आपली तब्बेत चांगली राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे हे तर आता सर्वांनाच माहिती झाले आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलला पाणी लागते. आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
पाण्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन योग्य प्रकारे होते. तसेच शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीतपणे चालते.
कोणी किती पाणी प्यावे ह्याचे काही नियम आहेत. साधारणपणे आपल्या वजनातील प्रत्येक २५ किलोला ४ ग्लास भरुन ह्या प्रमाणात पाणी प्यावे.
म्हणजेच एखादी व्यक्ति जर ५० कि वजनाची असेल तर त्या व्यक्तीने दररोज कमीतकमी ८ ग्लास पाणी प्यायलेच पाहिजे. श्रमाची कामे करणारे लोक, गरोदर स्त्रिया ह्यांनी तर ह्यापेक्षा जास्त पाणी पिण्यास देखील हरकत नाही.
अर्थातच हे पाणी एकदम प्यायचे नाही. दिवसभरात मिळून पाणी प्यायचे आहे.
आज आपण दिवसभरात कोणत्या वेळी किती पाणी प्यावे हे जाणून घेणार आहोत. अशा रीतीने पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. पण हेही आहेच की ह्या व्यतिरिक्त देखील आपल्याला जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी जरूर प्यावे.
अन्नापेक्षा देखील आपल्या शरीराला पाण्याची गरज असते.त्यामुळे पाणी पिण्यात कधीही टाळाटाळ करू नये.
ह्या आहेत दिवसभरातील पाणी पिण्याच्या वेळा
१. सकाळी उठल्याबरोबर १ ते २ ग्लास पाणी प्या
सकाळी उठल्यावर एकदम चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा आधी १ ते २ ग्लास पाणी प्यावे. रात्रभर झोपल्यामुळे आपण किमान ७ ते ८ तास पाणी प्यायलेलो नसतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली असते. ती भरून काढण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्यामुळे हायड्रेशन तर होतेच शिवाय पित्ताचा त्रास कमी होतो.
२. जेवणाआधी एक ग्लास पाणी प्या
जेवायला सुरुवात करण्याआधी एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांना फायदा होतो. ग्लासभर पाणी प्यायलेले असल्यामुळे कमी जेवूनही समाधान होते. पोट भरल्यासारखे वाटते. तसेच जेवणाच्या सुरुवातीला पाणी पिऊन जेवताना पाणी न पिणे असे केल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. त्यामुळे जेवणाच्या सुरुवातीला एक ग्लास पाणी पिणे सर्वांच्याच हिताचे आहे.
३. जेवण झाल्यावर १ ग्लास पाणी प्या
जेवताना फार जास्त पाणी पिऊ नये असे आपल्याला सांगितले जाते. जे योग्यच आहे. जेवताना गरज पडेल त्याप्रमाणे अगदी घोट, २ घोट पाणी प्यावे. त्यामुळे व्यवस्थित जेवण जाते. जास्त पाणी पित राहिले तर जेवण जात नाही आणि अशक्तपणा येऊ शकतो. मात्र जेवण झाल्यावर एक ग्लासभर पाणी जरूर प्यावे. ह्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होते. आणि न पचलेले अन्न आतडयातून पुढे सरकण्यास देखील मदत होते.
४. दुपारी कंटाळा आला असताना ग्लासभर पाणी प्या
दुपारी साधारण ३/४ वाजता आपल्याला अगदी कंटाळा येतो, मरगळ आल्यासारखे वाटते. अशा वेळी थेट चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा आधी एक ग्लास पाणी प्या. पाणी पिण्यामुळे ताजेतवाने वाटून उत्साह येतो. अनेकवेळा आपल्याला तहान लागली आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून दुपारी आवर्जून पाणी प्यावे. विशेषतः दिवसभर एसीत बसून काम करणाऱ्या लोकांनी ह्याकडे विशेष लक्ष द्यावे. कारण जास्त वेळ एसीत बसल्यामुळे डीहायड्रेशन होऊ शकते.
५. डोके दुखत असेल तर पाणी अवश्य प्या
डोकेदुखी हे डीहायड्रेशनचे लक्षण आहे. त्यामुळे डोके दुखत असेल तर पाणी प्यावे. थोड्याच वेळात बराच आराम मिळतो. तसेच अर्धशिशीचा त्रास असलेल्या लोकांनी आपले पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे, अर्धशिशीचा त्रास कमी होतो.
६. व्यायाम करताना स्मार्टली पाणी प्या
कोणताही व्यायाम सुरु करताना पाणी पिऊ नये. कारण पाण्यामुळे पोट भरले असताना व्यायाम केला तर डचमळून त्रास होऊ शकतो. परंतु व्यायाम करण्याच्या १ तास आधी पाणी जरूर प्यावे. त्यामुळे डीहायड्रेशन होत नाही. तसेच व्यायाम करून झाल्यावर भरपूर पाणी प्यावे.
७. झोपताना थोडे पाणी प्यावे
झोपायच्या आधी ग्लासभर पाणी पिऊ नये कारण त्यामुळे रात्री उठून बाथरूमला जावे लागू शकते आणि त्यामुळे आपली झोप डिस्टर्ब होऊ शकते. मात्र झोपण्याआधी घोटभर पाणी जरूर प्यावे त्यामुळे झोपेत तोंड आणि घसा कोरडा पडत नाही. शांत झोप लागते.
तर ह्या आहेत दिवसभराच्या पाणी पिण्याच्या सर्वोत्तम वेळा.
ह्या वेळांना तसेच एरवीही तहान लागली की आपण पाणी अवश्य प्यायले पाहिजे. त्यासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी भरून हाताशी ठेवण्याची सवय लावून घ्या.
आपण काम करत असलो तरी जवळ पाण्यानी भरलेली बाटली असली की बरोबर पाणी प्यायले जाते. कुठेही बाहेर जाताना देखील आपली स्वतंत्र बाटली बरोबर ठेवा. त्यामुळे बाहेरचे पाणी पिण्याची वेळ येणार नाही.
तसेच रात्री झोपताना देखील बेडजवळ पाण्याचा ग्लास अथवा बाटली ठेवा. त्यामुळे रात्री तहान लागून अस्वस्थ वाटले तर लगेच पाणी मिळू शकेल.
ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून आपण आपल्याला पाणी पिण्याची सवय लावून घेऊ शकतो जी आपल्या आरोग्याच्या हिताची आहे.
चांगल्या आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व आणि पाणी पिण्याचे प्रमाण, पद्धत समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.