लेखन: डॉ. अंजली औटी
“आजी जिंदाबाद!”… “आजी जिंदाबाद!”….
जेवता जेवताच मुलांनी म्हणायला सुरवात केली. आनंदाचं कारंजं उमटत होतं त्यांच्या हावभावातून, डोळ्यांमधून.
माणसाच्या मनाचा, हृदयाचा रस्ता माणसाच्या पोटातून जातो.. हे अक्षरश: साकार होत होतं समोर.. ही गोष्ट वेगळी की काही कृतघ्न माणसं खाल्ल्या अन्नालादेखील जागत नाहीत जगतांना..
कारण त्यांच्या मनाकडे कुठलाच रस्ता जात नाही. म्हणून प्रेमाची साद कशीही घातली तरी त्यांच्यापर्यंत कधी पोहोचतच नाही.
पण लहान मुलं खरोखरच निसर्गातली निरागस फुलं असतात. माझ्यासामोरची ही मुलं तर रानफुलं आहेत…. शहरातल्या वाऱ्याची अजून ओळख नाही त्यांना. म्हणून त्यांचा हा आनंद देखील अगदी नैसर्गिक, सहज व्यक्त होत होता.
आजीने बनवलेल्या स्वयंपाकावर जाम खुश झाली होती सगळी वानरसेना. खिरीच्या वाट्यांवर वाट्या फस्त होत होत्या.
मुलांच्या डोळ्यांच्या दिशेने बघितलं तर मला दिसलं एक मूर्तिमंत काव्य. जगण्यातली सुरेल कविता! स्वतःच्या जगण्यावर आणि जगावर खुश असलेली.
जो आनंद मुलांच्या चेहऱ्यावर तोच आनंद आजीच्या चेहऱ्यावर. आजीने मन जिंकून घेतलं होतं, तिच्या हातचं खाणाऱ्या प्रत्येकाचं.
ज्या वयात आपल्या मुला-नातवंडांमध्ये सुखाने राहायचं, त्या वयात ७६ वर्षाचं वय असलेल्या पेंडसेआजी आपल्या घरादारापासून दूर दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावरून, गावांमधून शिक्षणासाठी एकत्र आलेल्या मुलांमध्ये रमल्या होत्या.
या मुलांमध्ये, त्यांच्याबरोबर राहून काम करण्याची ईच्छा त्यांनी दाखवली, त्यावेळी साहजिकच त्यांच्या वयाकडे बघून सगळे विचारात पडले. पण या वयातसुद्धा आजी स्वतःला सांभाळून काम करण्याइतक्या मनाने सक्षम आणि शरीराने काटक होत्या.
“माझी काही काळजी करू नका, मरण्यासाठी मी नक्की घरी येईन… पण तोपर्यंत मला जे करायचं आहे ते करू द्या..”
असे आपल्या मुलांना सांगणारी एक कर्तबगार आई, आपल्या जिवलगांना हे पटवून देण्यात यशस्वी झाली की, “तुम्हाला कोणालाही माझी गरज असेल ना.. त्यावेळी मी चोवीस तासात तुमच्याजवळ येऊन पोहोचेन”
जिथे त्या आल्या तिथेदेखील त्यांनी सांगितले की मला काम करू द्या…. आणि मग जर तुम्हाला वाटले माझी मदत होण्याऐवजी तुम्हाला त्रास होत आहे, तर मग मीच इथे न राहता परत निघून जाईन..
पण इथल्या लोकांची काळजी वेगळीच होती, इतका पाऊस, थंडी.. या वयात…. आजीला.. त्रास नको व्हायला काही..
पण शेवटी हो, नाही करत आजी राहिल्या. आज आजींना मुलांसोबत काम करायला लागून आठ-नऊ महिने झाले.. इथल्या वातावरणात त्या नुसत्याच राहिल्या नाहीत तर लहान-मोठ्या सगळ्यांच्या जीवाच्या नातेवाईक झाल्या.
नातं काय फक्त रक्ताचं असतं? नाहीच मुळी…नातं हृदयाचं हृदयाशी असतं…. ते जुळलं की मनाच्या भिंती सहज मोडून पडतात.
रक्त, धर्म, जात, पात अशी माणसांना माणसांपासून दूर करणारी आजच्या काळातली हत्यारं हृदयाच्या या नात्यापुढे अगदी केविलवाणी ठरतात.
आजीने पडेल ते काम करायला सुरवात केली. कोणी हे कर, ते कर.. असे म्हणणारे नव्हतेच. मुलांचा अभ्यास घेणे हे महत्वाचे काम होतेच.
