पुराणांमध्ये एक गोष्ट मजेशीर गोष्ट आहे.
एकदा डाव्या हाताने उजव्या हाताशी जोरदार आणि खडाजंगी भांडण केलं, डाव्या हाताने रागारागाने सर्वांना सवाल केला, “कुठल्याही शुभ कार्याला उजव्या हातालाच मान का? त्याच्यापुढे मला सतत गौण स्थान का?”
सगळेजण डाव्या हाताची समजुत घालत होते, पण तो मात्र प्रचंड चिडलेला होता, त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणापाशीही नव्हतं!
संतापलेला डावा हात, तणतणत आपलं गाह्राणं घेऊन देवापाशी गेला, देवाने डाव्या हाताला हसत हसत उत्तर दिले, “तु कनिष्ठच राहीलास, कारण दान देताना तु कधीही पुढाकार घेतला नाहीस.”
मित्रांनो, ह्या जगात दोन प्रकारचे लोक बघायला भेटतात, ‘देणारे’ आणि ‘घेणारे’!
विंदा आपल्या कवितेत म्हणतात, तसं, देणारे देतच राहतात, त्याबदल्यात त्यांना अतुलनीय आनंद मिळतो.
कोणी जगाला प्रेम देतो, कोणी गरजुंना पैशाचं, वस्तुचं दान देतो…..
कोणी तहानलेल्यासाठी पाणीपोई उघडुन तडफडणार्यांची तहान भागवतो, कोणी अन्नछत्र उघडुन भुकेलेल्यांचा आत्मा तृप्त करतो.
देण्यार्याचं उत्तम उदाहरण म्हणजे निसर्ग!
झाडाचचं उदाहरण घ्या ना….. झाडे माणसाला ऑक्सीजन देतात, झाडं वाटसरुंना सावली देतात, भाविकांना सुगंधी फुलं देतात, भुकेलेल्यांना चवदार आणि व्हिटॅमिन असलेली फळं देतात, ढगांना थंड हवा देऊन थांबवतात, आणि आपला मित्र पाऊस ह्याला थांबवायला भाग पाडतात, आणि मनसोक्त बरसवण्यासाठी आग्रह करतात.
आणि माणसं त्याला तोडायला आली की शेवटी हसत हसत त्याला आपलं सर्वस्व असलेलं खोड, फांद्या असलेलं, लाकुडही देतात, कृतघ्नी माणसं मात्र निर्लज्जपणे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांची कत्तल करतात.
असंच एक डोळ्यात पाणी आणणारं बलिदान म्हणजे सैनिक! ते देशासाठी संपुर्ण आयुष्य देतात, स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, महत्वकांक्षा, मौजमजा बाजुला ठेवतात, देशातले लोक कितीही कृतघ्न असले तरीही भारतमातेला डोळ्यासमोर ठेवुन, आपला अनमोल जीव देतात, त्यांचा परिवारही खरा बहादुर असतो, कारण ते आपला जीवाभावाचा माणुस देशावर ओवाळुन टाकतात.
संत, महापुरुष कसल्याही अपेक्षेविना जगावर प्रेमाचा वर्षाव करतात. ते ज्ञान देतात, विश्वालाच आपलं घर समजुन इतरांना आनंदी भारमुक्त बनवुन त्यांची दुःखे आणि चिंता स्वतः झेलतात.
‘देणं’ ही जगातली सर्वात सुंदर कृती! देणारे कधीही फायद्यात राहतात. जसं की आपल्या हाताने अत्तर दुसर्याला लावलं की नकळत त्याचा सुगंध दिवसभर आपल्याही हाताला दरवळतो.
देणार्यांना भरभरुन मिळतंसुद्धा, छानसं स्मितहास्य दिलं की समोरुनही मनःपुर्वक स्वागत होतं, आपलेपणाने मदतीचा हात दिला की ह्र्दयपुर्वक आभार आणि सकारात्मक स्पंदने मिळतात, आपलेपणा, जिव्हाळा आणि प्रेम दिलं की भरभरुन कित्येक पटीने हे सगळं वापस येतं….
