मुलांना शिस्त लावताना एक गोष्ट फार महत्वाची असते.
मुले अनुकरण करत शिकतात. मुलांना त्यांच्या आजूबाजूला जी माणसे दिसतात त्यांचा प्रभाव मुलांवर पडत असतो.
यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे आई-वडिलांचा.
मुले अगदी कळायला लागल्यापासूनच आई-बाबांची प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक टिपत असतात.
आईवडिलांच्या चांगल्या सवयी मुलांना लागतातच, त्यासाठी विशेष कष्ट करावे लागत नाहीत.
पण याचबरोबर हे विसरता कामा नये की पालकांची एखादी वाईट सवय सुद्धा मुले पटकन उचलू शकतात.
मुलांना वाईट सवयी लागाव्यात असे कोणालाच वाटत नसते, पण या गोष्टी अगदी नकळत होतात.
पालकांच्या अगदी नकळतपणे त्यांच्याकडून काही वाईट गोष्टी केल्या जातात, काहीतरी चुकीचे बोलले जाते आणि मुले मात्र ते नेमकेपणाने टिपतात.
त्यांना संधी मिळताच ते त्याचे अनुकरण करायला बघतात.
अशाप्रकारे, मुलांना अनवधानाने या वाईट सवयी लागतात. मुलांना अचानक एखादी वाईट सवय लागली की बहुतेक वेळा त्याचा दोष मित्र-मैत्रिणींना दिला जातो.
पण बहुतेक वेळा पालकांना ठाऊकच नसते की या चुकीच्या गोष्टींचा उगम त्यांच्याच घरातून झाला आहे.
मित्रमैत्रिणींनो, हे चुकीचे आहे.. हो ना? हे टाळता यायला हवे.
आता यावर उपाय काय? त्याचसाठी हा लेख आहे.
मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून काय करावे, पालकांनी आपल्यात कोणते बदल करावेत हे सर्व आपण आधीच्या या संदर्भातील लेखांमध्ये पाहिले आहे.
पण या लेखात आपण अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट बघणार आहोत, ती म्हणजे मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी पालकांनी काय टाळले पाहिजे.
मुलांना वाईट सवयी लागण्यामागे पालकांच्या कोणत्या सवयी कारणीभूत असतात ते आपण बघूया.
१. स्वच्छता न पाळणे
लहान मुले बाहेर खेळताना, मस्ती करताना त्यांचे हात-पाय खराब होणे साहजिकच आहे.
मुलांचे हात-पाय खराब होतील, धुळीने माखतील म्हणून त्यांना खेळायला न पाठवणे हा पर्याय योग्य नाही.
पण त्याचबरोबर मुले आहेत, मातीत खेळणारच असे म्हणणे ही बरोबर नाही.
बहुतेक वेळा जेव्हा मुले बाहेरून खेळून येतात तेव्हा त्यांना हात, पाय, तोंड धुण्यासाठी सांगितले जाते.
पण पालक जेव्हा बाहेरून येतात तेव्हा ते तसे करत नाहीत.
पालक जरी मुलांप्रमाणे मातीत खेळायला जात नसले तरी एक सवयीचा आणि शिस्तीचा भाग म्हणून त्यांनी ते करयला हवे.
ही गोष्ट पालक मुद्दाम करतात असे नाही पण ही लक्षात न येण्यासारखी सवय मुलांना स्वच्छता न पाळण्यासाठी प्रवृत्त करू शकते.
यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत मुलांना गांभीर्य येत नाही.
याचबरोबर घराची, खोलीची साफसफाई करणे, आवराआवर करणे या गोष्टी केल्या पाहिजेत. पालकांना जर पसारा घालण्याची सवय असेल तर ती नकळतपणे मुलांमध्ये येते.
२. मारामारी करणे/ओरडणे
मुलांना मारणे ही अत्यंत चुकीची गोष्ट असली तरीही काहीवेळा रागात पालकांकडून मुलांवर हात उचलला जाऊ शकतो.
कधी मार नाही तरी मुलांवर आरडाओरडा केला जातो.
त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली तर त्यांच्यावर आवाज चढवून बोलले जाते.
घरात सुद्धा वादावादी, भांडणे झाली तर आईवडील एकमेकांशी मोठ्या आवाज बोलतात, क्वचित शिव्या सुद्धा दिल्या जातात.
या गोष्टी घडताना रागाच्या भरात पालकांच्या लक्षात येत नाहीत पण मुले मात्र या सगळ्या गोष्टी बघत असतात. यामुळे त्यांना मारणे, ओरडून बोलणे हे सगळे ‘नॉर्मल’ वाटायला लागते.
आईबाबांचे अनुकरण करणे मुलांना आवडते. यामुळे मग मित्रांशी मारामारी, शाळेत भांडणे झाली की ओरडून बोलणे सुरु होते.
