कथा शब्दांकन: अजय चव्हाण
कित्येक माणसे आपल्याला भेटतात कित्येक चेहरे आपण रोज पाहतो..
संबंध असा काही फारसा नसतोच किंबहुना तो आलेला नसतो.. तरीही हे चेहरे नि ही माणसे ओठावर ओळखीचं स्मितहास्य घेऊन आपल्याला रोज भेटतात….
रेल्वेस्टेशनवर गजरे विकणार्या आजीपासून ते ऑफिसमधल्या अडगळीच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणार्या क्लार्कपर्यंत.. कधी त्यांच्याशी बोलणं होत नाही की, निमित्त निघत नाही… मग अचानक कुठेतरी निमित्त निघतं आणि खऱ्या अर्थाने संबंध रूजायला लागतात..
मग कुठेतरी बंध फुलत जातात नि एक नातं तयार होतं..
असंच त्याचं नि माझं नातं नि फुलत गेलेली त्याची नि माझी प्रेमकहाणी… तर ह्या कहाणीला इथून सुरूवात होते..
“ऐ कोमल चल ना ग पिकनिकला प्लिज.. सगळे रेडी आहेत.. चल ना प्लिज” माझी बेस्ट फ्रेंड आणि कलिग निकिता मला पिकनिकसाठी फोर्स करत होती…. आतापर्यंत शंभर वेळा तिने मला विनंती केली होती आणि ह्यावेळी तिला नाही म्हणता नाही आलं… पिकनिक तशीच छोटीशीच वन डे रिटर्न टाईपवाली…. बदलापुरजवळच कुठल्याशा रिसोर्टमध्ये जाणार होती…. हा नाही करता आतापर्यंत पाचेक टाळकी कन्फर्म येणार होती आणि बाकीच्यांनी नेहमीप्रमाणेच वाटाण्याच्या अक्षता लावल्या….
निकिता तर सातवे आस्मान ते काय म्हणतात ना त्यावरच होती. त्यात मी जोडीला येणार आहे म्हटल्यावर डबल खुष.. यथावकाश पिकनिकचा दिवस उजाडला.. मस्त रविवारची सुंदर सकाळ..
रेल्वे स्टेशनवर इतरवेळी असते तशी गर्दी नव्हती.. जानेवारीतला स्वच्छ सुर्यप्रकाश.. त्याची कोवळी निरागसं किरणे जमिनीला कवेत घेऊ पाहत होती… अशा प्रसन्नवेळी मन प्रसन्न नाही झालं तर नवलचं… अणि त्याच प्रसन्न मनाने निकीताने काही लोकांची ओळख करून दिली.. म्हणजे तशी जुजबी ओळख होतीच पण नव्याने झालेली ही ओळख अधिक भावली मला…. मी, राहुल, किरण, निकिता, प्रशांत आणि सागर अशा सहा जणांचा खुप छान ग्रुप जमला..
गप्पाटप्पांच्या ओघात बदलापुर कधी आलं तेच कळलं नाही…
सहज गप्पा मारता मारता मी नव्या प्रत्येकाचं बारकाईने निरीक्षण करत होते….
किरण माझ्याच पठडीतला बहुतेक गोष्टि आमच्यात काॅमन होत्या… प्रशांत आणि सागर हे थोडे आडवळणाचे म्हणूनच की, काय त्यांच्यात जास्त रमताच नाही आलं मला.
आता राहीता राहीला राहुल….साडेपाचफुटापेक्षा जास्त उंची…. मध्यम बांधा, सावळा रंग.. दिसायला गंभीर पण तितकाच मनमिळाऊ…. कित्येकदा ऑफिसातल्या त्या डिपार्टमेंटमध्ये कधी गेले की, हमखास दिसायचा….
कधी फाईल चाळताना, तर कधी किबोर्डवर टाईप करताना…. पण त्याच्याशी बोलण्याचा कधी योग आला नव्हता.. आज पहिल्यांदाच जरी बोलत असला तरी खुप जुनी ओळख असल्यासारखा वाटायचा….
