२० जुलै १९६९ म्हणजे बरोबर ५० वर्षांपूर्वी मानवाने आपल्या इतिहासात पृथ्वी सोडून दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं. अमेरिकेचा अवकाशवीर निल आर्मस्ट्राँग ने म्हंटल होतं,
Giant leap for mankind.
आजच्या पिढीला कदाचित महत्व कळणार नाही कारण १९६९ नंतर जन्मलेल्या सगळ्यांसाठी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं, त्याकाळी २० जुलै १९६९ ची घटना टी.व्ही. वरून लाईव्ह दाखवली गेली होती. तब्बल ३.८ लाख किलोमीटर वरून घडणाऱ्या गोष्टी पहिल्यांदा लाईव्ह बघण्याचं भाग्य त्या काळच्या लोकांना मिळालं. आज तंत्रज्ञान पुढे गेलं तरी ५० वर्षांपूर्वी अश्या एखाद्या रॉकेट ची निर्मिती करून मानवाने चंद्रावर स्वारी करण्याची घटना स्वप्नवत अशीच होती.
२० जुलै १९६९ च्या सकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी मायकल कॉलिन्स ला मागे सोडत आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन ह्यांनी चंद्राच्या दिशेने आपला प्रवास सुरु केला. अगदी काही सेकंदाचं इंधन राहिलं असताना त्या चार पायांच्या यानाने चंद्रावरची कित्येक बिलियन वर्षाची धूळ उडवत आपले पाय रोवले. निल आर्मस्ट्राँग ने नासा शी संवाद केला,
Houston, Tranquillity Base here, The Eagle has landed.
ह्यावर उत्तर देताना नासा कंट्रोल रूम मधून मेसेज गेला,
Roger, Twan… Tranquillity, we copy you on the ground.
हे शब्द आता जरी सामान्य वाटले तरी ५० वर्षांपूर्वी या शब्दांनी मानवाचा इतिहास बदलून टाकला. ह्या घटनेनंतर बरोबर साडेसहा तासांनी निल आर्मस्ट्राँग चंद्रावर आपलं पाऊल टाकणारा पहिला मानव ठरला. ह्या नंतर नासा ला आपण चंद्रावर उतरलो हे सांगताना तो म्हणाला,
That’s one small step for (a) man, one giant leap for mankind.
अपोलो ११ च्या फ्लाईट डायरेक्टर नी म्हंटल होतं,
आजवर पृथ्वीवरून आपण चंद्राकडे, ताऱ्यांकडे, ग्रहांकडे बघत आलो. आज पहिल्यांदा आपण दुसऱ्या ग्रहावर उतरलो, राहिलो आणि आता तिथून पृथ्वी ला बघत आहोत.
ह्या नंतर जवळपास १० अमेरिकन अवकाशवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवलं पण त्याला तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. अपोलो १३ च्या अपयशा नंतर १९७० च्या आसपास चंद्र मोहिमा ह्या खर्चिक आणि निरुपयोगी वाटू लागल्या पण तो पर्यंत जवळपास ३८१ किलोग्रॅम वजनाचे दगड, मातीचे नमुने ह्या मोहिमांनी पृथ्वीवर आणले होते ज्याचा अभ्यास आजही केला जातो आहे. मानव चंद्रावर जाऊ शकतो ह्याचा १९६९ पर्यंत कोणीही स्वप्नात विचार केला नव्हता.
१२ एप्रिल १९६१ ला युरी गागरीन ला अवकाशात पाठवत रशियाने अमेरिकेवर अवकाश क्षेत्रात मात केली. हा पराभव शित युद्धाच्या काळात अमेरिकेच्या जिव्हारी लागला. ह्या नंतर २५ मे १९६१ ला तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी ह्यांनी म्हंटल होतं,
I believe that this nation should commit itself to achieving the goal, before this decade is out, of landing a man on the moon and returning him safely to the Earth.
आम्ही आता अवकाशात नाही तर चंद्रावर जाऊन दाखवू हा निर्धार अमेरिकेने केला होता. कारण अवकाशात रशिया ने बाजी मारली होती. आता असं काही लक्ष्य साध्य करण्याची गरज होती ज्याचा विचार कोणीच केला नसेल. आपल्या भाषणात केनेडी म्हणाले होते,
We choose to go to the moon in this decade and do the other things, not because they are easy, but because they are hard.
केनेडींचा शब्द खरा करण्यासाठी अमेरिकेने आपली सगळी ताकद पणाला लावली. सगळ्या लोकांना, वैज्ञानिकांना, संशोधकांना, अभियंत्यांना एकच लक्ष्य देण्यात आलं ते म्हणजे चंद्रावर मानव उतरवणं. तब्बल ८ वर्षाच्या अथक मेहनत आणि ८ अवकाशवीरांचा ह्या मोहिमेच्या चाचणीत बळी गेल्यावर जवळपास २५ बिलियन अमेरिकन डॉलर ( आताच्या तुलनेत २८८ बिलियन अमेरिकन डॉलर ) खर्च करून अमेरिकेने चंद्रावरची अपोलो मोहीम यशस्वी केली. १२ अवकाशवीर ह्या मोहिमेतून चंद्रावर आपलं पाऊल उमटवून परत पृथ्वीवर आले.
आजवर अनेक चंद्रमोहिमा झाल्या पण चंद्रावर उतरून तिथून पुन्हा पृथ्वीवर उतरण्याच्या अनुभवाची सर कशालाच नाही. आज ५० वर्षानंतर नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी सज्ज होते आहे. २०२४ पर्यंत आपल्या स्पेस लॉन्च सिस्टीम द्वारे पुन्हा एकदा चंद्रावर मानवाला पाठवत आहे. ५० वर्षात तंत्रज्ञानाचं बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं असलं तरी पुन्हा चंद्रावर उतरणं तितकं सोप्प असणार नाही ह्याची जाणीव नासाला ही आहे. अपोलो मिशन हे तंत्रज्ञानाचा एक मैलाचा दगड होतं. २० व्या शतकाच्या इतिहासात ५० वर्षांपूर्वी २० जुलै १९६९ ला टाकलेलं पाऊल हे सोनेरी अक्षराने नोंदलं गेलं आहे हे नक्की.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.