आपल्या प्रत्येकात काही स्वभाववैशिष्ट्ये जन्मत:च असतात. तर काही वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपण आत्मसात करत असतो. त्यानुसार आपला स्वभाव घडतो. त्यानुसार आपण आजूबाजूच्या जगातील घडामोडींना प्रतिसाद देत असतो. त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असतो.
आपल्या प्रतिक्रिया म्हणजेच आपले वाटणे, आपल्या भावना या समोरच्या व्यक्तीकडून सहज स्वीकारल्या गेल्या नाहीत किंवा कोणी वारंवार नाकारल्या तर एखाद्या व्यक्तीच्या मनात सगळ्या परिस्थितीला, व्यक्तीला विरोध करण्याची किंवा नाकारण्याची भावना तयार होते आणि मग पुढे त्यातूनच राग, आक्रमक भाव जन्माला येऊ शकतात. आजकाल लहान मुले खूप जास्त आक्रमक, रागीट झाली आहेत असे पालकांचे म्हणणे आहे. नकळत्या वयात असे व्यक्त होणे मुलं शिकतात तरी कुठून?
कोणी काहीही न शिकवता मुले अनेक गोष्टी शिकत असतात. घरातल्या व्यक्तींपैकी कोणीही आक्रमकपणे व्यक्त होत असेल तर न कळत्या वयातले मुलही त्या प्रतिक्रियेकडे सगळ्यात आधी आकर्षित होते. कारण आक्रमक व्यक्तीच्या वागण्यात आणि बोलण्यात वापरलेली शारीरिक उर्जा त्याचे लक्ष वेधून घेते. लहान मूल रांगतांना, नव्याने चालताना अडखळून पडले, आणि त्याला काही लागले तर जवळ असलेल्या मोठ्या व्यक्तीची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया असते… ज्यामुळे लागले त्या वस्तूला हाताने ”हात रे…” करण्याची. असे म्हणून हाताने मारण्याचा अविर्भाव मोठ्यांकडून केला जातो किंवा प्रत्यक्ष वस्तूला मारले सुद्धा जाते. आपल्याला काही लागले, आपण अडखळून पडलो ते आपण चालताना नीट चाललो नाही म्हणून. वस्तू काही आपल्या मार्गात आलेली नाही, तर आपण तिच्या मार्गात आलेले आहोत, ही साधी वस्तुस्थिती मुलांना नीट समजत नाही. कधी कधी तर मुलांना त्या वस्तूला “हात रे…” करायला लावतो आपण!
आपण ‘खाली पडण्याची’ जबाबदारी ही आपल्या स्वतःची नाही तर दुसऱ्याच कोणाची आहे याचा संस्कार त्यांच्या मनावर रुजतो आहे, हे लक्षातही येत नाही आपल्या. लहानपणी मुलांचे विश्व निर्जीव वस्तू, प्राणी, पक्षी, निसर्ग यांनी व्यापलेले असते. मग पुढे त्यांच्या आयुष्यात घराशिवाय इतर व्यक्ती, परिस्थिती येतात. “आपल्या वागण्यासाठी आपण जबाबदार नसून दुसराच कोणी आहे” या धारणेची ही छोटीशी सुरवात इतक्या लहान वयात, मोठ्यांच्याही अगदी नकळत मनावर बिंबवली जाते..
त्याऐवजी अशा प्रसंगात लहानग्याला कुठे लागले आहे, याची दखल घेऊन मग त्याचे लक्ष वस्तूवरून “आपण नीट चालूया हं.. नीट नाही चाललो की आपण पडतो आणि आपल्याला लागतं ना मग?” असे बाळाच्या ‘वागण्याकडे’ वळवता येईल, कारण असे करणे जास्त सोपे आहे.
आपल्या आजूबाजूला काय चाललेले आहे याचे भान लहान मुलांमध्ये असते. मोठ्यांचे आक्रमक वागणे, बोलणे तसेच खोटे बोलणे त्यांना समजते. अर्थ समजत नसला तरी त्यामागचा भाव त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचतो. एकदा एका लहानग्याने आपल्या वडिलांसाठी बाहेरून काठी आणून दारापाठीमागे लपवून ठेवली होती. त्याबद्दल बाबाने त्याला विचारल्यावर तो म्हणाला होता की “बाबा, तू आईला मारलं ना, तर तुला मारण्यासाठी आणली आहे!” वडिलांना खूप आश्चर्य वाटले, त्यांच्या घरात तर असे काही घडत नव्हते मग हा छोटा असे का म्हणाला असेल, याचे त्यांना कुतूहल वाटले. त्यांनी लक्ष ठेवले तर आई बघत असलेल्या मराठी सिरीयल मध्ये नवरा बायकोला मारझोड करतोय असा प्रसंग वारंवार दाखवला जाई.. आजूबाजूला खेळणाऱ्या आपल्या लहान मुलाचे लक्ष आपण बघतोय त्या सीरिअलकडे असू शकेल हे त्या आईच्या कधीच लक्षात आले नव्हते.