खुप गप्पा टप्पा झाल्या रिसोर्टमध्ये खुप धमालही केली…. विविध स्लाईड्स, रेन डान्स, उथळ पाण्याचं भरलेलं डबक, काही ऍडव्हेंचर तर काही फुलिश गेम..
पण ह्या सगळ्या व्यक्तिरित मला झालेला आनंद थोडा वेगळा होता.. राहुलचं वागणं, बोलणं, काळजी करणं हे कुठेतरी मनाला सुखावुन गेलं होतं.. पहिलीच ऑफिसात न झालेली ऑफिशियलं ओळख, घडलेला संवाद आणि जाणून घेतलेलं त्याचं मन अशा एकंदरीत समिश्र भावना माझ्या मनात रूंजी घालत होत्या..
मी त्याच्या प्रेमात पडले असं नाही म्हणणार मी पण सुरूवात तर होती.. खरंतर प्रेमाला सुरूवातच नसतेच… सुरूवात काय नि शेवट काय दोन्हीही प्रेमाला नसतं.. प्रेम तर अबाधित असतं… अवखळ असतं…. त्याचे अवखळ क्षण मनात कुठेतरी फेर धरून नाचू लागतात आणि मग आपण म्हणतो की, मी प्रेमात पडलोय किंवा पडलीय … माझं सुद्धा असंच झालं असेल कदाचित..
त्यादिवसापासून माझं नि राहुलच बरेच वेळा बोलण होई…
कधी येता जाता तर कधी व्हाॅटसअपवर.. बोलण्यातले विषय आपले नेहमीचेच अगदी बराक ओबामाच्या भारतदौऱ्यापासून ते खडूस बाॅसच्या गॉसीपिंगपर्यंत… काय बोलायचं हे महत्वाचं नसलं तरी बोलणं महत्वाचं असतं नाही का?? ऑफिसात कुणी बाॅस वैगेरे नसलं की, एकमेकांना लॅन्डलाईनवरून रिंग देत असू.. माझ्या डेस्कवरून फोन केला की, जोडलेल्या वायरीतून संदेशलहरी लहरत लहरत त्याच्या डेस्कपर्यंत जाऊन पोहचायच्या. आमच्या ह्या फंड्याला किरणने एक नावही दिल होतं.. “कयामत से कयामत तक” कित्येक वेळा तो आम्हा दोघांना ह्याच नावाने चिडवायचा.. मी फोन उचलला की, तो मस्करीत जोरात ओरडत असे.. “देखो कयामत गुजरने लगी है…. वो वहा फिर (राहुलच्या डेस्ककडे हात दाखवत) कयामत आ जायेगी.”
कयामत तो थी बस उसका कोई नाम नही था…. जुनुन नही था..
अभी एक डोर अधुरीसी थी… अभी कुछ सिलसिले बाकी थे.. मी पण ना स्टोरी सांगता सांगता हरखूनच गेले.. काहीही बरळतेय..
होतं असं कधी कधी, नाही प्रेमात पडले की, असचं होतं..
कित्येक क्षण कित्येक दिवस असेच सरले… नव्या आठवणी मोहरत गेल्या नि त्याच्या नि माझ्यातलं बंध घट्ट होत गेलं.
चिंगारी अब आग बन चुकी थी.. दो दिलो मे प्यार का दिया जल रहा था.. असं जरी असलं तरी ते अजुनही आमचं नातं अव्यक्तच होतं.. कधी कधी दोन्ही मनात प्रेम असतं.. दोघांनाही उत्तर माहीत असतं.. पण बोलायला, सांगायला दोघेही कचरतात.. त्याला वाटतं तिने आधी विचारावं तिलाही तसंच काहीस वाटतं असतं..
