पन्नाशीच्या पाऊलखुणा

पन्नास वर्षे म्हणजे आयुष्यातला संक्रमण काळ. या वयापर्यंत अनेक अनुभव गाठीशी जमा झालेले असतात.

एक प्रकारचं स्थैर्य आलेलं असतं. संसाराचे व्यापताप संपले नसले तरी सवयीचे झालेले असतात.

पण मग पन्नाशीच्या जवळपास होणारे शारीरिक आणि मानसिक बदल आणि आपला त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन यावर आपलं पुढचं आयुष्य कसं जाणार हे अवलंबून असतं.

आजचा लेख हा खास स्त्री वर्गासाठी आहे. कारण स्त्रीच्या आयुष्यातील हा अतिशय महत्वाचा असा काळ आहे. रजोनिवृत्ती म्हणजे पाळी कायमची थांबणे.

मेनोपॉज चा कालावधी

वयाची ४५ ते ५० वर्षे हा मेनोपॉजचा कालावधी असला तरीही मासिक पाळी पूर्णपणे बंद होण्याच्या चार ते पाच वर्षे आधीपासून शरीरात बदल व्हायला सुरुवात होते. आणि हळूहळू पुढील चार, पाच वर्षात पाळी बंद होते. म्हणजे चाळीशीतच शरीर आपल्याला अनेक संकेत देते.

ते ओळखून पुढे येणाऱ्या शारीरिक अवस्थेशी जुळवून घ्यायची तयारी आपण सुरू करायची.

चाळीशी उलटली की हळूहळू मासिक पाळी अनियमित होऊ लागते. शरीरातील संप्रेरके अर्थात हार्मोन्स बदलतात. त्यामुळे अनेक प्रकारचे बदल होतात. शरीराची त्वचा सैल पडणे, कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याने सांधे दुखणे, थकवा येणे, केस विरळ होणे, केस पांढरे होणे, चेहऱ्यावर वांग दिसणे.

हे सर्व बदल नैसर्गिक असले तरीही मानवी मन तारुण्यात जास्त रमते. त्यामुळे एखाद्या दिवशी अचानक आरशात बघताना पांढरा केस दिसला की नाही म्हटलं तरी वाईट वाटतंच. डोळ्यांवर चढलेला चष्मा, चालण्याचा वेग थोडा कमी झालेला, वाढलेलं वजन, त्यामुळे लागणारी धाप, पूर्वीसारखी पटापट कामं न उरकणे यांचा परिणाम शरीरावर जेवढा होतो त्यापेक्षा जास्त मनावर होतो.

आता आपण म्हातारे झालो हे एकदा का मनात घर करुन बसलं की मग आत्मविश्वास कमी होतो. मेनोपॉजमुळे मूड स्विंग म्हणजे भावनात्मक उलथापालथ होते.

मोनोपॉजची लक्षणे आणि त्रास कमी करण्याच्या महत्त्वाच्या टिप्स

त्यामुळे चिडचिड, भांडणे, आदळ आपट, तर कधी अबोला, रडू येणे, टोमणे, कधी कोणाशीच न बोलणे असे प्रकार होत असतात.

किचनमधली भांडी जोरदार आवाज करू लागली की घरच्या शांततेला तडा जातो. आणि अशी रडकी, दुर्मुखलेली सून, बायको किंवा आई कोणालाच हवीशी वाटत नाही.

यातून अनेक समस्या निर्माण होतात. ती स्त्री एकटेपणाची शिकार होऊन नैराश्याच्या खाईत जाऊ शकते. कधीकधी तर यामागील वैज्ञानिक कारणे माहीत नसल्याने नातेसंबंध ताणले जातात.

काही वेळा घटस्फोट किंवा इतर काही समस्या येऊ शकतात.

म्हणून ही संपूर्ण प्रक्रिया योग्य रितीने जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजकाल मेनोपॉज क्लिनिक आहेत.

तिथे शारीरिक आणि मानसिक बदलांची शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती दिली जाते. याशिवाय सपोर्ट ग्रुप असतात.

एकमेकींचे अनुभव शेअर केले जातात. या काळात कोणता आहार घ्यावा, व्यायाम कोणता करावा हे सर्व मार्गदर्शन केले जाते. शारिरिक संबंध नकोसे वाटू शकतात.

