न्यूयॉर्क च्या टाईम स्केवर वर मोठ्या मोठ्या स्क्रीन्स वर एक फोटो लाइव झळकत होता. हा फोटो काही साधासुधा नव्हता तर तो येत होता चक्क मंगळ ग्रहावरून. नासा च्या ईन – साईट ह्या यानाने मंगळाच्या पृष्ठभागावर ठरलेल्या ठिकाणी उतरताच आपण सुरक्षित असल्याचा संदेश नासा च्या जेट प्रपोलेशन लेबोरेटरी मध्ये येताच नासाच्या संशोधकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माणसाच्या इतिहासात ८ वेळा मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या यान उतरवण्यात नासा यशस्वी झाली आहे.
Interior Exploration using Seismic Investigations, Geodesy and Heat Transport (InSight) ईन – साईट ह्या मोहिमेने ५ मे २०१८ ला एटलास फाय- ४०१ रॉकेट द्वारे केलिफॉर्निया येथून मंगळासाठी उड्डाण भरलं.
४८० मिलियन किलोमीटर चा प्रवास करून ईन – साईट २६ नोव्हेंबर २०१८ ला मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं. ईन – साईट ची निर्मिती लॉकहिड मार्टिन ने केली असून ह्या पूर्ण मोहिमेचा खर्च ८३० मिलियन डॉलर च्या घरात आहे. आधी हे मिशन मार्च २०१६ ला उड्डाण भरणार होतं पण सेसमोमीटर मध्ये आलेल्या अडचणीमुळे हे मिशन दोन वर्ष लांबणीवर गेलं. ह्याचा खर्च ह्यामुळे ६७५ मिलियन डॉलर वरून ८३० मिलियन डॉलर इतका वाढला. ईन – साईट सोबत पहिल्यांदा दोन क्यूब सॅट पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेले आहेत. ह्यांना नासा ने “वॉली” आणि “इव्हा” अशी नावे दिली आहेत. वॉली ह्या एनिमेशन चित्रपटातील पात्रांवरून ही नावे दिली आहेत. जेव्हा ईन – साईट मंगळाच्या कक्षेत प्रवेश करत होतं तेव्हा ह्या दोन्ही क्यूब सॅट नी त्याच्या उतरण्याच्या शेवटच्या क्षणांची माहिती पृथ्वीवर पाठवण्याचं काम केलं.
ईन – साईट हे यान मंगळावर फिरणार नाही आहे तर एकाच ठिकाणी जिकडे उतरलं आहे तिकडून मंगळाचा अभ्यास करणार आहे. ह्यावर असलेलं सेसमिक इंटीरिअर सेन्सर मंगळावर येणाऱ्या भूकंपाचा तसेच तिकडे आदळणाऱ्या अशनींनमुळे मंगळावर काय फरक पडतो ह्याचा अभ्यास करणार आहे. ह्यातला एक प्रोब एच पी ३ मंगळावर १६ फिट खोल जाऊन त्यातून मंगळाच्या पृष्ठभागाच्या आतल्या तापमानाचा अभ्यास करणार आहे. राईज हे अजून एक उपकरण मंगळाच्या जमिनीतील खनिजांचा अभ्यास करणार आहे. तसेच ईन – साईट वर एक रोबोटिक आर्म असून हा आर्म ही उपकरणे मंगळाच्या पृष्ठभागावर ठेवणार आहे. ह्या आर्म वर एक थ्री डी कॅमेरा असून तो जिकडे हे यान उतरलं आहे त्याच्या आजूबाजूची छायाचित्र घेणार आहे. ह्या व्यतिरिक्त मंगळाच्या वातावरणात होणारे बदल ही ईन – साईट टिपणार असून त्याची इत्यंभूत माहिती नासा ला कळवणार आहे.
Aaah…soaking up the Sun with my solar panels. 🌞 After a long flight, and thrilling #MarsLanding, it feels great to get a good stretch and recharge my batteries. (Like, literally.) It’s just what I’ll need to really start getting in tune with #Mars. https://t.co/yse3VEst3G pic.twitter.com/LpsiI0KNNz
— NASAInSight (@NASAInSight) November 27, 2018
ईन – साईट हा नासा च्या १९९२ साली सुरु झालेल्या डिस्कवरी परियोजनेचा एक भाग आहे. ह्या योजने अंतर्गत आपल्या सौर मालेतील अनेक गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. ईन – साईट ३५८ किलोग्राम वजनाचं यान असून ह्याचे सोलार पॅनल ६ मीटर लांबीचे आहेत. मंगळावर सूर्याची उष्णता कमी पोचत असते ह्याचा विचार करून हे सोलार पॅनल बनवले गेले आहेत. ईन – साईट पुढील १ मंगळ वर्षापर्यंत पृथ्वीवर माहिती पाठवत राहणार आहे. १ मंगळ वर्ष म्हणजे पृथ्वीवरचे ७२८ दिवस अथवा पृथ्वीवरची दोन वर्ष.
ह्या मोहिमेने मंगळाबद्दल तसेच तिथल्या एकूण जडणघडणी बद्दल खूप मोठी माहिती उपलब्ध होणार आहे. ह्या माहितीचा आधार घेऊन मंगळावर पुढील प्रवासासाठी मोहिमा आखल्या जाणार आहेत. एकूणच अश्या मोहिमेंच्या यशातून आपलं तंत्रज्ञान हे योग्य दर्जाच आहे हे सिद्ध होत असते आणि पुढे मानवी वस्ती च्या दृष्टीने आपण अजून एक पाउल टाकत असतो. नासा च्या यशासाठी तिथल्या सर्वच अभियंते आणि वैज्ञानिकांच अभिनंदन आणि पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा.
वाचण्यासारखे आणखी काही…
अंतराळाबद्दल विनीत वर्तक यांनी लिहिलेले इतर लेख येथे वाचा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.