प्रत्येक व्यक्तिला आयुष्यात काहीतरी वेगळं करावसं वाटतं.
वेगवेगळी स्वप्न असतात.
बरेचजण त्याचा पाठपुरावा करतात.
पण प्रत्येकाला यश मिळतंच असं नाही.
काही जणांना कदाचित उशीरा यश मिळतं.
काहीजण लहान वयात खूप काही कमवतात. प्रत्येकाला मिळणारी संधी, कष्ट, चिकाटी अशा बऱ्याच गोष्टी जुळूनही याव्या लागतात.
आणि हेही खरं, की काही लोक संधी नसली तरी ती, प्रतिकूल परिस्थितीत निर्माण करतात.
सध्या प्रत्येक तरूण ज्याच्याशी जोडला गेला आहे तो सोशल मिडिया प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक.
फेसबुक बनवणारी व्यक्ती आहे तरी कोण?? अर्थातच फेसबुकने जसं आता कोणाचाच आयुष्य सिक्रेट ठेवलं नाही, तसंच हेही काही सिक्रेट राहिलेलं नाही…
आत्ताच्या पिढीतला तो एक तरुणच आहे.
जो इतरांसारखाच सामान्य स्थितीत होता.
मग त्याला एवढ यश मिळाल कसं??
त्याने बनवलेल्या फेसबुक मुळे आज सगळं जग जोडलं गेलं आहे.
‘फेसबुकपे बोलके तो देखो’ असं वाक्य सहज आता ऐकू येतं.
साऱ्या जगाला एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एकत्र आणणाऱ्या तरुणाची कहाणी पाहुया या लेखात…
मार्कचं लहानपण आणि कॉम्प्युटरचं आकर्षण :
मार्क जुकरबर्गचा जन्म १४ मे १९८४ रोजी न्यूयॉर्क इथला.
त्याच्या वडिलांचं नाव एडवर्ड जुकरबर्ग आणि आईचं नाव कॅरेन कॅम्पनर जुकरबर्ग.
मार्कला तीन बहिणी – रेंडी, एरिएलि, डोना.
मार्कला लहानपणापासून कॉम्प्युटरचं भारी आकर्षण.
तेव्हापासून तो हळूहळू कॉम्प्युटरवर प्रोग्रामिंग करायला शिकला.
यात त्याला त्याच्या वडिलांच खूप प्रोत्साहन मिळायचं.
तो वडिलांना कॉम्प्युटरचे बरेच प्रश्न विचारायचा.
कितीतरी वेळा त्यांना त्याची उत्तरं देता येत नव्हती. म्हणून त्यांनी मार्कला कॉम्प्युटर शिकवायला एका शिक्षकाची नेमणूक केली.
ते त्याला रोज कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकवायचे.
मार्कची कुशाग्र बुद्धी आणि कॉम्प्युटर विषयी जिज्ञासा यामुळे कित्येक वेळा असं व्हायचं की शिक्षकही त्याच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नव्हते.
ज्या वयात मुलं कॉम्प्युटर वर फक्त खेळ खेळायची त्या वयात मार्क कॉम्प्युटर वर खेळ तयार करायचा.
केवळ १२ वर्ष वय असताना त्याने जुकनेट नावाचा एक मेसेजिंग प्रोग्रॅम तयार केला.
त्याचा उपयोग त्याच्या वडिलांना दवाखान्यात inter office communication system म्हणून करता आला.
हार्वर्ड विद्यापीठातील दिवस :
नंतर मार्कने हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला.
अर्थात ते एक नामांकित विद्यापीठ जिथं जगभरातून अत्यंत हुशार विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.
तेथेही मार्कने आपल्यातल्या वेगळ्या हुशारीची चुणूक दाखवलीच.
त्याच्याकडे असलेल्या वेगळ्या कौशल्यामुळे तो विद्यापिठात प्रसिद्ध झाला.
त्या विद्यापिठात फेसबुक नावाचं एक पुस्तक होतं. ज्यात सर्व विद्यार्थ्यांचे फोटो आणि माहिती असायची.
याच कल्पनेवरून मार्कने फेसमॅश नावाची एक वेबसाइट बनवली.
या वेबसाइटवर त्याने कित्येक मुलींचे फोटो लावले.
विशेष म्हणजे त्याने हे फोटो विद्यापीठाची वेबसाइट हॅक करून मिळवले होते.
खरंतर त्या काळात हार्वर्ड विद्यापीठाची वेबसाइट अत्यंत सुरक्षित मानली जायची.
फेसबुकची सुरूवात :
फेसमॅश वेबसाइट हार्वर्ड विद्यापीठात मुलांमध्ये खूप प्रसिद्ध झाली.
पण त्यावरच्या गोंधळामुळे मुलींना ती असुरक्षित वाटली.
मुलींनी या साईटला जोरदार विरोध केला.
ती मार्कवर एक आपत्तीच होती.
फेसमॅशची प्रसिद्धी पाहून मार्कने एक सोशल नेटवर्किंग साईट बनवायचं ठरवलं.
