“आई, ती मोहनमाळ ठेव घरीच अन् या चार -चार बांगडया घालुन जातेस? अगं कसे दिवस आलेत माहित आहे नं?” सुमतीबाईंची तयारी करता करता रेणू करवादली.
“मग काय लंकेची पार्वती बनुन जाऊ चारचौघात?” सुमतीबाईं कुरकुरल्या..
“लंकेची पार्वती काय म्हणुन? गोफ अन् एकेक कडं आहे ना हातात. तसंही सगळ्यांना माहित आहे तुझ्या जवळ काय काय आहे ते. ऊद्या काही झालं तर लोकं मला मुर्खात काढतील. थांब तुला माझा दोन ग्रॅमचा लक्ष्मीहार देते.”
म्हणत रेणू पडदा दपटत आत गेली आणि सुमतीबाईंनी रात्रीच बॅगेत तळाशी पेपर खाली ठेवलेली नोटांची चळत चाचपली. ७-८ हजार तरी होतेच. लगबगीने त्यावर साडीची घडी ठेवुन त्या स्वस्थ बसल्या.
“आता आठवडाभर तरी फिरस्ती होणार हाताशी आपले म्हणुन असायला नको? इतक्या दिवसांनी जातेय दादाकडे देणं-घेणं तर होइलच नं.”
“हं हे बघ, हे एटीएम कार्ड, नंबर पाठ आहे तुला अं? नाही तर मला कॉल करून विचार तिथुन” रेणूच्या आवाजातली काळजी त्यांनी हेरली.
“अगं, हो हो! जंगलात कां जातेय मी आणि हे पैसे कशाला गं इतके?”
“असू दे गं.” म्हणत रेणू ने चार जांभळया नोटा आईच्या पर्समधे कोंबल्या.
“हं आता आटप पटापट हे सोडतील ऑफीस मधे जातांना.”
“आता त्यांना कशाला त्रास द्यायचा मी जाइन गं ऑटोने”
“ऑटोने? रस्ता खोदलाय सारा कुठलाही ऑटोवाला धड नेणार नाही तुला” म्हणत रेणू खोलीबाहेर गेली सुध्दा.
आधीच सुनिलरावांची ऑफीसची गडबड त्यात आपल्याला पोहचवण्याची जबाबदारी सुमतीबाई संकोचुन गेल्या. तरी बरं स्टेशनवर सोडायचं नव्हतं. गावातल्या बहीणीकडे सगळे जमणार होते आणि ऊद्याला सारे ट्रेनने एकत्रच जाणार होते.
रेणू म्हणाली ते खरंच होतं. पंधरा मिनीटांच्या सरळ सरळ अंतराला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला. गल्लीबोळातुन गाडी नेतांना सुनिलरावांची नजर घडयाळाच्या काटयावरच होती.
रेणूने अगदीच गळ घातली म्हणुन तर ते घाईत सुद्धा पंधरा मिनीटं द्यायला राजी झालेत. सुमतीबाईंना रेणूचा अगदी राग आला. “एवढा आटापिटा कशाला हवा होता हिला. दुपारच्या वेळात गेलेच असते ना मी. तसंही संध्याकाळच्या आत मलाच निघायचं होतं घरातुन”
संध्याकाळी रेणूच्या सासूबाई महिनाभरासाठी रहायला येणार होत्या आणि रेणूला तशी तयारी करायची होती मग तिनं नवऱ्यालाच वेठीस धरलं आईची पाठवणी करायला.
रामनगरच्या चौकात रेड सिग्नलला गाडी करकचुन थांबली आणि आटोवाल्यांना बघुन सुमतीबाई “इथेच उतरते” म्हणाल्या.
वेळेचं भान राखत सुनिलरावांनी त्यांची बॅग उतरवली, ऑटोवाल्याला सामानासकट ठरलेल्या ठिकाणी नीट पोहचवण्याच्या सुचना करून ते निघालेही.
माईच्या घरात स्वतःसकट सामान पोहचतं करून सुमतीबाईंनी ”हुश्श्य!!” म्हंटलं.
खरं तर सगळे ऊद्या वेळेवर जमणार होते. एकटया त्याच आधी म्हणजे तब्बल चोवीस तास आधी आलेल्या. कितीही नाही म्हंटलं तरी थोडं ओशाळवाणं वाटलंच.
थंड पाणी घेऊन सामोरं आलेल्या माईंनी मात्र सहजगत्या त्यांना आपल्यात सामावुन घेतलं. म्हणाली, “बरं झालं आजच आलीस ते. संध्याकाळी जवळच्या दुकानातुन काही खरेदी करायचीय, तुझी मदत होईल निवड करतांना”
“आता वेळेपर्यंत खरेदी सुरू काय गं तुझी?”
“हो बाई मला सुनेच्या तंत्रानं वागावं लागतं, तुझ्या सारखं नाही लेकीला ऑर्डर सोडली की कामं झालीत.” माईची दबक्या आवाजातली कुजबुज.
दुसऱ्या दिवशी स्टेशनवर ही झुंबड उडाली. सगळयांचं सामान मुलं–म्हातारे पंधरा-वीस जणांचा ताफा स्टेशनवर पोहचला सोबत जे एकटे जाणारे त्यांच्या घरचे सोडायला आलेले.
