असं म्हणतात की माणसाचा मेंदू आमच्यापेक्षा प्रगल्भ असतो, त्याने त्या जोरावर अख्या जगाला गवसणी घातली आहे. माफ करा साऱ्या ब्रह्मांडाला गवसणी घातली आहे, माफी यासाठी मागितली की तुमच्या प्रगल्भ मेंदूचा अपमान नको व्ह्यायला ना. तुमच्याकडे पाहिल्यावर कधी कधी तुमचा हेवा वाटतो पण आज धन्यता मानतो की आम्ही तुमच्यासारखे नाही. मुळात तुम्ही एक गृहितच धरलं आहे की या निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा हक्क फक्त आणि फक्त संवेदनाशून्य माणसालाच आहे.
काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट मी एका शहरावरून जात असतांना मला एका ठिकाणी काही माणसं कुत्र्यांना आगीच्या जबड्यात टाकताना दिसली आणि त्याच शहरात खूप कुत्री तडफडत असतानाचे विदारक दृश्य पाहिले. त्यावरून हा माणूस नावाचा प्राणी किती क्रूर आहे याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. माणुसकी नावाची संकल्पना तुमच्याच प्रगल्भ डोक्यातून निघाली आहे, नाही का!!
काही वर्षांपूर्वी मी आणि माझा परिवार खूप आनंदाने एका चिंचेच्या झाडावर सुंदर घर बांधून राहत होतो. बाजूलाच उंच उंच इमारती होत्या. माझ्या घरातून सूर्य मला कधीच दिसला नाही. आमच्या घराखाली काही मुलं हातात दगड घेऊन चिंचेच्या दिशेने भिरकवताना पहिली की अंगात धडकी भरायची पण ते दिवस कसेतरी काढले कारण इथले घर सोडण्याचा विचार आम्ही करू शकत नव्हतो. ते सोडलं तर या उंच इमारतींच्या जंगलात दुसरी चांगली जागा कुठे शोधणार ना. हे मला सारखे म्हणायचे, “अग आता लवकरचआपली छोटी छोटी पिल्ले जन्मला येतील, खूप जबाबदाऱ्या वाढतील, परवाच पोपटराव म्हणाले होते की नागाचा कहर वाढला आहे”. मी त्यांना बजावून सांगितलं होतं की पिल्लं अंड्यांतून बाहेर येईपर्यंत तुम्ही लवकर घरी येत जा. खुप काळजी वाटते तुमची आणि माझ्या बाळांनी डोळे उघडल्या उघडल्या त्याच्या बाबांना पाहावं अशी माझी इच्छा आहे. त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले “वेडे काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत कशाला काळजी करतेस? मी येत जाईन घरी रात्र व्हायच्या आत. तू फक्त आपल्या या जगात येऊ पाहणाऱ्या बाळांची काळजी घे.” आणि मी माझ्या बाळांना उत्तुंग आकाशात भरारी घ्यायला शिकवणार आहे आणि त्यांना खूप नवनवीन गोष्टी शिकवायच्या आहेत.”
चिमुकली पिल्लं घरी येणार या आनंदात सारं वातावरण कसं प्रफुल्लित झालं होतं. कोकिळा मला सारख म्हणायची की बाळ अंड्यातून बाहेर आली की त्यांना गाणी ऐकीवणार म्हणून. सगळं कसं सुरळीत चाललं होतं. अगदी माहोल बनला होता घरी. पण त्या आनंदाला ग्रहण लावले ते त्या काळ्या रात्रीने. सर्व माणसं आनंदात दिसत होती आणि सगळीकडे लखलखीत रोषणाई झाली होती. आजही तो दिवस आठवला तरी अश्रूंना आवरता येत नाही. हे नेहमी प्रमाणे बाहेर गेले होते आणि संध्याकाळ झाली तरी परत आले नव्हते, कानठळ्या बसवणारे आवाज ऐकू येत होते त्यांचा खूप त्रास होत होता. आमचं हृदय तुमच्यापेक्षा खूप छोटं असतं याची कल्पना तुम्ही आमचा अभ्यास केल्यानंतर आलीच असेल.
मी थोड्यावेळाकरिता घर सोडून कोकिळाताईकडे तिच्या बाळाला पहायला गेले होते आणि ती माझ्या बाळासाठी मऊ मऊ गवत पण देणार होती. जाताना माझ्या बाजूने काहीतरी उंच आकाशात उडालं आणि मोठा आवाज आणि प्रकाश मला दिसला आणि माझं हृदय जोराने धडधडू लागलं. मी आता जोराने पंख हलवत कोकिळताईच्या घरी पोहचले ,आणि जास्त गप्पा न मारता गवत घेऊन बाळांच्या काळजीने ताडकन घराकडे परतले. आता माझ्या पंखांचा वेग हा पूर्वीपेक्षा जास्त होता. कारण खूप मोठ्या मोठ्याने आवाज येत होते.
आधी मला वाटलं की परतीच्या पावसाच्या विजा चमकत आहेत पण नंतर लक्षात आलं की ती माणसांची पिल्लं खालून काहीतरी आकाशात सोडत आहेत. बाळांच्या काळजीने माझं काळीज आणिक फाटत होते. शेवटी घराजवळ पोहचत होते आणि तेवढ्यात मला दिसले की काहीतरी आपल्या घराकडे वेगाने जात आहे आणि डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच माझ्या घराने पेट घेतला माझ्या डोळ्यासमोर माझं घर जळताना दिसत होतं. पुढचं काही कळण्याच्या आत मी तिथेच एका इमारतीला आदळून कोसळले.मी रात्रभर बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. अंगात काही ताकद उरलीच नव्हती परंतु बाळांच्या काळजीने पंखांमध्ये सारं बळ एकटावलं आणि झेप घेतली घराच्या दिशेनं. धूर निघत होता तिथून हे जग पाहण्यापूर्वीच माझी पिल्लं हे जग सोडून गेली. मी माझ्या बाळांना गमावलं. पहाटे सगळीकडे धूर पसरला होता श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. यांची वाट पाहत होते पण यांचा पण काही पत्ता लागला नाही. अजूनही मी त्यांची वाट पाहत आहे. वेदना, संवेदना, दुःख, प्रेम या सर्व गोष्टी आम्हाला पण होतात. मान्य! आमच्याकडे नाही तुमच्या इतका तल्लख मेंदू पण आम्हाला हृदय आहे तुमच्याएवढ मोठं नाही पण आहे. तुमचा आनंद साजरा करताना फक्त एवढंच करा की आमचा त्यात जीव जाणार नाही याची काळजी घ्या.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
भाई खूप छान लिहले आहेस.
दर्जा रे भाव