पार्किंग मध्ये मशरूम पिकवून स्वतःचा व्यवसाय उभा करणाऱ्या अंजानाची गोष्ट

कसोटी बघणाऱ्या या कोरोना काळात बऱ्याच जणांची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे. काहींची नोकरी गेली तर काहींचे व्यवसाय बंद पडले….

अशा वेळी पर्याय राहतो तो, उत्पन्नाचे मार्ग वाढवण्याचा!!

उत्पन्नाचे मार्ग वाढवणारे व्यवसाय करणारांच्या सक्सेस स्टोरी सांगणारे हे सदर, ‘तुम्हीच व्हा, तुमचे बॉस‘ तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा देईल.

आपल्या रोजच्या कामाव्यतिरिक्त, मग ती नोकरी असो वा व्यवसाय आपण इतर कशात फारसं लक्ष घालत नाही.

कमाईचं माध्यम एकच असलं तरी आपण त्यात समाधान मानतो.

असं नाही की आपल्या कामात आपण मेहनत घेत नाही, उलट आपण मनापसून काम करतो, जीवापाड कष्ट घेतो पण आपल्यासाठी काम एके काम…

कामाव्यतिरिक्त इतर काही आपण केलंच तर ते छंदापुरतंच मर्यादित असतं.

असे अनेक छंद सुद्धा आपण जोपासत असतो पण फक्त फावल्या वेळात.

असे आपले कितीतरी छंद असतात आपण आपल्यापाशी असणाऱ्या वेळेत किंवा आपल्या त्या त्या वेळेच्या मूडनुसार ते जोपासत असतो.

बागकाम पण त्याच छंदापेकी एक.. आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनाच बागकामाची हौस असते.

काहींची ही हौस त्यांच्या दारातल्या चार फुलझाडांपुरती मर्यादित असते तर काहींना त्यापलीकडे जाऊन स्वतःसाठी आणि मित्रमंडळी, नातेवाईकांना पुरेल इतकी भाजी लावायची हौस असते.

पण यापलीकडे जाऊन आपल्या या आवडीचं रूपांतर आपण व्यवसायात करू शकतो आणि आपली आहेत ती व्यवधानं सांभाळत हा व्यवसाय सुद्धा वाढवू शकतो.

इतकंच नाही त्यातून भरभक्क्म पैसे सुद्धा कमावू शकतो..

आणि असं करणं शक्य आहे असं तुम्हाला सांगितलं तरी त्याच्यावर तुमचा पटकन विश्वास बसणार नाही.. हो ना?

आम्हाला त्याची कल्पना होतीच आणि म्हणूनच तुमचा यावर विश्वास बसावा, तुम्हाला यातून प्रेरणा मिळावी आणि नवनवीन दिशांना तुम्ही पंख पसरवायची तयारी दाखवावी म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी ‘अंजाना गमित’ या गुजराती मुलीची ही सक्सेस स्टोरी घेऊन आलोय..

अंजाना या एका इंजिनिअर असलेल्या मुलीने तीन वर्षांपूर्वी पार्किंग शेडमध्ये मशरूमच्या शेतीला सुरुवात केली.

आणि आपल्या कामाशिवाय, छंदातून नवीन ‘अर्निंग सोअर्स‘ उभा केला.

अंजानाने ही सुरुवात कशी केली, त्यासाठी कुठून प्रशिक्षण घेतलं, तिला काय अडचणी आल्या आणि तिला स्वतःला तिच्या या व्यवसायाबद्दल काय बोलायचं आहे हे जाणून घेण्यासाठी ही अंजानाची गोष्ट!

अंजाना ही इंजिनिअर असून, ती कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

हे इतकं असताना तिला अचानक मशरूमची शेती करायची कल्पना कशी सुचली अशा प्रश्न पडतो ना?

KVK, म्हणजेच कृषी विज्ञान केंद्राचा चार दिवसांचा एक ट्रेनिंग कोर्स (Entrepreneurship development through Mushroom Cultivation) अंजानाने केला.

आणि तिथपासून तिची सुरुवात झाली ते आज तिच्या प्रॉफिटमध्ये चाळीस टक्के वाढ झालीये.

या कोर्समध्ये मुशरूमची शेती, त्यामागे घ्यावे लागणारे कष्ट, त्याबद्दल माहिती आणि त्यातून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.

आश्चर्याची आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे KVK मधल्या नामवंत लोकांनी तिला ही नवीन सुरुवात करताना सुद्धा खूप मदत केली आणि वेळोवेळी तिला आलेल्या तांत्रिक अडचणी सुद्धा सोडवल्या.