रेणूचं जमणार नाही हे माहित असूनही सुमतीबाईंची नजर फिरून फिरून भिरभिरत होती. मग त्या ऊगाचच रेणूच्या मागे असलेली घरकामं, मुलं नवरा त्यांचं बिझी शेड्यूल, तिच्या सासूबाईंचं येणं, खोदलेले रस्ते असं काय काय कुणाकुणाजवळ सांगत राहील्या.
खरंतर कुणीही रेणूच्या येण्याचा किंवा नं येण्याचा इतका विचारच केलेला नव्हता. चपळ शरीर आणि सुटसुटीत सामान असलेल्या सुमतीबाई त्या साऱ्या गदारोळात कुणालाही जड न होता सहज सामावुन गेल्या होत्या.
आला!!! शेवटी डब्यात सारं स्थिरस्थावर झाल्यावर का होईना रेणूचा फोन आला. सगळयांसमोर मुठ झाकलेली राहीली याचा आनंद मानावा की ती स्वतः आली नाही, निदान मुलांना तरी पाठवायचं केलं नाही याची नाराजी वाटुन घ्यावी?
नेमंक कसं व्यक्तं व्हावं त्यांना कळलंच नाही. मग त्या रेणूच्या सुचनांना फक्त ‘हो’ च म्हणत राहिल्या.
लगतच्या दोन-तीन कम्पार्टमेंट्समधे आपलंच राज्य असल्यासारखी ये-जा, पसारा मांडणं झालं. मग सगळे आपापल्या ग्रुपमधे विखुरले.
जेष्ठ नागरिकांचं कोण गेलं, कोण राहीलं? कोणाचं सुनेशी वाजलं? कोणाची लेक वेगळी निघाली?
हजर नसलेल्यांच्या घरातल्या गोष्टी आणि हजर असलेल्यांचं कौतुक असं सारं सुरू झालं.
तर बच्चेकंपनी आई -बाबांच्या हातातले मोबाइल हिसकावुन गेम्स मधे रमली. मग त्या वितभराच्या डब्बीत मागे मागे जाणारी पळती झाडे, शिवारं, लहान स्टेशनवर रुळांना फुटणारे फाटे चाराचे दोन आणि दोनाचे एक होतात हे बघण्यातली गंमत, हिरवी झेंडी दाखवणाऱ्या दगडी इमारतींमधले माणसं, रेल्वे फाटकापाशी थांबलेल्या गर्दीला केलेला टाटा हे सारं सारं विसर्जित झालं.
आणि मुलांच्या हातातल्या मोबाइलमधल्या व्हॉटस् ऍपवर चॅटींग करायला मिळालं नाही म्हणुन त्यांच्या आया अस्वस्थ !
जरा वेळानं गप्पांचा वेग मंदावला, अर्धे सदस्य पेंगुळले. सुमतीबाईपण मग खिडकीबाहेर बघत राहील्या. मनाचा वेग गाडीच्या चाकाच्या वेगाला मागे टाकू बघत होता.
”खरंच कां चाललोय आपण गावाला? नक्की दादा–वहिनीच्या भेटीची ओढ लागली नां? की आणखी काही?…. काय आणखी काही?” चपापुन सुमतीबाईंनी इकडे तिकडे पाहिले. साऱ्या आयुष्याची रंगवलेली सुरेख प्रतिमा चुकुनही भंगायला नको होती त्यांना.
खरंच ! सुमतीबाईंचं सगळं जिवन सुखातच गेलेलं. प्रभाकर रावांसारखा उमदा जोडीदार, रेवा, रेणूसारख्या गोड मुली, ऊत्तम आर्थिक परिस्थिती कशाकश्याला कमी नव्हतं. पण अलीकडे अलीकडे म्हणजे प्रभाकरराव गेले तेंव्हापासुन काहीतरी हातुन निसटतंय असं सारखं वाटायचं.
खरंतर प्रभाकर रावांचं जाणं सुध्दा कालपरत्वेच होतं. मुली आपापल्या संसारात रमलेल्या, सुमतीबाईंसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केलेली, स्वतःचं घर, लेक जावयाचा शेजार, नातवंडांची सोबत, सभोवती नातेवाईकांचा गोतावळा त्यामुळे त्यांच्या जाण्यात कृतार्थताच होती. मात्र सुमतीबाईंना आजकाल करमेनासंच झालेलं.
तसं रेणू आणि त्यांच्या घरात फक्त एका भिंतीचंच अंतर. तेही रेणूच्या वाढत्या पसाऱ्याने कधीच मिटलेलं.
आईचं घर रिकामं आहे म्हणता म्हणता रेणुने बरचसं सामान त्याही घरात सरकवलं, आणि एकटया जिवाला कितीसं लागणार म्हणुन मग स्वयंपाकघरही एकत्र कधी झालं ते कळलंच नाही. अर्थात त्याबद्दल कुणाला काही तक्रार नव्हतीच.
पण आताशा सुमतीबाईंना काहीसं उपऱ्यासारखं वाटायचं. नातवांना आता आजीपेक्षा मोबाइल, नेट आणि त्याहुनही जास्त मित्र जवळचे वाटत होते, मुलं मोठी सुटसुटीत झालीत म्हंटल्यावर रेणूनेही मैत्रीणींचा गोतावळा वाढवला.
