लेखाचे नाव वाचून गोंधळात ना?
आयुष्यात इच्छा पूर्ण होण्यासाठी गुंतवणुकीचा काय संबंध?
मित्रांनो, ही गुंतवणूक काही पैशांची नाही बरं.
ही गुंतवणूक आहे ती इच्छाशक्ती आणि कष्टांची.
एखादी गोष्ट मिळवायची इच्छा असेल आणि त्याच्या जोडीने जर तुमची कष्ट करायची तयारी असेल तर तुम्हाला ती गोष्ट नक्कीच मिळते.
खरेतर हे साधे, सरळ आणि सोपे गणित आहे पण मग तरी असे का होते की आयुष्यात काही इच्छा पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात?
एखाद्या संध्याकाळी तुम्ही एकटे असाल किंवा आयुष्याबद्दल तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी चर्चा करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या ज्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्यासाठी तुम्ही कारणे शोधत बसता.
ही कारणे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगून, स्वतःला सांगून तुम्ही एकप्रकारे स्वतःची समजूतच काढत असता.
हे खरे आहे की आयुष्यात आपल्या सगळ्या इच्छा काही पूर्ण होऊ शकत नाही.
जर तुमच्या अवास्तव इच्छा असतील तर हा लेख त्या इच्छांना लागू होत नाही.
पण हा लेख वाचता वाचता सुद्धा जर तुम्ही दोन मिनिटे डोळे बंद करून तुमच्या आयुष्याचा आत्तापर्यंतचा प्रवास आठवून बघितला तर तुम्हाला जाणवेल की आत्तापर्यंत तुम्ही मिळवलेल्या कित्येक गोष्टींचे तुम्हाला समाधान आहे पण अशा कितीतरी इतर गोष्टी असतील ज्याबद्दल तुमच्या मनात पश्चात्ताप असेल. बरोबर ना?
ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला समाधान आहे त्या गोष्टींसाठी तुम्ही तुमची पाठ थोपटली पाहिजेच.
कारण तुम्ही तुमच्या कष्टाने, तुमच्या प्रयत्नांनी ती गोष्ट मिळवली आहे.
त्यामुळे तुम्ही या कौतुकास पात्र आहातच.
आयुष्यात तुम्ही जे स्वकष्टाने मिळवले आहे त्याचे कौतुक झालेच पाहिजे.
पण फक्त कौतुकात रमणे बरोबर नाही.
म्हणूनच आता आपण विचार करूया त्या अशा काही गोष्टींबद्दल ज्याबद्दल तुमच्या मनात समाधान नाहीये.
या काही गोष्टींच्या बाबतीत कदाचित तुमची स्वतःकडून किंवा आयुष्याकडून काही वेगळ्या अपेक्षा असतील ज्या पूर्ण झाल्या नसतील.
आता अशा गोष्टींचा विचार करताना तुमच्या मनात नेमके काय काय येते?
सहसा अशा अपूर्ण इच्छा, आकांक्षा असतात त्याबद्दल विचार करताना आपल्या मनात एकच गोष्ट येते….
ती म्हणजे कारणे किंवा ज्याला आपण एकस्यूझेस म्हणतो.
मित्रांनो, हे कटू असले तरी ते सत्य आहे.
कदाचित असे सांगून तुम्हाला समजणार नाही म्हणूनच आपण एक उदाहरण घेऊया.
समजा तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित असलेली बढती मिळाली नाही आणि तुमच्या ऐवजी ती इतर कोणालातरी देण्यात आली तर तुम्ही साधारण कशा पद्धतीने विचार कराल?
माझ्या नशिबानेच साथ दिली नाही..
मी पूर्ण प्रयत्न केले पण ही वेळ माझी नव्हती…
ज्याला किंवा जिला बढती मिळाली तिने काहीतरी चालूगिरी केली…
अशी अनेक कारणे तुम्ही स्वतःला आणि इतरांना देता हो ना?
मित्रांनो, या कारणांनी कदाचित इतरांची समजूत पटेल, काहीवेळा साठी तुमची सुद्धा समजूत पटेल पण जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी उशीवर डोके ठेवलं तेव्हा मात्र तुमचे तुम्हालाच लक्षात येईल, की ही तर केवळ कारणेच आहेत व सत्य परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे.
