भारतातील प्राचीन मंदिरांबद्दल जेवढी माहिती घेतली ती कमीच आहे.. एकेक मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे..
आज आपण कर्नाटकातील पटक्कल मंदिरे, ऐहोले मंदिरे, बदामी लेण्यांतील मंदिरे या सर्वांबद्दल जाणून घेऊ.
१. पट्टडकल मंदिरे: पट्टडकलचा इतिहास फारच जुना आहे.. ह्याचे पूर्वीचे नाव किसुवोलाल होते. म्हणजेच लाल मातीचा परिसर.
अगदी दुसऱ्या शतकापासून ह्या जागेचा उल्लेख इतिहासात आढळतो. सध्या कर्नाटकातील बागलकोट ह्या शहरात पट्टडकल हे स्थान वसलेले आहे.
चालुक्य राजवट सत्तेत असताना बदामी जवळील ऐहोले ह्या आपल्या राजधानी मध्ये राहून आजूबाजूच्या परिसरात आणि पट्टडकल इथे चालुक्य राजांनी भरपूर मंदिरे बांधली.
ही मंदिरे आणि तिथे बसवलेल्या शिळा त्या काळी राज्याभिषेक सोहळ्यासाठी वापरल्या जात असत. इथले स्थापत्यशास्त्र इतके सुंदर आहे की ह्याला UNESCO ह्या संस्थेने वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केले आहे..
चालुक्य राजवटीतील राजा विजयादित्य (६९६-७३३CE म्हणजे सातवे शतक), राजा विक्रमादित्य दुसरा (८३३-७४६ CE म्हणजे आठवे शतक) त्याच शतकात पुढे राजा किर्तीवर्मन दुसरा (७४६-७५३CE) ह्यांनी मालाप्रभा नदीच्या सुपीक किनारी ही पट्टडकलची मंदिरे वसवली.
पुढे चालुक्य साम्राज्य लयाला गेल्यावर राष्ट्रकूट साम्राज्य उदयाला आले आणि त्यांनी पट्टडकल मंदिरांच्या सौंदर्यात भर घातली. नवव्या शतकात जैन मंदिर देखील राष्ट्रकूट राजवटीत बनवले गेले.
पट्टडकल येथे खालील मंदिरे बघावयास मिळतात.
विरुपाक्ष मंदिर: विक्रमादित्य दुसरा ह्या राजाने पल्लव साम्राज्या विरुद्ध लढाई जिंकल्यामुळे विजयाचे प्रतीक म्हणून त्याची राणी त्रिलोकमहादेवी हिने हे मंदिर बांधून घेतले.
कांचीपूरमच्या कैलाशनाथ मंदिराप्रमाणे ह्याची बांधणी ठेवली गेली.
गर्भगृह, अंतराळ, मंडप, प्रकारा, कळस अशी हिंदू मंदिर स्थापत्यशास्त्राप्रमाणे ह्या मंदिराची बांधणी दिसून येते.
गणेश, महिषासुरमर्दिनी, सूर्य, नरसिंह, भैरव, नंदी अशा देवमूर्ती आणि कोरीव पुतळे तिथे पहावयास मिळतात.
विष्णूच्या अवतारातील काही दृश्ये देखील तिथे कोरण्यात आली आहेत.. श्रीकृष्णाने उचललेला गोवर्धन हे शिल्प पर्यटकांच्या खास पसंतीचे.
हंपीच्या पुरातन विरुपाक्ष मंदिराची सैर करायचीय? मग चला आमच्याबरोबर!!
मल्लिकार्जुन मंदिर:
विरुपाक्ष मंदिराच्या बाजूलाच हे मल्लिकार्जुन मंदिर बांधले गेले आहे. चालुक्य महाराणी त्रैलोक्य महादेवी हिच्या सन्मानार्थ हे मंदिर उभारले गेले होते.
ह्या मंदिराची उभारणी विरुपाक्ष मंदिराच्या सोबतच झाली. दोन्ही मध्ये फारसा फरकही नाही असे जाणकार सांगतात.
नरसिंह आणि हिरण्यकश्यपू ह्यांचे कोरीव शिल्प, समुद्र मंथनाचे शिल्प, मारीच, महिषासुरमर्दिनी अशी अनेक शिल्पे आणि पुराणातील प्रसंग तिथे कोरलेले आहेत.
संगमेश्वर मंदिर:
शिवलिंग आणि नंदी स्थापित केलेले हे मंदिर राजा विजयादित्य ह्याने बांधले. विष्णूच्या अवतारांचे प्रसंग आणि फुलांचे नाजूक नक्षीकाम काम केलेले हे मंदिर देखील अतिशय सुंदर आहे.
काडसिद्धेश्वर मंदिर आणि जंबुलिंगेश्वर मंदिर:
ही दोन्ही मंदिरे देखील पट्टडकल परिक्रमेतीलच आहेत. ही दोन्ही ही एकच सुमारास बांधलेली मंदिरे असून दोन्हीही मंदिरांवर शिखरे बांधण्यात आली आहेत.
काडसिद्धेश्वर मंदिरावर अर्धनारीश्वर, हरिहर, शिव, ब्रह्म आणि विष्णू ह्यांची कोरीव शिल्पे बघावयास मिळतात तर जंबुलिंगेश्वर मंदिरावर पक्षी, दागिने, नक्षीकाम अशी शिल्पे बघावयास मिळतात.
इतर मंदिरे:
ह्या परिसरात अजूनही इतर मंदिरे पहावयास मिळतात. गलगनाथ, चंद्रशेखर, पापनाथ, काशीविश्वेश्वर ही मंदिरे देखील पर्यटकांना भुरळ घालतात..