भीशी, किटी पार्टीज़, पिकनिक त्यात भर म्हणुन दिवसभर त्या व्हॉटस् ऍपचं तोंडी लावणं. एकुणच रेणुचाही सहवास कमी झाला. तसंही आजकाल तेच तेच विषय चघळण्याचा मायलेकींचा उत्साह उणावलाच होता.
जावई भला माणुस पण म्हणुन सुमतीबाईंनी मर्यादा थोडीच ओलांडली ? आणि तसंही काही अलिखीत नियम रेणू पाळायला लावायची.
“हे यायची वेळ झाली, तू आता तुझा इथला पसारा आवरून घे, आत बस”
“आई ह्यांना आता मॅच बघायचीय गं, तू आतल्या छोटया टिव्हीवर बघ नं तुझी सिरीयल.” नाहीतर ,
“आई हयांचे मित्र येताहेत जरा आतच बस ना, आणि टिव्हीचा आवाज तेवढा कमी ठेव गं!” अशा सुचना करायची.
मग सुमतीबाईंना खुप खुप एकटं वाटायचं. खोलीतल्या मंद प्रकाशात डोळयांना पाझर फुटायचा. वाटायचं, कुणीतरी यावं, बोलावं, आपणही कुठेतरी जावं रोजच्या आयुष्यापेक्षा थोडं वेगळं जगावं. पण नेहमी नेहमी येणार कोण? आणि रोज उठून जाणार तरी कुठे?
अशातच रेणूच्या सासूबाई महीना-दीड महिन्यासाठी येणार होत्या. त्या आल्या की सुमतीबाईंना मनातुन बरंच वाटायचं बोलायला कुणीतरी मिळायचं. विहीणबाईचीही सुनेच्या आईबद्दल तक्रार नव्हती. पण रेणूलाच सासूबाई आल्या की आईला बाजुला ठेवावंसं वाटायचं.
“आई,आईंना पंखा नको असतो, कमी कर जरा” वर्षातुन एकदा येणाऱ्या आजीसाठी नातवंड आपली जागा सोडायला तयारच नसायचे. मग, “आई थोडे दिवस आईंना तुझ्या खोलीत राहू दे.” म्हणत सुमतीबाईंच्य एकांतावर रेणू घाला घालायची.
मग पलंगांची अदलाबदल नाही तर जागा फेर असं काय काय रेणू करायची आणि त्या बघत बसायच्या. मागे एकदा माईकडे तिची विहीण आलेली तेव्हा, “सुनेनी स्वतःच्या आईसाठी माझी जागा बदलली.”
म्हणत सुमतीबाईंजवळ जाम कुरकुर केली होती. वरून म्हणाली, “तुला काय कळणार सुनांचं वागणं!”
एकुणच सुमतीबाईचं म्हातारपण अगदी आदर्श होतं त्यांच्या नातलगांसाठी. आणि तशीच प्रतिमा जपण्यात त्यांना स्वत:लाही आनंदच वाटायचा.
पण काही गोष्टी अगदीच जिव्हारी लागलेल्या असायच्या. मागच्याच खेपेला रेणूच्या सासूबाई आल्या तेव्हा अक्षरधामचा बेत ठरला. उत्साहाने तयार झालेल्या आईला गाडीत गर्दी होते म्हणुन रेणूने आधीच घरी बसवलं. मग एकांतात म्हणाली, “अगं, हयांनाही फक्त आपल्या आईसोबत वेळ घालवायचा असेलच नं. प्रत्येक वेळेस तूच सोबत राहीली तर कसं होईल? आणि तसही मला सासरच्यांनाही सांभाळुन घ्यावंच लागेल नं?”
आजकाल रेणूच्या वागण्या बोलण्यात ‘माझं सासर’, ‘सासरची कर्तव्यं’ याचा उल्लेख वारंवार यायचा.
सासरच्या मंडळीत आपलं महत्व वाढवतांना नाही म्हंटलं तरी तिला आईला बाजूला ठेवणं गरजेचं होतं. सुमतीबाईंना मात्र दोरी तुटलेल्या वेली सारखं वाटायचं.
ते कसं झालं, म्हातारपणी सोबत व्हावी म्हणुन प्रभाकर रावांनी गावातच असलेल्या रेणू सोबत घर बांधलं. तसंही पुढे मागे त्यांचं सगळं रेवा-रेणूचंच होणार होतं. आधी रेवा नको नको करत होती पण अनेक टक्के-टोणपे खाऊन अनुभवी झालेल्या सुमतीबाईंनी, “असू दे गं तुझ्याकडे भरपूर, पण माहेरच्या चोळी-बांगडीचा आधार काही वेगळाच असतो.” म्हणत मग रेवालाही तिच्या वाटच्या हिस्स्यातुन तिच्या सासर घराजवळ पुण्याला फ्लॅट घेऊन दिला.
पण सततच्या सान्नीध्याने सुमतीबाईंच्या घरात रेणू आणि तिच्या मुलांचा राबता, वर्चस्व होतं.
जावई असूनसुद्धा सुनिलराव सहज एखादा निर्णय घेत. प्रभाकररावांच्या आजारपणात रेणू, सुनिलराव, मुलं यांनी मन लावुन सेवा केलेली.
