वय वर्ष ९९…. शरीरावर असलेला गोळीचा व्रण आजही त्या ब्रिटीश सत्तेविरुद्ध देशासाठी जिवावर उदार होऊन लढलेल्या लढाईची आठवण करून देत असताना फक्त तिकडे न थांबता स्वातंत्र्यानंतर देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी शिक्षणाची बीजं भारताच्या अतिशय दुर्लक्षित भागात रोवून एक दोन नाही तर तब्बल १८ शाळा उघडून शेकडो विद्यार्थांच्या आयुष्यातला अंधार मिटवत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करत स्वतंत्र आयुष्य जगायला बळ देणारी व्यक्ती तिकडेच थांबत नाही तर त्यापुढे जाऊन एका ट्रस्ट ची स्थापना करून त्यातून वृद्ध, निराधार, अनाथ मुलांसाठी कार्य करत रहाते.
वयाच्या ९९ वर्षी पण मुलांना गणित शिकवते. हे करून आपण केलेल्या त्यागाची, बलिदानाची किंवा सध्या करत असलेल्या समाजसेवेचा आणि देशसेवेचा काडीमात्र गर्व न करता आपलं कार्य करत रहाते अश्या ऋषितुल्य व्यक्तीला आजचा भारत ओळखत नाही ह्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते?
स्वातंत्र्य ह्याचा खरा अर्थ आताच्या पिढीला कळणार नाही कारण पारतंत्र्याची चव त्यांनी चाखलेली नाही.
कोण्या एका घराण्यामुळे देशाला स्वातंत्र्य अजिबात मिळालेलं नाही. त्या स्वातंत्र्याची किंमत अनेक सामान्य माणसांनी मोजलेली आहे. आपलं दुर्दैव असं की आज आपले हक्क आणि कर्तव्य ह्यासाठी लोकशाही आणि भारताच्या घटनेचा आधार घेणारे सगळेच सोशल मिडिया वर आपलं ज्ञान पाजळत असताना ज्यांनी आपल्या शरीरावर गोळ्या झेलून ह्या देशाला स्वातंत्र्य दिलं त्यांना एका कोपऱ्यात टाकलं आहे.
ते लोक वेगळेच होते. त्यांनी भारत भूमीवर प्रेम केलं आणि आजही तितकच प्रेम त्याचं ह्या भूमीवर आहे म्हणून वयाची ९९ वर्ष पण त्यांना देशसेवा करण्यापासून परावृत्त करू शकत नाही.
आजच्या क्षणापर्यंत देशसेवा करत असणारं हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे पद्मश्री सुधांशू बिश्वास.
१९१७ साली जन्मलेल्या सुधांशू बिश्वास ह्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध अतिशय लहान वयात आला. ब्रिटीश सरकार विरुद्ध चळवळीत भाग घेतल्याने ते ब्रिटीश सरकारच्या नजरेत आले.
१९३९ साली मॅट्रिक ची परीक्षा देत असताना पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यांना ती परीक्षा देण्यापासून परावृत्त केलं.
पुढे त्यांनी तीच परीक्षा पोलीस सुरक्षेत दिली. मेट्रिक पास झाल्यावर त्यांनी अनुशिलन समिती मध्ये भाग घेत ब्रिटीश सरकारवर बॉम्ब हल्ला केला ज्यात ते निसटले.
पुढे ब्रिटीशांनी त्यांना पकडलं आणि अनेक वर्ष जेल मध्ये बंद केलं. ह्या सगळ्या घडामोडीत त्यांचा अनेकदा मृत्यूशी ही सामना झाला ज्याची आठवण आजही त्यांच्या शरीरावर आहे.
पण ते हरले नाहीत. भारत स्वातंत्र्य झाला. आपल्या ‘स्व’ च्या शोधासाठी ते काही वर्ष हिमालयात फिरले. १९७२ साली त्यांनी रामकृष्ण सेवाश्रमा ची स्थापना केली. सुंदरबन च्या अतिशय मागासलेल्या भागात त्यांनी एकामागोमाग एक अश्या १८ शाळा उभारल्या.
ह्या शाळांतून शिक्षणाचं महत्व सुंदरबन सारख्या अतिशय मागासलेल्या भागात पोहचवण्यात सुधांशू बिश्वास यशस्वी झाले.
आज ह्या शाळांतून शिक्षण घेऊन त्या भागातले शेकडो विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक अश्या महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
ह्या शाळेतून हजार पेक्षा जास्त अनाथ विद्यार्थी आजवर शिक्षण घेऊन स्वातंत्र्याचा खरा अनुभव घेत आहेत. पण इतकं करून सुधांशू बिश्वास थांबले नाहीत.
वयाच्या सत्तरी मध्ये त्यांनी जनरल मेडिसिन आणि होमिओपॅथी चा अभ्यास केला. गावात डॉक्टरांची कमतरता भासत असताना त्यांनी डॉक्टर कडून औषध घेऊन ती गावात त्या व्यक्तींपर्यंत पोचवण्याचं काम सुरु केलं.
तसेच वृद्धांसाठी वृद्धाश्रम ही चालू केला. वयाच्या ९९ वर्षामध्ये आजही ते ६० अनाथ मुलांच पालनपोषण करून त्यांच्या शाळेत गणित शिकवण्याचं कार्य करत आहेत.
विद्यार्थी दशेत ब्रिटिशांनी मॅट्रिकची परीक्षा द्यायला अटकाव केल्यावर त्यांना शिक्षणाचं महत्व कळलं.
म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यावर त्यांनी त्याची चळवळ सुंदरबन च्या आजूबाजूच्या भागात सुरु केली ज्याची फळ म्हणजे शिकून तयार झालेले त्यांचे हजारो विद्यार्थी. ह्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने देशासाठी आपलं रक्त तर सांडलच पण त्याही पलीकडे २१ व्या शतकातील नव्या भारतातील अनेकांच्या आयुष्यात शिक्षणाने स्वातंत्र्य आणलं.
भारत सरकारने उशिरा का होईना २०१८ मध्ये त्यांच्या अतुल्य कार्याचा गौरव करताना त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
मला वाटते ह्या वर्षी पद्मश्री पुरस्काराचं वजन त्यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाला मिळाल्याने नक्कीच वाढलं असेल.
पुतळे उभारून आणि त्यांना वर्षातून एकदा हार घालून त्यांचा मानसन्मान करण्यापेक्षा आजही जिवंत असून वयाच्या शंभरी मध्ये देशासाठी कार्यरत असणाऱ्या स्वातंत्रसैनिक ऋषितुल्य सुधांशू बिश्वास ह्यांचा सन्मान माझ्या शब्दातून व्यक्त करणं मी जास्ती महत्वाच मानतो. अश्या ऋषितुल्य व्यक्तीस माझा कोटी कोटी सलाम.
वाचण्यासारखे आणखी काही…
The Real Hero – ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान
अरुण देशपांडे यांची सोला(र)पूरची प्रयोगशाळा…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.