पक्षाघात किंवा अर्धांगवायू, पॅरालिसिस ज्याला बोलीभाषेत लकवा असे देखील म्हटले जाते हा एक गंभीर आजार आहे.
ह्या आजारात शरीराचा अर्धा भाग (संपूर्ण डावी बाजू किंवा संपूर्ण उजवी बाजू) बाधित होतो.
शरीराच्या अर्ध्या भागाच्या संवेदना नष्ट होतात आणि त्या भागाची हालचाल देखील रुग्णाला करता येत नाही.
तसेच शरीराचा जो भाग बाधित झाला असेल त्या बाजूला चेहरा, ओठ वगैरे वाकडे होणे, त्या बाजूचा हात, पाय शक्तिहीन, लुळा होणे असे परिणाम दिसून येतात.
काही वेळा हे दुष्परिणाम तात्पुरते असतात तर काही वेळा ते कायमस्वरूपी राहतात.
त्यामुळे अर्थातच ह्या रुग्णांची खूप काळजी घ्यावी लागते. आयुर्वेदात पक्षाघातावर अनेक उपाय सांगितले आहेत. आज आपण पक्षाघात होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेणार आहोत.
पक्षाघात/ पॅरालिसिस होण्याची कारणे
पक्षाघात होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील काही खालीलप्रमाणे –
१. मेंदू किंवा मणक्यामध्ये गाठ तयार होणे
२. अचानक मेंदू किंवा मणक्याला मार लागणे (ऍक्सीडेन्टटमुळे होणारा आघात )
३. स्ट्रोक म्हणजेच मेंदूतील रक्तपुरवठा काही काळापूरता खंडित होणे
४. सेरेब्रल पाल्सी (काही लहान बाळांना जन्मतः असणारा आजार)
५. कंपवात (उतार वयात होणारा आजार )
पक्षाघातामुळे रुग्णाच्या शरीराची संपूर्ण एक बाजू, अथवा दोन्ही बाजू बाधित होऊ शकतात.
तसेच काही वेळा सौम्य स्वरूपाचा पक्षाघात असेल तर एखादा अवयव म्हणजे हात किंवा पाय फक्त बाधित होऊ शकतो. आजाराच्या तीव्रतेनुसार अवयवांवर होणारा परिणाम दिसून येतो.
योग्य आहार आणि दिनचर्या ठेवली तर पक्षाघाताचे परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी करता येतात.
आज आपण पक्षाघाताच्या रुग्णांचा आहार कसा असावा ते जाणून घेऊया
पक्षाघाताच्या/पॅरालिसिसच्या रुग्णांनी काय खावे?
पक्षाघाताच्या/पॅरालिसिसच्या रुग्णांच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश असावा
१. धान्ये – गहू , ज्वारी,बाजरी
२. डाळी – मूग डाळ, कुळीथ
३. भाज्या – सगळ्या पालेभाज्या, कोबी, ब्रोकोली
४. फळे – डाळिंब, द्राक्षे, पपई, सफरचंद, संत्रे, कलिंगड, चेरी
५. इतर – हिंग, आलं, लसूण, ओवा, तीळ, काळी मिरी, दूध, नारळाचे पाणी, ग्रीन टी, बदाम, तेल, तूप
पक्षाघाताच्या रुग्णांनी काय खाऊ नये ?
पक्षाघाताच्या रुग्णांच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश असू नये
१. धान्य – नवीन आलेले धान्य, मैदा
२. डाळी – तूर, हरभरा, मटार
३. भाज्या – बटाटे, टोमॅटो, लिंबू, कारले, भेंडी, फ्लॉवर
४. फळे – केळी
५. इतर – तेल, तूप व मीठ अतिप्रमाणात खाऊ नये. चहा, कॉफी आणि जंक फूड जास्त प्रमाणात खाऊ नये. पचायला जड असणारे पदार्थ, मांसाहार, मद्यपान, कोल्डड्रिंक ह्यांचे सेवन मुळीच करू नये.
पक्षाघाताच्या रुग्णांचा डाएट प्लान कसा असावा?
नाश्ता – सकाळी ८.३० वाजता- १ कप दूध + १ प्लेट पोहे/ उपमा/ कॉर्न फ्लेक्स + १ वाटी फळांचे तुकडे
दुपारचे जेवण – दुपारी १२.३० ते १.३० – २, ३ फुलके + १ वाटी पालेभाजी + १ वाटी आमटी + १ वाटी भात + १ वाटी सॅलड
संध्याकाळी – ४.३० ते ५.०० – १ कप हर्बल चहा + मिश्र भाज्यांचे सूप
रात्रीचे भोजन – रात्री ७.३० ते ८.०० – २, ३ फुलके + १ वाटी पालेभाजी + १ वाटी आमटी
झोपण्याआधी अर्धा तास – १ कप दूध
असा असावा पक्षाघाताच्या रुग्णांचा दिवसभराचा डाएट प्लान.
पक्षाघाताच्या रुग्णांना डोक्याला तसेच हातापायांना हलक्या हाताने तेल लावून मालीश करावे. तसेच हात आणि पाय हळूहळू दाबून द्यावे, त्याने निश्चित आराम मिळतो.
पक्षाघाताच्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी?
पक्षाघाताच्या रुग्णांने नेहेमी खालील गोष्टींची काळजी घ्यावी.
१. नेहमी ताजे, सकस आणि गरम भोजन घ्यावे.
२. भोजन करताना नेहेमी आनंदी, उत्साही आणि सकारात्मक असावे.
३. एकदम खूप न खाता दिवसातून ४ वेळा खावे.
४. कोणत्याही वेळचे भोजन टाळू नये.
५. आठवड्यातून एक दिवस उपास करून हलका आहार घ्यावा.
६. अगदी पोटभर न जेवता २ घास कमी खावेत.
७. अन्न नीट चावून ग्रहण करावे.
८. सकाळी लवकर उठावे.
९. दररोज २ वेळा दात घासावे तसेच जीभ स्वच्छ करावी.
१०. रात्री लवकर झोपावे व पुरेशी झोप घ्यावी.
पक्षाघाताच्या रुग्णांना योगासने करण्याचा खूप उपयोग होतो असे दिसून आले आहे. खालीलप्रमाणे प्राणायाम आणि योगासने करण्याचा खूप उपयोग होतो.
प्राणायाम – भस्रिका, कपालभाती, बाह्यप्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी, उज्जायी
आसने – सूक्ष्म व्यायाम, उत्तानपादासन, मर्कटासन, भुजंगासन, सर्वांगासन, शवासन
अर्थातच ही सर्व आसने तज्ञ योगशिक्षकांच्या देखरेखीखाली करावी. रुग्णाने स्वतः एकट्याने काही करू नये.
पक्षाघाताच्या रुग्णांना अक्यूप्रेशरचा देखील खूप उपयोग होताना दिसतो.
रुग्णाच्या शरीराची जी बाजू बाधित झाली असेल त्या बाजूच्या हाताच्या अनामिकेच्या (अंगठी घालतो त्या बोटाच्या) वरच्या बाजूवर दाब दिला असता रुग्णाला आराम मिळतो. अर्थात हे अक्यूप्रेशर तज्ञ असणाऱ्या व्यक्तीने करणे आवश्यक आहे.
तर अशा प्रकारे योग्य तो आहार, दिनचर्येत योग्य तो बदल आणि योग्य व्यायाम ह्यामुळे पक्षाघाताचे रुग्णांवर होणारे परिणाम आटोक्यात आणता येतात. तसेच रुग्ण बरा होण्यास मदत होते.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Thanks for sharing