जन्मत: प्रत्येक माणसाच्या शरीरात ताल आणि मनात लय असतेच. अगदी लहान बाळ पण आईच्या अंगाई गीताने किंवा बाबाच्या चुटकीने क्षणभर का होईना रडायचे थांबतेच ना !!! खरं तर लक्षपूर्वक आपण निसर्गातले ध्वनी ऐकायला शिकलो तर त्यात नक्कीच लयबद्ध ताल ऐकू येईल. जसजशी आपली वाढ होत जाते तसतसे मग कानावाटे सूर मनात तर शरीराद्वारे ताल शरीरात भिनत जातो. आम्हाला नाचावेसे का वाटते? तालाच्या ठेक्यात असे काय असते की ज्यामुळे शरीर थिरकायला लागते? आपल्याला त्या शास्त्रीय नृत्या बित्त्यातले भलेही काही कळो की न कळो पण तालाच्या लयीवर नाचतोच की! लग्नाच्या वरातीत आम्ही नाचायची हौस भागवून घेतोच ना!! तालाची ही जादू अगदी लहानपणा पासून आमच्यावर गारूड करत आली आहे. आज मला या ताला संबंधी काही सांगायचे आहे. चित्रपटसृष्टीत तालवाद्यकारांनी किती अप्रतिम काम करून ठेवलंय !!! पण आम्हाला मात्र कदाचित आज त्याची नावंही आठवणार नाहीत.
सन १९४२ मध्ये १२-१३ वर्षांचा दत्तू नावाचा एक मुलगा आपल्या आई बरोबर गोव्याहून मुंबईत आला. मराठी माणसांना अतिशय प्रेमाने सामावून घेणाऱ्या त्या काळातल्या वस्त्या म्हणजे परळ आणि गिरगाव. हे दोघेही गिरगावातल्या ठाकूरद्वार या ठिकाणी राहू लागले. तिथे एक दिवस एक स्त्री दत्तूच्या आईला (जी स्वत: संगीतप्रेमी व गोव्याचीच होती) भेटली. तिने सर्व प्रथम दत्तूला एका संगीत गुरूकडे नेले. पंढरीनाथ नागेशकर या गुरूंनी त्याला विचरले- तबला शिकणार का? दत्तू हो म्हणाला. मग या गुरूने दत्तूला गंडा बांधला. त्यावेळी त्या गुरूला पण ही कल्पना नसेल की एक दिवस हा शिष्य आपल्या ठेक्याने अख्ख्या चित्रपटसृष्टीला डोलायला लावेन.
तरूण दत्तू पूढे आखाड्यात व्यायाम करायला जाऊ लागला. या ठिकाणी शंकर नावाचा एक तरूण नियमित यायचा. दोघांची हळूहळू मैत्री झाली. एक दिवस व्यायाम झाल्यावर फ्रेश होण्यासाठी दत्तू आखाड्यातल्या बाथरूम मध्ये गेला. अंघोळ करतानां त्याच्या कानावर तबल्याचे बोल ऐकू आले. दत्तूला आश्चर्य वाटले तो लगबगीने बाहेर आला. या आखाड्यात एका तबला प्रेमी व्यक्तीने एक तबला आणून ठेवलेला होता. बाहेर येऊन बघतो तर शंकर तबला बाजवतोय…दत्तूच्या तोंडून सहजपणे व्वा !!!…..व्वा !!!! असे उद्गार निघाले.
शंकर तबला वाजवायचा अचानक थांबला… दत्तूकडे बघत म्हणाला- “तू व्वा..व्वा.. कसे काय म्हणालास? तूला तबल्यातलं काही समजतं काय?” यावर दत्तू म्हणाला- “हो..मलाही थोडा फार तबला वाजवता येतो’’…आणि त्याने एक मुखडा म्हणून दाखवला.. शंकर उठला आणि दत्तूला कडकडून भेटला…भविष्यातले दोन महान कलावंत असे कडकडून भेटतानां सर्वप्रथम त्या तबल्याने बघितले होते. यातील दत्तू पूढे महान ऱ्हीदम संयोजक व संगीतकार दत्तराम बनला तर शंकर देखील जयकिशन सोबत जोडी जमवून महान संगीतकार बनला.
