यासाठी लोन काढण्याकडे कल असतो. परंतु आपल्याला प्लॉट घेण्यासाठीच्या कर्जाच्या नियमांची माहिती मात्र नसते. फक्त प्लॉट घेण्यासाठी कर्ज मिळेल का? हा प्रश्न बहुतेकांना पडलेला असतो.
आज आपण ह्या नियमांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सर्वात आधी हे माहीत करून घेतले पाहिजे की जमिनीचे शेत जमीन आणि बिगर शेतजमीन असे दोन प्रकार असतात.
शेतजमीन म्हणजेच ऍग्रिकल्चरल लँड घेण्यासाठी काही विशिष्ट लोन सुविधा नाही.
परंतु बिगर शेत जमीन म्हणजेच घर बांधता येण्यासाठी घेण्याचा प्लॉट घेण्यासाठी मात्र लोन मिळण्याची सुविधा आहे.
असे मिळणारे प्लॉट लोन हे इतर गृहकर्जाच्या तुलनेत कमी दराने मिळते. पण त्यासाठी त्या प्लॉटवर पुढील २,३ वर्षात घर बांधणे आवश्यक आहे.
लोन घेऊन प्लॉट खरेदी केला परंतु घर बांधलेच नाही असे करून चालत नाही.
परंतु खरं सांगायचं तर अनेक लोक असे करतात. काही लोक मुद्दाम करतात तर काही लोकांना नियमांची माहिती नसते म्हणून त्यांच्याकडून चुकीने असे घडते.
अशा वेळी पुढील तीन गोष्टींची माहिती तुम्हाला असली पाहिजे.
१. प्लॉट लोन घेऊन प्लॉट घेतला आणि घर बांधले नाही तर नक्की काय घडते?
२. काही दंड भरावा लागतो का?
३. आपल्याविरुद्ध कायदेशीर ऍक्शन घेतली जाऊ शकते का ?
१. लोन घेऊन प्लॉट घेतला आणि घर बांधले नाही तर नक्की काय होते :
जर आपण लोन काढून प्लॉट घेतला तर आपल्याला भरावे लागणारे व्याज हे तुलनेने कमी असते. प्लॉट लोनचा व्याजदर सर्वसामान्य गृहकर्जाच्या दरांपेक्षा कमी असतो कारण बँकेने तुम्ही पुढे २, ३ वर्षात तिथे घर बांधाल असे गृहीत धरलेले असते.
परंतु घर बांधून त्याची कागदपत्रे म्हणजेच कंप्लिशन सर्टिफिकेट जर आपण बँकेत दिलेल्या वेळेत सबमिट केले नाही, तर मात्र आपले प्लॉट लोन हे साध्या गृहकर्जात परावर्तित होते.
आणि आपल्याला आकारला जाणारा व्याजाचा दर वाढतो. त्यामुळे आपल्या लोनच्या मुद्दलात वाढ होते. म्हणजेच थोडक्यात आपल्यावरचे कर्ज वाढते.
ह्याचा अर्थ असा की कमी दराने प्लॉट लोन घेतले की ३ वर्षांच्या कालावधीत घर बांधून पूर्ण करून त्याची कागदपत्रे बँकेत सबमिट करणे बंधनकारक आहे.
२. प्लॉट घेण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी एकत्र कर्ज मिळू शकते का :
होय, तुम्हाला जर प्लॉट घेण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी कर्ज हवे असेल तर तसे नक्की मिळू शकते.
काही बँका ह्या असे लोन वेगवेगळे देतात. म्हणजे एक लोन प्लॉट करता आणि एक लोन घर बांधण्याकरता.
दोन वेगवेगळी अकाऊंट केली जातात. तर काही बँका एकत्र कर्ज देतात आणि त्याचा ४०% भाग हा प्लॉटसाठी तर ६०% भाग घरासाठी आहे असे ठरवून देतात. तसे लोनच्या अग्रिमेंटमध्ये नमूद केलेले असते.
३. काही वेळा आपल्याला चुकीची माहिती दिली जाते की प्लॉट लोन घेऊन प्लॉट घ्या, घर बांधायची काही जरूर नाही. नुसता प्लॉट घेऊन ठेवा. परंतु ही माहिती चुकीची आहे. अशा चुकीच्या माहितीला बळी पडू नका. नियमानुसार वागणे हे नेहेमीच योग्य ठरते.
नियमाबाहेर केल्या जाणाऱ्या कामांमध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.
प्लॉट लोन कोणाला मिळू शकते.
१. वय वर्षे १८ ते ७० असणाऱ्या कोणत्याही नागरिकास प्लॉट लोन मिळू शकते.
२. अशा नागरिकाचा सीबील स्कोर ६५० पेक्षा (संबंधित बँकेच्या नियमानुसार) जास्त असणे अपेक्षित असते.
३. एकूण किमतीच्या ६०% ते ७०% लोन मिळू शकते.
४. हे लोन फेडण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी १५ वर्षांचा असतो.
तर हे आहेत प्लॉट लोन घेण्यासाठीचे नियम. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, आपल्याला जर घर बांधायचे असेल तरच कर्ज काढून प्लॉट घेणे योग्य ठरेल अन्यथा नाही.
वरील माहितीचा पूर्ण उपयोग करा आणि विनासायास कर्ज मिळवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Is it ok to construct house on the completion of fifth year of plot loan taken .?? Because family with low income can’t pay back even 40% of plot loan taken within 2-3years