मग सटी-सहामासी आलेल्या रेवाला निखळ, फक्त एकटीचंच माहेरपण काही लाभायचं नाही.
प्रत्येक गोष्टीत रेणू अन् तिची मुलं, नवरा यांचं अस्तित्व जाणवायचं. नातलगांमधेही त्यांचंच कौतुक असायचं.
रेवा मग ‘मीही काही कमी नाही.’ या अविर्भावात तिच्या सासरची माणसं, त्यांची बंधनं, त्यांच्यासाठी खाल्लेल्या खस्ता यांचा पाढा वाचायची. वर पुन्हा “सासरचा धाक वेगळाच असतो, आई सारखे समंजस थोडेच आहेत ते.” अशी पुस्तीही जोडायची.
मग रेणूसुद्धा ‘मी दोन्हीकडचे नातलग जपते’ हे सिद्ध करण्यामागे लागली. या साऱ्यात सुमतीबाईंचं घरातलं स्थान हरवत चाललं होतं.
खरंतर ही घरोघरची कथा होती. पण इतरांकडे त्यावर सोप्पा उपाय होता, सुनांवर घरातल्या या सुप्त स्पर्धेचं, दुहीचं खापर फोडणं, जो सुमतीबाईंजवळ नव्हता.
याही वर्षी रेणूच्या सासूबाईंची येण्याची वर्दी मिळाली आणि सुमतीबाईना तिथुन कधी निघते असं झालं.
काय करणार? रोजच्या आयुष्यातले एकमेकांमधे गुरफटलेले व्यवहार, मनं आता एवढया तेवढया गोष्टीसाठी या उतारवयात वेगळे होऊ शकत नव्हते. पक्षी: तसं करायचंच नव्हतं आणि उपेक्षाही सहन होत नव्हती.
मग थोडे दिवस रेवाकडे जायला मन धाव घेत होतं. तसंही रेवाकडे कधी फारसा लांब मुक्काम झालाच नव्हता. सासू -सासरे, दीर नणंदा यांच्यातच मश्गुल असलेल्या रेवाजवळ आईसाठी वेळ नसायचा.
पण चार वर्षापुर्वी तिचे सासरे गेले आणि मागच्या वर्षी नातसून बघुन सासूबाई ही गेल्या. निदान आतातरी रेवाकडे थोडे दिवस रहाता येईल. सुमतीबाईंनी खुप आशेनी रेवाकडे विषय काढला.
“थांब बाई आई ! नुकतं ह्यांच्या आईच्या व्यापातुन मोकळीक मिळालीय. लगेचच पुन्हा नव्या जोडप्या भोवती गर्दी नको व्हायला. मिळू दे माझ्या सुनेला जरा एकांत. माझ्यासारखं मन मारायला नको तिला. आणि तसंही मी माझ्या माहेरचं लावलं तर तीही तिच्या माहेरच्यांकडे वळेल नं. सुन जवळ सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरतच गं. तुला नाही कळणार ते. या आजकालच्या अती स्मार्ट मुली! नको उगाच भलता पायंडा पडायला” रेवानी तिच्या अडचणींचा डोंगर पुढे ठेवला.
“हो गं बाई ! तुझंच खरं. मला कुठे सुना सांभाळाव्या लागल्यात” सुमती बाई सवयीनं मनातच बोलल्या. एकुण काय, आधी सासुरवाशिण म्हणुन आणि आता सुन घरात आली म्हणुन रेवाच्या घरात म्हणा की मनात आईसाठी फारशी जागा नव्हती.
अशातच मुंबईच्या मामेभावाकडे नातवाचं लग्न निघालं, सर्वांचा एकत्र जायचा बेत ठरला. दादाही सुमतीबाईना आणि माईला तोंडभरून ‘या’ म्हणाला.
खुप दिवसांनी इतरांच्याही भेटी होणार होत्या. म्हणजे आठ -दहा दिवस आरामात निभणार होते, मनमोकळं बोलायला, ऐकायला मिळणार होतं. सुमती बाई मनानं कधीच प्रवासाला निघाल्या होत्या.
लग्न घर पाहुण्यांनी भरलेलं होतं. काही नवी मंडळीपण दिसत होती. बहुधा सुनबाईच्या माहेरची होती. मेंदी, बांगडया भरणं यासोबतच ब्युटीशियनकडुन शरीराचे लाड पुरवले जात होते.
साडी नेसवणाऱ्या मुली आल्या. ही तर हद्दच होती. “नवनवी फॅडं!” म्हणुन नाकंही मुरडल्या गेली. सुमतीबाई मात्र सारं मन लावुन बघत होत्या. खरं तर सभोवताल इतकी माणसं बघुनच जीव हरखला होता.
लग्न तर शाही थाटात संपन्न झालं. नवरी पालखीत तर नवरदेव छत्र – चामरं घेऊन बोहल्यावर चढले. सभोवताल तर रंगांची उधळणच होती. निरनिराळया साडया, घागरे लेवुन मिरवणऱ्या बायका मुलींसोबतच शेरवानी, धोती, कुर्ते घातलेली मुलं–माणसं यांनीही मांडवाची शोभा वाढलेली.
