तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तींचे हात किंवा पाय थरथरतात का? त्यांना स्वतःचा तोल सावरता येत नाही का? असे असेल तर त्यांना कंपवात हा आजार असू शकतो.
पार्किन्सन किंवा कंपवात हा नेमका कसा आजार आहे? पार्किन्सन किंवा कंपवात या आजाराची लक्षणे कोणती? यावर कोणते उपचार उपयोगी ठरतात? ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
पु.ल.देशपांडे हे लोकप्रिय साहित्यिक होते तसेच डॉक्टर श्रीराम लागू हे लोकप्रिय अभिनेते होते. दोघेही आपापल्या क्षेत्रात अतिशय आघाडीवर होते. परंतु याशिवाय आणखीन एक गोष्ट या दोघांमध्ये कॉमन होती आणि ती म्हणजे या दोघांनाही पार्किन्सन किंवा कंपवात हा आजार होता. पु ल देशपांडे आणि डॉक्टर श्रीराम लागू या प्रसिद्ध व्यक्तींना हा आजार झाला आणि आपल्या मराठी लोकांना हा आजार काही प्रमाणात माहिती झाला. त्याआधी या आजाराविषयी फारशी माहिती लोकांना नव्हती.
म्हणूनच आपण आज कंपवात या आजाराविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कंपवात म्हणजे नेमके काय?
पार्किन्सन किंवा कंपवात हा आजार मुख्यतः मेंदू आणि मज्जासंस्थेशी निगडित आहे. मेंदूच्या शरीरातील विविध अवयवांना कंट्रोल करणाऱ्या नसांना किंवा पेशींना विशिष्ट प्रकारचा संसर्ग झाला की या चेतापेशी हळूहळू नष्ट होऊ लागतात आणि कंपवात या आजाराची लक्षणे दिसून येतात. मेंदूमध्ये स्त्रवणारे डोपामाईन या द्रव्याचे प्रमाण कमी झाले की मेंदूचा शरीराच्या हालचालींवरील ताबा कमी होतो आणि पार्किन्सन किंवा कंपवात या आजाराची लक्षणे आढळून येतात.
पार्किन्सन किंवा कंपवात या आजाराची प्रमुख लक्षणे.
पार्किन्सन झालेल्या रुग्णामध्ये खालील लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात.
१. रुग्णाच्या हात तसेच पाय या अवयवांना कंप सुटतो म्हणजेच हात किंवा पाय बसलेल्या स्थितीत असताना सुद्धा सतत हलत राहतात. याची सुरुवात एक हात किंवा एक पाय हलण्यापासून होते आणि त्यानंतर हळूहळू दोन्ही हात पाय हलू लागतात.
२. रुग्णाला स्वतःहून शारीरिक हालचाली करण्यास अडथळा येतो.
३. रुग्णाच्या वेगवेगळ्या स्नायूंमध्ये ताठरपणा येतो आणि स्नायूंच्या हालचालींवर मर्यादा येते.
४. रुग्णाला शरीराचा तोल सांभाळण्यात अडथळा येऊ शकतो.
५. रुग्णाच्या हालचालींची गती मंदावते आणि त्यामुळे शरीर एकाच स्थितीत बराच काळ राहते. ज्याला फ्रिजिंग अशी संकल्पना आहे.
६. कंपवात आजाराच्या रुग्णांमध्ये आढळणारे आणखी एक लक्षण म्हणजे ते चालताना जवळजवळ पावले टाकतात तसेच त्यांना अन्न गिळताना त्रास होऊ शकतो.
याशिवाय कंपवाताची निरनिराळ्या रुग्णांमध्ये निरनिराळी लक्षणे आढळून येतात. ती खालीलप्रमाणे
१. काही रुग्णांना लिहिण्यात अडचण येते.
२. काहींना पापण्यांची हालचाल करणे किंवा स्मितहास्य करणे या गोष्टी करताना अडचण येऊ शकते.
३. काही रुग्ण बोलताना अडखळायला लागतात तर काहींचे बोलणे तोतरे बनते.
४. काही रुग्णांना anxiety आणि डिप्रेशनचा सामना करावा लागतो.
५. काही रुग्णांचा लघवीवरील ताबा सुटतो तर काही रुग्णांना बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो.
६. बऱ्याच रुग्णांमध्ये थकवा येणे, झोप न लागणे, खूप घाम येणे, ब्लड प्रेशर कमी होणे आणि त्यामुळे काही वेळा चक्कर येणे अशी लक्षणे आढळून येतात.
७. अन्न गिळताना त्रास होणे हे देखील एक कॉमन लक्षण आहे.