तुम्ही मेहनत घ्यायला कुठेतरी कमी पडला असण्याची शक्यता आहे किंवा तुमच्याकडून काही गोष्टी करायच्या राहिल्या असण्याची सुद्धा शक्यता असू शकते.
खरेतर तुम्ही आयुष्यात ज्या गोष्टीची गुंतवणूक देता ती गोष्ट आयुष्य तुम्हाला दुपटीने परत देत असते.
आयुष्यात वेळ, काळ जुळून यायला गरज असते ती या कष्टांची.
ज्या व्यक्तीला बढती मिळाली असती तिने नक्कीच तुमच्यापेक्षा जास्तीचे प्रयत्न केलेले असतात व त्यात तुम्ही अगदी एका टक्क्याने का होईना पण कमी पडलेला असता.
म्हणूनच, या लेखाची सुरुवात करतानाच म्हटले आहे की आयुष्यात तुमच्या इच्छा तुम्हाला पूर्ण होऊन हव्या असतील तर गरज असते ती गुंतवणुकीची.. कष्टाच्या गुंतवणुकीची.
‘पेराल ते उगवाल’ या म्हणीचे उदाहरण देऊन सुद्धा ही गोष्ट पटकन लक्षात येऊ शकते.
तुम्ही जर कष्ट केलेत तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल पण तुम्ही जर वेळ वाया घालवला, व्यवस्थित नियोजन केले नाही तर त्याचे ही दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतीलच.
आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की तुम्ही कष्ट करताय का नाही हे नेमके ओळखायचे कसे?
याचे उत्तर शोधायला तुम्हाला खूप कष्ट पडणार नाहीत. यासाठी तुम्हाला काही सोप्या गोष्टी करायच्या आहेत.
एकतर तुमची इच्छाशक्ती वाढवायची आहे. तुमची इच्छा हीच तुमची प्रेरणा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तुमची इच्छा जितकी मोठी असेल तितकी तुमची कष्ट घ्यायची तयारी असेल.
असे केल्याने तुम्ही योग्य ते कष्ट घ्याल. तुमची योग्य दिशेने वाटचाल सुरु होईल.
पण इतके होऊन सुद्धा काहीतरी चुकू शकतेच.
सगळे नेहमीच सुरळीत चालेल असे नाही. तुम्हाला हव्या असलेल्या काही गोष्टी तुम्हाला मिळतील तर काही मिळणार नाहीत.
पण जेव्हा तुम्ही तुम्हाला न मिळालेल्या गोष्टींबद्दल विचार कराल तेव्हा तुम्ही तुमची विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे.
तुमच्या अयशस्वीपणाचे खापर नशिबावर किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर किंवा व्यक्तीवर न फोडता तुम्ही तुमचे स्वतःचे काय चुकले, तुम्ही कुठे कमी पडलात याचा विचार केला पाहिजे.
या पद्धतीने विचार केल्यावर तुम्हाला कुठे सुधारणा करायची हे समजेल.
समजा तुमचे वजन कमी होत नसेल तर इतर कशाचा विचार न करता तुमचे काय चुकते हे तुम्ही आठवले पाहिजे.
त्यासाठी वजन कमी करायला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची यादी केली पाहिजे.
त्यातील किती गोष्टी तुम्ही करता याचा विचार केला पाहिजे.
तुम्ही नियमितपणे व्यायाम करता का? चौरस आहार घेता का?
तुम्ही काढलेल्या यादीतील एखादी गोष्ट तुम्ही नक्कीच करत नसणार.
याच एका गोष्टीमुळे तुम्हाला हवे असलेले यश मिळत नसते.
अशाप्रकारे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचे तुम्ही ऑडीट करू शकता.
यामुळे तुम्ही कुठे कमी पडताय हे तुम्हाला नेमके समजेल आणि मग त्या दृष्टीने तुम्हाला सुधारणा करता येईल.
आयुष्यात हा दोन गोष्टींची गुंतवणूक केलीत तर आयुष्य त्याचे दुप्पट रिटर्न्स तुम्हाला नक्कीच देईल!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.