मांडवी नदी, खरंतर खाडी.. फार मोठी आणि सुंदर आहे. पुलावरून जाताना सुद्धा इतकं सुंदर पात्र दिसतं की फेरीत तर काही विचारायलाच नको. कदाचित फेरी है माझ्या रोजच्या प्रवासाचा भाग नसल्यामुळे किंवा आयुष्यात बऱ्याच उशिरा फेरी म्हणजे काय हे समजल्यामुळे असेल पण मला फेरीतून जायला फार आवडतं.
पणजीत कामानिमित्त जाणं व्हावं आणि अगदी ढळढळीत दुपारी तीन वाजता काम संपावं, म्हणजे गोंधळ उडण्यासारखी गोष्ट आहे. असं झालं की ‘आता काय करूया?’ असा जरा प्रश्न पडतो.
मिरामार बीचवर जाऊन बसायची ती वेळ नसते, लांब कुठे अरंबोल किंवा वॅगॅतॉरला जावं तर सूर्यास्तापर्यंत थांबून परत घरी येताना होणारा उशीर परवडण्यासारखा नसतो.
आणि एवढं पणजीत आल्यावर संध्याकाळच्या आतच परत जायचं म्हणजे अगदीच बावळटपणा केल्यासारखं होतं.
तर लिहायचा मुद्दा असा की परवा अगदी असंच झालं, पणजीत काम निघालं म्हणून जरा जास्तच उत्साहाने गेले, मला वाटलं काम संपायला चांगले पाच वगैरे होतील मग मस्त संध्याकाळी बीचवर जाता येईल किंवा मांडवीपाशी बसून कणीस खाता-खाता सूर्यास्त बघता येईल आणि मग सावकाश घरी जाताना वाटेतच काहीतरी खायचं किंवा घरीच नेऊन आरामात खायचं असे बरेच मनसूबे रचत आम्ही पणजीत पोहोचलो खरे पण कसलं काय?
तीनच्या आतच काम आटोपलं आणि अशा अडनिड्या वेळेत काय करायचं हा प्रश्न पडला. तीनच्या उन्हात गाडी चालवायचा पण कंटाळा आला होता आणि तिथेच कुठेतरी बसायचा सुद्धा.
अशातच अचानक ‘डॉक्टर सलीम अली बर्ड सँच्युअरी’ची आठवण झाली. रायबंदरवरून फेरीत बसलं की चोडणला पोहोचतो आणि तिकडे ही सँच्युअरी आहे हे साधारण माहीत होतं पण तिथे जाण्याची वेळ मात्र माहीत नव्हती.
सारासार विचार केला तर पक्षी बघायची ही वेळ नक्कीच नाही हे कळत होतं पण जाऊन बघायला काय हरकत आहे? नाहीतरी वेळ घालवायचाच आहे! असं वाटलं आणि आम्ही फेरीत बसलो.
दुपारच्या वेळेत सुद्धा चोडण फेरीत बऱ्यापैकी गर्दी असते हे या निमित्ताने समजलं. अजून एक गंमतीचा भाग म्हणजे गोव्यात फेरीवर लिहिलेल्या नावाचा आणि ती जात असलेल्या ठिकाणाचा बऱ्याचदा परस्परांशी काहीच संबंध नसतो.
त्यामुळे मझ्या मनात पहिल्यापासून ही फेरी नक्की तिथेच जाणार आहे ना? हा प्रश्न घर करुन होता पण सोबत नवरा असल्यामुळे शंका बोलून दाखवायची सोय नव्हती.
मांडवी नदी, खरंतर खाडी.. फार मोठी आणि सुंदर आहे. पुलावरून जाताना सुद्धा इतकं सुंदर पात्र दिसतं की फेरीत तर काही विचारायलाच नको. कदाचित फेरी है माझ्या रोजच्या प्रवासाचा भाग नसल्यामुळे किंवा आयुष्यात बऱ्याच उशिरा फेरी म्हणजे काय हे समजल्यामुळे असेल पण मला फेरीतून जायला फार आवडतं.
गोव्यात फिरायला येणाऱ्या लोकांसाठी या अशा फेरीत बसून उगीच फिरून यायची काही ठिकाणं/बेट आहेत, तिथे पोहोचण्याचा हा सुंदर मार्ग आणि तिथलं निसर्गरम्य वातावरण, गोवन/पोर्तुगीज विले, जूनी बांधकामं हे सगळं मोहवून टाकणारं आहे पण सहसा पाच-सहा मोजकी ठिकाण सोडून टूरिस्ट्स इतर कुठे दिसत नाहीत.