यातील काही लक्षणे इतर आजारांमध्ये सुद्धा आढळून येतात त्यामुळे आपल्या आजाराचे नेमके निदान होणे आवश्यक असते.
पार्किन्सन किंवा कंपवात या आजाराची कारणे कोणती?
कंपवात या आजाराबद्दल अजूनही तितकीशी जागृती झालेली नाही. भारतीय वैद्यकशास्त्रात जरी या आजाराची विस्तृत माहिती दिलेली असली तरी भारतीय लोकांना मात्र या आजाराची अजून तितकीशी माहिती नाही.
हा आजार मुख्यतः मेंदूतील पेशींशी निगडित असून शरीरातील अवयवांना कंट्रोल करणाऱ्या मेंदूच्या चेतापेशींचा ऱ्हास होऊ लागला की पार्किन्सन या आजाराची सुरुवात होते. हा आजार मुख्यतः अनुवंशिक असून त्याचप्रमाणे वृद्धापकाळ, काही विशिष्ट औषधांचे दुष्परिणाम आणि मेंदूच्या पेशींमध्ये होणारा बिघाड ही या आजाराची प्रमुख कारणे आहेत. आपल्या मेंदूत स्त्रवणारे डोपामाईन हे द्रव्य योग्य प्रमाणात तयार झाले नाही तर हा आजार होण्याची शक्यता बळावते. डोपामाईनची पातळी जेव्हा 60 ते 80 टक्के पर्यंत खाली येते तेव्हा पार्किन्सन या आजाराची लक्षणे दिसायला सुरुवात होते.
कंपवात हा आजार कोणाला होऊ शकतो?
पार्किन्सन किंवा कंपवात हा आजार सहसा साठीच्या पुढच्या वृद्ध लोकांमध्ये आढळून येतो. परंतु अलीकडे जगभरात अपवादात्मक रित्या का होईना परंतु तरुणांमध्ये देखील हा आजार होताना दिसून येत आहे.
हा आजार अनुवंशिक आहे म्हणजे आपल्या घरात याआधी जर कोणाला असा आजार झाला असेल तर पुढच्या पिढीत आजार असण्याची शक्यता जास्त असते.
स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये पार्किन्सन होण्याचे प्रमाण जास्त आहे.
एखाद्या अपघातात डोक्याला मार बसला असता हा आजार होऊ शकतो.
एखाद्या रुग्णाची लक्षणे तपासून तसेच त्याच्या अनुवंशिक आजारांची माहिती घेऊन डॉक्टर कंपवाताचे निदान करतात. तसेच यासाठी आवश्यकतेनुसार मेंदूचे सिटीस्कॅन आणि एमआरआय देखील केले जाते.
कंपवातावरील औषधे कोणती?
हा आजार संपूर्णतः बरा करू शकेल असे औषध अजून सापडलेले नाही. परंतु आजाराची लक्षणे आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य संतुलित आहार, सुयोग्य व्यायाम, कंपवाताच्या रुग्णाला जास्तीत जास्त आराम मिळेल अशी जीवनशैली आणि योग्य ते औषध उपचार उपयोगी पडतात. मेंदूतील डोपामाईनचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा आजार बळावतो त्यामुळे या आजाराच्या औषध उपचारांमध्ये डोपामाईनचे प्रमाण वाढवणाऱ्याऔषधांचा समावेश असतो. अर्थातच ही सर्व औषधे मेंदू रोग तज्ञ अर्थातच न्यूरोसर्जन आणि न्यूरोलॉजिस्ट यांच्या सल्ल्यानेच घ्यायची असतात.
अगदी सुरुवातीलाच कंपवाताचे निदान झाले तर योग्य औषधे देऊन आजार आटोक्यात ठेवता येऊ शकतो. त्यासाठी रुग्णामध्ये आढळून येणाऱ्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष देऊन वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय उपयोगी ठरते. त्यामुळे पन्नाशी ओलंडलेल्या स्त्रिया आणि पुरुषांनी जर वर दिलेली लक्षणे आढळली तर तिकडे मुळीच दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पार्किन्सन संपूर्णपणे बरा होत नसला तरी या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णाचे जीवन सुसह्य होण्यासाठी योग्य तो व्यायाम, योगासने, फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपी यासारख्या उपायांचा उपयोग होताना दिसतो.
तर मित्र-मैत्रिणींनो आज आपण पार्किन्सन म्हणजेच कंपवात या आजाराची सविस्तर माहिती पाहिली. तुम्हाला याबाबत काही माहिती असेल तर ती आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसेच या लेखातील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून हा लेख शेअर करायला विसरू नका.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.