आज बाजारात झेंडूची फुले आणण्यासाठी गेलो, फुले छान होती, जोरात विक्री सुरू होती. फुलं विक्रेते प्लॅस्टिक पिशवी काढून देत होते, ग्राहक आपल्या आवडीची फुले निवडत होती, प्लास्टिकच्या पिशवीत भरत होती, विक्रेता मोजून देत होता. ग्राहक स्वस्त, टवटवीत व सुंदर फुलं घेऊन घरी परतत होती. वा काय दृश्य होते, काही लोकं म्हणतील यात काय ते सुंदरता? आहे ना! काही दिवसांपूर्वी आपल्या राज्यात प्लास्टिक बंदी चा खरोखर दूरदर्शी निर्णय शासनाने घेतला होता. शासनाच्या त्या अतिशय चांगल्या संकल्पावर झेंडूची फुले फिरवून पार आपलं झेंडूत्व सिद्ध होत होतं.
त्याने मलाही प्लास्टिकच्या पिशवीत फुलं मोजून दिली मी ती पिशवी त्याला परत केली, जवळच्या कापडी पिशवीत फुलं घेतली व त्याला पैसे देऊ लागलो, (मी फार तिर मारले असं माझे आजिबात सांगणं नाही) सुरवातीला, मी परग्रहाहून आल्यासारखा तो बघू लागला. नंतर त्याला काही जाणीव झाली असावी “लोकं प्लास्टिक पिशवीच मागतात काय करावं?” असे सांगून त्याने त्याच्यापुरता हा प्रश्न सोडवला आणि मला अनेक प्रश्न देऊन मोकळा झाला. शासनाने आदेश काढावे आपण त्याची खिल्ली करावी, चांगले आदेश धुळीस मिळवावे, वरून शासन काम करत नाही म्हणून ओरडावे. शासनाने खरंच काम केले तर आपली पार गोची होईल.
PM, CM प्रामाणिक पाहिजे ते प्रामाणिक असले की देश तात्काळ अमेरिका होईल, जपान होईल या भाबळ्या आशेवर किती दिवस जगणार आहोत आपण? झेंडूची फुले घेऊन, तुझ्याच कडून भाजीही घेतो म्हटले तर त्यानेही दाबून ठेवलेली प्लास्टिक पिशवी बाहेर काढली. सर्व गम्मत आहे आपली, कोणी तरी सुपरपुरुष यावा व त्याने सर्व आलबेल करून द्यावं या भ्रमात जगत राहायचं. मग आपल्याला गुलाबाची सांगून झेंडूचीच फुलं मिळत राहणार आपली तीच योग्यता असावी. खरेदीला निघतांना एक पिशवी न नेऊ शकणारा नागरिक खरंच मतदान तरी जबाबदारीने करत असणार का?
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.