हिरवा सिग्नल असुनही आमची प्रेमाची गाडी पुढे सरकत नाही हे पाहुन किरणने धक्का मारायचा ठरवलं.. त्याने आधी मला विचारलं मग त्यालाही विचारलं.. दोन्ही मनात चांदणं एक होतं.. मग हे अमावस्येचं ढोंग कशासाठी ?? ह्याचं उत्तर जरी माहीत नसलं तरी किरणने आमच्या वतीने पुढाकार घेऊन त्या चांदण्याच्या जोडीला नक्षत्रे फुलवली होती.. एक नवं क्षितिज, एक नवं आभाळ कधीच प्रितीच्या अनेकविध ताऱ्यांनी फुललं होतं…. राहुल नि मी एकदा चोरी चोरी चुपके चुपके भेटायचं ठरवलं..
पहीली भेट अगदी कशीही असली तरी ती कायमच स्मरणात राहते…
त्या भेटीत एक हुरहुर असते.. ओढीची कमला प्रगल्भता असते.. हृदयाचं धडधडणं असतं.. स्वप्नाचं पाहणं असतं.. मनातलं गाणं असतं… किनाऱ्याची लाटांना व लाटांची किनाऱ्याला जितकी उत्सुकता असते त्याच्या कित्येक पटीने उत्सुकता दोन्ही मनात साचलेली असते. (साॅरी जास्तच राॅमंटीक होतेय का??) असो तर आमची भेट मँगो गार्डनमध्ये झाली…
इथेही कुणीच एकमेकांना प्रपोज न करता.. अगदी त्या पहील्या भेटीचे क्षण अनुभवले… कित्येक स्वप्नाच्या हलक्या ढगांमध्ये रमलो होतो.. कित्येक नवी क्षतिजे एकमेकांसमवेत सर केली होती..
कित्येक प्रेमाची बरसात हलकेच झेलेली होती.. एकेदिवशी राहुलनेच विषयाला हात घातला.. एकमेकांना न विचारताच खुप पुढे आलो आहोत आपण आता तरी विचारायलाच हवं..
पण राहुल तर काय राहुलच होता इतकी गळ घालूनही नाहीच विचारलं त्याने.. मग मीच विचारलं.. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगताना माझे डोळे ओतप्रोत भरले होते.. मनानेच मनाला दिलेला कबुलीजवाब होता आणि जज म्हणून उभ्या ठाकलेल्या राहुलने त्याच्या प्रेमाची जन्मठेपेची गोड शिक्षा मला दिली होती..
एक अध्याय संपला होता… प्रत्येक प्रेमाला जसा विरोध असतो.. तसा आमच्याही प्रेमाला होताच… माझ्या घरून जात एक असल्यामुळे परवानगी सहज मिळवता आली होती…
पण राहुलच्या आईचा ठाम विरोध होता.. हिंदी चित्रपटात दाखवतात तसं जुदाई वैगेरेचे सिन मला दिसत होते.. पण हार मानण्यातली मी नव्हते.. माझ्या प्रेमाला असं सहजासहजी दुर नसतं करता आलं मला.. राहुलच्या आईच्या मनात घर करायचं मी ठरवलं..
राहुलचे वडील, भाऊ, आणि बहीण यांच पाठबळ तर होतेच…. यथावकाश राहुलची आईही तयार झाली.. आणि दोन्ही रितीरिवाजाने आम्हि एकमेकांसमवेत लग्नाच्या गाठी बांधल्या… मग काय हॅप्पी एंडिंग..
अशी ही माझी, साधी सरळ व खरीखुरी प्रेमकहाणी..
काय म्हणताय??
लग्नात उखाणा कुठला घेतला होता??..
इश्श लाज वाटतेय..
बरं बरं असं गोंधळ घालू नका..
घेते हा..
तुझं मन माझं मन..
राहुलरावांच नाव घेते मी कोमल..
चला आता आमचे हे येतील…
भेटु नंतर.. बाय…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.