ते करत असतांना कधीतरी प्रेमाने मुलांसाठी काही वेगळे खायला बनवत असतांना हळूहळू किचनचा संपूर्ण ताबा आजीकडे कधी आला त्याचं त्यानाही समजलं नाही.
गायीचे दूध भरपूर असे, मग निगुतीने त्याचं दही लावणं, ताक करणं, लोणी काढून तूप बनवणं या कामात त्यांनी लक्ष घातलं.
आधी मुलांना पिण्यासाठी फक्त भरपूर दूध असे.. पण आता कधी दही, कधी ताक, कढी, कधी लोणी, श्रीखंड, खवा, गुलाबजाम, खीर तर कधी चांगल्या तुपातील शिरा, लाडू.. मुलांची तर खाण्याची चंगळच झाली..
रोजच्या साध्या वरणालासुद्धा आजीच्या हातची एक फोडणी बसली की मुलं खुश…. नावडत्या भाज्या पण पोटात गुडूप!
त्या आधी मुलांच्या जेवण्याच्या खूप तक्रारी होत्या.. मुलंच ती.. हे आवडत नाही.. आणि ते आवडत नाही.. करत पोटभर जेवायचीच नाहीत आणि आपल्या आईवडीलांपासून दूर राहून शिकणाऱ्या मुलांना रोज कोण प्रत्येकाकडे लक्ष देऊन जेऊ घालणार..?
अन्न वाया जाऊ द्यायचं नाही हा नियम असल्यामुळे मुलं त्यातल्यात्यात आवडेल तेच जास्त खाऊन घ्यायची.
मुलांच्या तब्येतीच्या, पोटाच्या तक्रारी जास्त असत. सकस, चौरस आहार मुलांना मिळायला हवा म्हणून आजीचे स्वयंपाकघरात प्रयोग सुरु झाले.
आता किचनच्या बाहेर येणाऱ्या वासावरून आज काय बनवलंय याचे अंदाज मुलांमध्ये बांधले जाऊ लागले.
मुलंच काय.. येणारे जाणारे पाहुणेदेखील आजीच्या हातच्या जेवणाच्या प्रेमात पडले.
बाहेरून कोणीही येवो.. मग भलेही तो काही कामानिमित्त आलेला एखादा बाहेरचा टेम्पोड्रायव्हर असेल.. आजी त्याला कमीतकमी चहा तर देणारच.. दोन गोड शब्द त्याच्याशी बोलणार.
रोजच्या कामात या अनपेक्षित अनुभवचा आणि आजीच्या मायेचा असा स्पर्श त्याच्या आयुष्यातल्या त्या क्षणाला झाला की तो निघतांना… “आई, येतो..हं..” म्हणणारच..
प्रेम कळते प्रेमळाला.. प्रेम त्याची कसोटी.. आजीचं वागणं हा प्रेमाचा परीस आहे मूर्तिमंत.. ज्याला ज्याला स्पर्श होईल.. त्याचा क्षण सोन्याचा!
एक मुलगा आणि दोन मुली आपापल्या संसारात स्थिरावल्यावर आजी आणि त्यांचा नवरा कोकणात, आपल्या खेड्यात राहायला गेले. तोपर्यंत त्याचं आयुष्य इतर संसारी स्त्रियांसारखं सरळमार्गी.
तिथे काही वर्ष गावातल्या लोकांशी जोडून घेऊन दोघं एकमेकांसोबत सुखात रहिले… आयुष्याचा जोडीदार निघून गेल्यावर आजीने सगळ्यात आधी काय केलं तर आपलं रहातं घर एका गरजू, घटस्फोटीत मुलांच्या एकट्या आईला त्यातल्या सामानासहित देऊन टाकलं.
संसार, वस्तू जमवणं एक वेळ सोपं आहे पण ‘संसार आवरणं’ एकदम कठीण. कारण घरातल्या वस्तूदेखील नुसत्या वस्तू नसतात.. तर त्यांच्या भोवती अनेक आठवणी जमा झालेल्या असतात.. आणि माणूस गुंतून पडतो.
त्यातून सहज सुटणे हेच तर मनाचे खरे वैराग्य..
त्यासाठी भगवे कपडे अंगावर घालायची पण गरज नसते! आजी सहज घराबाहेर पडल्या आणि भावाला गरज आहे म्हणून त्याच्याकडे गेल्या..
