माणूस आणि परमेश्वराची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. माणसाने परमेश्वराला मागणं घातलं कि, ‘दरवर्षी पूर, वादळ अशा गोष्टींमुळे आमचं नुकसान होतं. यावर्षी पिकांना आवश्यक तितकं पाऊस-पाणी, हवं तसं हवामान मिळू दे! आमच्यावर तुझी कृपा असू दे.’
आणि पुढे झालंही तसंच. कुठे वादळ नाही, जास्त पाऊस नाही, पीक मस्त तरारलं. आनंदलेल्या माणसाने पीकाची पहाणी केली, तेंव्हा त्याला धक्का बसला. तयार पीकात दाणा मात्र तयार नव्हता!
यावर हिरमुसलेल्या माणसाने परमेश्वराला, असा अनर्थ का केल्याचा प्रश्न विचारला तेव्हा, परमेश्वराने माणसाला सांगितलं की ‘प्रतिकूल परिस्थितीशी झगडल्यानंतरच पीकात सत्व असलेलं धान्य निर्माण होतं. आयुष्यात अडचणी येणार, त्यांच्याशी दोन हात केल्यानंतरच यशाचा शिक्का बसतो.’
प्रत्येकाला आयुष्यात अडचणी, अडथळे येतच असतात. पण जेंव्हा अडचणींचे डोंगर दिसायला लागतात तेंव्हा आपण निराश होतो.
आता या दहा गोष्टी लक्षात ठेवा, आणि अडचणींचा डोंगर सहज पार करा.
१) अडचणींचा अंदाज घेऊन तयार रहा.
आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात काय काय अडचणी येतात याची जाणीव आपल्याला असतेच. एखादा शेतकरी जसं तांदूळ पेरतो, एखादा ऊस लावतो, एखादा शेतकरी फुलांची शेती करतो. शेतात पीक कुठलंही असलं तरी, प्रत्येक शेतकऱ्यांला कीड नियंत्रण करावं लागणार आहेच. पण प्रत्येक पीकावरची कीड वेगळी असते. त्यानुसार शेतकरी तयारी करत असतो.
त्याचप्रमाणे कुठल्याही क्षेत्रात येणाऱ्या अडचणींची चाचपणी, आधीच करून ठेवली तर त्यांना तोंड देण्याची तयारी तुम्हाला सहज करता येते. जास्तीत जास्त वाईट काय घडू शकतं त्याचा विचार करून सामना करण्याची तयारी आपण आधीच करून ठेवली पाहिजे.
2) सकारात्मक रहा.
सकारात्मक. हा शब्द आजच्या घडीला महत्त्वाचा ठरला आहे. वेगवान आयुष्यात आपल्यासाठी कुणाला वेळ नसतो. त्यामुळे प्रत्येक वळणावर सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. छान चालू असलेली ए.सी. कार घाटात बंद पडली तर काय होतं? आताच का बंद पडली? माझ्याच बाबतीत असं का होतं? निघताना गाडी व्यवस्थित चेक केली होती तरी असं का झालं ? या प्रश्नांनी डोकं भणाणून जातं.
त्यापेक्षा असं कुणाच्या ही बाबतीत कुठं ही होऊ शकतं, याआधी ही कुणालातरी हा प्रॉब्लेम आला असणार, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने सेम प्रॉब्लेम वर मात केली असणार हे लक्षात ठेवा. शांत रहा चिडचिड करण्यापेक्षा पर्याय शोधा.
जगात असंख्य व्यक्तींनी स्वतः जवळचं सगळं गमावून, राखेतून फिनिक्स भरारी घेतली आहे. अशी उदाहरण आपण वाचली, पाहिली, ऐकली असतील ती लक्षात ठेवून संकटांशी सामना करायला सकारात्मक पध्दतीने तयार व्हा.
3) नियोजनबद्ध काम करा.
कुठलंही संकट आलं की पहिल्यांदा आपलं वेळापत्रक चुकतं, रुटीन बिघडतं. संकटाशी सामना करायचा तर पहिल्यांदा विस्कटलेलं कामाचं वेळापत्रक पुन्हा तयार करा आणि त्या वेळापत्रकानुसार काम पुर्ण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
जेंव्हा वेळापत्रकानुसार कामं पुरी होतात, तेंव्हा नकळत आत्मविश्वास वाढत जातो. हाच आत्मविश्वास संकटांशी, अडथळ्यांशी सामना करायला खूप महत्त्वाचा ठरतो.
4) यशावर मन केंद्रित करा.
प्रत्येक काळ्याकुट्ट रात्रीनंतर आशेचा एक नवा दिवस असतो. आज संकंटांशी सामना करावा लागला तरी काही दिवसांनी पुन्हा सगळं नीट होईल, पुन्हा बिझनेस छान चालेल, परीक्षांमधलं अपयश संपून उत्तम गुणांनी करीयरचा मार्ग मोकळा होईलच हे लक्षात ठेवा!!
‘ब्लेड रनर’ म्हणून प्रसिद्ध असलेला माजी पॅरालिंपिक विजेता ऑस्कर पिस्टोरियस जन्मतः चालण्याचा प्रॉब्लेम घेऊन आला होता.
