“अग… चल उठ ग. ?? किती वेळ लोळत पडशील.?? शाळेत जायचे नाही का ..??” अमृताच्या पाठीवर धपाटा मारत निमी म्हणाली “चल आता मला झोपू दे थोडा वेळ”.
“आई ….! मी नाही जाणार शाळेत ..?? आज मदर्स डे आहे. सर्वांना आपल्या आईबद्दल बोलावे लागेल काहीतरी. मला नाही जमणार बोलायला.. ??” अमृता चिडून म्हणाली.
“का …??काय झाले .?? तुझी आई वाईट आहे का.. ??” क्षणात हळवी होऊन निमीने तिला जवळ घेतले.
“नाही ग… तू खूप चांगली आहेस. पण शाळेत सर्वांसमोर काय सांगू .?? मला लाज वाटते” खाली मान घालून अमृता म्हणाली.
“तुला आपल्या आईबद्दल बोलायला लाज वाटते..?? याचाच अर्थ मी तुला वाढविण्यात मोठे करण्यात कमी पडलेत बेटा…माझी छाया तुझ्यावर पडू नये म्हणून खूप काही करतेय मी….. ज्याचा त्रास किती होतो ते मलाच ठाऊक. मी अशिक्षित आणि त्यामुळे कोणावरतरी भाबडा विश्वास टाकून मुंबईत आले…. आली आणि इथेच पडले. तुला जन्म देण्यासाठी खूप झगडा केला मी या समाजाशी, इथल्या लोकांशी. आणि त्यात तू मुलगी म्हणून जन्माला आलीस ते अजून त्रासाचे झाले मला. इथले लांडगे खुश झाले कारण त्यांना माझी वारसदार मिळाली होती. मी म्हातारी होईन तेव्हा तू तयार होशील हा त्यांचा अंदाज. तरीही मी डगमगले नाही. माझ्या कामाची छाया तुझ्यावर पडू दिली नाही. तुला समजू लागले तेव्हाच मी तुला सर्व कल्पना दिली. काही दिवस तुझ्या नजरेतील तिरस्कार सहन केला मी. …….पण तुझा विश्वासघात करण्यापेक्षा हे चांगले नाही का.. ?? मला कळतंय तुला शाळेत माझ्याबद्दल सांगायला लाज वाटते. तुझ्या मैत्रिणींना इथे घेऊनही येऊ शकत नाही तू. पण बेटा आपण भिकारी नाही. फुकटचे लोकांकडे हात पसरून काही मागत नाही की दुसऱ्यांच्या जीवावरही जगत नाही. इतरांसारखा मीही व्यवसाय करते. चोरी करण्यापेक्षा हे बरे नाही का? ……आज माझ्याबद्दल बोलायला लाजलीस तर आयुष्यभर खोटे बोलावे लागेल तुला ?? आणि हे सत्य बाहेर येईल तेव्हा तुझे काय होईल याचा विचार कर जरा. तुझे खरे मित्र मैत्रिणी तुला जशी आहेस तशी स्वीकारतील….. म्हणून खरे बोल. मी तुझ्यावर किती कोणते संस्कार केले ते माहीत नाही पण सत्याला नेहमी सामोरे जा हेच शिकविन तुला. आता शाळेत जा आणि जे सत्य आहे ते बोल” असे बोलून निमा डोळे पुसत आत गेली.
संध्याकाळी अमृता धावत तिच्या रूममध्ये शिरली. “थँक्स आई ….आज तुझ्यामुळे मी वर्गात बोलू शकले. सर्वांना धक्का बसला तुझ्याबद्दल ऐकून. पण नंतर टीचरने माझे अभिनंदन केले इतके धाडस दाखविल्याबद्दल. काहीजणी आता मला पाहून नाक मुरडू लागल्या तर काहीजणी अजून जवळ आल्या. आज तुझ्यामुळे मला माणसांची खरी किंमत कळली. खूप हलके वाटले बघ मला. हॅपी मदर्स डे आई ..” असे बोलून तिने निमाला मिठी मारली.
“तू खूप चांगली मुलगी आहेस. चल आता…. आत जाऊन बस माझीही धंद्याची वेळ झाली आहे ..” असे बोलून तिची छानशी पपी घेऊन निमा खिडकीत जाऊन उभी राहिली.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.