त्याकाळात पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरचे मोठे नाव होते. चर्नीरोड स्टेशन जवळ ऑपेरा हाऊस ही एकमेव इमारत त्याकाळी नाटकांसाठी प्रसिद्ध होती. नंतरच्या काळात या ठिकाणी चित्रपटगृह झाले. मी स्वत: इथे अनेक चित्रपट पाहिले. तर या इमारतीत पृथ्वी थिएटरच्या नाटकाच्या तालमी होत असत. शंकर यानी दत्ताराम यांना तिथे बोलावून घेतले. येथील कँटीनमध्ये जयकिशन, हसरत जयपूरी, शैलेंद्र, राज कपूर, राजा नवाथे, शम्मी कपूर असे सर्वजण येत असत. सर्वचजण काही तरी बनायचे या ध्येयाने झपाटलेले होते. येथे जी नाटके होत असत त्यातील मध्यातंरात सतार, सनई, तबला वाजवणारे कलावंत आपली कला सादर करत.
मग येथे दत्ताराम देखिल तबला वाजवू लागले. राज कपूर म्हणजे संगीतातील अत्यंत दर्दी व्यक्तीमत्व. संगीताची अतिशय उत्तम जाण या माणसाला होती. त्यांच्या चित्रपटातील गाणी म्हणजे त्या चित्रपटाचा प्राणच असत. १९४८ मध्ये राज कपूर यांनी “बरसात” चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली. १९४९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शीत झाला आणि यातील संगीताने अक्षरश: धूमाकूळ घातला. शंकर-जयकिशन, शैलंद्र, हसरत जयपूरी, लताजी, मुकेश यांनी संगीताचा बाजच बदलून टाकला आणि संगीताच्या एका नव्या युगाची सुरूवात झाली.
शंकर-जयकिशन यांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे ऑर्केस्ट्रेशन मधील महाप्रचंड ग्रॅजंर. सर्वकाही भव्यदिव्य असे. त्यांच्या गाण्याचे रेकॉर्डिग मध्ये वादकांचा खूप मोठा ताफा असे. मेलडी आणि ऱ्हिदम यांचे ते अनभिषक्त सम्राट होते. नंतरच्या काळात शंकर-जयकिशन यांनी यातील मेलडीची जबाबदारी सॅबेस्टीन या प्रचंड प्रतिभाशाली संयोजकाकडे तर ऱ्हिदमची जबाबदारी दत्तराम यांच्याकडे सुपूर्द केली. हे दोघे शंकर-जयकिशन यांचे प्रमूख सहाय्यक म्हणून अखेर पर्यंत सोबत राहिले. बरसात नंतर राज कपूरनी “आवारा” चित्रपटाची तयारी केली. यासाठी त्यांनी फेमस स्टुडिओत ऑफिस थाटले. (मी काल ज्या इमारती बद्दल लिहले त्या इमारतीने हा सुवर्णकाळ बघितला.)
दत्ताराम यांना सुरूवातीला फक्त रेकॉर्डिंग पूर्वीच्या तालिमीतच वाजवायला मिळत असे. प्रत्यक्ष रेकॉर्डिंगमध्ये मात्र त्यांचे गुरूच वाजवित असत त्यामुळे ते खट्टू होत असत. त्यांच्या प्रतिभेचा कस लागायचा आणखी शिल्लक होता. आणि एक दिवस त्यांना ती संधी मिळाली. ‘आवारा’ चित्रपटातील…. ‘एक बेवफासे प्यार किया….’ या गाण्याचे रेकॉर्डिंग व्हायचे होते. पण दत्तरामचे गुरू जे ढोलक वाजविणार होते ते आलेच नाहीत. वेळ महत्वाचा होता. वाट बघून शेवटी राज कपूर म्हणाले- अरे..दत्तूलाच सांगा आता…आणि दत्तराम यांनी यात ढोलक वाजविला. शंकर-जयकिशन,राज कपूर, लतादीदी सर्वचजण खूप खूष झाले.आणि येथून खऱ्या अर्थाने दत्तराम यांच्या वादनाची कळी बहरू लागली.
