नोकरी करणाऱ्या लोकांना करोडपती होणे शक्य आहे का?
सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात
बहुतेक वेळा आपल्या सर्वांचा असा समज असतो की बिझनेस करणारे लोकच गर्भश्रीमंत होऊ शकतात. करोडपती होण्यासाठी स्वतःचा मोठा व्यवसाय करणे आवश्यक असते.
नोकरदार, दर महिन्याला पगार मिळवणाऱ्या लोकांना ते कधीच शक्य होणार नाही.
परंतु हे खरे नाही. आपल्या आजूबाजूला नीट पाहिलेत तर असे लक्षात येईल की योग्य प्रकारे आणि नियमित गुंतवणूक करणारे अनेक नोकरदार लोक करोडपती झाले आहेत. तुम्हालाही हे सहज शक्य आहे.
नोकरी करूनही गर्भश्रीमंत अथवा करोडपती होण्यासाठी काय करावे याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत
१. सर्वात महत्वाचे हे की नोकरी असो अथवा व्यवसाय आपल्याला आपल्या गुंतवणुकीतून भरपूर पैसे मिळवायचे असतील, तर लवकर सुरुवात करणे आवश्यक असते. आपण आज नोकरी असणाऱ्या, पगार मिळवणाऱ्या लोकांचा विचार करणार आहोत.
२. वयाच्या साधारण २२/२३ व्या वर्षी नोकरी मिळतेच. भलेही पगार कमी असेल परंतु काही नियमित उत्पन्न नक्की सुरू होते.
नेमकी याच वेळी तरुण तरुणींना स्वतःचा पैसा मिळायला लागल्यामुळे मौजमजेसाठी खर्च करण्याकडे त्यांचा कल वाढतो.
भविष्यासाठी सेविंग्स करण्याचे लक्षात येत नाही. परंतु असे न करता तरूणांनी सुरुवातीपासूनच जर पगारातील काही रक्कम बाजूला टाकायला सुरुवात केली तर अनेक वर्षे सेविंग्स केले जाऊन काही कालावधीनंतर त्यांना घसघशीत रक्कम मिळू शकेल.
३. आपल्या गरजांपैकी काही गरजा ह्या अत्यावश्यक, काही आवश्यक आणि काही गरजा चैन अशा प्रकारच्या असतात. पैकी अत्यावश्यक आणि आवश्यक गरजांवर खर्च करून उरलेले पैसे साठवावे. त्यांची योग्य प्रकारे गुंतवणूक करावी. चैन म्हणून करायच्या गोष्टी योग्य गुंतवणूक करून पैसे साठवून कराव्यात.
अत्यावश्यक गरजा – दूध, किराणासामान, कपडे, घरभाडे किंवा ई एम आय, सर्व बिले इत्यादी
आवश्यक गरजा – दुचाकी किंवा चारचाकी, पेट्रोल, काही वेळा बाहेरचे खाणे नाटक सिनेमा इत्यादी
चैन – परदेशवारी, महागडे कपडे, दागिने इत्यादी
तर अशा प्रकारच्या अत्यावश्यक आणि आवश्यक गरजांसाठी खर्च करून उरलेले पैसे योग्य प्रकारे गुंतवावे.
यासाठी अर्थतज्ञ सहसा ५०:३०:२० असा फॉर्म्युला सांगतात. पगाराच्या ५० टक्के रक्कम अत्यावश्यक गरजांसाठी, ३० टक्के रक्कम आवश्यक गरजांसाठी तर २० टक्के रक्कम गुंतवणुकीसाठी वापरावी असे ते सांगतात.
हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया.
समजा ‘क्ष’ व्यक्तीला रु. २००००/- प्रति महिना इतका पगार आहे. तर त्या व्यक्तीने दर महिन्याला पगाराच्या ५०% म्हणजे रु. १००००/- अत्यावश्यक गोष्टींवर, ३० % म्हणजे रु. ६०००/- आवश्यक गरजांवर आणि २० % म्हणजे रु. ४०००/- गुंतवणुकीसाठी खर्च करावे.
