मासिक पाळीदरम्यान पोट फुगल्यासारखे, ब्लॉटिंग झाल्यासारखे वाटते का? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय
वयाच्या साधारण १२, १३ व्या वर्षापासून ते ४५, ५० वर्षापर्यंत महिलांना मासिक पाळीचा सामना करावा लागतो. मासिक पाळी नियमित येणे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असते.
परंतु मासिक पाळीदरम्यान महिलांना काही अडचणींचा सामना देखील करावा लागतो. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे पोट फुगल्यासारखे वाटणे, ब्लॉटिंग होणे किंवा गॅसेस होणे.
या सर्व समस्यांचे मूळ कारण मासिक पाळी दरम्यान शरीरात होणारे हार्मोनल बदल हे आहे.
मासिक पाळी दरम्यान कोणकोणते हार्मोनल बदल होतात?
१. मासिक पाळी सुरु होण्याच्या आधीच्या काळात शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढू लागते.
२. मासिक पाळीच्या दुसऱ्या फेजमध्ये शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढू लागते.
३. यादरम्यान अंडाशयातून बाहेर आलेले स्त्रीबीज फलित न झाल्यास मासिक पाळी सुरू होते. त्यादरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी अतिशय जास्त प्रमाणात वाढते.
४. यादरम्यान शरीर पाणी आणि मीठ साठवून ठेवू लागते. त्यामुळे शरीरातील पाण्याची आणि मिठाची पातळी वाढल्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटून ब्लॉटिंग होते.
याचाच अर्थ मासिक पाळी सुरू होण्याच्या अगदी आधी आणि पाळी सुरु झाल्यानंतर शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलामुळे शरीर पाणी आणि मीठ साठवून ठेवते आणि त्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते. यालाच वॉटर रिटेन्शन असे देखील म्हणतात.
मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या ब्लॉटिंगची लक्षणे
१. पोटात जडपणा जाणवणे.
२. पोट दुखणे.
३. पोटात ताणल्यासारखे किंवा ओढल्यासारखे वाटणे
४. गॅसेसची समस्या जाणवणे
५. कॉन्स्टिपेशन/मलावरोध होणे
६. डायरिया/जुलाब होणे
मासिक पाळी दरम्यान होणार्या ब्लॉटिंगवर करण्याचे घरगुती उपाय
मासिक पाळी दरम्यान होणारे ब्लॉटिंग ही एक अगदी कॉमन समस्या आहे. त्यात फार काही गंभीर असे नाही. तसेच घरच्या घरी काही उपाय करून त्या समस्येवर मात करता येऊ शकते. ते उपाय कोणते ते आता आपण पाहूया
१. संतुलित आहार घ्या
मासिक पाळी दरम्यान आणि पाळी सुरू होण्याच्या थोडा काळ आधी पासून संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे फायद्याचे ठरते.
अधिक प्रमाणात फायबर असणारा आणि मिठाचे प्रमाण कमी असणारा आहार घेणे योग्य ठरते. फायबरयुक्त आहार घेतल्यामुळे पचनाचे काम सोपे होऊन आतड्यांवर त्याचा ताण येत नाही. तसेच आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवल्यामुळे शरीरातील मीठाची पातळी संतुलित राहते आणि वॉटर रिटेन्शनची समस्या कमी होते. या दिवसात भरपूर प्रमाणात पाणी पिणे देखील आवश्यक असते.
२. मॅग्नेशियम युक्त आहार घ्या
मॅग्नेशिअम हे एक प्रकारचे मायक्रो मिनरल आहे. गर्भवती नसणाऱ्या किंवा स्तनपान न करणाऱ्या महिलांना दररोज तीनशे ते तीनशे वीस मिलिग्रॅम मॅग्नेशियमची आवश्यकता असते.
अशा योग्य प्रमाणात मॅग्नेशियमचे सेवन केल्यामुळे स्नायूंना आराम मिळतो तसेच प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम म्हणजेच पाळी सुरू होण्याच्या आधी जाणवणारी लक्षणे यांचे प्रमाण कमी होते. बदाम, शेंगदाणे, काजू, दलिया आणि सोयामिल्क या पदार्थांमध्ये मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते.
३. पोटॅशियम युक्त आहार घ्या
पोटॅशियम शरीरातील सोडियमची मात्रा नियंत्रित करण्यासाठी उपयोगी ठरते. त्याच बरोबर किडनीचे कार्य सुधारून टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी देखील पोटॅशियमचे योग्य प्रमाण उपयोगी ठरते.
पोटॅशियमचे संतुलित सेवन ब्लॉटिंगची समस्या कमी करण्यासाठी उपयोगी असते. पालक, केळी, अवाकाडो हे पदार्थ भरपूर पोटॅशियमयुक्त असे आहेत.
४. हलका व्यायाम करा
मासिक पाळी दरम्यान अतिशय जास्त प्रमाणात व्यायाम करणे योग्य नसले तरी हलका, झेपेल इतका व्यायाम जरूर करावा. असा व्यायाम करण्यामुळे शरीराचे आखडलेपण कमी होते तसेच उत्साह वाढतो.
त्याशिवाय पाळीच्या सुरुवातीला पोटात येणारे क्रॅंप्स कमी होण्यास देखील व्यायामामुळे मदत होते. मासिक पाळी दरम्यान सोपी योगासने आणि प्राणायाम करणे अतिशय फायद्याचे ठरते. तसेच चालण्याचा व्यायाम करणे देखील उपयोगी आहे.
५. प्रोबायोटिक सप्लीमेंट
पोटाचे पचनाचे कार्य सुरळीत व्हावे म्हणून आहारामध्ये प्रोबायोटिक सप्लीमेंटचा समावेश करावा. अशा सप्लिमेंटमुळे शरीरात अन्नपचन करणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होऊन अन्नपचन सुरळीत होऊ शकते.
त्यामुळे मलावरोध किंवा डायरिया या समस्या उद्भवत नाहीत. दही हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे.
६. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या
शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्याची समस्या खूप जास्त प्रमाणात असेल तर त्यावर उपलब्ध असणारी औषधे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने अवश्य घ्या. अशी औषधे घेण्यामुळे मूत्र उत्सर्जन वाढून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
त्याचबरोबर पाळी येण्याआधी जाणवणाऱ्या लक्षणांवर देखील औषधे उपलब्ध आहेत. परंतु कोणतीही औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग ती घेणे अतिशय आवश्यक आहे. स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नयेत.
७. गरम पाण्याने पोट शेकणे
पोट दुखी किंवा पोटात येणारे क्रॅम्प्स यावर गरम पाण्याच्या पिशवीने पोट शेकणे हा एक घरगुती उपाय आहे. त्याच बरोबर गरम पाण्याबरोबर पाव चमचा ओवा घेणे, किंवा पाव चमचा शहाजिरे घेणे हे उपाय देखील उपयोगी ठरतात.
तर मैत्रिणींनो, मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या ब्लॉटिंग वरचे हे आहेत काही घरगुती उपाय. हे उपाय जरूर करून पहा आणि तुम्हाला त्याचा कसा उपयोग झाला हे आम्हाला कमेंट करुन सांगा.
मासिक पाळीदरम्यान कमी रक्तस्त्राव होण्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय
मासिक पाळीच्या रक्तस्त्रावाच्या रंगावरून जाणून घ्या तुमची तब्येत
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.