यशस्वी लोक मिनिटांचा आणि सेकंदांचा विचार करतात तर अयशस्वी लोक तासांचा… कसे ते वाचा या लेखात
मित्रांनो, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट असली पाहिजे तर ती म्हणजे वेळेचा सदुपयोग.
कष्ट, मेहनत, चिकाटी, अभ्यास या सगळ्या गोष्टी आहेतच.
या गोष्टी केल्याशिवाय यश प्राप्त होणार नाहीच.
पण या गोष्टी तेव्हा करता येतील जेव्हा तुम्ही वेळेचे नियोजन कराल.
तुमच्याकडे असलेला वेळ वाया न घालवता त्याचा जास्तीतजास्त वापर तुम्ही कसा करता यावर तुमचे यश अवलंबून आहे.
अनेकांसारखे तुम्हालाही वाटत असेल की तुम्हाला जास्त काम करायला, जास्त मेहनत करायला वेळ मिळत नाही, सगळा वेळ आहे त्या कामात जातो किंवा जर जास्त वेळ मिळाला असता तर तुम्ही जास्त पैसे कमावू शकला असतात.
इतकेच काय, काही वेळा तुम्ही वेळेची सबब पुढे करून व्यायाम न करता येणे, मनासारखे वाचन न करता येणे, तुमच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता न येणे, तुमच्या छंदांसाठी वेळ देता न येणे अशा तक्रारी करत असाल.
“काय करणार, दिवसच कमी पडतो.. इतके काम आहे..”
आहे ना हे वाक्य परिचयाचे?
मित्रांनो, तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत हे वाक्य तुम्ही निदान एकदा तरी स्वतःला नाहीतरी इतरांना ऐकवले असेल आणि इतरांकडून ऐकले सुद्धा असेल.
इतकेच काय वेळ कमी पडतो त्यामुळे मनासारखे जेवण सुद्धा करता येत नाही, वेळेच्या कमतरतेमुळे सकाळच्या नाश्त्यावर पाणी सोडावे लागते अशा सुद्धा अनेकांच्या तक्रारी असतात.
पण खरेच विचार करा, आपण जगाशी खोटे बोलू शकतो पण स्वतःशी नाही.
आपल्या दिनक्रमाचा विचार करून बघा. आपला किती वेळ खरेच कामात जातो?
नीट विचार केलात तर तुमचे तुम्हाला लक्षात येईल की हा वेळेचा बागुलबुवा आपण उगाचच करून घेतला आहे.
जर तुम्ही नीट वेळापत्रक ठरवून घेतले, त्या प्रमाणे प्रत्येक कामाला एक वेळ आखून दिली तर तुमचे काम, छंद, वाचन, हे सगळे व्यवस्थित करून सुद्धा तुमच्याजवळ तुमच्या परिवारासोबत घालवायला वेळ शिल्लक असेल?
पण आपण सर्वसमान्य माणसे घडाळ्यातल्या तासांमध्ये अडकून जातो आणि इथेच नियोजन चुकते आणि आपल्याला वेळ कमी पडतो. खरे वाटत नाही?
मग असा विचार करून बघा..
आपल्या दिवसात आपल्याला २४ तास मिळतात आणि बिल गेट्सच्या दिवसात सुद्धा २४ तासच असतात.
तरीही आपल्याला ते २४ तास पुरत नाहीत, असे कसे शक्य आहे?
बिल गेट्स कशाला? आपण यासाठी अगदी आपल्या जवळचे उदाहरण घेऊ..
भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती.. मुकेश अंबानी कसे आपल्या दिवसात मिनिटांचे, सेकंदाचे काटेकोरपणे नियोजन करून आपला दिवस व्यतीत करतात.
हा लेख वाचल्यानंतर तुमच्या नक्की लक्षात येईल की दिवसातल्या तासांचा हिशोब मांडण्यापेक्षा जर मिनिटांचे नियोजन व्यवस्थितपणे केले तर यश संपादन करताना ‘वेळेचा अभाव’ ही सबब राहणार नाही.
भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी, ‘रिलायन्स इनडसट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर’ आणि चेयरमन जे दिवसाला ३० करोड रुपये कमावतात..
म्हणजेच दर तासाला १.२५ करोड रुपये कमावतात हे आपल्या दिवसाचे नियोजन कसे करत असतील?
भारतातील सगळ्यात भव्य, २७ मजले असणाऱ्या घरात राहणारे अंबानी एवढा मोठा व्यवसायाचा डोलारा सांभाळून सुद्धा आई, बायको, तीन मुले यांना वेळ देतात, व्यायाम करतात, वाचन करतात, छंद जपतात.
हे सगळे ते कसे करतात? त्यांच्या सुद्धा दिवसात आपल्या सारखेच २४ तास आहेत.
पण ते आपल्यासारखा तासांचा विचार करत नाहीत तर दिवसातले प्रत्येक मिनिट कसे वापरता येईल हे बघतात आणि एक मिनिट सुद्धा कसे वाया जाता कामा नये या कडे लक्ष देतात
हे वाचून तुम्हाला सुद्धा कुतूहल वाटतच असेल की ते आपल्या दिवसाचे नियोजन नेमके कसे करतात?