आईबाबांकडून ऐकलेल्या शिव्यांचा अर्थ कळत नसताना, केवळ भांडणे झाली की ते शब्द उच्चारायचे म्हणून शिव्या सुद्धा दिल्या जातात.
मुलांना अशा सवयी लागल्या की त्यांच्या संगतीची शहानिशा केली जाते. पण या सवयींसाठी घरचे, पालक जबाबदार असतात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
३. वेळ न पाळणे
तुम्हाला जर ऑफिसला, कोणत्या समारंभाला वेळेवर जायची सवय नसेल तर तुमची ही वाईट सवय मुलांना लागण्याची पूर्ण शक्यता असते.
खरेतर वेळ न पाळणे ही खरेच एक वाईट सवय आहे. याचा मुलांना पुढे जाऊन त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात बरेच नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता असते.
वेळ न पाळणाऱ्या व्यक्तीचे इम्प्रेशन वाईट होते. कदाचित तुम्हाला तुमच्या या सवयीमुळे काही नुकसान झाले नसले तरी तुमच्या मुलांना होऊ शकते हे लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही ठिकाणी वेळेवर, किंवा वेळेच्या आधीच पाच मिनिटे पोहोचणे ही चांगली सवय मुलांना लागायला हवी. त्यासाठी पालकांनी वेळ पाळणे, वेळेवर सगळ्या गोष्टी करणे गरजेचे आहे.
४. खाण्यापिण्याच्या वाईट सवयी
हॉटेलमधून जेवण मागवणे, सतत बाहेरून आणून खाणे या गोष्टी जर तुम्ही पालक म्हणून करत असाल तर त्या वेळीच थांबायला हव्यात.
रुचीपालट म्हणून कधीतरी बाहेरचे खायला हवेच, मुलांना सगळ्या प्रकारच्या खाण्याची सवय हवी त्यामुळे बाहेरचे आजिबातच खायचे नाही असे नाही.
घरच्या सकस आणि चौरस आहाराचे मुलांना महत्व पटावे यासाठी पालकांनी सुद्धा घरी जेवण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
तुम्ही जर जंक फूड, फास्ट फूड जास्त प्रमाणात घरात आणत असाल, तर त्यात काही चुकीचे आहे हे मुलांना समजणार नाहीच.
डायबेटीस, हायपरटेन्शन या आजारांमागे खाण्या-पिण्याच्या सवयींचा मोठा हात असतो.
मुलांना पुढे जाऊन हे त्रास होऊ नयेत, त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना लहानपणीच योग्य त्या सवयी लावणे महत्वाचे आहे.
५. आळशीपणा
सकाळी उशिरा उठणे, घरातील पसारा न आवरणे, घरातील कामांचा कंटाळा करणे या गोष्टी जर पालक करत असतील तर मुलांना साहजिकच तीच सवय लागेल.
कधीतरी रुटीनचा कंटाळा येऊन आळशीपणा करणे वेगळे आणि आळशीपणा हेच रुटीन करणे वेगळे.
जर तसे होत असेल तर ती सवय जाणीवपूर्वक बदलायला हवी. पालक जर आळशी असतील तर मुले मोठी होताना आळशी तर होतातच.
शिवाय त्यांना जबाबदारीची जाणीव सुद्धा येत नाहीत आयुष्याबद्दल, कामाबद्दल हे अत्यंत बेफिकीर आणि हलगर्जी असतात.
मुले अशी होण्यामागे लहानपणी त्यांनी बघितलेला आईबाबांचा आळशीपणाच असतो.
मित्रमैत्रिणींनो, मुले वाढवणे हे एक अत्यंत जबाबदारीचे काम आहे.
मुलांना वाईट सवयी लागू नयेत यासाठी पालकांना अनेक नवीन सवयी लाऊन घ्याव्या लागतात तसेच जुन्या, वाईट सवयी जाणीवपूर्वक बदलाव्या लागतात.
आई-बाबा मुलांसाठी पहिले गुरु असतात असे म्हणतात ते यासाठीच.
या लेखात सांगितलेल्या आईबाबांच्या या ५ वाईट सवयी मुले नकळतपणे उचलतातच पण त्याबरोबरच वागण्या-बोलण्या संबंधित अनेक इतरही वाईट सवयी मुलांना लागण्याची शक्यता असते.
नखे खाणे, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर हात न धरणे, खाताना ओठांचा आवाज करणे, जोरजोरात बोलणे अशा सवयी नकळतपणे आईबाबांकडे बघून मुलांना लागू शकतात.
गाडी वेगाने चालवणे, दारू पिणे, सिगारेट पिणे, वाहतुकीचे नियम तोडणे अशा सामाजिक जीवनात महत्वाच्या असलेल्या सवयी सुद्धा मुले आईबाबांकडून शिकत असतात.
म्हणूनच जबाबदार मुले हवी असतील तर पालकांना अगोदर जबाबदार होणे गरजेचे असते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.