विष्णुपुरणातील अनेक शिल्प, अश्मयुगीन शिलालेख, चालुक्य शिलालेख अशी आणखी शिल्प तिथे प्रसिद्ध आहेत. जैन स्थापत्यशास्त्राचा सुंदर नामुना असलेल्या जैन मंदिराला सुद्धा भेट द्यायला आवर्जून पर्यटक तिथे जातात.
२. ऐहोले मंदिरे:
ऐहोले परिसरात देखील पट्टडकल सारखीच भरपूर मंदिरे बांधण्यात आली आहेत. पाचव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत चालुक्य साम्राज्याच्या अमलाखाली ऐहोले येथे जवळ जवळ १२५ हिंदू मंदिरांचा समूह बांधला गेला.
पुढे बाराव्या शतकानंतर राष्ट्रकूट आणि इतर साम्राज्य जसजशी अस्तित्वात येत गेली त्या राज्यकर्त्यांनी बांधलेली जैन मंदिरे आणि नंतरच्या काळात बांधलेली बौद्ध मंदिरे, लेणी देखील येथे पहावयास मिळतात.
अश्मयुगातील शिळेतून बांधलेली, एकाच दगडात कोरलेली, महाभारत आणि रामायणातील गोष्टी कोरलेली असंख्य मंदिरे इथे पाहायला मिळतात.
भारताच्या पार्लमेंटचे डिझाईन ज्या मंदिराकडून घेतले आहे ते मंदिर देखील ऐहोले येथे पहावयास मिळते.
दुर्गा मंदिर, लढखान शिव मंदिर, मेगुती मंदिर, रावनफडी शिवलेणी, हुच्चीमल्ली मंदिर, गोवडा मंदिर आणि सूर्यनारायण मंदिर ही तेथील प्रसिद्ध मंदिरे. इथे सुंदर नक्षीकाम केलेली, भरपूर शिव मंदिरे बघायला मिळतात..
३.बदामी लेण्यांतील मंदिरे:
पट्टडकल आणि ऐहोले सारखीच सहाव्या शतकापासून चालुक्य साम्राज्यातील राज्यकर्त्यांनी बांधलेली हिंदू शिव मंदिरे ह्या बदामी लेण्यांमध्ये बघायला मिळतात..
चालुक्य साम्राज्यानंतर आलेल्या साम्राज्यातील राज्यकर्त्यांनी बांधलेली जैन मंदिरे सुद्धा इथे प्रसिद्ध आहेत.
सातव्या शतकापूर्वी चालुक्य साम्राज्याची राजधानी असलेले हे बदामी शहर पूर्वी वतापी म्हणून प्रसिद्ध होते. पुलकेशी पहिला ह्या चालुक्य राजाने बदामी हे स्थान वसवले.
पुढे त्याचा मुलगा किर्तीवर्मन पहिला ह्याने ह्या बदामी लेण्या कोरून घेतल्या. पुढे चालुक्य साम्राज्य संपवून दंतीदुर्ग ह्या राष्ट्रकूट साम्राज्यातील राजाने इथे जैन मंदिरेही बांधून घेतली.
लाल लाल दगडांचे डोंगर फोडून एकाच कातळात कोरलेल्या ह्या लेण्या बघायला लांबून पर्यटक येतात. मुख मंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी रचना असलेली मंदिरे इथे लेण्यांच्या आतमध्ये कोरलेली दिसून येतात.
पहिली लेणी शिव मंदिर आहे. येथील शिवतांडव हे कोरीव शिल्प शिवाचे नटराज रूप दर्शवते. त्या बाजूला गणेश आणि नंदीचेही दर्शन होते.
त्याच मंदिरात महिषासुरमर्दिनीचे शिल्प आणि मोरावर स्वार असलेले कार्तिकेय भगवंताचे शिल्प देखील आढळून येते. यक्ष आणि अप्सरांची कोरीव शिल्प लक्ष वेधून घेतात.
दुसरी आणि तिसरी लेणी विष्णू मंदिर आहे. येथे विष्णूच्या अवतारातील वामन, वराह इत्यादी कोरीव शिल्पे पाहायला मिळतात. विष्णुपुरणातील प्रसंग देखील कोरलेले दिसून येतात.
तर चौथी लेणी जैन मंदिर आहे. जिथे पार्श्वनाथ, महावीर आणि बाहुबलीची शिल्पे आढळून येतात..
बदामी लेण्यांजवळ असलेले अगस्त्य तीर्थ ह्या तळ्याकाठी बांधलेले भूतनाथ मंदिर देखील आवर्जून पाहण्यासारखे आहे.
येथे बौद्ध मंदिरे, वेगवेगळ्या प्रेक्षणीय गुहा सुद्धा आवर्जून पाहण्यासारख्या आहेत.
पट्टडकल, ऐहोले आणि बदामी येतील सगळी हिंदू मंदिरे द्राविडी स्थापत्य पद्धतीने बांधण्यात आली आहेत. काळाच्या ओघात आणि परकीयांच्या आक्रमणात मंदिरांची नासधूस झालेली असली तरी सुंदर कलाकुसर, कोरीव शिल्प तिथे अजूनही बघायला मिळतात.
कधी कर्नाटकात जायची संधी मिळाल्यास बागलकोटला जाऊन ह्या तीनही मंदिरांच्या समूहांना खास वेळ काढून आवर्जून भेट द्या…!!
Image Credit: YouTube, Rati Unravels
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
🙏