गेल्या वर्षी हॉलिवूडमध्ये खळबळ माजवणार्या #Me Too या मुक्तमाध्यमांवरील अभिव्यक्तीला सध्या एका चळवळीचे रूप आल्याचे दिसते. लैंगिक शोषण झालेल्या अनेक महिला आता समाजमाध्यमांवर मुक्तपणे आपल्याबाबत झालेल्या घटनांचा मोकळेपणे आणि मोठ्या धाडसाने उच्चार करीत आहेत. त्यामुळे ‘महिलांचे लैंगिक शोषण’ हा प्रदीर्घ काळापासून चर्चिला जाणारा विषय आता वेगळ्या प्रकारे चर्चेला आला आहे. गत वर्षी ऑक्टोबरमध्ये हॉलिवूडमधील हार्वे विन्स्टीन या निर्मात्यासह काही नामवंत कलाकारांवर #Me Too च्या माध्यमातून गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर या चळवळीचा आवाज काहीसा क्षीण झाला. मात्र आता अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर देशभरात आरोपांचा धुरळा उडाला. देशातील माध्यमं, मनोरंजन क्षेत्रातील बड्या बड्या प्रस्थांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जात असून त्याचे लोन पुण्यातील सिम्बायाेसिस महाविद्यालयापर्यंत येऊन पोहचले आहे. आरोपाच्या फैरी झडत असताना काहींनी यावर चुप्पी साधली तर काहींनी या आरोपाचे जोरदार खंडन करत यामागे षडयंत्र असल्याचा प्रतिआरोप केला आहे. अर्थात, आरोपातील तथ्य हा तपासाचा भाग असल्याने लागलीच कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येणार नाही. आणि त्यावरील आरोपाकडे डोळेझाकही ही करता येणार नाही. मुळात, ह्या घटना काही वर्षांपूर्वीच्या असल्याने त्याची सत्यासत्यता पुराव्यांनिशी सिद्ध करणे तसे कठीण आहे. त्यामुळे एखादा आरोप पूर्वग्रहदूषित ठरण्याची श्यक्यताही आहे. परंतु या सर्व घडामोडीतून जे विदारक सामाजिक सत्य समोर येते आहे, ते मुळीच दुर्लक्षिता येणारे नाही. फक्त आरोप-प्रत्यारोपापुरता हा मुद्दा मर्यादित नसून समाजातील महिलांच्या बाबतीत अशा घटना घडत आहेत कि नाही, यावर अंतर्मुख होण्याची गरज आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांसोबत गैरवर्तन किंवा त्यांचे शोषण केल्या जात असल्याच्या घटना नवीन नाहीत. आज कोणतेही क्षेत्र नसेल ज्यामध्ये असे प्रकार घडत नसतील. शाळा -महाविद्यालयात, कार्यालयात, रस्त्यावर, रेल्वेत, एस.टी.त, सिनेमागृहात, बागेत, अशा प्रत्येक ठिकाणी महिलांवर दूषित नजरा खिळलेल्या असतात. संधी मिळाली कि महिलांसोबात अनुचित वर्तन केल्या जाते. मात्र यातील बहुंताश घटनांकडे लोकलाजेस्तव नाईलाजाने दुर्लक्ष केल्या जाते.. त्या घटना दडपुन टाकल्या जातात. महिलांनाही व्यक्त होण्याचा योग्य मार्ग सापडत नसल्याने त्यांचाही नाईलाज होत होता. परंतु समाज माध्यमांचं व्यासपीठ मिळाल्यापासून अशा काही घटनांना वाचा फुटू लागली आहे. गेल्या काही दिवसात अभिनेत्री तनुश्री दत्ता ने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर आठ वर्षांपूर्वी गैरवर्तन केल्याचा आरोप याच #Me Too च्या माध्यमातून केला, अन् या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली. त्यानंतर विनता नंदांनी यांनी अभिनेते आलोकनाथ यांच्यावर, किमान सहा महिला पत्रकारांनी पत्रकार आणि राज्यसभा खासदार एम. जे. अकबर यांच्यावर, पुण्यातील सिम्बायाेसिस महाविद्यालयाच्या अाजी-माजी विद्यार्थिनींन प्राध्यापकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप समाज माध्यमातून केले आहेत. शिक्षणसंस्थांपासून न्यायसंस्थेपर्यंत आणि माध्यम क्षेत्रापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत या आरोपांचे लोन जाऊन पोहोचले आहे. अर्थातच, या क्षेत्रांमध्ये असलेली स्पर्धा, राजकारण, असूया, त्यातून निर्माण होणारे हेवेदावे यातून काही आरोप केवळ प्रसिद्धी आणि सनसनाटी साठी केले असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण म्हणून सगळेच आरोप पूर्वग्रहदूषित असल्याचा प्रतिआरोप कुणी करू नये.
त्यामुळे, महिला आयोगासह पोलिस विभागाने या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन त्यातील तथ्य शोधून काढणे गरजेचे आहे. पण, हा या समस्येवरील उपाय नाही. हे देखील समजून घेण्याची गरज आहेे. तनुश्री दत्ता सह इतर ज्या महिलांनी आपल्या उद्विग्न भावना #Me Too च्या माध्यमातून मांडल्या. त्यातील जवळपास महिला शिक्षित, स्वयंपूर्ण आणि वलयांकित आहे. त्यामुळे सोशल माध्यमातून का होईना आपले विचार मांडण्याचे धाडस त्या करू शकल्या. मात्र गाव-खेड्यात, नगर-महानगरात अशा पुरुषी प्रवृत्तीचा सामना करणाऱ्या हजारो लाखो महिला अजून व्यक्त झालेल्या नाहीत. लोकलज्जा, संस्कार, परिस्थिती, जबाबदारी,आत्मविश्वासाची कमतरता आदी विविध कारणांमुळे त्या व्यक्त होण्याची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे हे प्रकार थांबवायचे असतील तर एकूणच मानसिकता बदलण्याची गरज अधोरेखित होते.
स्त्री अत्याचाराची नाळ सामाजिक सत्तासंदर्भ, पुरुषत्वाची संकल्पना याच्याशी घट्ट जोडली गेली आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू समजण्याची पुरुषी मानसिकता अजूनही कायम असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे देशभरात स्त्री सबलीकरणाचे कितीही प्रदर्शन केले जात असले तरी स्त्रियांची कुचंबणा अद्याप थांबलेली नाही. किंबहुना, आता अशा घटनात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या समस्येवर समाजाने नव्याने विचार करायला हवा. स्त्री-पुरुष समानतेच्या नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारण्याचा मोठेपणा समाजाने दाखवायला हवा. सोबतच स्वत:साठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची वेळ आता महिलांवर आली आहे. यासाठी त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. स्वत:च्या मर्यादा ठरविणे, अवांछित गोष्टींना प्रतिसाद न देणे, परिस्थितीबाबत जागरुक राहणे तसेच साशंक व्यक्तिमत्वांपासून जपून राहणे याचा अवलंब महिलांनी करणे आवश्यक आहे. समाज माध्यमाच्या व्यासपीठावरून काही महिलांनी ‘मी सुद्धा’ म्हणत आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली.. वेळ आल्यास इतरांनीही धीटपणे समोर येऊन निर्भीडपणे व्यक्त होणे, आज काळाची गरज आहे.
वाचण्यासारखे आणखी काही…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.