त्याने कोकणात एक छोटा डोंगर विकत घेतला होता.. दोघांनी मिळून त्या डोंगरावर आंब्याची पाच हजार झाडे लावली..
काही दिवस त्याच्या सोबत राहून, त्या शोधतच होत्या की आणखी काय करता येईल? ज्याच्या पावलांवर चक्र आहे तो माणूस म्हणे खूप प्रवास करतो..
आजीच्या मनात चक्र होते.. जे तिला स्वस्थ एका जागेवर न बसू देता काहीनकाही करण्यासाठी प्रेरणा देत होते!
शोधणाऱ्याला देव पण सापडतो.. आजींना पण सापडला.. या मुलांच्या रुपात..!
आणि या देवाच्या मुखी जाणारा रोजचा घास मग प्रसाद बनला! आश्रमशाळेला मंदिराचे पावित्र्य आले!
तिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर या माऊलीच्या प्रेमाची स्निग्ध साय जमा झाली. तिने सगळ्यांना एक, केले.. एका सूत्रात बांधले.
कोण म्हणतं की म्हातारपण हा आयुष्याचा शेवट असतो?
नाही…. ती तर एक सुरुवात असते…. आपल्याला जे काही आजपर्यंत मिळालंय ते निसर्गाला परत करण्याची.
मग आयुष्यात जे काही मिळालेलं असू दे.. काही फुलं असतील आपल्या ओंजळीत तर काही काटेही असतील पायात टोचलेले…. जगण्यातलं शहाणपण तर फुलांनी जितकं दिलं त्याहीपेक्षा जास्त काट्यांनी दिलेलं असतं..
मग हे शहाणपण ज्यांच्या आयुष्याची अजून सुरुवात आहे त्या मुलांना देता आलं तर किती छान आहे. आजींची स्वतःची नातवंडं आहेतच..
बाहेर उजेड पडण्यासाठी घरातल्या दिव्याखाली अंधार नाहीये हे मुद्दाम सांगतेय.. सगळ्यांना हवीहवीशी आहे आजी.. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत आणि मग ज्यांना गरज आहे त्याचं बालपण सुखाचं व्हावं म्हणून वाटणारी कळकळ मनात आहे.
इतकं समृद्ध म्हातारपण की आयुष्यानेही हेवा करावा जगण्याचा!
मला ‘असामान्य’ वाटतात आजी, मला ‘संत’ वाटतात आजी.. कारण ‘संत’ ही कुठलीही पदवी नाही तर वृत्ती आहे! कारण मी प्रत्यक्ष अनुभवते आहे त्यांना या गोकुळात रमलेलं..
आज आपल्या आजूबाजूला इतकं अराजक बघतो आहोत आपण.. माणसाशी माणसाला हृदयशून्य वागणूक देतांना बघतो आहोत..
आपापल्या जाती, धर्म आणि पंथांसाठी कुपमंडूक वृत्तीने दुसऱ्याला सहज संपवताना अनुभवतो आहोत..
कुटुंबांमधून म्हाताऱ्या माणसांची हेळसांड बघतो आहोत…. त्याच म्हाताऱ्या माणसांना आपल्या मुलांसमोर लाचार, एकाकी आपल्या शेवटाची वाट बघतांना बघतो आहोत..
त्या सगळ्यात स्वतः सन्मानाने जगून दुसऱ्यांचे आयुष्य निर्लेप मनाने सोपे करणाऱ्या या म्हाताऱ्या व्यक्तीला माझा, तुमचा आपल्या सगळ्यांचा सलाम नको?
मार्ग शोधणाऱ्याला नक्की मिळतो.. आपल्यातच आहेत हीदेखील उदाहरणे, जी बघून जगण्याची उमेद पक्की होते, आयुष्य सुंदर आहे यावर विश्वास बसतो.. तुम्हाला नाही वाटत असं?
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुपच सुंदर आयुष्य आहे.
प्रेरणादायी ,अनुकरणीय ।मानाचा मुजरा।
Khup ch anukaraniya…
नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.
मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom
मनाचेTalks फेसबुक पेज:
https://www.facebook.com/ManacheTalks/
मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:
https://www.facebook.com/ManacheTalksHindi/
Where is this all, which city/location?
Currently, she lives near Mehendale garage in Erandwane, Pune
chan jivanman unchavne mhanje avajvi karch nasun ya gosti amlat anane ahe.
AAJEE HAYAAT AAHET KAA?
ASLYAAS SHI.SAA.NA.
NASTIL TAR A.P.S.
SALUTES
WITH 21 GUN FIRE