पाऊस, मी आणि …….?

माळावरचा धीरगंभीर पाऊस कोसळत राहायचा अखंडपणे.

त्याचा तो विशिष्ट आवाज अन् मातीशी होणारी अवखळ भेट कितीदा पाहत राहायचो माजघरातल्या खिडखीतून.

हवेत आलेला गारठा पांघरून… गुडघ्यावर मान टेकवून कितीदा हरवत जायचो त्याच्यामध्ये. आकाशात ढग जमा होऊ लागले कि एक अनामिक हुरहूर लागायची आणि मीही धीरगंभीर होत जायचो वातावरणासारखा.

खरंतर पाऊस किती आल्हाददायक, अवघं चराचर आपल्या सरींनी धूऊन काढणारा, स्वैर, स्वच्छंदी पाहुणा, आपल्या आगमनाने सगळ्या सृष्टीत आनंद पेरणारा एक अवलिया. मला मात्र तो कमालीचा धीरगंभीर वाटायचा याचं कारण आजही सापडत नाही. का बंर असं असेल?

छतावर टपटप वाजणारे पावसाचे टपोरे थेंब, त्यातून उसळणारं बेभान पण लयबद्ध संगीत, दूरवरच्या माळावर कोसळताना भासणारा त्याचा पांढरा रंग आणि माझी तंद्री. किती जबरदस्त कॉम्बिनेशन राहायचं. कोणी कितीही हाक मारल्या तरी कानावर यायच्या नाहीत. कुणी फिरकायाचाही नाही माझ्याकडे.

मी मात्र मस्त एन्जॉय करायचो माझा पाऊस. मनभरून कोसळल्या नंतर पाऊस चालू लागायचा त्याची वाट हळूहळू. तसा मी पुन्हा असवस्थ होत जायचो. पण हि अस्वस्थता वेगळीच असायची. कुणी अगदी जवळचा सोडून जातोना अगदी तशीच…

खरंतर आज हे सगळं आठवताना हसू येत माझं मलाच. माझी अस्वस्थता मला ढकलत न्यायची घराबाहेर आणि मी शोधू लागायचो नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या पाऊल खुणा….

पाऊस पडल्यानंतर घर पुन्हा सुरू व्हायचं नेहमीप्रमाणे. जो तो आपापली कामे हाती घेऊन चालू लागायचा. मी सगळ्यांची नजर चुकवून हळूच चोरपावलांनी चालता व्हायचो माळा कडे. जागोजागी साचलेल्या गढुळ पाण्याचे डबके चुकवून माझ्याच तालात चालत राहायचो दूरपर्यंत. अगदी निर्मनुष्य ठिकाणी. किती शांत वाटायची मोठी झाडे सुद्धा.

वाऱ्याची हलकीशी झुळूक स्पर्श करायची पानाफांद्यांना अन् पाऊस पडल्याचा भास व्हायचा. किती मऊ वाटायचा तो भास. खरंतर पावसाची मज्जा अनुभवण्यासाठी मी हटकून जवळ करायचो असी झाडं. काळजाच्या कपारीतून दुखः टीपकाव तसं थेंब टपकत राहायचे त्यांच्या पानांतून अन् लगेच मिसळूनही जायचे ओल्याचिंब मातीत आपलं अस्तित्व विसरून.

कुणा शेतकऱ्याच्या बांधाचा पावसाने केलेला तमाशा खटकुनही जायचा मनाला. पण क्षणभरच. गालातल्या गालात हसून पुन्हा वाट सोबत करायची माळा पर्यंत. माळा वरती आल्यावर पाणीच पाणी नजरेस पडायचं. दूर डोंगरावरून अखंडपणे पडणाऱ्या पांढऱ्याशुभ्र धारेचा आवाजही समुद्राचा भास द्यायचा. काळ्याकभिन्न खडकावर मावळतीकडे गेलेल्या सूर्याशी पाठ देऊन शोधत राहायचो माझीच सावली दूरवर पसरत गेलेली.

हाताशी आलेले मातीमिश्रीत दगड कितीतरी वेळ चाळवत राहायचो. हात चिखलाने माखून जायचे . मग एक एक करत भिरकावून द्यायचो डबक्यात. दोन्ही हात खडकावर टेकून उभा राहायचो. अगदी म्हाताऱ्या सारखा. खरंतर खूप जड व्हायचं उठायला. पण नाविलाज. सुर्य झुकायाचा आणि काळोख पसरू पाहायचा. पावसात नखशिखांत न्हालेल्या कुणा गुराख्याच्या सोबतीन घराकडे चालू लागायचो. खूप एकटा होतो त्या दिवसात पाऊस सोबत करायचा. बरं वाटायचं.

कविता वैगरे काही सुचली नाही त्यावेळी. पण अस्वस्थ राहायचो कमालीचा. पुढे एम. ए. साठी फर्ग्युसन ला निघालो. घर गाव सोडताना गलबलून आलं. गावाकडचा पाऊसही सुटला. पुण्यासारख्या महानगरीय लोकांसारखाच पाऊसही तिरसट असेल असा अंदाज घेऊन निघालो. पण अंदाज चुकीचा ठरला.

फर्ग्युसन मुळात मुख्य शहरात असूनही धीरगंभीर. मोठ्या टेकडीने केलेली त्याची पाठराखण खरंतर भाऊन गेली पहिल्या भेटीतच. अन् मीही रेंगाळत गेलो पायथ्याशी. सुदैवानं आमचे लेक्चर्सही टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्या इमारतीत व्हायचे. अगदी झाडाझुडपात. तिथेही बिचारा पाऊस येरझाऱ्या घालत राहायचा. लेक्चर्मधलं लक्ष त्याच्याकडे लागायचं. परकं वाटलंच नाही कधी फ़र्गुसन्मधे. करमून गेलं .

‘My heart leaps up when I behold rainbow in the sky”. असा काहीतरी Wordsworth नावाच्या अवलिया चा संदर्भ ऐकला मॅडमच्या तोंडून आणि एकदम सोयराच वाटला मला तो. पडत्या पावसात झालेली तिची माझी पहिली भेट किती थेटपणे रुतून बसलीय काळजात. मला आवडणारा पाऊस तिच्याही आवडीचा झाला आणि कितीतरी ओल्याचिंब भेटींचा साक्षीदार बनला. पुढं नोकरीनिमित्त पुणं सुटलं आणि सर्वच मिटलं. आता मी

असतो, पाऊस असतो पण….? प्रत्येक पावसाळा आला कि ढग असे भरून येतात, बरसून जातात अन् उरते फक्त जीवघेणी घालमेल… कशासाठी कुणासाठी…. सगळंच अनुत्तरीत…..


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “पाऊस, मी आणि …….?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।