१९५३ मधील राजा की आयेगी बारात… (आह) हे गाणेही हीट झाले. राज कपूर एकदा शंकर-जयकिशन, शैलेंद्र व दत्ताराम यांना घेऊन खंडाळा येथे गेले. एका नृत्य गाणे त्यांना हवे होते. शंकरजीना त्यांनी विचारले एखादी चाल सूचते का? ते म्हणाले ‘हो’ मग ते दत्तरामला म्हणाले एखादा ठेका दे बघू…दत्ताराम यांनी ताल धरला…यावर शंकरजी- ‘’ रमैया वस्तावैया ’’ अशी ओळ म्हणू लागले. बराच वेळा तीच ओळ म्हणत राहिले..राज कपूर म्हणाले- ‘’ अरे आता पूढे काय?’’ जवळच शैलेंद्र बसले होते त्यांनी पूढची ओळ म्हटली ‘’ मैने दिल तुझको दिया….’’ आणि बघता बघता एक अजरामर गाणे तयार झाले. १९५५ मधील श्री ४२० या चित्रपटातील दत्तराम यांनी वाजविलेली ‘ ईचक दाणा बिचक दाणा’,,, ‘प्यार हुआ इकरार हुआ है’.. ‘ रमैया वस्तावैया ’ ही सर्वच गाणी प्रचंड गाजली.
यातील ढोलक वरील वाजवलेले ठेके अप्रतिम आहेत. दत्तरामजी चांगले कंपोजर पण होते. त्यांचे पूर्ण नाव दत्तराम वाडकर असे आहे. त्यांच्या मुलाचे नाव सुरेश वाडकर. अनेकजण गायक सुरेश वाडकर यांना त्यांचे मुलगे समजात. पण फक्त नाव साध्यर्म. त्यांचा मुलगा फॅशन डिझाईनर आहे. १९५७ मध्ये त्यांनी एक वेगळा प्रयोग केला. लहान मुलांवर एक चित्रपट त्यांनी निर्मित केला. “अब दिल्ली दूर नही’’ हे त्याचे नाव. राजेंद्रसिग बेदी आणि मुहाफिज हैदर यांनी कथा पटकथा लिहिली होती. यात संगीतकार कुणाला घ्यायचे ? असा विचार करत असताना शंकर यानी दत्तराम यांचे नाव सांगितले. राज कपूर यांनीही विश्वास दाखवत त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली. यातील “छूम छूम करती आयी छिडिया, दाल का दाणा लायी छिडिया”….हे रफी यांचे गाणे तुफान गाजले. याकूब या विनोदी अभिनेत्यावर हे गाणे चित्रीत केले आहे. या गाण्यातील त्यानी वाजवलेला ढोलक केवळ अप्रतिमच आहे. हा च ठेका पूढे त्यांची ओळख बनणार होता.
‘मधूमती’चे संगीतकार सलील चौधरी यांनी त्यांना बोलावले. दत्तारामनी जेव्हा त्यांना विचारले की ‘या गाण्यावर कोणता ठेका वाजवू?’ यावर सलिलदा त्यांना म्हणाले होते- “हे मी तुला काय सांगणार? तूच ठरव की काय वाजवायचे !!!!” ज्यानां आपण मोठी माणसं असं म्हणतं असतो ती अशा प्रसंगामुळे खरोखर मोठी होत असतात. यातील ‘’घडी घडी मेरा दिल धडके’’, ‘’सुहाना सफर और ये मौसम हंसी’’ आणि ‘’आजा रे परदेसी’’… या गाण्यांवर त्यांनी सुंदर ढोलक वाजवले.