त्याचा उद्देश असा होता की विद्यापीठातील सगळेच कायम एकमेकांच्या संपर्कात राहतील.
साधारण जून २००४ मध्ये त्या वेबसाइटला ‘द फेसबुक’ असं नाव दिलं.
ही साइट मार्क त्यावेळी हॉस्टेलच्या आपल्या खोलीतून चालवायचा.
ही साइट खूप प्रसिद्ध होत गेली.
पण ती त्यावेळी फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित होती.
मग मार्कने ठरवलं की जगभरातल्या लोकांना ही साइट वापरता आली पाहिजे.
याच विचाराने उत्तेजित होऊन मार्कने आपलं शिक्षण अर्धवट सोडून एक टीम तयार केली, आणि या वेबसाइटचं काम जोरदार सुरु केलं.
२००५ मध्ये ‘द फेसबुक ‘ हे नाव बदलून केवळ ‘फेसबुक ‘ असं नाव दिलं.
त्याला इतकं यश मिळाल की २००७ पर्यंत फेसबुकवर लाखो व्यावसायिक गट आणि वैयक्तिक प्रोफाईल तयार झाले.
२०१५ पर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त मंथली ऍक्टिव्ह युजर तयार झाले.
शेअर बाजारात फेसबुकचे शेअर्स वाढले.
अल्पावधीतच मार्कची गणती जगातल्या अब्जाधिशांच्या यादीत झाली.
कमी वयात इतकं यश मिळवणारा मार्क एकमेवाद्वितीय ठरला.
दरम्यान १९ मे २०१२ ला त्याने प्रिसिलिया चान हिच्याशी विवाह केला.
२०११ लाच फेसबुक ही जगातील सर्वात मोठी वेबसाइट ठरली.
त्यासाठीच्या अथक परिश्रमांमुळे मार्क इंटरनेटच्या जगात अव्वल ठरला.
फेसबुकच्या उन्नतीत आलेले अडथळे :
१. लहान वयात CEO पदावरून काम करत असल्यामुळे सुरूवातीला मार्कवर कोणी विश्वास ठेवला नाही. बालक CEO म्हणून काही जणांनी टिंगल केली.
२. सुरूवातीला मार्कवर असे आरोप झाले की फेसबुकची कल्पना त्याने harvardconnectin.com वरून चोरून घेतली आहे.
३. एंजेल इन्व्हेस्टमेंट मिळवण्यासाठी त्यांच्यापुढे २००४ पर्यंत १.५ कोटी युजर्सच टार्गेट होतं ते हुकलं.
तरीही प्रयत्नांती ही इन्व्हेस्टमेंट त्यांनी मिळवली.
४. लहान वय आणि कमी अनुभव असल्याने मार्कला निर्णय घेताना कठिण वाटायचं.
अशा वेळी तो एक विचार करायचा की हा निर्णय मला प्रगतीसाठी उपयोगी आहे का??
५. कमी अनुभव आणि कमी वयाचा CEO आणि नवीन कंपनी हे पाहून इतर अनेक कंपन्या फेसबुकला विकत घ्यायच्या विचारात होत्या.
मध्यंतरी अशीच बातमी आली की याहू कंपनी फेसबुकला विकत घेणार आहे.
तरीही फेसबुकने स्वतःचं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलं.
मार्कने एक गोष्ट पक्की ठरवली होती की, धोका न पत्करणं हाच मोठा धोका आहे.
फक्त ज्या निर्णयामुळे फेल होऊ असं वाटेल तो धोका पत्करायचा नाही.
अशा तत्वांमुळेच मार्कने केवळ फेसबुकला मोठं केलं नाही तर व्हॉट्स अप, इंस्टाग्राम कंपन्या आपल्यात सामावून घेतल्या.
२०१८ ला मार्क जुकरबर्गची गणती जगातल्या पहिल्या दहा अब्जाधिशात झाली.
फेसबुक संदर्भातला वाद :
मध्यंतरी अशी बातमी होती की फेसबुकने युजर्सचा डेटा एका कंपनीबरोबर शेअर केला.
त्याचा गैरवापर अमेरिकेत निवडणूकीत झाला.
यासाठी मार्क जुकरबर्गने जाहीर माफी सुद्धा मागितली.
मार्क जुकरबर्गने एका प्रतिज्ञापत्रावर सही केली आहे. त्यात असा उल्लेख आहे की स्वतःच्या मृत्युनंतर एकूणातली ५०% संपत्ती चांगल्या कामांसाठी दान केली जाईल.
त्याप्रमाणे २०१० मधे न्यूजर्सीतल्या नेटवर्क स्कूल सिस्टीमला १०० कोटी डॉलरची मदत केली आहे.
इतक्या कमी वयात इतकी मोठी झेप घेणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही.
पण धाडस, निश्चय आणि योग्य निर्णय यामुळे सामान्य व्यक्तिसुद्धा इतकी कर्तबगार होऊ शकते यात शंका नाही.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.