“ह्या वर्षी तरी पालखीक नेतयस ना…..??” थरथरत्या आवाजात भिकू पेडणेकरानी दशरथला विचारले. तसा तो वैतागला.
“ओ तात्यानु पडून रवा हो..?? या वयात खय पालखी…. पालखी करताव… हयसूर वेळ कोणाक हा…?? तुमचो नातू दोन वर्षांनी घरी इलोय. त्याच्याबरोबर राहू की चार दिवस… गेलो की पुन्हा दोन वर्षा येऊचो नाय….”
भिकू तात्यांच्या डोळ्यात पाणी आले. “तसा नाय रे झिला…. पण बरीच वर्षे झाली पालखी खांद्यावर घेऊन. आता लय वाटता रे जाण्यापूर्वी बघूची.” बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून कधी पाणी वाहू लागले ते कळलेच नाही.
भिकू पेडणेकर वय वर्षे ८५… सध्या सर्व काही बिछान्यावर. बाहेर पडले तर व्हीलचेयरवरच… मुलगा दशरथ पेडणेकर सध्या मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर…पण आता निवृत्तीच्या वाटेवर. तर नातू निशिकांत पेडणेकर इंजिनियर…सध्या परदेशात वास्तव्य. आला तरी केवळ दहा दिवसासाठी भारतात.
भिकू तात्या कोकणातून मुंबईत कामासाठी आले आणि पक्के चाकरमानी बनले. पण सणासुदीला कोकणात जाणे काही थांबले नाही.
दरवर्षी होळीला जायचे…. पालखी नाचावयाची….. कुटुंबासाठी नवस बोलायचं आणि तो फेडण्यासाठी पुन्हा पालखीला हजर राहायचे.
दशरथ लहानपणी त्यांच्याबरोबर जायचा पण लग्न झाल्यावर बायकोला घेऊन गेला आणि त्यानंतर गावाचे तोंड पाहिले नाही.
पुढे पत्नी गेल्या नंतर त्यांनीही गावी जाणे सोडले. गेल्या चार वर्षांपासून ते अंथरुणावर खिळून आहेत. दरवर्षी होळी आली की केविलवाण्या चेहऱ्याने दशरथला पालखीला नेण्यासाठी विनवतात.
पण कोणालाच त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुकाटपणे डोळे पुसत ते शांतपणे बसले. इतक्यात निशी आत आला…. “काय झाले पपा..?? आजोबा का असे बसलेत…??
“अरे काही नाही रे …?? गावी जाऊ म्हणतात पालखीला… बरीच वर्षे गेलो नाही, म्हणतात.. आता घेऊन चल… पण आता जमेल का ह्यांना प्रवास… ती धावपळ… त्यात कोकणातले रस्ते खराब…”
निशीने नुसतीच हम्म…!! करीत मान डोलावली. “पालखीबद्दल बरेच काही ऐकलं आहे मी… त्यांची इच्छा असेल तर चार दिवस जाऊया पपा…” तो सहज स्वरात म्हणाला.
“अरे काय….?? सोपे वाटते का तुला गावी जाणे. तिथे प्रवास बारा तासाचा…पाण्याचा प्रॉब्लेम. टॉयलेटचा प्रॉब्लेम..” दशरथ चिडून बोलले.
“तरीही माणसे राहतात ना तिथे …?? पपा जगात इथल्यापेक्षाही भयानक परिस्थितीत लोक राहतात. मलाही काम करताना मनासारखे काही मिळत नाही. चला यावर्षी जाऊच सगळे चार दिवस.. मी गाडीची सोय करतो” असे बोलून वळला पण नजरेच्या कोपऱ्यातून आजोबांच्या डोळ्यातील चमक त्याला सुखावून गेलीच.
नातवाच्या तोंडातून सर्व ऐकताना भिकू तात्याचे मन प्रसन्न होत होते. अंगात नवचैतन्य आले. दुसऱ्या दिवशी पहाटे ते निघाले. आपल्या मुलाचे आणि नातवाचे मन पालटू नये म्हणून भिकूतात्या स्वतःला फिट दाखविण्याचा प्रयत्न करीत होता.