त्याबाबत समुपदेशन केले जाते. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा असला की कोणतीही समस्या सोडवणे सोपे जाते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले शरीर हे नित्यनेमाने बदलत रहाणार आहे याची जाणीव ठेवणे. जन्म, बालपण, तारुण्य, प्रौढावस्था, वार्धक्य आणि मृत्यू या अटळ अवस्था आहेत.

हे सत्य मनापासून स्विकारले की मग कोणताही त्रासदायक विचार आपण विवेकबुद्धी वापरून पडताळून पाहू शकतो.

बाह्य सौंदर्य, तारुण्य, शरीर सौष्ठव यापलीकडे जाऊन आयुष्यातील सुंदर, अर्थपूर्ण, खराखुरा आनंद देण्याऱ्या गोष्टी आपण शोधू शकतो.

नोकरी धंदा, संसार यात व्यस्त होऊन मागे दूर कुठल्यातरी वळणावर सोडून दिलेले छंद पुन्हा नव्याने जागवावेत. संगीत, बागकाम, वाचन, लेखन, प्रवास, रंगकाम, विणकाम अश्या आपल्या कित्येक आवडी आपण दूर सारलेल्या दिसतील.

या छंदांमुळे मन रमतंच पण आपल्या आवडीची गोष्ट करताना एक समाधान, आनंद मिळतो. मग नकारात्मक गोष्टींचा त्रास कमी प्रमाणात जाणवतो.

याचबरोबर पन्नाशीच्या नंतरचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगायचं असेल तर योग्य आहार, नियमित व्यायाम यांची काळजी घेतली पाहिजे.

वारंवार बाहेरून जेवण मागवणे, किटी पार्टी, गेट टुगेदर अश्या निमित्ताने तेलकट, तुपकट पदार्थ खाणे आणि दिवसभर टिव्ही किंवा मोबाईलला चिकटून बसणे म्हणजे रोगांना आमंत्रण!!!

या वयात शारीरिक हालचाल पुरेशी होणे खूप गरजेचे आहे. मात्र याचवेळी व्यायामाचा अतिरेक सुद्धा टाळला पाहिजे. त्यामुळे नियमित चालणे, योगासने या प्रकारचा शारीरिक व्यायाम उपयुक्त ठरतो. विशेषत: योगसाधनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची सांगड घातली जाते.

आत्मविश्वास वाढतो. मनाला योग्य त्या सूचना देऊन केलेले ध्यान किंवा योगनिद्रा यामुळे मन: शांती, समाधान अनुभवता येते.

या वयात कोणत्याही सामाजिक संस्थेच्या कामात आपण मदत करू शकतो. ही मदत फक्त आर्थिक स्वरूपात असावी असंही काही नाही.

कित्येक संस्था अशा आहेत की त्यांना चांगली, सेवाभावी माणसे काम करण्यासाठी पाहिजेत. अशा ठिकाणी आपण दिवसातून काही वेळ आपल्या आवडीचे काम करू शकतो.

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आणि आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो. म्हणून फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात आपली सेवा जरूर द्यावी.

याचा दुसरा फायदा असा की आपण समाजातील वंचित, उपेक्षित यांचं दु:ख जेव्हा अनुभवतो तेव्हा लक्षात येतं की आपली परिस्थिती खूप चांगली आहे.

मग लहान सहान गोष्टींचा बाऊ करून रडत बसण्याची वृत्ती कमी होते. एकलकोंडेपणा सोडून आपण जेवढे समाजाभिमुख होऊ तेवढी आपली वास्तवाची जाण वाढते.

आपल्या संस्कृतीत आशीर्वाद देताना ‘शतायुषी भव’ असं म्हणतात. मग त्यादृष्टीने पन्नाशी म्हणजे अर्धशतक समजावे.

पन्नाशीतच आयुष्य कसेबसे रडत जगणारी रडूबाई की वार्धक्याच्या दिशेने होणारा प्रवास जाणून घेऊन परिपक्व व्यक्तीमत्व म्हणून जगणारी स्त्री!!! आपल्याला कोण व्हायला आवडेल ते आपणच ठरवायचं.

आणि आयुष्य भरभरून जगायचं. पन्नाशीच्या पाऊलखुणा उमटणारच आहेत पण त्या अश्या असाव्यात की आपल्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही पिढ्यांना आपलं हे रूप हवंहवंसं वाटलं पाहिजे. या पाऊलखुणा जीवनात आनंद फुलवू दे हीच शुभेच्छा!!!

महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।