मथळा वाचून आश्चर्य वाटलं ना… आता हे काय नवीन…
खरंतर यात नवीन असं काहीच नाही.
गोष्टी रोजच्याच असतात पण त्या सगळ्या मुख्य व्यक्तीपर्यंत पोचतातच असं नाही.
त्यामुळे काही अडीअडचणी येऊ शकतात.
माणसं दुरावू शकतात.
हे आपल्याला टाळता येईल.. नक्कीच.. त्यासाठी एक गुपीत आत्मसात करता आलं पाहिजे.
एक आटपाट नगर होतं.
तिथल्या राजाचा एक गुणी राजकुमार होता.
राजाची इच्छा होती की त्याने एक कर्तबगार राजा म्हणून पुढे काम करावं.
प्रजेचा हितरक्षक व्हाव. म्हणून त्याने राजकुमाराला गुरुमंत्र मिळावा म्हणून गुरुगृही पाठवण्याचा निर्णय घेतला.
तिथे त्याला योग्य मार्गदर्शन मिळेल, चांगल वळण लागेल अशी त्याची अपेक्षा होती.
त्याप्रमाणे राजकुमार गुरूकुलात गेला, शिक्षण घेतलं.
मग गुरूजींनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं.
त्यासाठी एक वर्ष त्याला अरण्यात रहायला सांगितलं.
एकट्याने अरण्यात राहून त्याला काय शिकता येईल हे त्यांना पहायचं होतं.
त्याप्रमाणे राजकुमार अरण्यात गेला, एक वर्ष तेथे राहिला.
मग पुन्हा गुरूकुलात आला.
गुरूजींनी त्याला विचारलं, “तू अरण्यात जाऊन काय केलंस? काय शिकलास? कोणाच्या कथा व्यथा ऐकल्यास का?”
त्याप्रमाणे राजकुमार सांगू लागला, “अरण्यात पक्ष्यांचा किलबिलाट होता, नदी खळाळून वाहणारी होती, झाडाच्या पानांची सळसळ होती, प्राण्यांचे आवाज होते, वाऱ्याची झुळूक होती.”
गुरूजींनी शांतपणे त्याच म्हणणं ऐकून घेतलं.
गुरूजी त्याला म्हणाले, “तू पुन्हा एकदा अरण्यात जा. लक्ष देऊन ऐक. तुला एखादा नवीन आवाज ऐकू येतोय का ते लक्षपूर्वक ऐक. जोपर्यंत तू असा आवाज ऐकत नाहीस तोपर्यंत परत येऊ नकोस.”
राजकुमाराचा उत्साह मावळला होता. त्याला आपल्या राज्यात परत जायचं होतं. पण गुरुजींचा आदेश तो मोडू शकत नव्हता. नाईलाजाने का होईना तो पुन्हा अरण्यात गेला.
काही दिवस अरण्यात असेच गेले.
सगळे पूर्वीचेच अनुभव. काही वेगळं असं त्याला अनुभवता येईना.
तो निराश झाला.
पण तेव्हाच त्याने एक निश्चयही केला की जोवर काही असा वेगळा आवाज ऐकू येत नाही, वेगळा अनुभव येत नाही तोपर्यंत परत मागे फिरायचं नाही.
लक्षपूर्वक सगळं ऐकायचं.
पूर्वीचे अनुभव सुरूच होते. पण तो आता लक्षपूर्वक ऐकत होता.
तेवढ्यात त्याला काही हळूवार असे नवीन आवाज ऐकू आले.
जे त्याने पूर्वी कधीही ऐकले नव्हते. तो त्याच्यासाठी विलक्षण अनुभव होता.
कारण ते आवाज त्याच्या कल्पनेपलीकडे होते.
ते आवाज म्हणजे कळी खुलण्याचे, सूर्यकिरण जमिनीवर पडण्याचे असे वेगळेच होते. त्याला त्याचं आश्चर्य आणि कुतूहल वाटत होतं.
मग तो ताबडतोब गुरुजींकडे गेला. ते विलक्षण अनुभव त्याने सांगितले.
हे ऐकून गुरुजींना खूप आनंद झाला.
ते राजकुमारावर खुश झाले.
त्याला म्हणाले, “एक चांगला राजा होण्यासाठी हाच गुण आवश्यक आहे.
तळागाळातील लोकांचा आवाज त्याला ऐकू आला पाहिजे.
त्यांच्यापर्यंत त्याला पोचता आलं पाहिजे.
त्यांच्या भावना, दुःख त्यांनी व्यक्त केली नाही तरी राजाला ओळखता आली पाहिजेत.
कोणत्याही तक्रारी त्याच्याकडे आल्या नाहीत तरी कायम राजाच लक्ष प्रजेकडे एक पालक म्हणून असलच पाहिजे.
यामुळेच तो आपल्या प्रजेचा विश्वास संपादन करु शकतो. त्यांच्या गरजा भागवू शकतो. ”
या गोष्टी खरंतर फक्त राजापुरत्या मर्यादित नाहीत.
प्रत्येकाला आयुष्यात ते उपयुक्त आहे.
जेव्हा कोणी एखाद्या गटाचं प्रतिनिधित्व करत असेल, कुटुंब प्रमुख असेल, एखाद्या मोठ्या हुद्द्यावर असेल तर अशा व्यक्तीला त्याला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती हवीच.
कोणाला अडचण येणार नाही अशी व्यवस्था न सांगता करता आली पाहिजे.
भांडण तंटे, वादविवाद न होता सुरळीतपणा जपता आला पाहिजे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.