आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या कित्येक व्यक्ती आहेत.
पण दुर्दैवाने त्यांना आपली मानसिक अवस्था ठीक नाही हे कळतच नाही आणि येणारा प्रत्येक दिवस ते अशांत, अस्थिर मन:स्थितीशी झुंजत कसाबसा ढकलतात.
यामागे ठळकपणे दिसणारी आणि छुपी अशी अनेक कारणे असतात.
या लेखातून आम्ही तुम्हाला अशी काही मानसिक कारणे आणि त्यावरचे उपाय याबाबत माहिती देणार आहोत.
तुमचे मानसिक आरोग्य कसे आहे हे ओळखण्यासाठी यांचा निश्चितच उपयोग होईल.
मानसिक अशांतीची कारणे
मन: स्थिती बिघडण्याची अनेक कारणे आहेत. पण याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे
- कामाच्या ठिकाणचे वातावरण
- घरगुती समस्या
- सामाजिक प्रभाव
- मानसिक तणाव निर्माण करणाऱ्या इतर गोष्टी
मानसिक अनारोग्याचे परिणाम
मानसिक आरोग्य बिघडल्याने जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमाण १४% एवढे आहे.
तर मानसिकरित्त्या निरोगी व्यक्तींच्या तुलनेत मानसिक आजार असलेल्या व्यक्ती २.२% एवढ्या जास्त प्रमाणात मृत्युमुखी पडतात.
आपल्या संपूर्ण आयुष्यात एखाद्या प्रौढ व्यक्तीला मानसिक समस्या जाणवण्याचे प्रमाण ३०% असून यातील बहुतांश व्यक्ती आर्थिक दृष्ट्या कमकुवत स्तरातील असतात.
मानसिक अस्थिरतेमुळे मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात. जगभरात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची संख्या ८ लाख प्रतिवर्षी एवढी प्रचंड आहे.
यावरुन मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजते. जर आपले मानसिक संतुलन चांगले रहावे असे वाटत असेल तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
आपल्या सभोवतालचे वातावरण आरोग्यपूर्ण असेल तर मानसिक स्वास्थ्य अबाधित रहाते.
मानसिक स्थिरता राखण्यासाठी करा हे सात उपाय
१. दुपारची एक डुलकी काढणे फायदेशीर आहे.
एका प्रौढ व्यक्तीला सात तास शांत झोप मिळाली तर त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नोकरी, व्यवसाय सांभाळणे, कामानिमित्त वरच्यावर प्रवास, सतत टेन्शन यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. कामानिमित्त रोज लवकर उठणे आणि रात्री परत उशिरा झोपणे हा नित्यक्रम बनला आहे.
त्यामुळे अनेकांना झोपेच्या समस्या आहेत. यामुळे जर तुम्ही दुपारच्या वेळी अर्धा तास डुलकी काढली तर मेंदूला थोडी विश्रांती मिळते आणि पुन्हा फ्रेश वाटते.
पण ही फक्त एक डुलकीच असली पाहिजे. दुपारच्या वेळी तुम्ही जास्त वेळ झोपलात तर रात्री झोप लागणार नाही व दुसऱ्या दिवशीही अस्वस्थ वाटत राहील.
ही डुलकी घेण्याची जागा शांत, खूप प्रखर लाईट नसलेला असा एक निवांत कोपरा असावा.
अगदी खुर्चीवर आरामात बसून सुद्धा तुम्ही साधारण २० मिनिटे विश्रांती घेतली तरी खूपच शांत वाटते आणि पुन्हा काम करण्याची ऊर्जा मिळते.
आता काही कंपन्यांना या दुपारच्या छोट्याशा विश्रांतीचे महत्त्व समजले आहे त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना असा एखादा निवांत कोपरा ते आवर्जून उपलब्ध करून देतात.
२. आपल्या छंदांना वेळ द्या
छंद म्हणजे आपलं मन रमविणारी कोणतीही गोष्ट. यात गुंग होऊन तणाव, टेन्शन यापासून आपण दूर जातो.
मन प्रसन्न होते. आपल्या आवडत्या छंदात मन पूर्णपणे गुंतून जात असल्याने मानसिक स्थिरता राखण्यासाठी कोणतातरी छंद जोपासला पाहिजे.
आपल्या व्यस्त टाईम टेबल मधून जाणीवपूर्वक यासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे.
छंदातून एक प्रकारची मन: शांती, समाधान मिळते. मनाची कार्यशक्ती, निर्णयक्षमता वाढते.
नियमितपणे आपले छंद जोपासणारी माणसे अधिक आनंदी, उत्साही असतात.
लिखाण, वाचन, संगीत, वादन, गायन, नृत्य, व्यायाम, बागकाम, स्वयंपाक करणे असे अनेक छंद म्हणजे आपले स्ट्रेस बस्टर असतात.