तर, मुद्दा असा आहे की नवऱ्यावर आणि फेरीवर शंका घेत घेत दहा मिनिटं गेली आणि या दहा मिनिटाच्या फेरीने चोडणला उतरल्यावर लगेच उजव्या हाताला सँच्युअरी दिसली आणि मी सुटकेचा श्वास सोडला.
माझ्या अपेक्षेप्रमाणे फेरीतली इतर कोणतीच माणसं सँच्युअरीत येणारी नव्हती. भर उन्हात पक्षी बघायला आम्हीच दोघं होतो असं लक्षात येताच मगाचचे शंकेचे कावळे परत मनात उडु लागले.
इथली लोकं आपल्याला परतावून लावतील का? हसतील का? अशा अनेक प्रश्नांवर मात करुन आम्ही आगेकूच केली.
बाहेरच तिकीट कॉउंटर आहे. २० रुपयांचं तिकीट काढतानाच तिथल्या माणसाने आत्ता काहीच पक्षी दिसणार नाहीत, अगदी नशीब चांगलं असेल तर दिसतील पण पक्षी बघायचेच असतील तर सकाळी या असं प्रामाणिकपणे सांगितलं.
मग आम्हाला पण प्रश्न विचारायची ऊर्जा आली. “मग आत्ता या वेळेला करण्यासारखं काय आहे?” असं विचारलं आणि कळलं की आतमध्ये साधारण १ किलोमीटर चालायला मिळेल.
आजूबाजूला मँग्रूवची (खारफुटी) झाडं आहेत आणि एकूण छान परिसर आहे अशी माहिती मिळाली.
झालं… आम्हाला तरी अजून काय पाहिजे होतं? मुळात सँच्युअरी बघायचा आमचा प्लॅन नव्हताच त्यामुळे आम्हाला पक्षी दिसले नसते तरी चालणार होतं. छान चालून, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायची संधी मिळत होती म्हणून उड्या मारत आत गेलो.
डॉक्टर सलीम अली बर्ड सँच्युअरी म्हणजे थोडक्यात मांडवी नदीच्या बाजूला, दोन्ही बाजूने मॅन्ग्रोव्हचं घनदाट जंगल आणि मधून जाणारी नागमोडी, लाल मातीची चादर ओढलेली वाट!
इथे पहाटेच्या शांततेत प्रचंड पक्षी बघायला मिळतील याबद्द्ल दुमत नव्हतं पण दुपारीही सगळीकडे ऊन असताना असं सावलीतून, झाडांच्या गारव्यातून चालण्याची मजा वेगळीच होती.
कसलाच आवाज आतपर्यंत पोहोचत नव्हता, प्रचंड शांतता होती. कदाचित निक्षून बघितलं असतं तर एकदोन पक्षी दिसले सुद्धा असते पण आम्हीच काही प्रयत्न केला नाही.
या ठिकाणाची अजून एक खास गोष्ट म्हणजे इथे ठिकठिकाणी माहिती देणाऱ्या पाट्या (इंग्रजी व कोंकणीत) आहेत, मुख्य म्हणजे केवळ पक्षांबद्दलच नाही तर झाडे, प्राणी, निसर्ग सगळ्याबद्दलचीच माहिती या पाट्यांवर होती.
उपयुक्त माहिती देताना, सोपी, समजेलशी भाषा आणि सोबतीला फोटो वापरल्यामुळे प्रत्येक पाटीजवळ थांबून आवर्जून वाचलं गेलं. काहीच गर्दी, म्हणजे आम्ही दोघे सोडून आतमध्ये एक ही व्यक्ती नसल्याने खबरदारी म्हणून आम्ही आत पर्यंत गेलो नाही पण चौकशी केल्यावर कळलं की आतमध्ये ‘बोटिंग’ला जाता येतं.
सकाळच्या वेळेस ही बोट राईड असते. दहा लोकं असतील तर ७५ रुपये प्रत्येकी तिकीट आहे पण जर लोकांची संख्या कमी असेल, म्हणजे अगदी दोघांनाच जायचं असेल तर ७५० रुपये भरून दोघांनीच जायची सुद्धा सोय आहे.
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी आवर्जून जावं असं हे ठिकाण.
मला स्वतःला वाटतं की खूप लोकांची सोबत असेल तर एखाद्या पहाटे नक्की जावं असं हे एक छान ठिकाण आहे. नाही म्हटलं तरी त्या झाडांमधून दोघेच जात होतो तेंव्हा मला थोडी का होईना भीती वाटत होती, पण परत कधी दुपारचा वेळ मिळाला तर शांततेसाठी नक्की जावं अशी ही जागा मला मिळाली आहे.
लेखन: मुग्धा शेवाळकर
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.