सुमतीबाईंना आठवलं, पुर्वी मांडवात रंगारंग कपडयांची मिजास फक्त बायकांचीच! पुरूष मंडळींचे कपडे साधारण एकाच छापाचे असायचे, काळपट पँट अन् चौकडयांचे नाही तर रेघाटी शर्ट. प्रभाकररावही त्यातलेच!
एकदा हट्टाने सुमतीबाईंनी कोस्याचा झब्बा शिवला होता त्यांच्यासाठी. आधी कुरकुरले पण मग खुप वर्ष तोच झब्बा वापरला खुप ठिकाणी. आठवणीचा तागा उलगडला होता आणि मन त्यात गुरफटलं होतं.
“काय सुमाताई, कुठे हरवल्या?” पाठीवर थाप देत दादा विचारत होता. “कुठे रे ! इथेच तर आहे” स्वतःला सावरत त्या भानावर आल्या. “तर काय गं! अख्खी हयात गेली संसार करण्यात अन् या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या आपल्याला शिकवताहेत” माई बोलत होती.
“हो ना!! कानामागुन आल्या आणि तिखट झाल्या” वहिनींनी दुजोरा दिला. एकुणच जेष्ठ महिला मंडळ रंगात आलेलं होतं. “पुर्वी सासरच्यांच्या तक्रारी आता सुनेच्या कागाळया!!! माईंला स्वत:भोवती लोकांना गोळा करणं छान जमतं. जिथे तिथे हीच्या आपल्याच कथा!” सुमतीबाईंना तो तक्रारीचा सुर नकोसा वाटला इतक्या छान वातावरणात. “असू दे गं चालायचच, आपण लक्ष देऊ नये.” त्या समजावणीच्या सुरात म्हणाल्या.
“परदुःख शितल असतं गं! तुझ्या मुली सांभाळुन घेतात म्हातारपणी तुला काय कळणार सुनांचं वागणं.” माई उसळलीच. सुमतीबाईंनाही वाटलं ताडकन् बोलावं, सांगावं, “बायांनो, मला पण तडजोडी कराव्याच लागतात तुमच्यासारख्या…” पण मनातलं मनातच राहीलं नेहमीप्रमाणे. तसंही चारचौघात आपलं मत ठासुन मांडणं त्यांना जमलंच नाही सगळा संवाद मनाशीच व्हायचा.
“आता आल्यासरशी रहा हो महीनाभर दोघीजणी” वहिनीचा आग्रह सुरू होता. मग अण्णा ही मागे लागला “थांबा!” म्हणुन.
“महीनाभर!” परतीच्या प्रवासातल्या सोबतीचा प्रश्न सुमतीबाईंसमोर आs वासुन उभा झाला. “आलो तसंच सर्वांसोबतच जाऊ या गं! परत सोबतीचा प्रश्न उभा होइल समोर.”
“दोघी एकमेकींना सोबत असतांना आणखी कोणी कशाला हवं? पण दादा आमचा महीनाभराचा मुक्काम तुमच्या घरात सोसवेल?” माईचा प्रश्न परखड होता.
“न सोसायला काय झालं?” वहिनी पुढे होत म्हणाली. “थांबा हो सुमावन्स, माईची तेवढीच लेक सुनेच्या बंधनातुन सुटका.”
“तसंही कुरकुरायला आमच्या सुना घरात असणार कुठे? बाहेरगावी जातायत त्या म्हणुन तर आग्रह करतोय ना. नाहीतर एरवी कुणाला बोलवायचं म्हटलं की यांची तोडं वाकडीच असतात हो सुमावन्स. बाकी माईंना सवयीचं असेल सारं हो ना?” आता धाकटी वहिनीही पुढे सरसावली.
“थांबा गं! आता महीनाभर आमची दोघांचीही मुलं जाताहेत युरोपच्या टुरवर फक्त आपण म्हातारेच करू या एंजॉय.” दादा निर्वाणीचं बोलला अन् मग त्या दोघी तिथेच थांबल्या.
तसंही आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा असा योग जुळुन येणं दुरापास्तच होतं. जमेल तितकं एकमेकांच्या सहवासाचं सुख उपभोगुन घ्यायचं, स्पर्श शोषुन घ्यायचे, आठवणी उजळायच्या खुप ऐकायचं, खुप बोलायचं सुमतीबाई मनापासुन सारं उपभोगत होत्या.
‘माहेरपण माहेरपण!’ म्हणत दोघीही छान एंजॉय करत होत्या आणि त्यांचे लाड पुरवतांना भाऊ – वहिन्यांना समाधान वाटत होतं. आयुष्यभरात कधिही राग -द्वेषाला थारा न देता मनापासुन निरपेक्ष प्रेमाने निभावलेल्या नात्याला म्हातारपणी आलेलं हे गोमटं फळ खुप लोभस होतं.
तसं नाही म्हणायला वहिन्यांची सहानभूतीची सुई माईकडे अंमळ जास्तच झुकत होती, ‘लेक- सुनेच्या बंधनातली’ म्हणुन. थोरल्या वहिनीने माईची आंबोळ्यांची फर्माईश लगोलग पुर्ण केली’ सुनेच्या राज्यात कुठे मनाजोगतं खायला मिळत असेल?’ म्हणुन.
खरं तर रेणू मुलांच्या, सुनिल रावांच्या फर्माझ्शी पुर्ण करण्यात आणि रोजच्या कामाच्या धबडग्यात इतकी गुंतलेली असायची की, सुमतीबाईंना तिच्याजवळ स्वत:ची आवडनिवड व्यक्त करतांना संकोचच वाटायचा.