अशा प्रकारे वयाच्या २२/२३ वर्षापासून एखाद्या व्यक्तीने दर महिन्याला नियमित गुंतवणूक केली तर चक्रवाढ व्याज पद्धतीने त्या व्यक्तीस भरपूर परतावा मिळू शकतो.
आम्ही असे मुळीच म्हणत नाही की नोकरदार व्यक्तीने चैनीच्या गोष्टी करू नयेत.
परंतु अनियोजित पद्धतीने न करता नीट आर्थिक नियोजन करून अशा गोष्टी केल्यास त्या करणे सहज शक्य तर होतेच शिवाय आर्थिक बोजा देखील पडत नाही.
४. वर दिलेल्या उदाहरणात आपण हे पाहिले की अगदी कमी पगार असेल तरीही सुरुवातीपासूनच योग्य रीतीने गुंतवणूक केल्यास भरपूर मोठी रक्कम उभी करता येऊ शकेल.
परंतु अनेक तरुण तरुणी नेमकी हीच गोष्ट करण्याचे टाळतात आणि गुंतवणुकीची सवय लावून घेण्यास उशीर करतात.
त्यामुळे गुंतवणुकीची सवय उशिरा लागली की मोठी रक्कम उभी करण्यास वेळ तर लागतोच परंतु चक्रवाढव्याज पद्धतीचा जो फायदा मिळायला हवा तेवढा मिळत नाही.
यासाठी आम्ही वारंवार असे सांगतो की अगदी सुरुवातीपासूनच मिळणाऱ्या पगारातील काही रक्कम आपल्या सुरक्षित भविष्यासाठी बाजूला काढायला हवी.
५. जसजशी आपल्याला मिळणार्या पगारात वाढ होऊ लागेल तसतशी आपण करत असलेल्या गुंतवणुकीच्या रकमेत देखील वाढ होणे अपेक्षित आहे.
हे मान्य आहे की जरी पगार वाढला तरी पगारदार व्यक्ती वरील कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील वाढत असतात. परंतु त्याच जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आपण करत असलेल्या गुंतवणुकीत वाढ करणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ मुलांचा जन्म होताच त्यांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करणे सुरू करावे, आपल्याला नोकरी मिळतात रिटायरमेंट नंतर मिळणाऱ्या पेन्शन साठी गुंतवणूक करणे सुरू करावे, आपल्याला एखादी परदेशाची सफर करायची असेल किंवा महागडा दागिना घ्यायचा असेल तर त्यासाठी काही वर्षे आधीपासून गुंतवणूक करावी म्हणजे अशा मोठ्या खर्चांचा एकदम बोजा पडत नाही.
६. गुंतवणूक करणे म्हणजे निव्वळ बँकेत पैसे ठेवणे किंवा एफ डी करणे असे नसून निरनिराळ्या सरकारी योजना, नॅशनल पेन्शन स्कीम, पब्लिक प्रोविडेंट फंड, एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्युचुअल फंड अशा सर्व प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी.
अर्थात अशी गुंतवणूक त्या बाबतीतील सर्व माहिती काढून तसेच योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षित रित्या करावी.
अवास्तव परतावा देण्याचा दावा करणाऱ्या फसव्या योजनांना भुलू नये. सरकारी योजना सुरक्षित आणि फायदेशीर असतात असा सर्वसाधारण अनुभव आहे.
अशा योजनांचा जरूर लाभ घ्यावा. आम्ही वेळोवेळी अशा सर्व योजनांची माहिती देणारे लेख पब्लिश करत असतो. त्यांचा लाभ घेऊन योग्य गुंतवणूक करावी.
तर अशाप्रकारे सुरुवातीपासून योग्य रीतीने आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास १५ ते २० वर्षांच्या कालावधीत चांगली मोठी रक्कम उभी करून करोडपती होणे नोकरदार वर्गाला देखील सहज शक्य आहे.
या लेखात सांगितलेल्या टिप्सचा वापर करून तुम्ही देखिल करोडपती होण्यासाठी जरूर प्रयत्न करा. या बाबतीतले तुमचे अनुभव आम्हाला कमेंट करुन सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.