मुलांना वाढवणे हे काम एखादी कला साकारणे यापेक्षा कमी नसते.
मुले जन्माला येतात तेव्हा कोरी पाटी घेऊन येतात, पण त्यावर आपण आपल्या शिकवणीचे, संस्काराचे धडे त्यांना गिरवायला शिकवतो.
मुलांना वाढवण्यात त्यांची तब्येत, त्यांचे शिक्षण हे जितके महत्वाचे असते तितकीच महत्वाची त्यांची विचार करण्याची पद्धत असते.
आपल्या हातून एक सुसंस्कृत, विचारी व्यक्ती घडावी ही सगळ्या पालकांची इच्छा असते, आणि असावी सुद्धा.
आईवडील जशी वाढवतील तशी मुले वाढत जातात. मुलांना योग्य दिशा दाखवणे, ती भरकटल्यावर त्यांना हात धरून योग्य मार्गावर आणणे हे काम पालकांचे असते.
हे करताना मुलांना चांगल्या पद्धतीने विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यांना नकारात्मक विचार, भावना यापासून शक्य तितके दूर ठेवणे, हे जबाबदार पालकांनी सांभाळले पाहिजे.
मुलांचे मन जितके निरागस असते तितकेच कमकुवत असते.
एखाद्या लहानशा गोष्टीचा सुद्धा त्यांच्या मनावर लगेच परिणाम होऊ शकतो.
त्यांना एखादी गोष्ट जमली नाही, जसे की एखादे चित्र काढायला जमत नसेल, पेन्सिल हवी तशी फिरवता येत नसेल तर त्यांचा आत्मविश्वास लगेच डळमळीत होऊ शकतो.
त्यांना चित्रकलेबद्दल भीती बसू शकते. त्यांच्या मते एखादी गोष्ट असते किंवा नसते..
त्यांना एखाद्या गोष्टीचे चटकन वाईट वाटू शकते. बोलणाऱ्याच्या लक्षात सुद्धा येणार नाही असा नकळत परिणाम त्यांच्या मनावर होऊ शकतो.
आपल्या पेक्षा दुसरा मुलगा एखाद्या कलेत किंवा विषयात जास्त हुशार असेल तर त्यांना स्वतःबद्दल एक कॉम्प्लेक्स येण्याची शक्यता असते.
बऱ्याचदा आपण मोठी माणसे सुद्धा अशा नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकून राहतो.
पण या लहान मुलांमध्ये तर कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करण्याची क्षमता अजून आलेली नसते.
पालक म्हणून त्यांना तसा विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे ही आपली जबाबदारी आहे.
मुलांना दर वेळी आपल्या नजरेखाली ठेवणे शक्य नाही आणि ते करू ही नये.
पण यामुळे मुले बाहेर असताना काय बघतील, काय वाचतील, हे आपण सांगू शकत नाही.
अशा अनेक गोष्टींच्या त्यांच्या नाजूक मनावर परिणाम होण्याची शक्यता असते.
त्यामुळे मुलांना त्यांचे मन मोकळे करता यावे अशी हक्काची जागा आईबाबांनी त्यांच्यासाठी निर्माण केली पाहिजे.
त्यांच्या मनातले वादळ जर मनातच राहिले तर ते त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरेल.
याउलट जर त्यांची पालकांशी मनमोकळी चर्चा घडत असेल तर त्यांच्या मनातली नकारात्मकता दूर करणे शक्य होईल.
तसेच मुलांना त्यांची स्वतःची बाजू मांडता यायला हवी.
एखादी गोष्ट हवी असेल तर ती ठामपणे मागता यायला हवी तसेच त्यांना काही नको असेल, काही काम अंगावर घ्यायचे नसेल तर त्यांनी परस्पर ते निस्तरायला हवे.
प्रत्येक वेळी त्यांना त्यासाठी आईबाबांची गरज लागता कामा नये कारण त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे कधीच विचार वा कृती करता येणार नाही.
कधी कधी तर मुलांना नवनवीन गोष्टी करून बघायच्या असतात, पण त्यांना भीती वाटत असते, अशा वेळी त्यांना गरज असते ती एका ‘पुश’ची.
त्यांचे प्रोत्साहन वाढवणे अशा वेळी महत्वाचे असते.
वरील उदाहरणे वाचून आपल्या लक्षात आलेच असेल की वाढत्या वयात वेगवेगळे अनुभव गोळा करताना मुलांना अनेक अडचणी येऊ शकतात.
मुलांच्या या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल आत्मविश्वास वाटावा, त्यांना स्वतःबद्दल चांगला आणि सकारात्मक विचार करता यावा, एखाद्या गोष्टीत ठामपणे मत मांडता यावे, मनात नकारात्मक विचार येऊ नयेत, मन मोकळे करायची सवय लागावी आणि त्यांना वेळोवेळी हवे असलेले प्रोत्साहन मिळत राहावे यासाठी आम्ही या लेखात काही अफर्मेशन्स घेऊन आलोय.
अफर्मेशन्स म्हणजे अशी काही वाक्ये जी सतत म्हटल्याने, स्वतःला सतत बजावल्याने त्याचा आपल्या मनावर सकारत्मक विचार होऊ लागतो.
आपण ती वाक्ये सतत घोकली तर आपल्या डोक्यात तेच चालू राहून आपली विचारांची दिशाच बदलते आणि त्यामुळे अनेक अडचणी दूर होतात.