तसंही रेणूला रोजचा ठरलेला स्वयंपाक करण्या इतपतच उल्हास होता आणि सुमतीबाईंना एकटया स्वत:साठी काही करणं आताशा नको वाटायचं. एकुणच जिभेला आणि मनाला आवरूनच ठेवावं लागायचं.
“झालं आता या वास्तुचे थोडेच दिवस राहिलेत, आम्ही आहोत तोवर वाटे-हिस्से करून मुलांना वाटुन द्यायचं.” दादा सांगत होता.
“फ्लॅटस्कीममधे प्रत्येकाला एकेक फ्लॅट नावावर करून देऊ. आमच्या माघारी भांडणं नकोत त्यांच्यात.” अण्णाही गप्पात सामील झाला.
“आम्ही मात्र एकत्रच राहू हं! आता या वयात कुठे वेगळं रहा अन् सुनांच्या स्वाधीन व्हा.” धाकटी वहिनी म्हणाली तसं माई खिदळली, “हो ना, नव्या देवदूतापेक्षा जुना सैतान बरा.” आणि साऱ्याजणी खळखळुन हसल्या.
अण्णा सांगत होता उत्साहाने, “आता सुबोधतर काही त्याची अमेरिका सोडत नाही, माझ्या जागेत ओल्ड एज होम काढा, असं म्हणाला. त्याचंही म्हणणं योग्यच आहे म्हणा.”
“केंव्हा होइल रे तो वृध्दाश्रम पुर्ण?” सुमतीबाईनी अधिरतेने विचारलं आणि अण्णाची भुवई उंचावली.
अण्णासोबत गर्दीच्या रहदारीतुन येतांना सुमतीबाईची छातीच दडपली. “आता आल्या आहात ना मग सगळ्यांना भेटुन घ्या गं! त्या निमीत्ताने आमच्याही भेटीगाठी होतील सर्वांशी.” म्हणत दादा आणि अण्णानी दोघींना नातेवाईक, मित्रमंडळींना भेटीला नेण्याचा सपाटाच लावला.
कुणाकडे जोडीदार गेलेला, कुठे अर्धांग अंथरूणाला खिळलेलं, जिथे दोघंही चालत– फिरते आहेत तिथे सुद्धा एकाकीपणा ठासुन भरलेला. सातासमुद्रा पल्याड गेलेली लेकरं सततचं सान्निध्य देऊ शकत नव्हती.
परदेशस्थ मुलांमुळे मिळालेल्या ग्लॅमरची किंमत म्हातारपणी एकटं राहुन चुकवावी लागत होती. आणि जिथे मुलं जवळ होती तिथेही मनोमन दुरावाच निर्माण झालेला.
आपल्याच सोबत्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळचं हे चित्र बघुन चित्त सैरभैर झालेलं. भेटींमधे, संवादात निखळ हास्य, प्रसन्नता नव्हती राहीलेली.
रस्ताही पुर्वीच्या ओळखीच्या खाणाखुणा विसरलेला. सुमतीबाई विलक्षण अस्वस्थतेने सारं न्याहाळत होत्या आणि अण्णा त्यांना.
कौपेश्वराच्या मंदीरापाशी अण्णाने गाडी थांबवली. पुर्वीचं छोटेखानी देऊळ मोठ्ठं देवस्थान झालेलं. परक्या नजरेनं सारं न्याहाळणाऱ्या सुमतीबाईंना गाभारा मात्र जुनाच दिसला.
ओळखीची खुण पटली तसा मनोभावे नमस्कार करून त्या सभामंडपात जराशा टेकल्या. नजर पडेल तिथे गितेतले श्लोक रंगवलेले होते. वाचता वाचता त्या स्वतःशीच हसल्या.
“काय गं, कां हसली?” अण्णा विचारता झाला. “काही नाही रे ! त्या श्रीकृष्णाला आठ बायका अन् प्रत्येकीचे दहा-दहा मुलं. कितीही केलं तरी एका तरी लेक- सुनेला जाणिव असेल त्याची? इतक्या लेेक-सुनांना सांभाळतांनाच निष्काम कर्मयोग शिकला असेल तो.”
उद्वेगाला वाट मिळाली होती मनातलं ऐकवायला कुणी भेेटलेलं होतं. “काय होतंय सुमाताई? मोकळी हो मनातलं काढुन टाक सारं.” अण्णानं मायेने पाठीवर थोपटलं आणि सुमतीबाईंच्या डोळ्याला धारा लागल्या.
“काही नाही रे ! खुप वेगळं, हातातुन सारं निसटुन गेल्यासारखं वाटतं सारं”
“कां गं, लेकीशी कुरबुर? की जावईबापुंची नाराजी?”
“नाही रे! देवमाणुसच सुनिलराव म्हणजे. मुलगा काय करेल इतकं केलं त्यांनी ह्यांचं, माझं” दोन्ही गालांना हात लावत त्या म्हणाल्या.
“पण काहीतरी बदललंय रे!” खुप सांगायचं होतं त्यांना. नातवांचं, रेणूचं दुर गेल्यासारखं वाटणं, रेवाचं आपल्यातच मश्गुल असणं, एकटेपणा, आवडीनिवडींची होणारी उपेक्षा, बाहेरच्यांसमोर होणारी अडचण…..