“आम्ही तर घरात कोणीच असे वागत नाही, आमचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत.. तरीही आमचा मुलगा किंवा मुलगी इतकी रागीट कशी?” असे प्रश्न पडणाऱ्या पालकांच्या प्रश्नाचे उत्तर अशा प्रसंगात आहे. संध्याकाळी न चुकता हे काळ्या-पांढऱ्या टोकाच्या भावनांनी भडक रंगात रंगवलेले मालिकेतले कुटुंब मूल सातत्याने बघत, ऐकत असेल तर ते तुमचे गुण आत्मसात करेल की सीरिअलमधल्या माणसांचे?
स्क्रीनवर चाललेले नाटक आहे, आभासी आहे, खोटे आहे याची ‘समज’ मोठ्यांना तरी असते का? त्यानुसार घरातले स्वयंपाक, जेवणाचे, मुलांच्या अभ्यासाचे वेळापत्रक सुद्धा बदलले जाते. ‘आम्ही कोणीच असे नाहीत आणि आमचे मूल असे का वागते?..’ याचे उत्तर मोबईल, टी.व्ही, इंटरनेट, गेम्स यात आहे का हे जरूर शोधावे.
डोळ्यासमोर वारंवार दिसत असलेली आक्रमक दृश्ये मुलांना उत्तेजित करतात आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात त्यांना कोणाचा राग आला तर तो या अशा ‘बघितलेल्या’ मार्गांनी व्यक्त करण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. आजकाल आपल्या जवळपास अशा अनेक घटना आपण घडतांना बघतो. कोणत्याही गोष्टीचे कारण कधीच वरवर असू शकत नाही. ते एखाद्या प्रसंगात, अनुभवात रुजलेले असते, हे लक्षात घ्यावे.
मुलांच्या छोट्या, रंगीबेरंगी कपड्यांची मोठ्यांना हौस असते. त्यांच्यासाठी आपल्याला आवडणारे कपडे खरेदी करून आपल्या इच्छेनुसार त्यांना घालण्याची मोठ्यांना सवय लागलेली असते. पुढे कधीतरी खरेदीला गेल्यावर अचानकपणे मुलं आपण निवडलेल्या कपड्यांना नाक मुरडतात आणि त्यांना आवडलेल्या ड्रेससाठी हट्ट धरून बसतात. मुलांच्या स्वतंत्र मतांची ती सुरवात असते. हळूहळू जवळपास सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे वेगळे म्हणणे पालकांना जाणवायला लागते. हा बदल अत्यंत संयमाने आणि धोरणीपणे स्वीकारावा, हाताळावा लागतो. कारण आधी मनासारखे घडण्याचा हट्ट येतो आणि तसे झाले नाही तर मुलं आलेला राग वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करतात. पालकांनी हे नीट हाताळले नाही तर वरवर छोटी वाटणारी घटना त्यांच्या मनात नकारात्मक भाव रुजवून जाते.
पालकांचं आणखी एक वाक्य आपल्या ओळखीचं आहे, “रोज घरी मार खाऊन येतो हा मुलांचा.. तरी बरं, सगळे याच्याइतकेच आहेत. आता तर मीच त्याला सांगून ठेवलंय कोणी एक मारली ना तर तू चांगल्या दोन दे लगावून! पण जर पुन्हा मार खाऊन घरी रडत आलास ना तर याद राख…”
आजकालच्या जगात ‘जशास तसे’च वागायला हवे! असेसुद्धा बहुतेकांना वाटते. सहावीतल्या देवांगची आई पण काही वेगळी नव्हती, तिने आपल्या मुलालासुद्धा हेच सांगितले.
पण एकदा शाळेकडून बोलावणे आल्यावर शाळेतल्या मुलांशी मारामाऱ्या करणाऱ्या देवांगच्या तक्रारी ऐकून आई चिडली, त्यावेळी टीचरसमोर देवांग आईला म्हणाला, “तूच तर म्हणालीस ना की कोणाचा मार खाल्लास तर याद राख म्हणून?”