त्याने लहानपणापासून आपल्याला पाय नाहीत यावर लक्ष केंद्रित केलं नाही, तर आपल्या पळण्यावर लक्ष केंद्रित. पॅरालिंपिक सह ऑलिंपिकमध्ये धावण्याच्या स्पर्धेसाठी कृत्रिम पायाने धावण्याचं स्वप्न ऑस्कर पिस्टोरियसने पाहिलं, आणि ते पुर्णही केलं. कारण आपलं पुर्ण लक्ष ऑस्कर पिस्टोरियसने यशावर केंद्रित केलं होतं….
अशीच एक असामान्य कहाणी वाचण्यासाठी पुढे करा 👉 निक व्युजेसिक – हात पाय नसून सुध्दा आयुष्याला कवेत घेणारा मोटिवेशनल स्पीकर
5) चुकांमधून धडा घ्या.
अडथळे केंव्हा निर्माण होतात? जेंव्हा एखादी चूक आपल्याकडून घडते. एखादं मशीन चोवीस तास चालू ठेवलं तर तापून बंद पडू शकतं. आपल्या लक्षात येतं, मशीनला सतत सुरू ठेवण्याची चूक करायची नाही. हा धडा गिरवून पुढे जायचं. अशा घडलेल्या चुका लक्षात घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे.
6) कौशल्य विकसित करा.
व्यावसायिक पातळीवर जेंव्हा अडथळे येतात तेंव्हा सुसंवाद कमी पडला नाही ना? याकडे लक्ष दयायला हवं. आपल्याकडे जन्मजात काही गुण-अवगुण असतात. गुणांचा चांगला वापर करा, अवगुण कमी करा, योग्य तेथे योग्य तसा संवाद साधण्याचं कौशल्य माणसाला प्रगती करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं ठरतं. आपल्या क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक विषयात कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करत राहा. तांत्रिक बाबी समजावून घ्या.
7) यशस्वी व्यक्तींच्या संघर्षाकडे आदर्श म्हणून पहा.
संकटात सापडलेले आपण एकटे नसतो. आपल्याबरोबर इतर व्यक्ती संकटात असू शकतात. काही व्यक्तींनी आपल्या वाट्याचा संघर्ष पुर्ण केलेला असू शकतो.
बिझनेस क्षेत्रात रतन टाटा, मुकेश अंबानी यांनी अनेक चढउतार पहात आजचा टप्पा कसा गाठला जाणून घ्या.
हिंदी कॉमेडीयन कपील शर्मा यांच्या शोचा सेट जळाला, सहकलाकारांत गैरसमज निर्माण झाले तरी त्यावर मात करत त्यांचा शो दर आठवडयाला प्रसारित होतो.
अशा लोकांकडून प्रेरणा घेऊन आपण पुढे जायला शिका.
8) मित्रमंडळींचा दबाव टाळा दर्जा राखा.
‘पीर प्रेशर’ हा ही सध्याच्या ट्रेंडचा शब्द आहे. आयुष्याचं नुकसान करणारा हा दबाव टाळा. त्यापेक्षा उत्तम मित्रमंडळी जमवा. आजूबाजूची तरुणाई काय करते पहा.
जयंती कठाळे, आय टी प्रोफेशन सोडून मराठंमोळं पुर्णब्रह्म चालवतात. श्रीलंकेची गायिका भाषेचा अडथळा दूर करून आपल्याला डोलायला लावते.
आपली मित्रमंडळी आपल्याला सक्सेस स्टोरीज दाखवणारी असावीत.
9) तज्ञांचा सल्ला घ्या.
आयुष्याचे हजारो पैलू आहेत मित्रांनो, प्रत्येकावर आपली हुकुमत कशी असेल? इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या व्यक्तीला साहित्य विषयात अडचण येऊ शकते.
कला किंवा साहित्य क्षेत्रातले लोक तांत्रीक गोष्टीत मागे पडू शकतात. अशावेळी व्यावसायिक पातळीवर काम करणारे जे तज्ञ असतात त्यांची आवर्जून मदत घ्या आणि अडथळ्यांना वाढू न देता, लवकरात लवकर त्यांना पार करा. प्रत्येक गोष्ट आपणच केली पाहिजे हा अट्टहास सोडा. कामाची विभागणी करा.
10) कधीही मागे फिरू नका.
दशरथ मांझी या मजूर काम करणाऱ्या माणसानं 22 वर्षे खपून, डोंगर फक्त छिन्नी हातोडयाच्या सहाय्याने फोडला, रस्ता तयार केला. यामुळे 55 किमी अंतर पार करून ज्या गावाला जायला लागायचं तिथं 15 किमी मध्ये जाता येऊ लागलं. लोकांनी दशरथ मांझी यांना वेडा ठरवलं होतं. तिकडे दुर्लक्ष करत दशरथ मांझी प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि एक दिवस ते काम त्यांनी पुर्ण केलं.
निराश न होता, आयुष्यात संयम ठेऊन काम करत रहा चुकून ही मागे फिरू नका, काम अर्धवट सोडू नका. आयुष्यात अडथळे येतच राहणार, त्यांना न घाबरता पार करण्याचा प्रयत्न करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Mast if possible can we have a meeting with all somewhere pls let me know my no is 9579438202
Nice thoughts