खुप आत आत साठलेलं बाहेर पडू बघत होतं, पण एकावर एक कढ येत गेले आणि शब्द त्यातच विरघळले. अण्णा शांत होता खुप काही समजल्त्यासारखा. एका क्षणी समजुन उमजुन त्या सावरत म्हणाल्या, “कधी वाटतं हयांच्या आधी मी जायला हवं होतं.”
“बरं झालं, तसं नाही झालं ते. अगं पेलाभर पाण्यासाठी तुझ्यावर अवलंबुन असलेले प्रभाकरराव तुझ्याशिवाय राहू तरी शकले असते? किती फरफट झाली असती त्यांची” न राहवुन अण्णा मधेच बोललां.
“म्हणुन परवा वृद्धाश्रमाची चौकशी केलीस? विचारही करू नकोस तो. अगं मुलांबाळांपासुन दुर राहुन काय सुख मिळणार? स्वतःच्याच अहंकाराने आपल्याच परतीच्या वाटा बंद करून वृध्दाश्रमात आलेलेसुध्दा शेवटी आपल्या माणसांकडे जायला आसुसतांना बघतोय ना मी. तिथेही सुख लाभतच नाही”
अण्णा खुप मनातलं बोलत होता, “अगं, म्हातारपणी जवळ रहाणारी मुलं म्हणजे पंगतीत मांडलेला पाट! जरा कुठे काही टोचलं, बोचलं म्हणुन पाट सोडुन उठायचं नसतं. शेवटी जवळची मुलंचआधार म्हातारपणचा!”
सुमतीबाईंना सारं पटत होतं, मान्यही होतंच पण. त्यांनीच रेखाटलेल्या सुंदर प्रतिमेचं आता त्यांना ओझं वाटत होतं.
क्षणभर त्यांनाही वाटलं मोठ्याने ओरडावं, सांगावं सर्वांना, “मलाही म्हातारपणच्या व्यथा, सल आहेत रे! नका मला सुखाच्या राशीवर बसलेली समजुन तुमच्यातुन वगळू….” पण तोंडून शब्द निघालेच नाहीत. मन शांतवलं तसं सुस्कारा टाकुन बहिण- भाऊ परतले.
मुक्काम संपायचे दिवस जवळ आलेले तेव्हा सुमतीबाई रेवाकडे गेल्या. रिकाम्या हाती कसं जायचं? म्हणुन जातांना साग्रसंगीत अहेर नेला.
चार दिवसाच्या रेवाकडच्या मुक्कामात नातसुनेची ‘गोड बातमी’ कळली अन् सुमती बाई स्वतःच मोहरल्या. प्रभाकररावांची मनापासुन आठवण झाली त्यांना. “अहो! प्रवाहाला नवी धार फुटतेय हो!” सुमतीबाई मनाशीच पुटपुटल्या.
“आई, पुढच्या महिन्यात पाळणा करतेय सुनेचा तू पण ये गं.” रेवाच्या निमंत्रणाला हो म्हणायच्या आधी त्यांच्यासमोर प्रवासातल्या सोबतीचा प्रश्न उभा झाला. रेवाच्या गोऱ्यापान, नाजुक सुनेला त्यांनीच घेतलेल्या हिरव्या चणिया चोलीत, फुलांच्या दागिन्यांनी सजलेलं बघायची खुप इच्छा होती त्यांना, पण सारखं सारखं येणं जाणं, स्टेशनवरून ने आण करणं याचा प्रश्न होता.
“वेळेवर बघू” म्हणत सुमतीबाईंनी विषय संपवला आणि रेवानेही ‘आलीच आहे तर थांबुन जा, डोहाळजेवणापर्यंत’ असं काही म्हटलं नाही. आईलाही काही सांगायचं-बोलायचं असेल तिच्याही मनाचा कानोसा घ्यावा असा विचार सुध्दा रेवाच्या मनात आलेला नव्हता.
परतीचे दिवस जवळ आलेले. ‘आलोच आहोत तर भेटुन जावं’, म्हणत जावेकडे भेटायला गेलेल्या सुमतीबाईं तिथेच दोन दिवस मुक्कामी थांबल्या.
जेवढयास तेवढं बोलत सासूला द्यायचं तितकंच महत्व देणारी जावेची सुन आणि तिच्या कागाळया करणारी जाऊ यांना निरखत सुमतीबाईंचा वेळ कसा गेला ते त्यानाही कळलं नाही. संध्याकाळी घरी आलेल्या पुतण्याला बघुन सुमतीबाईंना कळेचना आता आत जायचं की बाहेरच थांबायचं? जाऊ मात्र दिवाणावर तशीच लोळत पडलेली. “का गं, बरं वाटत नाही कां आई?” सुमतीबाईना बसण्याची खुण करत पुतण्या जावेजवळ बसला.
