आयुष्य म्हटले की, काही निर्णय चुकणार तर काही योग्य ठरणार.
आयुष्यात अगदी परफेक्ट होणे कोणालाच साध्य झालेले नाही.
त्यामुळे काहीतरी कमीजास्त होणारच.
आयुष्य व्यतीत करताना एखादवेळेस काही अंदाज चुकणार, नियोजन फसणार आणि आपले निर्णय चुकणार हे गृहीतच धरले पाहिजे.
खूप विचार करून घेतलेले निर्णय सुद्धा चुकतात. खरेतर अनुभवासारखा गुरु नसतो असे म्हणतात.
त्यामुळे या चुकीच्या निर्णयातून आपण जर काही घेऊ शकत असलो तर घ्यायचा तो धडा.
पण जर तुम्हाला भावनांच्या आहारी जाऊन, ऐन वेळेस निर्णय घ्यायची सवय असली तर या सवयीमुळे तुमचे अर्धाहून जास्त निर्णय चुकीचे ठरण्याचीच शक्यता जास्त असते.
यामागचे कारण सोपे आहे. जेव्हा तुम्ही भावनांच्या आहारी जाता तेव्हा तुमची सारासार विचार करण्याची शक्ती कमी होते.
याचा परिणाम तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो.
विचार न करता केवळ भावनांना, मग त्या चांगल्या असोत किंवा वाईट, महत्व देऊन तुम्ही जर (ज्याला आपण इम्पल्सिव्ह डिसिजन म्हणतो) असे निर्णय घेत असाल तर साहजिकच नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप व्हायची शक्यता असते.
या इम्पल्सिव्ह डिसिजन्स चे उदाहरण द्यायचे झाले तर काही किरकोळ वादावादीनंतर आयुष्यभरासाठी होणारी मैत्रीची ताटातूट.
त्या क्षणी रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाचा नंतर शांतपणे विचार केल्यावर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते.
काही वेळा तर अशा इम्पल्सिव्ह डिसिजन्समुळे काहींना एकदम मोठी खरेदी करायची सवय असते.
पैसे, हफ्ता, वेळ याचा हिशोब न मांडता त्यावेळी भावनांच्या आहारी जाऊन खरेदीला जास्त महत्व दिले जाते, पण नंतर मात्र त्या निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते.
तुमच्या बाबतीत सुद्धा असे होत असेलच ना?
अगदी नेहमी नाही पण आयुष्यात तुम्ही सुद्धा असे भवनांच्या आहारी जाऊन, सारासार विचार न करता चुकीचे निर्णय घेत असलाच.
खरेतर, चुका करणे हे माणूस असल्याचे लक्षण आहे.
त्यामुळे अशा चुका सगळ्यांच्याच होतात.
पण याचा अर्थ असा सुद्धा नाही की चुकलेले निर्णय सोडून द्यावेत.
चुका कुरवाळत न बसता, नव्याने सुरुवात करायची हे जरी खरे असले तरी, जर तुमच्याकडून वारंवार भावनांना प्राधान्य देऊन असे चुकीचे निर्णय घेतले जात असतील
तर त्याचा तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात विपरीत परिणाम होऊ शकतो.
असे होऊ नये, तुम्हाला सारासार विचार करून मग निर्णय घेण्याचे महत्व समजावे.
तसेच एखाद्या वाईट निर्णयाला कसे सामोरे जायचे, त्याचे परिणाम कसे सहन करायचे त्याबद्दल सांगणारा हा मार्गदर्शनपर लेख तुमच्या फायद्याचा नक्की ठरेल.
१. तुमच्या भावना स्वीकारा
जेव्हा तुम्ही एखादी समस्या स्वीकारता, तेव्हाच ती सोडवायच्या दृष्टीने तुम्ही पहिले आणि सगळ्यात मोठे पाऊल उचललेले असते.
जर तुम्हाला इम्पल्सिव्ह निर्णय घ्यायची सवय असेल तर ते तुम्ही आधी स्वतःशी मान्य करणे गरजेचे आहे.
हे इम्पल्सिव्ह निर्णय वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात.
जे निर्णय घेताना तुम्ही बुद्धीपेक्षा भावनांना जास्त महत्व देता ते धोकादायक ठरू शकतात.
राग, हाव, प्रेम या भावनांना महत्व देऊन घेतलेले अनेक निर्णय चुकू शकतात.
असे निर्णय घेण्याची सवय तुम्हाला असेल तर त्यात लपवण्यासारखे काहीच नसते.
तुम्ही जर तुमच्या या सवयींचा स्वीकार केलात तर त्यावर उपाय शोधणे तुम्हाला सोपे जाईल.
तुम्ही जर असे वाईट निर्णय घेतले असतील तर सर्वप्रथम तुमचे ते निर्णय आणि ते घेण्यामागची तुमची मनस्थिती याचा स्वीकार करा.
एकदा तुम्ही हे केले तर मग तुम्हाला स्वतःला तुमच्या कोणत्या भावना अनावर होतात ते समजेल.
अशा भावनांना कसे नियंत्रणात ठेवायचे याचा अंदाज येईल.
तुमचे काही निर्णय चुकतात हे मान्य केल्यावर, ते का चुकतात याचा आढावा घेऊन स्वीकार केल्यानंतर कदाचित तुमचे की चुकते हे तुमचे तुम्हालाच उलगडेल किंवा यासाठी तुमची कोणाशी तरी बोलायचा, कोणाबरोबर तरी बोलून या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेऊ शकाल.