या लेखात मुकेश अंबानी आपल्या एका संपूर्ण दिवसात काय करतात, कुठल्या गोष्टींना प्राधान्य देतात, त्यांना हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळेचे नियोजन कसे करतात हे सगळे सांगितले आहे.
यामुळे तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळेल आणि टाईम मॅनेजमेंटचा अंदाज येईल.
१. व्यायाम आणि वाचन
बहुतांश यशस्वी व्यक्ती या सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात करतात.
त्याचप्रमाणे मुकेश अंबानी सुद्धा सकाळी ५ ते साडे ५ च्या दरम्यान उठतात.
उठल्यावर दीड तास ते त्यांच्याच घरात असलेल्या जिममध्ये व्यायाम करतात.
याच वेळात ते स्विमिंग सुद्धा करतात. यानंतर काही महत्वाच्या वर्तमानपत्रांचे वाचन करून ते नाश्ता करायला जातात.
२. नाश्ता
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण मुकेशजी त्यांच्या नाश्त्याला भरपूर वेळ देतात.
साधारण ८ ते ९ च्या मध्ये ते नाश्ता करतात. म्हणजेच यासाठी ते आपल्या दिवसातला तब्बल एक तासभर देतात.
त्यांना व्यायामानंतर नाश्त्याला काहीतरी साधेसे खायला आवडते.
नाश्त्यात त्यांना पपईचा रस प्यायची पण सवय आहे. इतकेच नाही तर दर रविवारी त्यांना त्यांच्या आवडीच्या साऊथ इंडिअन हॉटेलमध्ये नाश्ता करायला आवडतो.
३. ऑफिसची तयारी
स्वतःचे आवरणे, अंघोळ, ऑफिसचे कपडे करून मग घरातील ऑफिसमधून त्यांची ऑफिसची बॅग, लॅपटाॅप, फाईल्स आणि इतर सामान स्वतः आणणे हे सगळे ते करतात.
त्यानंतर रोज न चुकता त्यांच्या आईला भेटून त्यांचा आशीर्वाद घेतात.
हे सगळे आवरे पर्यंत त्यांचा दीड तास जातो. मग ते त्यांच्या बायकोला, नीता अंबानींना भेटून साधारण साडे १० पर्यंत ऑफिससाठी निघतात.
४. ऑफिस
नरीमन पाँइंटला असलेल्या त्यांच्या ऑफिसमध्ये ते साधारण ११ वाजता पोहोचतात.
पोहचल्यावर अर्ध्या तासात ते त्या दिवसाला करायच्या कामांचा आढावा घेतात, आज कोणत्या मिटींग्स आहेत, कोणाला भेटायचे आहे त्यासाठी काय तयारी हवी हे बघतात.
यानंतर मग साडे ११ ते रात्रीचे १० ते ऑफिसमध्ये असतात. दिवसभर काम, मिटींग्स हे सगळे आवरून ते घरी जायला निघतात.
५. रात्रीचे जेवण
रात्री इतका उशीर होत असला तरी सुद्धा मुकेशजी रात्रीचे जेवण नीताजीं बरोबरच घेतात.
घरी पोहोचून रात्रीच्या १२ पर्यंत त्यांचे जेवण आटोपते.
रात्री सुद्धा त्यांना साधेच जेवण आवडते. पोळी, भाजी, आमटी, भात, भाजी आणि कोशिंबीर हे ते सहसा खातात.
आठवड्यातून दोनदा तरी त्यांना अतिशय आवडणारे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ रात्रीच्या जेवणात केले जातात.
६. बायको सोबत वेळ
जेवण झाल्यावर साधारण अर्धा तास ते त्यांच्या बायकोबरोबर वेळ घालवतात. दिवसभर काय घडले, काही महत्वाच्या घडामोडी ते एकमेकांना सांगतात.
७. झोप
झोपण्यापूर्वी साधारण अर्धा तास ते येणाऱ्या दिवसातील ऑफिस च्या कामाचे नियोजन करतात.
८. कुटुंबासाठी वेळ, छंद इत्यादी
आठवडाभर काम केल्यानंतर मुकेशजी रविवारचा पूर्ण दिवस आपल्या परिवाराच्या सोबत व्यतीत करणे पसंत करतात.
त्यांची आई, बायको, तीन मुले, एक सून, जावई यांच्या बरोबर ते दिवस घालवतात.
त्यांच्या या एकूण जीवनशैलीवरून ते स्वतः किती साधे आहेत हे लक्षात येते पण मुकेश अंबानी जरी, अगदी साधे असले तरी त्यांचे काही छंद मात्र महागडे आहेत.
त्यांना महागड्या गाड्या जमवायचा छंद आहे. त्यांच्या घराच्या पहिल्या तीन मजले हे पार्किगचे आहेतत ज्यामध्ये सध्याच्या घडीला १७० गाड्या आहेत. त्यासाठी सुद्धा ते वेळ देतात.
मित्रांनो, आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सुद्धा त्यांची सगळे व्यवधाने सांभाळून आपले खाणे-पिणे, व्यायाम, आरोग्य, परिवार आणि छंद यासाठ्ठी वेळ देतात
तर पुढच्या वेळेला आपल्याला ‘वेळ नाही..’ हे कारण देण्यापूर्वी तुम्ही विचार कराल ना की तुमचे वेळेचे नियोजन नेमके कुठे चुकते आहे?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.