१९५८ मध्ये दत्तराम यानां आणखी एक चित्रपट मिळाला. राज कपूर, माला सिन्हा यांचा ‘परवरीश’. यातील ‘’आंसू भरी है ये जीवन की राहे…’’ हे मुकेश यांचे गाणे तुफान गाजले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी वादक कलावंताचा संप होता त्यामुळे वादकच मिळत नव्हते. शेवटी दत्ताराम यांनी त्यांच्या ओळखीतील काही मित्रानां सारंगी, सतार वाजावायला सांगितली व गाणे रेकॉर्ड केले. यातील दुसरे उडत्या चालीचे …’’ मस्ती भरा है समा…’’हे गाणे पण खूप लोकप्रिय झाले.यातील त्यांचा ढोलकचा ठेका चित्रपटसृष्टीत दत्ताराम ठेका याच नावाने प्रसिद्ध झाला. संगीतकार कुणीही असो पण वादकानां सूचना करताना ते म्हणत- अरे भाई वह दत्तराम ठेका बजाना… राज कपूरच्याच ‘’ जिस देशमे गंगा बहती है ’’मध्ये एका गाण्यात गाणे सुरू होण्यापूर्वी विविध ताल वाद्ये वाजवली होती. याचे सर्व संयोजन दत्तराम यांनी केले होते यात लाला भाऊ नावाच्या एका ढोलकी बहाद्दराने केवळ बोटांनी डफावर अप्रतिम बोल वाजवले होते.
हे तेच ढोलकीपट्टू होते ज्यांनी ‘’ घर आया मेरा परदेसी…’’ या गाण्यावर अप्रतिम ढोलकी वाजवली होती. याच चित्रपटातील ‘’ हाँ मैने प्यार किया…’’या लताजीच्या गाण्यातील ऱ्हिदम ऐका…केवळ लाजबाब आहे. ‘’बसंत बहार’’ या चित्रपटातील सर्वच गाणी रागदारीवर आधारीत असलेली होती ती सर्वच लोकप्रिय झाली. त्यांचे ‘लव्ह इन टोकियो’ तील ‘’ सायोनारा..सायोनारा…’’ हे गाणे व गुमनाम मधील ‘’इस दुनिया मे जीना है तो सुनलो मेरी बात…..’’ही दोन गाणी म्हणजे दत्ताराम ठेक्याचा कळस म्हणता येईल इतकी अप्रतिम आहेत. चित्रपटसृष्टीतल्या जवळपास सर्वच संगीताकारांसाठी त्यांनी काम केले. गोव्याने चित्रपटसृष्टीला अनेक नामवंत कलावंत दिले.
यात गायक, साहित्यीक, संगीतकार, वादक, अभिनेते सर्वच् आहेत. दत्तरामजी हे यातील अत्यंत लखलखणारे रत्नच होते. ऱ्हिदम हा त्यांच्या नसानसातच भिनला होता जो बोटाद्वारे उसळून बाहेर येत असे. खरं तर तबला, पखावज, मृदुंग हे भारतीय शास्त्रीय संगीतातल्या दरबारी मानाने रूजू झाले. या वाद्यांचा शास्त्रीय पद्धतीने विकास होत गेला. त्यात तालाचे बोल स्पष्टपणे लिहून व्याकरण तयार केले गेले पण ढोलक, ढोलकी वा ढोलाला हा मान मिळू शकला नाही. या वाद्यांना दत्तारामजीमुळे चित्रपटसृष्टीत मात्र मान मिळाला. १९७७ पर्यंत ते चित्रपटसृष्टीत सक्रिय होते पण नंतर मात्र गोवा या आपल्या मूळ गावी त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य घालवले. ८ जून २००७ मध्ये त्यांचा श्वासाचां ठोका आणि हा बहारदार ठेका कायमचा बंद झाला.
(त्यांच्या आयुष्यावर आधारीत ‘’मस्ती भरा है समाँ ‘’ या नावची एक डॉक्युमेंट्री जेष्ठय चित्रपट समिक्षक अशोक राणे यांनी तयार केली. या लेखासाठी मला या डॉक्यूमेंट्रीचा संदर्भ म्हणून खूप उपयोग झाला. त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद)
-दासू भगत, औरंगाबाद.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.