तुम्ही जगातल्या दहा सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहात? नाही!!
मग भारतातल्या सर्वात श्रीमंत वीस लोकांपैकी एक आहात? याही प्रश्नाचे उत्तर नाही असेच असेल.
कारण प्रत्येक व्यक्ती श्रीमंत किंवा अति श्रीमंत असणार नाही. आणि पैशाचा आणि आनंदाचा काही संबधही नाही.
एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसे म्हणून ती जास्त आनंदी आणि दुसऱ्या व्यक्तीकडे कमी पैसे म्हणून ती कमी आनंदी असे होत नाही.
पैसा हा जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे परंतु आनंदासाठी नाही. प्रत्येक आनंद हा पैशात मोजता येत नाही.
तुम्ही जर ‘माझ्याकडे पैसे नाहीत’ असे म्हणून दुःखी होत असाल तर तसा विचार करणे त्वरित थांबवा.
तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करून व थोडाफार चैनीवर खर्च करून देखील तुम्ही समाधानी आयुष्य जगू शकता.
तुमच्या पेक्षा जास्त श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींशी जर तुलना करत राहिलात तर सतत उणीव भासेल, परंतु हा विचार करा की आपल्या कडे राहायला घर आहे, दोन वेळचे जेवायला आहे, काटकसरीने का होईना पण सर्व सुख सोयी आहेत.
तुम्ही कधी पुलाखाली किंवा फूटपाथवर बसलेले लोकं पाहिलेत? त्यांना बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला जाणीव होईल की देवाने तुम्हाला भरपूर सुख दिलंय. म्हणून जे आहे त्यात आनंद मानायला शिका.
पैशाच्या श्रीमंती शिवाय आपले आयुष्य सुंदर कसे करता येईल ते बघूया.
१) जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा
जर एखाद्या सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या माणसाला दहा लाखाची लॉटरी लागली तर त्याचा हा आनंद किती काळ टिकेल? आलेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन न करता जर खर्च करत राहिला तर काही दिवसातच होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. आणि खूप उंचावर जाऊन खाली येणे ही परिस्थिती जास्त बिकट आहे.
म्हणून आहे त्या परिस्थितीत स्वतःला स्वीकारा. तुम्हाला हव्या असणाऱ्या काही गोष्टी, काही वस्तू सध्या तुमच्याकडे नसतील परंतु त्याच्या नसण्याने फारसा फरक पडत नाही.
आणि ही फरक न पडू देण्याची कला तुम्हाला शिकावी लागेल.
२) प्रामाणिक राहा
तुमचा आनंद हा तुमच्या आर्थिक परिस्थिती वर अवलंबुन असता कामा नये. परिस्थिती काहीही असली तरीही छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता आला पाहिजे.
जेव्हा तुम्ही तुमची आवडती गोष्ट करता, तेव्हा एक आंतरिक समाधान मिळते. आणि आयुष्यात केवळ पैशाच्या मागे धावण्यापेक्षा हे समाधान शोधले तर तुम्ही अधिक सुखी व्हाल.
३) सर्जनशील व्हा
तुमच्याकडे जर पैसे कमी असतील तर तुम्ही अधिक सर्जनशील होऊ शकता, वाचायला वेगळे वाटेल पण ते खरंय.
हव्या असलेल्या गोष्टी विकत घेण्यासाठी पैसे असतील तर प्रश्नच नाही पण नसतील तर मात्र त्यातुन नाविन्याची दारे उघडतात. परिस्थितीच तुम्हाला वेगळ्या प्रकारे विचार करायला भाग पाडते.
एक उदाहरण बघूया: एका मुलीला दुकानात एक ड्रेस आवडला, परंतु महाग असल्यामूळे ती तो खरेदी करू शकली नाही. मग तिने तिच्या आईच्या साडीचा तशाच प्रकारचा ड्रेस शिवून घेतला,
आणि रेडिमेड मिळालेल्या ड्रेसपेक्षा जास्त आनंद तिला तो शिवून घेण्यात झाला. म्हणजेच परिस्थितीतून सर्जनशीलतेने मार्ग काढता येऊ शकतो.
४) जे आवडते ते करा
बऱ्याचशा लोकांचा असा समज आहे की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो श्रीमंत. पण त्या व्यक्तीला तसे वाटते का याचाही विचार केला पाहिजे.
एखाद्याला छान नोकरी आहे, लाखोंचा पगार आहे, सर्वाना वाटेल छान चाललंय. परंतु कदाचित स्वतः ती व्यक्ती खूप ताणतणावातून जात असेल, कदाचित ती नोकरी सोडायच्याही विचारात असेल. नाण्याला दोन बाजू ह्या असतातच.
तुम्ही जे काही काम करता त्यातून तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. पैसे येत राहतात, फक्त स्वतःला आवडीच्या कामात झोकून द्या.
बिल गेट्स सारख्या जगातील मोठ्या व्यक्ती ह्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करतात, म्हणून त्यांच्या क्षेत्रात उच्चपदावर आहेत.
५) नम्रतेने वागा
एखादी व्यक्ती कितीही मोठी झाली तरीही त्या व्यक्तीच्या स्वभावात जर नम्रपणा असेल तर ती इतरांसाठी आदरणीय ठरते.
पद आणि पैशाने मोठे झालो तरीही पाय मात्र जमिनीवर राहिले पाहिजेत.
तुम्हीही बिकट परिस्थितीतुन वर आला असाल, तुमच्या कठीण काळात ज्यांनी मदत केली, त्यांना कधीही विसरू नका.
महात्मा गांधी, गौतम बुद्ध यांच्याबद्दल वाचल्यावर त्यांचा नम्रपणाची ओळख होईल.
६) उदार व्हा
उदारतेचा अर्थ केवळ कुणाला आर्थिक मदत करणे एवढाच नाही.
तुमच्याकडे जे काही आहे ते वाटून समोरच्या व्यक्तीला तुम्ही आनंद देऊ शकला पाहिजे.
इतरांच्या दुखाविषयीची कळकळ ही मनातुन आली पाहिजे. प्रत्येकाला केवळ पैशाचीच गरज असते असे नाही, तुमच्या प्रेमळ वागण्यानेही तुम्ही खुप काही देऊ शकता. म्हणून प्रेम आणि आनंद वाटण्यात उदार व्हा.
७) नातेसंबंध जोडा
नात्यांशिवाय व प्रेमाच्या माणसांशिवाय तुम्ही आनंदी राहू शकत नाही.
कल्पना करा तुमच्याकडे खूप मोठा बंगला आहे, सर्व सुख सोयी आहेत, परंतु तुमचे जवळचे नातेवाईक व मित्रमंडळी यापैकी कुणीही तुमच्यासोबत नाही.
तर असे एकटे किती दिवस राहू शकाल? अशक्य आहे ना!
म्हणून नाती जोडा टिकवा. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला एक सुविचार आहे, “जीवन मे ज्यादा रिश्तो का होना जरुरी नही है, जो रिश्ते है उनमे जीवन का होना जरुरी है।” हे लक्षात घेऊन आनंद देणारी नाती जपा.
कधी कधी असंही असतं की, नाती तर असतात पण ती आनंद देणारी नसतात. अशा वेळी आपली कर्तव्ये मात्र सोडू नका.
या पाच गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर, पैशाने श्रीमंत नसलात तरी समृद्ध आयुष्य तुम्ही जगू शकाल, काय पटतंय ना!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.