तुमचा छंद कोणता हे कमेंट्स मध्ये आम्हाला जरूर कळवा.
३. मानसिक आरोग्याची माहिती मिळवा.
मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक आरोग्य बिघडते तेव्हा कोणती लक्षणे दिसतात याबाबत तुम्ही माहिती करून घेणे आवश्यक आहे.
अन्यथा तुम्ही स्वतः, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती आणि तुमचे वातावरण आरोग्यदायी आहे की नाही हे तुम्हाला कळणार कसे?
असा अभ्यास केल्यास तुम्हाला कारणे आणि उपाय यांची शास्त्रीय माहिती मिळते. मानसिक अशांती, अस्वस्थता असल्यास वेळेवर मदत घेता येते.
आता मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे. अनेक संस्था ऑनलाईन काउन्सिलिंग द्वारे तुम्हाला घरबसल्या मदतीचा हात देतात पण त्यासाठी आधी तुम्हाला स्वतःची मानसिक अवस्था ओळखता आली पाहिजे. यासाठी मनाचेTalks वरील लेख वाचणे हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
४. घरातील वातावरण चांगले ठेवा.
ज्या ठिकाणी तुम्ही रहाता ती जागा तुम्हाला मनापासून आवडली तरच तुम्ही त्याठिकाणी आनंदी रहाल.
थकूनभागून घरी आल्यावर आपल्याला आराम करता येईल, मनावरचा ताण हलका होईल असे वातावरण घरी असणे अपेक्षित आहे.
म्हणून घर साफसूफ आणि नीट आवरलेले असावे. अस्ताव्यस्त पसरलेल्या घरात काही सुचेनासे होते आणि टेन्शन जास्त वाढते.
म्हणून घरातील पसारा असलेल्या जागा निदान आपल्या नजरेआड रहातील अशी रचना ठेवावी. आणि वेळ मिळेल तेव्हा नियमितपणे घराची सफाई करत रहावी. कचरा साठू देऊ नये.
५. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा.
एकाच ठिकाणी बंदिस्त होऊन राहिल्यास कंटाळा येतो. मनावर ताण येतो आणि मानसिक थकवा जाणवतो.
निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवणे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे.
मोकळ्या हवेत, झाडांची हिरवाई पाहून मन शांत होते. हिरवा रंग हा मनाला ताजेतवाने ठेवणारा आहे आणि निसर्गात तर हिरव्या रंगाच्या अनेक छटा आढळतात.
म्हणून मानसिक थकवा आला तर दूरवर फिरून यावं म्हणजे आपोआपच मूड फ्रेश होतो.
६.पौष्टिक आहार.
संतुलित आहार हा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
ताजे, सात्विक अन्न, भरपूर पालेभाज्या, कडधान्ये, ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे, सुकामेवा आणि योग्य प्रमाणात पाणी यांचे संतुलन आहारात ठेवावे.
यातून मिळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे यामुळे मानसिक स्थिरता येते आणि ताणतणाव असले तरी उग्र स्वरूप धारण करत नाहीत.
७. समाजात मिळून मिसळून रहाणे
मानवप्राणी हा समाजप्रिय आहे. आपल्या अडचणीत इतरांची मदत घेणे किंवा आनंदाच्या प्रसंगी सर्वांना सामील करून घेणे यामुळे परस्पर संवाद आणि सहकार्य या भावना वाढीस लागतात.
एकटेपणाची भावना कमी होते. इतरांसोबत वावरताना आपल्या व्यक्तिमत्त्वाची अधिक चांगल्या प्रकारे ओळख पटते.
समाजाभिमुख व्यक्ती अधिक आनंदी असतात.
यावरून तुमच्या लक्षात आले असेल की मानसिक आरोग्य चांगले असेल तर सकारात्मक भावना अनुभवता येतात.
म्हणून आपल्या आजूबाजूला चांगले वातावरण असेल याची काळजी घ्यावी.
इतरांशी संवाद साधावा. आपल्यातील चांगल्या गुणांना उत्तेजन देणाऱ्या लोकांच्या सहवासात रहावे. रोजच्या जगण्यात ताणतणाव हे असणारच पण त्यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी.
आपली मानसिक अवस्था कोणत्या गोष्टींमुळे नाहीशी होते व त्यावर कोणते उपाय करावेत याचा सतत अभ्यास करावा. व योग्य वेळी हे ओळखून मदत घ्यावी.
हा लेख आवडल्यास लाईक व शेअर करा. स्वतःच्या आणि इतरांच्या मानसिक आरोग्याची निगा राखा. समाधानी आणि शांततापूर्ण आयुष्याचा आनंद घ्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.