या लेखात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मुलांना कोणती अफर्मेशन्स मदत करतील, त्यांचे वेगवेगळ्या दिशेला धावत असलेले विचार एकत्र घेऊन येतील हे दिले आहे.
मुलांना रोज ही वाक्ये म्हणायला सांगून आपण त्यांच्यामध्ये ही उर्जा पेरत असतो, त्यामुळे त्यांच्या विचारात आणि आचरणात या वाक्यांचा परिणाम दिसून येऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल, सकारात्मकता वाढेल आणि स्वतःबद्दलचे दुराग्रह कमी होतील.
थोडक्यात ही अफर्मेशन्स रोज म्हटल्याने, त्यांची सतत उजळणी करत राहिल्याने ती जास्तीतजास्त यशस्वी होतील.
अ. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना या वाक्यांची उजळणी करायला सांगा :
१. माझ्यात नवनवीन कामे करण्याची क्षमता आहे.
२. मला प्रत्येक गोष्टीतून, मग ती चूक का असेना, शिकण्यासारखे काहीतरी मिळत असते आणि मी प्रत्येक चुकीतून धडा घेऊन पुढे जात राहणार.
३. प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी यायला हव्यात असे नाही. काही लोक गणिते चागली सोडवतात तर काही नवीन भाषा पटकन शिकतात.
४. एकदा प्रयत्न करून जमले नाही तरी प्रयत्न सोडायचे नाहीत.
ब. मुलांना स्वतः बद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी (अपयश पचवताना मुलांनी स्वतःला दोष देऊ नये यासाठी)
१. मला एखादे काम जमले नाही तरी इतर अनेक कामांमध्ये मी कुशल आहे. तसेच मी प्रयत्न केले तर मला न जमणाऱ्या कामांमध्ये सुद्धा मी कुशल होऊ शकतो.
२. मी स्वतःबद्दल सतत चांगला विचार करेन, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढेल.
३. मला सगळीच कामे जमली नाही तरी चालेल पण जी कामे जमतात ती मी मन लाऊन केली पाहिजेत.
४. सगळे दिवस चांगले नसतात. काही वेळा माझ्या मनासारखे होईल तर काहीवेळा मला हवा तसा माझा दिवस जाणार नाही.
क. त्यांचे म्हणणे ठामपणे मांडता यावे यासाठी
१. मला एखादी गोष्ट करायची नसेल तर त्यासाठी नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार मला आहे. माझ्यावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही.
२. मी मोठ्यांना सुद्धा, उद्धटपणा न करता, चांगल्या शब्दात एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणू शकतो.
३. मला गरज वाटली तर कोणाचीही मदत मागायला मी लाजणार नाही.
४. मी माझे वागण बदलू शकतो पण लोकांनी काय करावे आणि काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे.
ड. मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी
१. मी सगळी कामे मनापासून करतो आणि एकदा हातात घेतलेले काम पूर्ण करतोच.
२. प्रयत्न करून मी अवघड कामे सुद्धा पूर्ण करून त्यात यशस्वी होऊ शकतो किंवा शकते
३. मला नवीन गोष्टी शिकायला आवडते.
४. मला अडचणी आल्या, काही जमले नाही तर मी इतरांकडून मदत मागून, शिकून पुढे जाईन पण एकदा हातात घेतलेले काम सोडणार नाही.
क. मुलांना स्वतःचे मन मोकळे करता यावे यासाठी
१. मला जे वाटते ते बोलण्यासाठी मला आई-बाबा, आजी-आजोबा, मित्र आहेत. त्यांच्याबरोबर मी माझ्या मनातले बोलू शकतो.
२. वाईट वाटले, राग आला, तरी मी शांतपणे माझे म्हणणे मांडू शकतो.
३. मला जर कोणाशी बोलावेसे वाटले नाही, काही वेळ एकटे बसावेसे वाटले तर मी तसे सगळ्यांना नीट सांगू शकतो म्हणजे सगळे मला समजून घेतील..
मुलांचे मन एकदम हळवे असते.
त्यांना जर त्यांचे मन मोकळे करता आले नाही तर या भावना त्यांच्या मनात साठत जातात आणि मग त्यांना अगदी असह्य झाले की त्या चुकीच्या मार्गाने बाहेर पडतात.
वरची सगळी अफर्मेशन्स या न त्या प्रकारे त्यांचे मन मोकळे करण्यासाठी, त्यांची उर्जा योग्य ठिकाणी खर्च व्हावी यासाठी उपयुक्त आहेत.
मुलांनी ही वाक्य रोज म्हटली, सतत वाचली किंवा त्यांच्या डोळ्यासमोर राहिली तर ती त्यांच्या मनात पेरली जातील आणि अडीअडचणीच्या वेळी, एखाद्या अवघड प्रसंगात कसे वागायचे हे त्यांना अपोआप उमगेल.
यासाठी ही वाक्ये त्यांच्या टेबल जवळ, कपाटावर लिहून चिकटवण्याचा पर्याय चांगला आहे…
मुलांच्या वयानुसार त्यांच्या आवडीनुसार एक छानसा चार्ट तुमच्या मदतीने त्यांच्याकडून बनवून घ्या.
या ‘किड्स अफर्मेशन्स ऍक्टिव्हिटी’ चा फोटो काढून पाठवा.
त्यातले तीन क्रिएटिव्ह फोटो आपण मनाचेTalks वर मूल आणि पालकांचे नाव देऊन प्रसिद्ध करू.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.