आजवर अनेक सैनिकांनी स्वतःचं आयुष्य आपल्या देशासाठी बलिदान केलं आहे. त्यांच्या त्या परमोच्च बलिदानामुळे तुम्ही, आम्ही आज शांतपणे झोपू शकतो. आपले हक्क आणि कर्तव्य हे मागू शकतो. एका शांतता असलेल्या आणि आपल्याला हवं तसं आयुष्य जगण्याची संधी देणाऱ्या देशात अभिमानाने त्याचा नागरिक म्हणून कुठेही जाऊ शकतो. पण ह्या स्वातंत्र्याची खूप मोठी किंमत आपण चुकवत असतो. भारतीय सेनेच्या पराक्रमी, जीवावर उदार होऊन देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांमुळे आज आपण आहोत. त्यांच्या ह्या कर्जातून आपण कधीच ऋणमुक्त होऊ शकत नाही. पण निदान त्यांच्या ह्या बलिदानाची आठवण ठेवण्याची आणि त्याचं हे बलिदान समजून घेण्याची वृत्ती मात्र आपण अंगिकारयाला हवी.
ह्या खऱ्या हिरोंची गोष्ट न चित्रपटात येते, न कोणत्या पाठ्यपुस्तकात, न आपल्याला कधी कोणाकडून ऐकायला मिळते. देशासाठी बलिदान देणारे हे हिरो काळाच्या गर्तेत असेच आपण विसरून जातो. कारण आपल्या देशाचा मिडिया हा पडद्यावर दिसणाऱ्या लग्नाच्या, राजकारण्यांच्या, त्यांच्या खासगी आयुष्यातील गॉसिपिंग च्या मायाजाळात इतका अडकलेला असतो की ह्या खोट्या हिरोंच्या मुलाने आई म्हणून हाक मारली तरी त्याची बातमी होते आणि आपल्या मातृभूमीसाठी रक्त सांडणारा सैनिक फक्त हवेतच विरला जातो. आपलं देशप्रेम फक्त दोन दिवस ते ही मोठ्या मुश्किलीने जागृत होतं असलं तरी हे सैनिक मात्र ह्या मातृभूमीच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असतात.
असाच एक हिरो म्हणजे मेजर मोहित शर्मा ज्याला माईक असं ही म्हंटल जायचं. मेजर मोहित शर्मा ह्याने भारतीय सेनेत प्रवेश एन.डी.ए. मधून मिळवला. मेजर मोहित शर्मा ला शेगाव च्या संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये प्रवेश मिळून पण त्याचं मन त्यात रमलं नाही. त्याला देशासाठी काहीतरी करून दाखवायचं होतं. हीच प्रबळ इच्छा त्याला पुण्याच्या एन.डी.ए. मध्ये घेऊन आली. एन.डी.ए. मधून १९९५ साली पासआउट होताना त्या आधी मेजर मोहित शर्माने आपल्यातील कलागुणांची चुणूक त्या काळात दाखवली होती. मेजर मोहित शर्मा एक विजयी घोडेस्वार होता. त्याने कर्नल बलवंत सिंग ह्यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा ह्या आपल्या आवडत्या घोडीवर घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं होतं. मेजर मोहित शर्मा उत्कृष्ठ बॉक्सिंगपटू तसेच अति उत्कृष्ठ जलतरणपटू होता. त्याच वेळेस गाण गायचा आणि वाद्य ही सफाईने वाजवायचा. त्या नंतर मेजर मोहित शर्मा ह्याने १९९८ साली इंडियन मिलिटरी एकेडमी इकडे प्रवेश घेतला. इकडेही त्याची चुणूक दिसून आली. त्याला Rank of Battalion Cadet Adjutant ने सन्मानित करण्यात आलं. ह्यामुळेच त्याला भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन ह्यांना राष्ट्रपती भवनात भेटण्याची संधी मिळाली.
१९९९ साली आपलं ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर मेजर मोहित शर्मा ह्याने ५ मद्रास ह्या रेजिमेंट इकडे भारतीय सेनेत प्रवेश केला. त्यानंतर ३३ राष्ट्रीय रायफल सोबत काश्मीर खोऱ्यात भारताच्या सीमांच संरक्षण अतिरेक्यांपासून करताना आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली. त्यासाठी त्याला Gallantry COASM ( Chief of Army Staff Commendation Medal) in year 2002. देण्यात आलं. पण त्याची इच्छा वेगळीच होती. त्याला पारा कमांडो बनायचं होतं. जून २००३ मध्ये त्याने ह्या तुकडीत प्रवेश घेतला. आपल्या प्रतिभेची चुणूक इकडेही दाखवताना त्याला एका वर्षात सेना पदकाने सन्मानित करण्यात आलं.