विशेष म्हणजे ही सुरुवात करण्यासाठी लागणाऱ्या जाड पॉलिथिनच्या पिशव्या आणि स्पॉन, म्हणजेच मशरूमचं बियाणं या दोन गोष्टी सुद्धा तिला KVK कडून पुरविण्यात आल्या होत्या.

या कोर्सबद्दल आणि अंजानाच्या यशाबद्दल माहिती देताना KVKचे सचिन चव्हाण सांगतात की KVK ऑरगॅनिक फार्मिंगसाठी फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर इतर लोकांना सुद्धा उद्युक्त करतो.

त्यांच्या वर्कशॉपमध्ये ते हेच पटवून द्यायचा प्रयत्न करतात की जरी ऑरगॅनिक फार्मिंगसाठी कष्ट आणि अभ्यास लागत असला, तरी त्याचा इतका बाऊ करण्याची गरज नाही.

थोडी शिकण्याची इच्छा दाखवली आणि योग्य शिकवणारी व्यक्ती मिळाली तर हे कोणालाही सहज जमण्यासारखं असतं.

ते म्हणतात की अंजानाला यात इतकं यश मिळालं, तिची इतकी प्रगती झाली कारण तिची मेहनत करायची, शिकायची इच्छा होती.

आणि मुख्य म्हणजे तिला शेतीची आवड सुद्धा होती. ‘

अंजाना सारख्या इतरही मुलांनी-मुलींनी पुढाकार घेऊन ऑरगॅनिक फार्मिंगचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे.

आपल्या नेहमीच्या कामाशिवाय एक नवा उत्पन्नाचा मार्ग उभा करण्यासाठी, किंवा स्वयंरोजगार तयार करण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे’ असं सचिनजी सांगतात.

वर्कशॉप करून झाल्यावर नेमकी अंजानाने सुरुवात कशी केली?

खरंतर अंजानाने या ऑरगॅनिक मशरूम फार्मिंगची सुरुवात तिच्या १०x१० च्या पार्किंगला आजूबाजूने हिरवं कापड लावून केली.

आणि तुमचा विश्वास बसणार नाही पण दोनच महिन्यात तिने १४० किलोचं पिक काढलं आणि त्यातून ३०,००० रुपये कमवले!

ही शेती नेमकी कशी करतात?

१. कोरडं गवत (स्ट्रॉ) पाण्यात ४ ते ५ तासांसाठी भिजवून ठेवायचं, जेणेकरून ते मऊ आणि स्वच्छ होईल.

२. त्यानंतर हे गवत चांगलं १०० डिग्रीला स्टर्लाईझ करून घ्यायचं.

३. त्यानंतर गवत गार व्हायला परत थंड पाण्यात बुडवून, झाकून ठेवायचं.

४. गवत थोड्यावेळाने थंड पाण्यातून काढून घेऊन रात्रभर सुकवत ठेवायचं.

५. यानंतर ते व्यवस्थित सुकलेल गवत आणि मशरूमचं बी एकत्र पॉलिथिन बॅगमध्ये भरून घट्ट बांधून ठेवायचं, आत मध्ये हवा जाता कामा नये ही काळजी घ्यायची.

६. साधारण १८ दिवसांनी मशरूम उगवतो, मग अगदी नाजूकपणे एकेक बॅग उघडून त्यातून मशरूम मुळापासून उपटून घ्यायचे.

हे सगळे सोपस्कार पार पडायला २५ दिवस तरी जातात.

अंजाना सांगते, की साधारण १० किलो स्पॉनमधून ४५ किलो मशरूम तयार होतात!

ही सगळी कृती जरी करायला सोपी असली तरी यात भरपूर काळजी घ्यावी लागते कारण यात कन्टॅमिनेशनचे धोके खूप असतात.

त्यामुळे तापमान आणि आर्द्रतेचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात.

अंजानाला देखील सुरुवातीला याचा त्रास झाला होता आणि पाहिल्या पहिल्यांदा तर तिचं सुमारे ८० टक्के पीक कन्टामिनेट होऊन वाया जायचं.

मराठी सुविचार

पण यामुळे खचून न जाता तिने प्रयत्न सुरूच ठेवले आणि यातून मार्ग शोधून काढला.

साध्या कडुलिंबाच्या तेलाच्या वापराने तिने कन्टामिनेशन कन्टॅमिनेशन कमी केलं.

१०x १० पासून सुरुवात करून आता हळूहळू अंजानाने तिचा अख्खा पार्किंग लॉट (२६x४५ फीट) या मशरूमच्या शेतीसाठी वापरायला सुरुवात केली आहे.