मुलं कशावरूनतरी वाद घालत असतात. उलट बोलत असतात. पालकांना हे कसे थांबवावे कळत नाही. मग धाक दाखवला जातो, “आवाज खाली कर आधी, कोणाशी बोलते/बोलतो आहेस तू?” यातला टोन आणि कधीकधी तर वाक्यदेखील मुलं मोठ्यांच्या अनुकरणातून उचलतात. कारण त्यांना आक्रमक वागण्याचे फायदे तत्काळ मिळतात हे त्यातून दिसते. कशासाठीतरी हट्ट करतांना रडून गोंधळ घालणारी लहान मुले बघाल तर लक्षात येईल, डोळ्यातून येणाऱ्या पाण्यापेक्षा ‘रडण्याचा मोठा आवाज’ हे त्यांचे हुकमी अस्त्र असते. कडेवरून खाली ठेवल्यावर संताप करून रडणारं बाळ तुम्हीदेखील बघितलं असेल. त्याला काय होतंय म्हणून मोठ्यांनी घाबऱ्याघुबऱ्या बघावं तर उचलून जवळ घेतल्यावर ते क्षणात शांत होतं, मजेत खेळतं. आपल्यातल्या शक्तीचा अंदाज मुलांना इतक्या लहान वयात होतो.
थोडी कळत्या वयाची मुलं निर्जीव वस्तूंवर आपला राग काढतात. हातातल्या वस्तू फेकून देणं, जोरजोरात आपटणं. असं करून त्यांना समजतं की वस्तू काही पुन्हा उलटून आपल्याला मारू शकत नाहीत आणि दुसरा फायदा म्हणजे असे वागल्यावर आपले म्हणणे मोठी माणसे लगेच मान्य करतात. घरापेक्षा बाहेर, अनोळखी लोकांसमोर असे वागलो की आपले म्हणणे ताबडतोब मान्य होते, हे अनुभवातून त्यांना समजते.
राग येणं ही एक नैसर्गिक भावना आहे पण आपल्याला राग आल्यानंतर आपण त्याच्या किती प्रमाणात आहारी जातो.. त्यात वाहवत जाऊन स्वतःला किंवा इतरांना नुकसान करणारी कृती करून बसतो. हे आपल्या हातात असतं. रागाला आपण किंवा आपल्या जवळचे इतर लोकं कसा प्रतिसाद देतात त्यावर पुढच्या वेळी पुन्हा ते हत्यार वापरायचं की नाही हे ठरतं.
राग येणे ही एक स्वाभाविक भावना आहे. राग आला त्याआधी घडलेल्या प्रसंगाबद्दल मुलांशी ते चांगल्या मनस्थितीत असतांना बोलले पाहिजे, ज्यातून त्यांच्या मनातल्या विचारांची दिशा समजेल. ‘मला राग आला’ असे म्हणून त्या भावनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, हेदेखील मुलांना समजावे.
‘तुझ्यामुळे मला राग आला’, ’अमुक अमुक घडले’ म्हणून मला राग आला असे म्हणणे म्हणजे आपल्या भावनांची जबाबदारी दुसऱ्याच कोणावर तरी टाकण्यासारखे आहे. ‘राग कंट्रोल करता यायला हवा’ असे सगळ्यांना वाटते. कंट्रोल करणे म्हणजे निचरा होणे नाही. ते दाबून टाकणे झाले, अशा दबलेल्या, दडपलेल्या भावना अतिरेक झाला की त्या अनिर्बंधपणे, अनैसर्गिकपणे बाहेर पडतात. कोणतीही भावना ही उर्जा (energy) असते. तिचे नियमन करता येणे शक्य आहे. रागामध्ये आपल्या आयुष्याचा मौल्यवान वेळ आपण वाया घालवायचा आहे का याचीही निवड व्यक्तीच्या हातात असते.
आपल्या कोणाच्याही आयुष्याला रिटेक नाही. मुलांच्या वाढीला तर नाहीच नाही. म्हणून समोर असलेला क्षण तो आपला, असे समजून या क्षणापासून सजग राहण्याचा प्रयत्न करूया आणि पालकत्वाच्या शाळेतील हे पहिले-वहिले धडे मनापासून शिकूया!
लेखन : डॉ. अंजली औटी
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.