परवा रात्री मी घरातल्या चिल्ल्यापिल्यांना ज्युस प्यायला घेऊन गेलो होतो, सर्वांच्या एकामागुन एक फर्माईशी सुरु झाल्या, आणि बिल झाले, सहाशे नव्वद रुपये. अर्थातच त्यांना बिलाशी काही घेणंदेणं नव्हतं, पण नऊ वर्षाचा सर्वात मोठा पुतण्या म्हणाला, चाचु, इतके मोठे बिल. किती खर्च केला ना आज सगळ्यांनी, आपल्याकडे काय पैशाचं झाड आहे का? पैसे काय झाडाला लागतात का?
“पैसे काय झाडाला लागतात का?”
लहानपणापासुन कितीदातरी हे वाक्य कानावर पडलयं, खरचं असं पैशाचं झाड असतं तर किती बरं झालं असतं. रोज गरज पडली की तोडा पैशांची नोट असलेलं एक पान, जास्त गरज पडली की तोड अख्खी फांदी….किती मज्जा!…कसलं टेंशन नाही, ताण नाही, राग नाही की चिडचिड नाही….हवा तेव्हा हवा तितका पैसा!.. मज्जाच मज्जा!….
असतं का असं पैशाचं झाड?? हो असतं!, प्रत्येक श्रीमंत माणसाच्या तिजोरीत असतं हे झाडं, त्याचं ‘बी’ आधी डोक्यात पेरावं लागतं. कमाईचे दोन मार्ग असतात, सक्रीय कमाई आणि निष्क्रीय कमाई. सक्रीय कमाई म्हणजे काम चालु – उत्पन्न चालु… म्हणजे मजुरी, नौकरी, दुकान, व्यवसाय आणि यासारखी सर्व उत्पनाची साधनं. जेव्हा आपण इथे मेहनत आणि वेळ देणं बंद करतो, उत्पन्न थांबते. म्हणजे काम बंद – उत्पन्न बंद…
आणि निष्क्रीय कमाई म्हणजे काम बंद तरीपण उत्पन्न सुरुचं… बॅंकेत ठेवलेलं फिक्स डिपॉझीट, म्युचल फंड किंवा शेअर्स, किरायाने दिलेली जागा किंवा गाडी किंवा इतर कसलीही वस्तु हे निष्क्रीय कमाईचे काही स्त्रोत असतात. त्या दिशेने विचार केला की आपोआप डोकं चालतं आणि आयडिया मिळतात. हेच ते मी सुरुवातीला म्हण्टलेलं पैशाचं झाड. कुणीही हे झाड आपल्या घराच्या अंगणात लावु शकतो, अट – यासाठी काही सवयी लावुन घ्यायला हव्यात.
- उत्पन्नापेक्षा आपला खर्च कमीच असला पाहीजे अशी जीवनशैली हवी.
- किरायाची जागा आणि कर्ज ह्या गोष्टींमुळे तुमच्या मेहनतीवर दुसरे श्रीमंत होतात.
- कमीत कमी वीस टक्के आणि जास्तीत जास्त जमेल तितकी रक्कम प्रत्येक महीन्याच्या सुरुवातीला बचत खात्यात भरलीच पाहीजे.
- असं काही महीने, काही वर्षे केल्यास आपोआपच एक मोठा निधी तयार होतो, त्याला योग्य ठिकाणी गुंतवुन निष्क्रीय कमाईचा दर्जेदार सोर्स उभा करा. अंदाजे दहा वर्षात एक झाल्यावर दुसरा, असे अनेक मार्ग उभे करता येतात.
- मग फक्त आपल्याला मजा येईल अशीच कामे करायची.
- प्रत्येक क्षणी आयुष्याचा मनमुराद उपभोग घ्यायचा.
छोट्या छोट्या आर्थिक अडचणी माणसाच्या रोजच्या जीवनातला निखळ आनंद हिरावुन घेतात. कधी त्याला जिकीरीस आणतात तर कधी जिकीरीस आणतात, वाढती स्पर्धा आणि वाढती महागाई यांनीही ताण वाढतो.
या सर्वांवर एकच उत्तर आहे, ते हे पैशाचं झाड.
तुमच्याही मनाच्या अंगणात हे झाड लावण्यासाठी शुभेच्छा……..
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.