दशरथलाही वडिलांचे हे रूप नवीनच होते. जसजसे गाव जवळ येऊ लागले तसतसे भिकुतात्याच्या चेहऱ्यावर उत्साह दिसू लागला. एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाने तो सारा गाव नजरेत साठवून घेत होता.
मध्येच नातवाला जुन्या आठवणी सांगत होता. निशीही कौतुकाने सगळे ऐकत होता.
घरी पोचताच एखाद्या राजप्रमाणे त्याचे स्वागत झाले. चुलतभावाने मिठी मारून त्याचे स्वागत केले. दोघांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते. रात्री दशरथ आणि निशी होळी पेटवायला गेले तेव्हा सर्वजण त्यांची मायेने विचारपूस करीत होते.
निशीने वडिलांना विचारलेही…. की ओळख नसताना देखील ही माणसे कशी आपलेपणाने बोलतात….?? दशरथ हसून म्हणाला “अरे… हीच तर खरी कोकणाची ओळख आहे.
परक्याशी देखील आपलेपणाने वागतात. आज ती आपल्याला भिकूची पोरं म्हणजेच आपली माणसे म्हणून ओळखतात.
दुसऱ्या दिवशी पालखी येणार म्हणून रात्रभर भिकू झोपलाच नाही. सकाळी लवकर उठून ठेवणीतले कपडे घालून तो पालखीची वाट पाहत बसला.
चुलत भावाला जवळ बोलावून त्याने कानात काही सांगितले तसे त्याने हसत मान डोलावली. मग दशरथ जवळ येऊन म्हणाला “तात्या बोलतत पालखी तुझ्या खांद्यावरून घरात घेऊन ये” काही न बोलता दशरथने मान डोलावली.
पालखी घराजवळ आली आणि दशरथने ती एक बाजूने खांद्यावर घेतली त्याच क्षणी त्याला भरून आले. एक वेगळीच सुखाची अनुभूती त्याच्या शरीरातून वाहू लागली.
त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. प्रत्यक्ष देवाला घेऊन आपल्या घरी चाललोय ही भावनाच त्याचा उर भरून येण्यास पुरेशी होती.
दाटल्या डोळ्यांनी त्याने अंगणात प्रवेश केला. समोर व्हीलचेय वर वडील बसले होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच त्याला कळले आपण आयुष्यात कोणते सुख कमाविले आहे.
वडील आश्चर्याने मागे का पाहताय..?? म्हणून त्याने मागे नजर वळवली आणि आश्चर्याचा अजून एक धक्का त्याला मिळाला. दुसऱ्या बाजूने निशी पालखी घेऊन उभा होता. अतीव आनंदाने सर्वांनी पालखीची पूजा केली आणि निरोप दिला.
दुसऱ्या दिवशी सर्व परत निघाले. प्रवासात दशरथ थट्टेत भिकूतात्याला म्हणाला.. “ओ तात्यानु.. देवाकडे काय मागीतलाव …??”
“अरे.. त्या देवाकडे काय सारखासारखा मागूचा.. आपला काय ता आपल्या नशिबात.. उगाच देवावर लोड कित्याक..? काय मागूचा हवा म्हणून खांद्यावरून घेवून येताव की काय..?? सर्व हसले.
दुसऱ्या दिवशी सर्व मुबंईला माघारी निघाले. रात्री घरी येऊन सर्व झोपी गेले. पण दुसऱ्या दिवशी भिकूतात्या उठलाच नाही. मेल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते.
बातमी कळविण्यासाठी दशरथने गावी फोन केला. फोनवर रडत रडत म्हणाला “पालखीला जायची त्यांची अंतिम इच्छा होती ती पूर्ण झाली आणि समाधानाने गेले..”
पलीकडून चुलते म्हणाले “शेवटची पालखी त्यांनी खांद्यावर घेऊन घरात आणली तेव्हाच म्हणाले होते जो पर्यंत माझा मुलगा पालखी स्वतःच्या खांद्यावर घेत नाही तोपर्यंत मला मरण देऊ नकोस.” काल तुम्ही दोघांनी पालखी खांद्यावर घेतलीत तेव्हाच त्याचे जाणे नक्की झाले होते.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.