२. समस्या सोडवण्यावर भर द्या
एकदा तुम्ही तुमच्या समस्येचा स्वीकार केलात तर त्याबद्दल अधिक विचार करणे तुम्हाला सोपे जाईल.
नेमके काय प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला नक्की काय हवे आहे याचा विचार करता येईल.
एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलून या समस्येच्या तळाला जाता येईल.
या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर पुढच्या वेळेला निर्णय घेताना तुम्ही सावध असाल.
काय चुकते आहे, कुठे चुकते आहे याचा तुम्हाला काही प्रमाणात तरी अंदाज आलेला असेल.
ज्यामुळे पुढच्या वेळेला निर्णय घेताना तुम्ही जुन्या चुका परत न होऊ द्यायचा प्रयत्न करू शकाल.
३. सोडून द्यायला शिका
तुमचे दोन निर्णय चुकतील, चार निर्णय चुकतील…
पण तसे झाले तरीही आयुष्यात गरजेचे आहे ते पुढे जाने- मूव्ह ऑन करणे.
तुमच्या चुका म्हणजे तुमचे आयुष्य नाही तर या चुका म्हणजे तुम्हाला मिळालेले धडे आहेत.
या अनुभवांमधून शहाणपण घेऊन पुढे चालत राहणे हिताचे आहे.
आयुष्यात अनेकांचे निर्णय चुकतात ते तुमचे सुद्धा चुकले असे म्हणून तुम्ही पुढे जायला शिकले पाहिजे.
सतत जर तुम्ही स्वतःला दोष देत राहिलात तर त्याचा फक्त त्रासच होईल, त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही.
म्हणूनच चुकीचे निर्णय सोडून द्या पण त्यातून मिळालेले अनुभव सोबत घेऊन सकारात्मकतेने ‘मूव्ह ऑन’ करा.
आणि घेतलेल्या निर्णयावर फोकस करून कामाला लागा…
तोच चुकीचा निर्णय बरोबर ठरवणं हे तुमच्या हातात आहे, आणि ते तुम्ही करणार, यावर दृढ विश्वास ठेवा.
४. स्वतःला माफ करा
चुका केल्या तरच प्रगती होते.
चुका करणे हे प्रयत्न करत असण्याचा पुरावा आहे.
त्यामुळे तुम्ही चुका करत असाल, चुकीचे निर्णय तुमच्याकडून घेतले गेले असतील तर ते एकप्रकारे चांगलेच आहे,
कारण त्याचा अर्थ तुम्ही एका जागी स्थिर न बसता काहीतरी खटपट करत आहात.
पुढच्या वेळेला तुम्ही जर कुठला चुकीचा निर्णय घेतलात तर मनाशी या वाक्यांचा सराव करून स्वतःला माफ करायला शिका.
यामुळे तुम्ही तुमच्या चुकीच्या निर्णयात अडकून न पडता तुमचे प्रयत्न प्रवाही ठेऊ शकता.
५. पश्चातापातून वेळीच बाहेर पडा
तुम्ही एखाद्यावेळेला भावनांच्या आहारी जाऊन चुकीचा निर्णय घेतला, त्यातून तुमचे नुकसान झाले, त्याचे परिणाम तुम्ही भोगले, तुम्हाला पश्चाताप झाला.. हि एक साखळी आहे.
प्रत्येक वाईट निर्णयाचे परिणाम हे भोगावेच लागतात आणि त्याचा पश्चाताप देखील होतो.
पण वरच्याच मुद्द्यात म्हटल्याप्रमाणे यामुळे तुमचे प्रयत्न थांबता कामा नयेत.
वाईट निर्यण जर तुमच्याकडून घेतले गेले असतील तर त्यावरच सतत विचार करत राहण्यापेक्षा त्यातून बाहेर कसे पडता येईल याचा विचार करावा.
६. पुढच्या वेळी विचार करताना काळजी घ्या
असे म्हणतात की आयुष्यात चुका कराव्यात पण दर वेळी नवीन चुका कराव्यात, त्याच त्या चुका परत परत करू नयेत.
म्हणूनच जर तुमच्याकडून काही चुकीचे निर्णय घेतले गेले असतील, तर वरील मुद्यांचा निट विचार करून तुमचे कुठे चुकते हे शोधून काढा.
याचा उपयोग तुम्हाला पुढच्या वेळेला होईल. जेव्हा तुमच्यावर परत एखादा निर्णय घ्यायची वेळ येईल तेव्हा तुम्ही घाबरून न जाता, टेन्शन न घेता (ज्या पुन्हा भावना च आहेत) फक्त आणि फक्त सारासार विचार करून निर्णय घेऊ शकाल.
असे केल्याने निर्णय घ्यायच्या आधीच तुम्हाला त्याच्या परिणामांचा विचार करण्याची संधी मिळेल.
जर तुम्ही निर्णय घेताना परत भावनांच्या आहारी जात असाल तर तुम्ही यामुळे वेळीच सावध व्हाल.
एका निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात, त्या निर्णयाला इतर काय पर्याय आहेत, त्यांचे काय परिणाम होऊ शकतात या सगळ्याचा विचार करून निर्णय घ्यायची सवय तुम्ही स्वतःला लाऊन घ्या.
https://manachetalks.com/9477/krari-banedar-honyasathi-nirnyshkti-vadhvnyachi-panchsutri-manachetalks/
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप छान आणि उपयुक्त माहिती.
मनाचे talks टीम चे मनापासून धन्यवाद.
रोज सकाळी मनाला आणि बुद्धीला सकारात्मक खाद्य पुरविणाऱ्या या अनोख्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा.
Very nice post, useful for improving mind ability.