२१ मार्च २००९ रोजी ब्राव्हो टीम सोबत जम्मू काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यात हापुर्डा जंगलात काही अतिरेकी दबून बसल्याची माहिती मिळाली होती. अतिरेक्यांची संशयास्पद वागणूक दिसताच त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना त्याची माहिती दिली पण तोवर अतिरेक्यांनी तीन बाजूने जोरदार गोळीबार सुरु केला. ह्यात कमांडो तुकडीचे ४ कमांडो जखमी झाले. आपल्या जीवाची पर्वा न करता मेजर मोहित शर्माने त्या धुमश्चक्री मध्ये ही जमिनीवर लोळून आपल्या दोन सहकाऱ्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी पोहचवलं. अतिरेक्यांकडून तुफान गोळीबार होत असताना सुद्धा त्याची पर्वा न करता त्याने ग्रेनेड ने त्यांच्यावर हल्ला केला. ह्या हल्ल्यात दोन अतिरेकी मारले गेले. पण मेजर मोहित शर्मा ला छातीत गोळी लागली. त्या परिस्थितीतही मागे न हटता त्याने आपल्या टीमच एका लिडर प्रमाणे पुढे राहून त्यांच्या जीवाला धोका होणार नाही ह्याची काळजी घेतली. आपल्या कमांडोचा जीव समोरून होणाऱ्या गोळीबाराने धोक्यात जातो आहे हे बघून मेजर मोहित शर्मा ने मागचा पुढचा विचार न करता त्या अतिरेक्यांवर झडप घातली. समोरून गोळ्या लागताना पण त्याने अजून दोन अतिरेक्यांचा खात्मा करून आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवला. पण ह्या सगळ्यात मेजर मोहित शर्माला वीरमरण आलं.
मेजर मोहित शर्मा ला त्याच्या ह्या सर्वोच्च बलिदानासाठी मरणोत्तर शांती काळात देण्यात येणाऱ्या सर्वोच्च सैन्य पुरस्कार “अशोक चक्र” ने सन्मानित करण्यात आलं. मेजर मोहित शर्मा ची पत्नी मेजर रीशिमा शर्मा ही पण एक भारतीय सैन्याची अधिकारी असून तिने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला होता.
आपला जीव धोक्यात घालताना आपल्या देशासोबत आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याची व त्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची मानसिकता आणि तशी परंपरा फक्त आणि फक्त भारतीय सेनेत आहे. ह्या परंपरेला जागताना मेजर मोहित शर्मा ने सर्वोच्च बलिदान दिलं. त्याचं हे कर्ज आपल्या सगळ्या भारतियांच्या डोक्यावर शेवटपर्यंत राहील आणि असेल. ते उतरवण्याची आपली पात्रता नसेल तर निदान त्याचा अपमान करण्याचा करंटेपणा आपल्या वागण्यातून आपण भारतीयांनी करू नये. कारण ज्यांना देश आणि देशाचे हिरो कधी समजले नाहीत. ज्यांना मी पलीकडे काही दिसत नाही अश्या लोकांकडून बलिदान, राष्ट्र, धर्म, कर्तव्य हे शब्द ऐकताना त्यातला पोकळपणा उघडा दिसून येतो. हिरो बनायला मोठं नाही व्हावं लागत पण आपलं कर्तुत्व आणि आपलं व्यक्तिमत्व त्या हिरो शब्दाला मोठेपण देतं. मेजर मोहित शर्मा हा त्यातला एक होता ज्याने हिरो शब्दाला मोठं केलं. अश्या हिरोला माझा सलाम. जाता जाता दोन ओळी ह्या हिरोसाठी….
उरूजे कामयाबी पर कभी हिन्दोस्ताँ होगा
रिहा सैयाद के हाथों से अपना आशियाँ होगा
चखाएँगे मज़ा बर्बादिए गुलशन का गुलचीं को
बहार आ जाएगी उस दम जब अपना बाग़बाँ होगा
ये आए दिन की छेड़ अच्छी नहीं ऐ ख़ंजरे क़ातिल
पता कब फ़ैसला उनके हमारे दरमियाँ होगा
जुदा मत हो मेरे पहलू से ऐ दर्दे वतन हरगिज़
न जाने बाद मुर्दन मैं कहाँ औ तू कहाँ होगा
वतन की आबरू का पास देखें कौन करता है
सुना है आज मक़तल में हमारा इम्तिहाँ होगा
कभी वह दिन भी आएगा जब अपना राज देखेंगे
जब अपनी ही ज़मीं होगी और अपना आसमाँ होगा…..
- जगदंबा प्रसाद मिश्र
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.