आणि आता तिच्याकडे ३५० मशरूम बॅग्स आहेत.

ज्यांना अशी मशरूमची शेती करायची इच्छा आहे अशांसाठी अंजाना काय सांगते ते वाचून आश्चर्य वाटेल

आणि कदाचित विश्वास सुद्धा बसणार नाही.

ज्यांना ही शेती करायची आहे त्यांना सुरुवातीला फक्त १०x१० ची जागा आणि ४०० रुपये इतकीच गुंतवणूक लागेल!

याचं रॉ मटेरिअल एखाद्या मोठ्या नर्सरीमधून किंवा हॉर्टिकल्चरच्या दुकानातून सहज मिळू शकतं.

एका किलोपासून सुरुवात करण्याचा सल्ला देताना अंजाना सांगते की एक किलो पीक काढायला अर्धा किलो गवत आणि ५० ग्राम स्पॉन लागतं आणि रोज अंदाजे ५ लिटर पाणी!

आहे की नाही सोपं?

अंजाना सांगते की अशा प्रकारची शेती करायची असेल तर ऑयस्टर मशरूमचा पर्याय उत्तम आहे.

कारण यासाठी एकदम मोठ्या पट्टीवर सुरुवात करायची सुद्धा गरज नाही.

अगदी लहान प्रमाणात घरच्याघरी हे करून बघून त्यात आपला हात बसला, आत्मविश्वास आला की वाढवत नेता येईल.

सुरुवातीला अंजानाला लोकांना मशरूमचं महत्व समजावून सांगायला फार त्रास झाला.

आपल्याकडे मशरूम म्हणजे पावसाळ्यात उगवणारी कावळ्याची छत्री असाच एक समज आहे.

शिवाय मशरूम विषारी असतात त्यामुळे ते खायचे नाहीत असं लोकांना वाटतं.

पण खाण्याचे मशरूम वेगळे असतात हे अनेकांना माहीत सुद्धा नसतं.

खाण्याच्या मशरूम चे प्रकार आणि त्याचे पौष्टिक गुणधर्म सांगणारा लेख या लेखाच्या शेवटी वाचायला मिळेल.

बऱ्याच जणांना तर मशरूमम्हणजे नॉनव्हेजचाच प्रकार वाटतो त्यामुळे ते मशरूम आजिबात खात नाहीत.

अंजानाला सुद्धा यामुळे बराच त्रास झाला पण हळूहळू लोकांना मशरूममध्ये व्हिटॅमिन ‘डी: आढळतं, ते पौष्टिक असतात आणि मुख्य म्हणजे नॉनव्हेज किंवा विषारी नसतात, हे पटवण्यात यश आलं आहे.

अंजाना आता मशरूम छोट्या दुकानात तर विकण्यासाठी देतेच पण तिने अंगणवाडीला पण मशरूम द्यायला सुरुवात केली आहे.

पेशाने इंजिनिअर असलेल्या अंजानाबद्दल कौतुक वाटलं ना?

मग हे वाचून अजून कौतुक वाटेल, की इतक्यावरच समाधान मानून ती थांबली नाही,

या मशरूमपासून वेगवेगळे प्रॉडक्ट्स, जसं की चिप्स, लोणची, मशरूम पावडर इत्यादी करण्याचा तिचा मानस आहे!

१०x१० इतक्याच जागेत सुरु केलेल्या या शेतीला आपल्या प्रयत्नांनी आणि कष्टाने अंजानाने कुठल्याकुठे नेलं आहे..

मित्रांनो, आपल्या बऱ्याच इच्छा असतात, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला बरीच माहिती सुद्धा असते.

आणि त्यासाठी कष्ट करायची आपली तयारी सुद्धा असते पण आपलं गाडं फक्त ‘सुरुवात कशी करायची?’

या प्रश्नापुढे येऊन आडतं. अंजानाची ही गोष्ट वाचून तुम्हाला नव्याने हुरूप आला असेल, मशरूम फार्मिंगची एक नवीन कल्पना सुचली असेल आणि कदाचित तुम्हाला हवं असलेलं प्रोत्साहन सुद्धा मिळालं असेल, हो ना?

मग तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा ही गोष्ट वाचायला द्यायला विसरू नका!

https://manachetalks.com/9546/types-of-mushroomsches-prkar-marathi-mahiti/

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “पार्किंग मध्ये मशरूम पिकवून स्वतःचा व्यवसाय उभा करणाऱ्या अंजानाची गोष्ट”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।