परवा आमच्या रोटरी क्लबने केरळ पुरग्रस्तांसाठी रस्त्यावर, मार्केटमध्ये, दुकांनामध्ये जाऊन, गल्ल्यांमध्ये फिरुन निधी जमवला, त्यात एका भिकार्याने मदत ड्ब्यात पैसे टाकले, आणि त्यावेळी त्याच्या चेहर्यावर ओसंडून आनंद वाहत होता.
‘देणारे’ कॅटॅगिरी नेहमी आनंदात असते, जवळचे, पदरचे, हक्काचे देऊनही त्यांना कसं काय आनंद मिळतो, असा प्रश्न आपल्याला पडतो, ‘देणं’ ही कृतीच इतकी सुंदर आहे की, दिल्याने आपोआपच आतमधुन सात्विक आनंदाचा झरा खळखळ वाहु लागतो!
याउलट एक दुसरी जमात असते, हे असतात, ‘घेणारे कॅटेगिरी’!
ह्यांचा भर घेण्यावर असतो, ह्यांना सरकारकडुन सर्व प्रकारच्या सुविधा पाहीजे असतात, त्यासाठी आंदोलनं करण्याची ह्यांची तयारी असते. ह्यांना सबसिड्या पाहीजे असतात, रिझर्व्हेशन पाहीजे असतात, कसल्याही मोफत स्कीम आल्या की रांगा लावण्यात हे सर्वात पुढे असतात.
‘घेणारे’ ह्या कॅटॅगिरीचे लोकं, हवं ते मिळवण्यासाठी कधी भांडतात, कधी दरडवतात, कधी ओरडतात, कधी चोरतात, कधी रडतात, कधी कुटील डावही खेळतात.
हे कधी चांगले चालणारे सहकारी साखर कारखाने बंद पाडतात, तर कधी नफ्यात चालणार्या सहकारी बॅंका दिवाळखोरीत काढतात. कधी आपल्या मार्केट कमिट्यांमध्ये चलाखी करुन भाव पाडतात, कधी लालच दाखवुन दुसर्यांच्या मेहनतीचा पैसा रातोरात पळवुन गायब होतात.
कधी एटीएम फोडुन पैसे पळवतात, कधी ऑनलाईन डल्ले मारतात….
घेणारे कधी अडवणुक करुन लाच घेतात, कधी समोरच्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमिशन घेतात. यांच्यामध्ये जसे दोन रुपये किलो राईस खाऊन आळशी झालेले येतात, तसेच मेडीक्लेम आणि इन्शुरंसचे खोटे क्लेम बनवुन पैसे लाटणारे सो कॉल्ड धनाढ्यही येतात.
पण शेवटी ‘माझं ते माझं, आणि तुझंपण माझं’, ही वृत्तीच त्यांचा घात करते, आयुष्यात कितीही मिळाले तरी काही केल्या, यांचे समाधान काही होत नाही,
उलट ह्यांच्यामध्ये ओरबाडण्याची सवय लागल्याने, हे ऐतखाऊ आणि आळशी होतात, यांची बुद्धी आपोआपच मंद होते, फुकट घेण्याची वृत्ती यांच्या प्रगतीच्या आड येते, यांच्या नकळतच हे इतरांचा द्वेष करु लागतात, तर इतरांबद्द्ल असलेली, ईर्ष्येची आग यांना आतमधुन पोखरते, कणाकणाने जाळुन टाकते.
आपल्या आयुष्यात आपण कोणती कॅटॅगिरी निवडुन आपलं आयुष्य जगावं, ते आपणच ठरवतो.
दोन्ही हाताने भरभरुन देऊन, ‘देण्यामधला’ आनंद मिळवायचा की तोच हात पसरुन दुसर्याकडुन मागुन किंवा हिरावुन घ्यायचे, ही निवड आपणच करायची असते.
शेवटी ‘पेराल तेच उगवते’, हाच नियतीचा नियम आहे.
आपण सगळे ‘देणारे’ ह्या स्पेशल कॅटॅगिरीतले होवुन, जगण्याचा प्रत्येक क्षणी, प्रसन्न होवुन, आनंद घेऊ, अशा मनःपुर्वक शुभेच्छा!
धन्यवाद!
वाचण्यासारखे आणखी काही प्रेरणादायी ….
जितकी मोठी स्वप्ने, तितके मोठे यश!…
आयुष्याकडे बघण्याचा आनंदी दृष्टिकोण
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.