माणूस कितीही गरीब असला तरी त्याचे विचार श्रीमंत असतील तर कुठल्याही परिस्थितीतून तोडगा काढून तो ठरवलेले मनसुबे तडीस नेतो. हे सांगणारी नारायण स्वामींची कहाणी वाचा या लेखात.
मित्रांनो, आज तुम्ही खूप अडचणीच्या परिस्थितीत दिवस काढताय असा जर तुमचा समज असेल, तुम्हाला वाटत असेल, मला नशीब कधी साथ देत नाही.
त्यामुळे असतील त्या अडचणींना तोंड देत दिवस काढणं हेच फक्त माझ्या हातात आहे.
तर थांबा, कर्नाटकच्या नारायण स्वामींची ही कहाणी वाचा. म्हणजे तुम्हाला नक्कीच पटेल कि मनात दृढनिश्चय असेल, उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नावर फोकस असेल आणि विचारांना निश्चित दिशा असेल तर काहीही अशक्य नाही.
वर्ष १९८६, १९ वर्षांचा एक मुलगा कर्नाटकच्या कोल्लार जिल्ह्यातून एक शर्ट आणि पॅन्ट एवढंच सामान घेऊन बंगलोर शहरात पोहोचतो.
डोक्यावर छप्परच काय दोन वेळचं खायला मिळेल एवढे पैसे सुद्धा त्यावेळी त्याच्याकडे नसतात. पण एक स्वप्न उराशी बाळगलेलं होतं त्याने, शाळा सुरु करण्याचं…
पैश्याने नसला तरी मनाने तो श्रीमंत होता म्हणून असं अवघड आवाक्याबाहेरचं वाटणारं स्वप्न त्याने पाहिलं.
आणि याच स्वप्नाने त्याच्या पंखांना बळ दिलं, त्याच्या जिद्दीपुढे नियतीने हार मानली आणि स्वप्नाला सत्यात उतरवलं.
नारायण स्वामी यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर पटेल… मोठी स्वप्न बघितली, त्यासाठी कष्ट उपसली, ती स्वप्न जगली तर निश्चितच ती सत्यात येतात.
३३ वर्षांपूर्वी जेव्हा नारायण स्वामींचे आई वडील वारले तेव्हा नारायण बारावीची परीक्षा देत होते.
आणि कुठल्याही पालकांची हुशार मुलासाठी असते तशीच त्यांची सुद्धा नारायणला डॉक्टर करण्याची इच्छा होती. त्यामुळे नारायण डॉक्टर होण्याच्या दृष्टीने बोर्डाची तयारी करत होते.
पण आई वडिलांच्या मृत्यूमुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं आणि रोजच्या जगण्याचा संघर्ष नारायण स्वामींच्या वाट्याला आला.
हुशार विद्यार्थी असलेल्या नारायणने आपले शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची तयारी ठेवली.
आणि कुठलाही पर्याय नसल्याने कर्नाटकची राजधानी बँगलोरला तो पोहोचला ते एक बॅग, अंगावरचे कपडे आणि… उत्तुंग स्वप्न घेऊन!!
संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगताना नारायणस्वामी सांगतात,
३३ वर्षांपूर्वी मी जेव्हा गावातून निघालो तेव्हा एकच विचार मनात होता, कि शिक्षण घ्यायची इच्छा असलेल्या मुलांना माझ्यासारखा संघर्ष करायची वेळ यायलाच नको. जेवणाच्या ऐवजी पाणी पिऊन भूक भागवणं काय असतं ते त्या काळात मी अनुभवलं. पुढची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पै अन् पै वाचवत होतो.
शिक्षकी पेशाचं शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये जात असताना नारायण स्वामींनी बरोबरीने छोटी मोठी कामं चालू ठेवली.
आणि परीक्षा पास केली. त्यानंतर एका प्रार्थमिक शाळेत नोकरी मिळवली. नोकरी करत असताना शाळा सुरु करण्याचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.
नोकरी करताना मिळणारा पगार गरजूंसाठी एक शाळा सुरु करण्यासाठी पुरेसा नव्हता. तेव्हा त्यांनी आपली वडिलोपार्जित संपत्ती विकली आणि काही कर्ज घेतले.
१९९० साली पाच विद्यार्थ्यांना घेऊन स्वामींनी “विद्योदय हाय्य्यर प्रायमरी स्कुल” ची स्थापना केली.
शाळेतील विद्यार्थ्यांना कमी खर्चात गणवेश, वह्या- पुस्तके दप्तर आणि एक वेळचं जेवण देता यावं हि त्यांची सुरुवातीपासून इच्छा होती.
शाळेत शिक्षकांना नोकरी देताना सुद्धा नारायण स्वामींनी गरजूंना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. पण पुढे हळू हळू आर्थिक परिस्थितीमुळे तग धरणं कठीण जाऊ लागलं तेव्हा ट्रॅव्हल-टुरिझम चा व्यवसाय सुरु करून आर्थिक बाजू सांभाळली.
गरजू विद्यार्थ्यांना राहायला जागा मिळावी म्हणून मोफत राहायची जागा उपलब्ध करून देण्यासाठी हॉस्टेल सुद्धा सुरु केलं.
पण आर्थिक डोलारा सांभाळणं शक्य न झाल्याने हॉस्टेल मात्र बंद करावं करावं लागलं.
शेवटी अथक प्रयत्नांना मदतीची जोड हि मिळतेच. तसंच १९८८ साली कर्नाटक सरकारकडून १२ शिक्षकांच्या वेतनापोटी अनुदान मिळाले आणि बराचसा भर हलका झाला.
या शाळेत इतर खासगी शाळांसारख्याच सर्वांगीण विकास होण्यासाठी सोयी पुरवण्याचा प्रयत्न नारायण स्वामी ठेवतात.
नारायण स्वामींसमोर खूपदा कठीण प्रसंग उभे राहिले. पण त्यांनी ‘गिव्ह अप’ केलं नाही.
अडचणीतून मार्ग काढला आणि पुढची वाटचाल सुरु ठेवली. परिस्थितीला दोष देऊन रडत बसले नाहीत तर स्थिर चित्ताने काम करत राहिले.
माणूस कितीही गरीब असला तरी त्याचे विचार श्रीमंत असतील तर कुठल्याही परिस्थितीतून तोडगा काढून तो ठरवलेले मनसुबे तडीस नेतो.
नारायण स्वामींना जे जमलं ते तुम्हा आम्हाला का नाही जमणार, फक्त गरज आहे स्वप्न बघण्याची, ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्ट करण्याची, आणि अथक प्रयत्नांची!!
https://manachetalks.com/11373/first-female-porter-manju-yadav-marathi-information/
https://manachetalks.com/9759/opra-winfrey-motivational-story-prernadayi-kahani-marathi/
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.