“हो रे! जरा पाठीत छातीत दाटतय.” जावेचं उत्तर. तिच्या औषधपाण्याची चौकशी करून, पथ्य पाळण्याची सुचना करत तिच्या पाठीवर हात फिरवुन तो आत गेला अन् जाऊ कुरकुरली, “बस्स ! एवढीच किंमत मला. तुमचं बरं आहे बाई. मुलगी प्रेमाने करते सारं”
सुमतीबाईंना वाटलं म्हणावं, ‘किती कुरकुरतेस तू! अगं मुलगा घरी यायच्या वेळेसही समोरच्या खोलीत ऐसपैस पसरायला मिळतं हेच किती छान आहे. माझ्यासारखं संकोचाने संध्याकाळी आतल्या खोलीत नाही बसावं लागत. त्याने पाठीवरून आत्मीयतेने फिरवलेल्या हाताचं मोल नाही लक्षात येत तुझ्या? अगं अशाच मायेच्या, हक्काच्या स्पर्शाला आचवलेय, घरातल्या मोकळेपणाला दुरावलेय मी.” पण ओठ मिटलेलेच राहीले.
”आपल्याला मुलगा असता तर.. आपणही असंच मोकळं वागलो असतो, नाही?” क्षणभरासाठी तरी मनात विषाद, हेवा दाटुन आला. दुसऱ्याच क्षणी तो विचार झटकुन सुमतीबाई भानावर आल्या.
सर्वांचा निरोप घेत, भरल्या डोळ्यांच्या अण्णा, दादा आणि दोन्ही वाहिन्यांना प्लॅॅटफॉर्मवर तसंच सोडुन गाडी पुढे सरकली अन् डोळयांना काही दिसेनासंच झालं. ”निट जा, काळजी घ्या, जपुन रहा” कानांत शब्द घुमत होते.
जरा वेळानं दोघीही सावरल्या. आता घरचे वेध लागलेले. प्रवास संपला. खुप बोलणं झालं, साऱ्यांना भेटणं झालं कौतुक झालं, कौतुक केलं. उतारवयातल्या भेटीगाठी पुन्हा होतील न होतील, असे आनंदाचे क्षण पुन्हा लाभतील न लाभतील म्हणुन मनात गोंदवुन घेतलेले. पण ‘सारं कसं छान आहे’ ही स्वतःची प्रतिमा जपतांना मनाच्या तळाशी असलेले सल तशीच राहिली.
गाडी शहरात शिरतांना ओळखीच्या खुणा दिसू लागल्या. आता केंव्हा घरी पोहचतो असं झालेलं. मनात गेल्या महिन्याभरात उपभोगलेल्या आनंदाच्या उर्मी उफाळुन येत होत्या, त्या कुणापाशीतरी व्यक्त केल्याशिवाय शांत होणार नव्हत्या.
माईचा अजित स्टेशनवर घ्यायला आलेला. त्याला हक्काने कुरवाळत माईची बडबड, चौकशी सुरू होती.
अजितजवळ बॅग देत सुमती बाई मागोमाग मुकाट चालत होत्या. रेणूला घ्यायला येणं जमणार नव्हतं, तिने तसं आधीच अजितला सांगितलेलं. “पुनः माईच्या घरी जायचं? प्रवासाने शरीर आंबलं होतं. म्हणजे तिच्या सुनेला तिच्या सोबत आपलीही उस्तवार करावी लागेल. पुन्हा नकोच ते! आपण घराजवळ रस्त्यातच उतरू या.”
मनाशी काही ठरवुन सुमतीबाईंनी गाडी मधेच थांबवली आणि माईच्या काळजीला, अजितच्या आग्रहाला न जुमानता त्या उतरल्या. खरं तर घरापर्यंत गाडीने जावं वाटलं, पण मग अजित, माईला ‘या,बसा!’ करतांना रेणूच्या कामात अडथळा आला असता.
संकोचाने त्या खोदलेल्या रस्त्याचं निमित्त करत मधेच उतरल्या. उतरतांना माईने हातात हात हात धरले. महिन्याभराचं माहेरपण संपलं होतं. रोजचंच आयुष्य पुनःसुरू होणार होतं. डोळ्यातलं पाणी परतवत माई गाडीत बसली….
ऑटोरिक्षातुन ओळखीच्या नजरेने सुमतीबाई भोवताल निरखत होत्या. रस्त्याचं काम त्या टोकापर्यत झालेलं होतं. फाटकाशी रिक्षातुन उतरतांनाच, रेणूच्या दिराची गाडी त्यांच्या नजरेस पडली.
समजुन उमजुन त्या बाजुच्या दाराने आत गेल्या. पुन्हा एकदा त्यांना जावेचं समोरच्या खोलीत मुलासमोर लोळत पडणं आठवलं. सुस्कारा टाकत, स्वच्छ होऊन त्या आत खोलीत लवंडल्या.
वर गच्चीत सारे जमलेले होते. हसण्याचे आवाज येत होते. आजीची चाहुल लागलेला नातू खाली आला अन् हात धरून गच्चीत घेऊन गेला.
“अगं बाई आई!! आलीस?” म्हणत रेणू सामोरी आली आणि आजच खरेदी केलेला, आताच्या सेलीब्रेशनचं कारण ठरलेला, मायक्रोवेव्ह ओव्हन समोर घेऊन गेली.
त्या आवाज आणि आग नसलेल्या पण आच असलेल्या, सुबक, पेटीकडे भारावल्यागत बघतांना तिच्या चकचकीत झाकणात सुमतीबाईंना आपलेच प्रतिबिंब दिसले.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.